Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश संगीतरंगाचा निर्मितीकार

संगीतरंगाचा निर्मितीकार

‘अंधा युग’च्या निर्मितीत अनुस्यूत असलेल्या भव्यतेला साजेसं असं संगीत देण्याची जबाबदारी आमोद भट्ट यांना देण्यात आली होती, तोपर्यंत या माणसाच्या कर्तृत्वाची ओळख मला एका शब्दानेही नव्हती. पण आज वीस वर्षांनंतर मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा त्यांच्या सांगितिक कर्तृत्वाची उंची पाहून केवळ हरखून जायला होतं. या वीस वर्षांत कधी त्यांच्यासोबत चालत, तर कधी त्यांच्या वाटचालीचा दूरस्थ साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं, याबद्दल नियतीचे आभार मानावे तितके थोडेच ! देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या या ‘दादा’ संगीतकाराचा परिचय आपल्या मराठी वाचकांना असावा, म्हणून हा लेखप्रपंच.

Related Story

- Advertisement -

साल 2001. मी ज्या ‘संवेदना परिवार’ या नाट्यसंस्थेत काम करत होतो, तिचे अध्यक्ष निर्मल पांडे यांनी त्यांच्या मनात असलेला एक मोठा प्रकल्प तडीस न्यायचं ठरवलं. तो प्रकल्प म्हणजे डॉ. धर्मवीर भारती लिखित ‘अंधा युग’ या नाटकाची निर्मिती होय. त्याआधी, सौरभ शुक्लांनी लिहिलेल्या आणि स्वत:च दिग्दर्शित केलेल्या ‘काल’ या चेखोव्हच्या कथेवर आधारीत नाटकाचे आम्ही पंधरा सोळा प्रयोग केले होते. पण ‘अंधा युग’ म्हणजे शिवधनुष्य होतं. मोठा म्हणजे किमान चाळीसएक कलाकारांचा लवाजमा, तामझाम, मोजकंच पण सूचक नेपथ्य, पात्रांच्या अनुरूप केलेली वेषभूषा आणि ‘अंधा युग’च्या निर्मितीत अनुस्यूत असलेल्या भव्यतेला साजेसं असं संगीत, असा सगळा तो पसारा होता. खरंतर, संस्थेचं आर्थिक बळ पाहता ‘अंधा युग’ची निर्मिती म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. पण निर्मल ‘अंधा युग’ करायचंच, या ध्येयाने झपाटलेले होते. कलाकारांची जुळवाजुळव करणं तितकंसं कठीण काम नव्हतं.

पण जी आर्थिक कुमक लागणार होती त्याची मोठी जबाबदारी निर्मलने आपल्या खांद्यावर घेतली आणि ‘अंधा युग’ यशस्वीपणे मंचित केलं. तालमींच्या सुरुवातीच्या चारेक दिवसांनंतर एकदा निर्मल एका नव्या माणसाला सोबत घेऊन आले. आमच्याशी परिचय करून दिला आणि म्हणाले, आपल्या नाटकाचं संगीत दिग्दर्शनाची धुरा मी या माणसाकडे सोपवत आहे. यांचं नाव आहे आमोद भट्ट. तोपर्यंत आमोद भट्ट या माणसाच्या कर्तृत्वाची ओळख मला एका शब्दानेही नव्हती. पण आज वीस वर्षांनंतर मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा त्यांच्या सांगितिक कर्तृत्वाची उंची पाहून केवळ हरखून जायला होतं. या वीस वर्षांत कधी त्यांच्या सोबत चालत, तर कधी त्यांच्या वाटचालीचा दूरस्थ साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं, याबद्दल नियतीचे आभार मानावे तितके थोडेच ! देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या या ‘दादा’ संगीतकाराचा परिचय आपल्या मराठी वाचकांना असावा, म्हणून हा लेखप्रपंच.

- Advertisement -

रंगसंगीताचे नवे नवे सोपान पार करताना, रंगसंगीत म्हणजे एक संवाद असतो, एक उद्गार असतो, भावनांचं प्रस्फुटन असतं आणि विरामाचा स्वर असतो, असं सांगितिक तत्वज्ञान बाळगणार्‍या आमोदकृष्ण भट्ट यांचा जन्म तीस जून एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांच्या सुरूवातीच्या दिवसांतली कर्मभूमी असलेल्या भोपाळ येथे झाला. याच भोपाळमध्ये ब. व. कारंथांनी स्थापन केलेल्या ‘भारत भवन’मध्ये आपल्या ऐन उमेदीतली सोळा वर्षे त्यांनी रंगसंगीत शिकत आणि पुढे शिकवत व्यतीत केली. त्याबद्दल विस्ताराने पुढे सांगेनच. पण मूळ तेलंगणातून आलेल्या वल्लभ संप्रदायातील वैष्णवपूजक कीर्तनकार पंडितांच्या परिवाराची पार्श्वभूमी लाभलेल्या आमोद भट्ट यांना संगीताचा वारसा अनुवांशिकतेतून लाभला, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. शिवाय, ज्या द्वारकाधीश मंदिरात त्यांचा जन्म झाला, त्याची निर्मिती भोपाळच्या मुस्लीम नवाबांनी आपल्या मशिदीच्या विटा रचून केली होती. साहजिकच, त्यांच्या संगीतात केवळ टाळ मृदुंगाचे घुमारेच नाहीत, तर मशिदीतल्या अजानीचे सूर देखील तितक्याच सात्विकतेने ऐकू येतात.

आमोद भट्ट जेव्हा भोपाळमध्ये त्यांच्या ऐन उमेदीच्या वर्षांत संगीतक्षेत्रात काम करत होते, तो काळ संपूर्ण उत्तर भारतातील हिंदी रंगभूमीचा समृद्ध असा काळ होता आणि भोपाळचे नाव यात अग्रभागी होते. 1982 साली ‘भारत भवन’च्या स्थापनेनंतर तर मध्य प्रदेश हा हिंदी रंगभूमीचा केंद्रप्रदेश बनला होता. याचं संपूर्ण श्रेय आमोद भट्ट यांचे गुरू श्री. ब. व. कारंथ यांना जातं आणि आज सबंध भारतात कारंथजींच्या रंगसंगीताचा वारसा समर्थपणे जर कुणी जपला असेल तर तो आमोद भट्ट या एकमेव संगीतकारानेच ! खुद्द कारंथजी हयात असतांना असं म्हणत की, त्यांच्या पश्चात त्यांच्या रंगसंगीताची धुरा जर कुणी समर्थपणे वाहू शकेल, तर ते केवळ आमोद भट्ट ! ‘भारत भवन’मध्ये कारंथजींसोबतच काम करत असतांनाच त्यांनी समांतरपणे फ्रिट्झ बेनेविट्झ, हबीब तन्वीर, जॉन मार्टीन, कवाल्लम पणिक्कर, एम. के. रैना, बंसी कौल, जयदेव हट्टंगडी, जॉर्ज ल्युआंडो, बॅरी जॉन, रूद्रप्रसाद सेनगुप्ता, वामन केंद्रे, सुनील शानबाग आणि अतुल कुमार यांच्यासारख्या हिंदी रंगभूमीवरील दिग्गज मंडळींसोबत काम केले.

- Advertisement -

अनुभवाचे इतके प्रचंड पाठबळ असणारे आमोद भट्ट हे माझ्या मते आजच्या घडीला देशपातळीवर जे मोजके लोक नाट्यसंगीतकार म्हणून प्रसिद्ध पावले, त्यांच्यापैकी एक आहेत. दिल्लीचे राष्ट्रीय नाट्य विद्यालय असो, मुंबई विद्यापीठाचे अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स असो, गोवा कला अकादमी असो की देशभरातील इतर कुठलीही नाट्यप्रशिक्षण देणारी संस्था, विद्यापीठ असो, आमोद भट्ट नुसतेच तिथल्या एखाद्या नाटकाचं संगीत दिग्दर्शन करून थांबले नाहीत. प्रसंगी त्या संस्थांची नाट्यसंगीतविषयक धोरणं ठरवण्यात आणि त्याही पुढे रंगसंगीताचं विधिवत प्रशिक्षण देण्यातही त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.

आमोद भट्ट यांचा रंगसंगीताच्या क्षेत्रातला वावर केवळ हिंदीपुरताच मर्यादित राहिला नाही. एक प्रयोगशील नाट्यसंगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती जसजशी देशभर पसरली, तशी देशांतल्या तमाम शहरांतून त्यांना नाटकांचं संगीत दिग्दर्शन करण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. ज्या विविध भाषांमधल्या नाटकांच्या प्रयोगांना आमोद भट्ट यांनी संगीत दिलं, त्यात हिंदीसोबत प्रामुख्याने तेलुगू, ओडीया, बुंदेलखंडी आणि मराठी भाषेचा सुद्धा समावेश आहे. पण इतक्या भाषेतून नाटकातील गाण्यांना चाली देणार्‍या आमोदजींशी जेव्हा त्यांच्या प्रवासाबद्दल सविस्तर बोलतो तेव्हा जाणवते की, रंगसंगीताच्या निर्मितीतील खरा आनंद त्यांना अशा गाण्यांना चाली देण्यातून लाभतो, ज्यांना पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध आहे. आपल्या देशात लोकसंगीताची जी समृद्ध परंपरा आहे, तिचे आपल्यावरील ऋण मान्य करताना आमोद भट्ट कधीच संकोचताना दिसत नाहीत.

भोपाळहून मुंबईला आल्यानंतर मात्र त्यांच्या संगीताचा विस्तार असा झाला, जणू भारत भवनच्या पाठीमागचा प्रसिद्ध तलाव मुंबईच्या अरबी सागरात रूपांतरीत व्हावा ! नाटकांना संगीत देणं हे तर नित्याचंच होतं. त्यासोबत, सिनेमा आणि मालिकांचं संगीत दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केलं. पण एखाद्याचा आपला म्हणून एक प्रांत असतो. तसा नाटक हा आमोदजींचा प्रांत आहे. आमोद भट्ट म्हणजे रंगसंगीत हे आता इतकं रूढ समीकरण झालं आहे. मुंबईच्या अवकाशाने त्यांच्या रंगसंगीताला नवे आयाम प्रदान केले. अतुल तिवारींचे ‘ताऊस चमन की मैना’, हे त्याचं एक प्रमुख उदाहरण म्हणून सांगता येईल. एकाच नाटकात इस्लामिक, इंग्रजी आणि भारतीय शास्त्रीय संगीत अशा तीनही प्रवाहांची मोट एकत्र बांधून अनोखं रंगसंगीत त्यांनी निर्माण केलं होतं.

त्याशिवाय, रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकांतील रंगसंगीत, वामन केंद्रेंनी दिग्दर्शित केलेलं ग्रीक नाटकांच्या परंपरेतलं ‘वेधपाश्य’, फैज अहमद फैजची ‘बकरी’ या नाटकातील गाणी, कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्रम’चं केलेलं रिव्हायवल, जयशंकर प्रसाद यांच्या गाण्यांना दिलेल्या चाली….असं खूप काही सांगता येईल त्यांच्या प्रवासातलं. पण जे नाटक देशाची सीमा पार करत त्यांच्या रंगसंगीताला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेले ते म्हणजे शेक्सपियरचे ‘पिया बहरूपिया’ (Twelfth Night चे रूपांतर). लंडनच्या ग्लोब थिएटरसाठी अतुल कुमारने या नाटकाची निर्मिती केली होती. दोन वेळा लंडनवारी करत जगातल्या तेवीस देशांत या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. त्यांनी ख्यातनाम अष्टपैलू कलावंत गुलजार यांच्यासोबत केलेल्या प्रकल्पाबद्दल सांगायचे तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. अशा कर्तृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली नसती तरच नवल. चारेक वर्षांपूर्वी त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’च्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमांत लीलया संचार करणारे आमोद भट्ट जेव्हा नाटकाचा विषय येतो, तेव्हा त्यांच्या मूळ पिंडाचं दर्शन घडवतात. कमालीचा मृदु स्वभाव, बोलण्या-चालण्यात खास कलावंतांची अशी अदब आणि हिंदी-उर्दू भाषांवर प्रभुत्व असलेले आमोदजी जेव्हा एखाद्या नाटकाचं संगीत दिग्दर्शन करायला घेतात, तेव्हा फक्त आणि फक्त हार्मोनियम, तबला, ढोलक, मादल, डफ आणि अभिनेते हीच त्यांची सामुग्री असते. माझ्या आजवरच्या त्यांच्या सहवासात मी एकदाही त्यांना ध्वनिमुद्रीत संगीताचा वापर नाटकात करताना पाहिले नाही. ‘नाटक म्हणजे लाईव्ह म्युझिक’चा जो संस्कार मनावर झाला तो केवळ आमोदजींमुळेच ! ते नेहमी म्हणतात, तयारीच्या गायकाकडून गाणी गाऊन घेण्यात काहीच कर्तृत्व नाहीय. पण गायनाच्या अंगाने ठार अडाणी असलेल्या अभिनेत्यांकडून गाऊन घेण्यात मोठं आव्हान आहे. त्या अभिनेत्यांचा Rawness हीच माझी उपलब्ध सामुग्री असते. अशा Raw नटांकडून हवा तो परिणाम काढून घेण्यातच मला आनंद लाभतो आणि तो आनंद मला केवळ रंगसंगीत करण्यातूनच मिळतो. नाटक हे माध्यम मला तो आनंद मिळवून देते.

आमोदजींसोबत एक Raw गायक असलेला अभिनेता म्हणून काम करण्याची मुबलक संधी मला नाटकाने दिली, हे मी माझं भाग्यच समजतो.

- Advertisement -