Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश शिक्षणाने ‘स्व’ जगवावा!

शिक्षणाने ‘स्व’ जगवावा!

Subscribe

समाजातील सर्वधर्मीय लोक जेव्हा ‘स्व’च्या जाणिवेचा विचार करत आपला प्रवास करू लागतील तेव्हा तो सारा प्रवास चांगुलपणाच्या दिशेने असेल. लोक ‘स्व’च्या जाणिवेसोबत चालू लागले तर समाज आपोआप चांगुलपणाच्या उंचीवर पोहचलेला अनुभवता येईल. त्यामुळे शिक्षणातून ‘स्व’ची आणि चांगुलपणाची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यक्तित्वाची ओळख म्हणजे आपल्या वेगळेपणाची जाणीव नाही तर त्या वेगळेपणातही सामान्यत्वाचा विचार आहे हे लक्षात घ्यायला हवे. हा विषमता मुक्तीच्या आणि स्वराज्याच्या दिशेचा प्रवास ठरेल.

शिक्षणाचा उद्देश हा प्रत्येक व्यक्तीला ‘स्व’ची जाणीव करून देणे हा आहे. अभ्यासक्रम विकसित करताना गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्य, २१ व्या शतकासाठी कौशल्य अशा विविध दृष्टिकोनातून विचार केला जात असतो. प्रत्येक व्यक्ती आंतरिकदृष्ठ्या वेगळी आहे. तिच्या वेगळेपणातच विशेष असे काही सामावलेले आहे. प्रत्येकाची विचाराची दृष्टी भिन्न आहे. प्रत्येकाची बुद्धी आणि अभिरूची वेगवेगळी आहे. निसर्गही विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे प्रत्येकात विविधता सामावलेली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये बाह्य आणि आंतरिकदृष्ठ्या भिन्नता आहे. त्या भिन्नतेची ओळख प्रत्येकाला झाली तर समाजातील संघर्ष थांबतील. भिन्नता आहे म्हणून संघर्ष आहे असे म्हणणे उचित नाही. प्रत्येक धर्म, जातीची व्यक्ती समाज व राष्ट्रासाठी समर्पणाने कार्यरत राहू शकेल. त्याचबरोबर सृजनशीलतादेखील अनुभवता येईल. त्याकरिता ‘स्व’ची जाणीव होणे महत्त्वाचे आहे.

आपल्या आस्तित्वाची ओळख, आपले स्थान, आपली बलस्थाने, आपल्या उणिवांचा शोध असे बरेच काही असले तरी आपल्याबरोबर इतरांची ओळखही महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्ती चांगली बनणे याचा अर्थ अवघा समाज चांगला बनणे असते. महात्मा गांधी म्हणत असत की, मी चांगला हिंदू बनणे याचा अर्थ मी चांगला ख्रिश्चन बनणे आहे. चांगला मुस्लीम बनणे आहे. आपण चांगले व्यक्ती बनणे आहे. समाजातील सर्वधर्मीय लोक जेव्हा ‘स्व’च्या जाणिवेचा विचार करत आपला प्रवास करू लागतील तेव्हा तो सारा प्रवास चांगुलपणाच्या दिशेने असेल. लोक ‘स्व’च्या जाणिवेसोबत चालू लागले तर समाज आपोआप चांगुलपणाच्या उंचीवर पोहचलेला अनुभवता येईल. त्यामुळे शिक्षणातून ‘स्व’ची आणि चांगुलपणाची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यक्तित्वाची ओळख म्हणजे आपल्या वेगळेपणाची जाणीव नाही तर त्या वेगळेपणातही सामान्यत्वाचा विचार आहे हे लक्षात घ्यायला हवे. हा विषमता मुक्तीच्या आणि स्वराज्याच्या दिशेचा प्रवास ठरेल.

- Advertisement -

खरंतर ‘स्व’ची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाचा विचार सातत्याने केला जात आहे. त्या दिशेने आपला शिक्षणाचा प्रवास घडावा यासाठी प्रयत्न होण्यासाठी अनेक विचारवंत, तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. ‘स्व’च्या जाणिवेतून माणसं किती उंचीवर पोहचू शकतात हे त्यांच्याकडे पाहून जाणता येते. जगप्रसिद्ध तत्वज्ञ लाओत्से हे असेच व्यक्तिमत्त्व होते. ‘स्व’ची जाणीव झालेले हे विचारवंत होते. चीनमधील अत्यंत साधे, विनम्र, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यामध्ये बरेच काही अद्भुत असे सामावलेले होते. त्यांना सत्याचा शोध लागलेला होता. अंतर्दृष्टी लाभलेली होती. इतरांपेक्षा अधिक उंचीवर असलेला तत्त्वज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या विचारातील उंचीची जगातील अनेकांना भुरळ पडली होती. त्यामुळे जगभरात त्यांची प्रसिद्धी होती. त्यांच्या या वेगळेपणाबरोबरच त्यांचे साधेपणही डोळ्यात भरणारे होते. अशा या असाधारण महापुरुषाच्या संदर्भातील माहिती राजापर्यंत पोहचली होती. लाओत्सेची माहिती ऐकून राजालाही आश्चर्य वाटले. आपण अशा विद्वान माणसाला भेटायला हवे असे त्यांना वाटले.

अखेर राजाने या महापुरुषाला भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांना भेटण्यासाठी ते वाट चालत लाओत्से जिथे राहत होते तिथे गेले. त्यांनी तेथील घर, भोवतालचे वातावरण पाहिले तर येथे कोणी अद्भुत व्यक्तिमत्त्व राहत असावे असे त्यांना जाणवले नाही. कारण तेथे विद्वान राहत असल्याच्या संदर्भाने राजाने जी कल्पना आपल्या मनात केली होती तसे वेगळेपण काहीच जाणवले नव्हते. अगदी सामान्य माणसाचे आयुष्य जसे असते तसेच सारे होते. राजा लाओत्सेला भेटण्यासाठी जेथे पोहचला होता, त्या ठिकाणी केवळ एक झोपडी होती. त्या झोपडीबाहेर एक व्यक्ती कुदळ हाती घेऊन काम करत होती. अंगावर फार भरजरी नाही, पण किमान चांगले वस्त्र म्हणून आपण जे मानतो त्या स्वरूपाचे वस्त्रदेखील लाओत्से यांच्या अंगावर नव्हते. त्यामुळे आपल्यासमोर जी व्यक्ती आहे ती लाओत्से असण्याची शक्यता नाही हे राजाने मनोमन निश्चित केले होते. समोर कामात मग्न असलेल्या व्यक्तीला राजाने शेतात काम करणारा मजूर समजून त्याला विचारले लाओत्से कोठे आहे? आपल्या समोर उभा असलेला माणूस लाओत्से असण्याची शक्यता नाही.

- Advertisement -

लाओत्सेबद्दल जे ऐकले होते की, या माणसाची उंची प्रचंड मोठी आहे. सारे लोक त्याबद्दल बोलत आहेत, म्हटल्यावर अंगावर फाटकी वस्त्रे परिधान करत ती व्यक्ती शेतात कसे काय बरे राबत असेल, असा प्रश्न राजाला पडला होता. शेतात काम करणारी एक साधी व्यक्ती लाओत्से कसा असू शकेल, असा प्रश्न राजाला पडणे सहाजिक आहे. आपण अनेकदा विचार, मोठेपण आणि बाह्यवेष यांचा संबंध लावत प्रतिमा निर्माण करत असतो. त्यामुळे मनातील निर्माण झालेल्या कल्पनेचा परिणाम म्हणून पण शेतात काम करणारा आणि अत्यंत साधी राहणार्‍या व्यक्तीला लोओत्सेच होता यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. माणसाचे मोठेपण, प्रतिष्ठा, हुशारी ही बाह्य आभूषणावर नसतेच मुळी. माणसाच्या आत जे आहे तेच महत्त्वाचे. आंतरिक विचारावरच त्याचे मोठेपण अवलंबून असते. त्यांना बाह्य देखावा करण्यासाठी कशाची गरज वाटत नाही. कारण स्वतःची ओळख स्वतःला झालेली असते. त्या ओळखीने साधेपणा त्यांच्यात रूजलेला असतो. त्यामुळे शिक्षणाने अशा स्वरूपाची ओळख प्रत्येकाला व्हावी असे काम करण्याची गरज आहे. आपली ओळख आपल्याला झाली की समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होते.

आपण कोण आहोत? आपले कर्तव्य काय आहे? आपले अस्तित्व कशासाठी आहे? यांसारख्या प्रश्नांचा विचार करत आपण स्वत:ला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपला प्रवास जबाबदार नागरिकाच्या दिशेने झालेला अनुभवता येईल. मी माणूस आहे, जीवन आनंदाने जगायचे आहे. मला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा इतक्याच माझ्या गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी मला फार कशाची गरज पडणार नाही. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्ग तयार आहे. प्रश्न फक्त माझ्या हावेचा आहे. मला अधिक जी भूक आहे ती भूक मात्र निसर्ग पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आपले शहाणपण कशात आहे हे जाणणे महत्त्वाचे आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रपतीभवन सोडताना सोबत काहीच नेले नाही.

जे नेले ते फक्त स्वत:चे गरजेचे आणि काही पुस्तके होती. आपली गरज कशाची आहे हे जाणता आल्याने आणि त्या दिशेचा प्रवास करण्याचा निर्धार त्यांनी जीवनभर पाळला. त्यामुळे ते समाजमनात सतत प्रतिष्ठेच्या स्थानी राहिले. त्यांना ‘स्व’ची झालेली जाणीव त्यांना एका उंचीवर घेऊन गेली. महात्मा गांधी यांनीदेखील सातत्याने सामान्य माणूस म्हणूनच आपला प्रवास सुरू ठेवला होता. सामान्य माणसाच्या आयुष्याच्या पलीकडे त्यांनी स्वत:ला मोठे कधीच समजले नाही. अंगावरील वस्त्रात साधेपणा होता. तितकाच साधेपणा त्यांच्या आहारात होता. जेवणासाठी भाज्या कापण्यापासून स्वयंपाकघरातील अनेक कामे ते करत होते. जेवणातसुद्धा अत्यंत स्वस्त ज्या भाज्या असतील त्या भाज्या करण्याकडे आणि खाण्यासाठी त्यांचा आग्रह असायचा. आश्रम स्वच्छ करण्याचे कामही ते करत असत. असे सामान्यत्व त्यांच्यामध्ये सामावलेले होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून पत्नीला परदेश दौर्‍यावर सोबत नेले नाही. सरकारी पैसा हा घरातील व्यक्तींवरदेखील खर्च होता कामा नये ही जाणीव कोठून येते, हा खरा प्रश्न आहे. जगातील अनेक विचारवंत, महापुरुष, देश, धर्म, जातीपातीच्या सीमा ओलांडून जगभर त्यांचे विचार पोहचले. त्यामागे त्यांच्या विचारांचा प्रवास आहे. विचारातील नेमके मोठेपण हे त्यांना झालेल्या जाणिवेत आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनी स्वत:ला ओळखले होते. आपली ओळख एकदा झाली की माणसं अधिक चांगल्या दिशेने प्रवास करत राहतात.

जीवनात पैसा, संपत्ती, धनदौलत कधीच महत्त्वाची असत नाही. त्यापलीकडे जीवनाचे मोल आहे हे आपण विसरता कामा नये. कायद्याचे पालन करण्यात मोठेपण सामावलेले आहे ही जाणीव महत्त्वाची आहे. ज्ञान हीच जीवनाची योग्य वाट आहे. ज्ञानाची साधना जीवन समृद्धतेची वाट दाखवत असते. ज्ञानामुळे जीवन आनंदाच्या दिशेने प्रवास करत असते अशी जाणीव ‘स्व’मध्ये दडलेली असतेच. ‘स्व’च्या जाणिवेत जीवनाचा अर्थ सामावलेला असतो. त्यामुळे शिक्षणाने ‘स्व’च्या जाणिवेवर भर दिला तर अवघा समाज शहाणपणाच्या आणि विवेकाच्या दिशेने जाताना दिसेल. त्यातच समाज व राष्ट्राचे भले आहे.

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -