घरफिचर्ससारांशस्थिर राजकीय वातावरण आणि शेती विकास!

स्थिर राजकीय वातावरण आणि शेती विकास!

Subscribe

सरकार दोलायमान असल्यास कृषी विकासाच्या ध्येय-धोरणात सातत्य राहत नाही. शेती खात्याचे मंत्री बदलल्यामुळे नवीन शासनात नवीन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जुने निर्णय बदलले जाण्याची भीती असते. केवळ प्रतिष्ठा म्हणून काही नवीन निर्णय लागू केले जाण्याची भीती असते. जुन्या गोष्टी मोडीत काढून नवीन लागू केल्या जातात किंवा जुन्या गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल केले जातात. त्यात शेतकरी भरडला जातो.

– प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

कृषी विकासात समाजातील प्रत्येक घटकाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. त्यातील काही घटक हे प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष परिणाम करणारे असतात. या सर्व घटकांच्या प्रयत्नावरच शेतीचा विकास अवलंबून असतो. शेती विकासातील महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून राजसत्तेकडे किंवा राजकीय वातावरणाकडे पहिले जाते. त्या राज्यातील किंवा देशातील राजकीय वातावरण हे अस्थिर असेल तर त्याचा परिणाम शेतीच्या प्रगतीवर होतो. हे वातावरण शेती विकास प्रक्रियेतील मोठी समस्या ठरते.

- Advertisement -

देशाची किंवा राज्याची मध्यवर्ती शासन यंत्रणा ही स्थिर स्वरूपाची असावी. आज आपल्याला ही यंत्रणा स्थिर  स्वरूपाची मिळालेली असली तरी यापूर्वी ही यंत्रणा नेहमीच अशी होती असे नाही. अनेकदा केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी सरकार चालवताना दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त पक्षांनी एकत्र येऊन सरकार चालवलेले होते. सरकारमध्ये एकापेक्षा अधिक पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत असतील तर वैयक्तिक किंवा पक्षीय मतभेद विकोपाला जाऊ शकतात, सरकार दोलायमान होते.

सरकारचा पाठिंबा काढला जाऊ शकतो. याचा त्या राज्याच्या, देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. कृषी विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्याने अडचणी येतात. कृषी विकासाच्या ध्येय-धोरणात सातत्य राहत नाही. शेती खात्याचे मंत्री बदलल्यामुळे नवीन शासनात नवीन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जुने निर्णय बदलले जाण्याची भीती असते. केवळ प्रतिष्ठा म्हणून काही नवीन निर्णय लागू केले जाण्याची भीती असते. जुन्या गोष्टी मोडीत काढून नवीन लागू केल्या जातात किंवा जुन्या गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल केले जातात. त्यात शेतकरी भरडला जातो.

- Advertisement -

शेती विकास हा केंद्र शासन, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या विविध पातळ्यांवर महत्त्वाचा विषय आहे. या विविध पातळ्यांवर वेगवेगळ्या पक्षांची सरकारे असतील किंवा अनेक पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलेले असेल तर पक्ष प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा वातावरणात केंद्र शासनाने सुरू केलेल्या अनेक शेती विकास योजना ग्राम पातळीपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे शेती विकास योजनांवरील नियंत्रण चांगल्या प्रकारे करण्यात अडचणी येतात.

स्थिर शासन असूनही मंत्रिमंडळात सतत खांदेपालट होत असेल तरीदेखील शेती विकासात अडचणी येतात किंवा शासन स्थिर असूनही कृषिमंत्री बदलले तर नवीन महोदयांना कामास वेग घेण्यास थोडाफार वेळ लागणारच हा साधा नियम आहे. एकूणच राजकीय वातावरण हा शेती विकासासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यातील राजकारणाचा अप्रत्यक्ष परिणाम शेती विकासावर होतो. केवळ राजकारणासाठी राजकारण न करता केवळ शेती विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पातळ्यांवर प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -