हरवलेली गुणवत्ता शोधण्याचे आव्हान !

कोरोनाच्या कालावधीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्याची गुणवत्ता खालावलेली आहे. ती भरून काढण्यासाठी शासनाने हे वर्ष विविध उपक्रमाची अंमलबजावणी करून गुणवत्ता उंचावण्यासाठी ‘गुणवत्ता वृध्दी वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे हरवलेली गुणवत्ता उंचावण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. वर्गातील अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाचा विचार करण्याबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेशी जोडून ठेवण्याचे मोठे आव्हान शाळांसमोर आहे. केवळ विद्यार्थ्यांची अध्ययन क्षती झाली असे नाही तर अभ्यासाची वृत्ती कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अध्ययन क्षती झाली आहे. शासनाच्या अहवालांसह अनेक संस्थांच्या अहवालांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने प्रवास घडवायचा असेल तर पावले उचलावी लागणार होती. स्थानिक पातळीवर शिक्षक, शाळा, व्यवस्थापन समिती, स्थानिक प्रशासन आपापल्या स्तरावर कार्यक्रम अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत. राज्य म्हणून शासनानेदेखील गंभीर पावले उचलली आहेत. शासनाने हे वर्ष विविध उपक्रमाची अंमलबजावणी करत गुणवत्ता उंचावण्यासाठी गुणवत्ता वृध्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे हरवलेली गुणवत्ता उंचावण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. वर्गातील अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाचा विचार करण्याबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेशी जोडून ठेवण्याचे मोठे आव्हान शाळांसमोर आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षती झाली असे नाही तर अभ्यासाची वृत्ती कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने सूचित केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून किमान पायाभूत स्वरूपाच्या संकल्पनाचे भरण होईल आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणापासून दुरावलेपणा दूर करण्यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे.

कोरोनाने झालेले नुकसान भरून काढण्याबरोबर त्याकाळात विविध कारणांमुळे विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. त्यांना शाळेत दाखल करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी शून्य शाळाबाह्य विद्यार्थी मोहिमेतून सुरू केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नियतकालिक मूल्यमापनाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहीमेच्या दृष्टीने गुणवत्ता वृध्दी वर्षात प्रयत्नासाठी पावले टाकली जाणार आहेत. देशातील प्रत्येक मूल शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीच्या अखेरीस आवश्यक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करेल असे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. ज्या मुलांनी भाषा व गणिताची पायाभूत कौशल्ये प्राप्त केलेली नाहीत, त्यांना आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक शिक्षक मार्गदर्शन आणि सहाय्य, सहाध्यायींकडून मदत आणि वयानुरूप व पूरक श्रेणीबद्ध अध्ययन साहित्याच्याव्दारे शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रीय करण्याची गरज आहेच.

कुटुंब व परिसरातील भाषा वापरातून मौखिक भाषेचा विकास शाळापूर्वस्तरावरील प्रारंभिक भाषा आणि साक्षरता यांच्या विकासासाठी शालेय भाषेचे योग्य अभिव्यक्तीसह प्रकटीकरण आणि त्यासोबत चांगले श्रवण व आकलन कौशल्य, मुद्रित आणि ध्वनीविषयक जागरूकता विकसित करणे महत्वाचे आहे. राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या १०० टक्के विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषिक साक्षरता व गणितिय कौशल्य व क्षमता विकसित होण्यासाठी पावले टाकण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सध्या पहिलीत दाखल मुले ही तशी अंगणवाडीत गेलेली नाहीत. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेणे सहजसुलभ व्हावे. त्यांना विकासासाठी योग्य प्रारंभिक शिक्षण अनुभव देणे, यासाठी विविध खेळ, कृती, उपक्रमाचे आयोजन शाळांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी या शैक्षणिक वर्षात सुरुवातीस तीन महिने कालावधी असणारा विद्या प्रवेशातंर्गत खेळ व कृती यांवर आधारीत शाळापूर्व तयारी कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. त्यांने शिक्षणाशी जोडणे घडेल.

शासनाने विविध उपक्रमांचा विचार केलेला असला तरी आनंददायी अभ्यासक्रमाचा विचारही महत्वाचा ठरणार आहे. सध्याच्या काळात विविध कारणांनी लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक हिंसात्मक घटना, आत्महत्येचे प्रसंग अवतीभवती घडताना दिसतात. तसेच कोरोना संकटामुळेसुद्धा गेल्या काही वर्षात मानसिक स्वास्थ्य टिकविणे हे आव्हान आहे. तर्कसंगत विचार, कार्य करण्यासाठी सक्षम असणार्‍या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणार्‍या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आनंददायी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणातील अभिरुची वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक, संभाषण, समस्या निराकरण, ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य विकसित करणे इ. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आनंददायी कृतीचे नियोजनाबाबत बरेच काही हाती लागेल.

शेवटी सध्याच्या काळात गुणवत्ता जितकी महत्वाची आहे त्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षणांच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याचे आव्हान पेलता येणार आहे. परिषदेच्या सुरू असलेल्या या विविध प्रयत्नांमुळे परिवर्तनाची अपेक्षा करण्यास काय हरकत आहे. आनंददायी अभ्यासक्रमामुळे स्वतःमधील आनंद समजणे, आनंद मिळवता येणे आणि अनुभवता येणे यासाठी या पाठ्यक्रमात सजगता, कथा , गोष्टी, कृती, अभिव्यक्ती या चार घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन केले जाणार नाही. खरेतर शिक्षण हे सहजतेने होते. परीक्षा नावाची गोष्ट मुलांवरती अधिक ताण निर्माण करत असते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा उद्देशच मुळात ताणतणावातून मुक्ती अपेक्षित आहे. त्यामुळे अनौपचारिक मूल्यमापन व सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा विचार करण्यात आला आहे.

भटकंती हे ज्ञान प्राप्त करण्याचे प्रभावी साधन आहे. समर्थनांनी देखील त्या संदर्भात प्रवासाचे महत्व सांगितले आहे. शिक्षकांमधील कल्पकता उंचावयाची असेल तर त्यांना प्रेरणा मिळायलाच हवीच. राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी देशाबाहेरील शैक्षणिकदृष्ठ्या नवोपक्रमशील व प्रगत देश आणि भारतातील शैक्षणिकदृष्ठ्या अग्रेसर राज्यांमधील उपक्रमशील/प्रयोगशील शाळा. शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण कार्यक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक प्रयोगांचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध राज्य व देशांचा अभ्यास दौरा ही योजना राबविण्याचे सूतोवाच करण्यात आले आहेत. या भेटी राज्यातील शिक्षकांना प्रेरित करतील. खरेतर शिक्षकांची दृष्टी शिक्षणाच्या व्यापक क्षेत्राचे संदर्भाने विस्तारित होईल तर त्याचा लाभ राज्याला निश्चित होईल. घराचे पाऊल बाहेर पडताच विद्यार्थ्यांचे नाते ज्यांच्याशी बांधले जाते ती असते शाळा. त्यामुळे शाळेचे वातावरण घरासारखेच असायला हवे. त्यामुळे या वातावरणात आपुलकी आणि जवळीक निर्माण व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना गटानुसार शालेय भिंती, वर्गकोपरे आणि इतर शालेय परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरणाची उपक्रमांचे आयोजनाचा विचार करण्यात आला आहे.

शाळेचा परिसर हा अध्ययन पूरक असायला हवा. त्यादृष्टीने कबीर वाजपेयी यांनी शाळेच्या परिसराचा अभ्यासाच्या दृष्टीने उपयोग केला जाऊ शकतो हे बाला नावाच्या पुस्तकात दर्शित केले आहे. खरंतर परिसरातील अशी एकही गोष्ट नाही की, जीचा शिक्षणात उपयोग करता येणार नाही. प्राथमिक शिक्षण हाच परिसर अभ्यास आहे. त्यामुळे शाळेचा परिसरात विविध विषयातील संकल्पनावर आधारित आकृत्या, चिन्हे, संबोध दर्शविणार्‍या बोलक्या भिंती, पोस्टर, फलकलेखन करून सुशोभित करण्याचा विचार केला आहे. वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी मिळावी या दृष्टीने नाविन्यपूर्ण व कलात्मक उपक्रमांची आखणी करून अंमलबजावणी अपेक्षित आहे. आजच्या विद्यार्थ्यांपुढे भविष्यात येणारे तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणाची अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी लागणारे २१ व्या शतकातील तंत्रज्ञान आणि जीवन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना अल्पवयात उद्योजक मानसिकता निर्माण करण्यासाठी शिक्षणाची उद्योगाशी सांगड घालून विद्यार्थ्यांना विविध पर्याय आणि उपक्रम हाती घेण्याचे सूतोवाचही महत्वाचे आहे. शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेऊन विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी हेच दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचे खरे दूत आहेत. असे गुणी विद्यार्थी जिल्ह्याचे ‘शिक्षण दूत’ म्हणून काम करणार आहे. खरेतर ही योजना अत्यंत चांगली आहे. शासकीय शाळांच्या बाबतीत गेले काही वर्ष नकारात्मकता पसरविली जात आहे. गुणवत्ताहीनता म्हणजे शासकीय शाळा असे म्हटले जाते, मात्र गेल्या काही वर्षात या शाळांनी कात टाकली आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात शासकीय शाळांची गुणवत्ता उंचावलेली दिसते आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शासकीय शाळांमधील कामगिरी नेत्रदीपक आहे.

या देशातील स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक क्रांतिकारक, महापुरूष, नीतीमान राजकारणी, साहित्यिक, संशोधक, विचारवंत या शाळांनी समाजाला दिले आहेत. त्यांच्या प्रतिमा शाळांचा आवारात किमान लावल्या गेल्या तरी त्या प्रतिमा नागरिकांच्या बरोबर बालकांच्या मनात अभिमानास्पद वृत्ती विकसित होण्यास मदत करतील. त्यामुळे शिक्षण दूत योजनेमुळे या शाळांकडे पाहाण्याची दृष्टी बदलण्यास मदत होणार आहे. एका समान आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक, भाषिक पातळीवरील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जाणे निश्चितच सोपे असते. मात्र असमानता असलेल्या या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या स्तरावर आणण्याचे खरे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधून घडते आहे. नव्वद पंच्यान्नव टक्क्यांवरती प्रवेश द्यायचा आणि शंभर टक्के निकाल लावायचा यात विशेष ते काय? पण येईल त्याला शिकवायचे आणि त्याला शिकण्यासाठी तयार करत, शिक्षणाची कवाडं खुली करायची हे आव्हान या शाळा पेलत असतात. त्यामुळे या निमित्ताने शाळांच्या प्रतिमा उजळून निघाल्या तर समाज मनात बदल घडण्यास मदत होईल.