Monday, April 12, 2021
27 C
Mumbai

भेटीअंती

Related Story

- Advertisement -

कोण भेटले?
कोणास भेटले?
कोठे भेटले?

आधी ह्या प्रश्नांची वासलात लावल्याशिवाय ‘का भेटले?’ ह्या प्रश्नाला हात घालता येणार नाही असं मास्तरांनी स्वच्छ शब्दांत सांगून टाकलं. कुणी समजत असेल की मास्तर इतिहास ह्या विषयाचे विशेषज्ञ होते तर ते साफ चुकीचं आहे. मास्तर वर्तमानाचे गाढे अभ्यासक होते. आजच्या वर्तमानाचा उद्या इतिहास होतो ह्या म्हणण्यापेक्षा आजच्या वर्तमानाची उद्या रद्दी होते हे म्हणणं त्यांना जास्त मान्य होतं. इतिहासाच्या काळोख्या गुहेत रमण्यापेक्षा वर्तमानाच्या हवेलीत रमणं केव्हाही उत्तम असं त्यांचं सनातन मत होतं. आजच्या वर्तमानाबद्दल त्यांच्याशी विचारमंथन करायला आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी म्हणूनच हे तीन प्रश्नं आधी विचारले.

- Advertisement -

…तरी कोटावर टाय लावलेला वर्तमानातला एक आगाऊ विद्यार्थी ‘का भेटले?’ असा आपला वाह्यात प्रश्न आजच्या वर्तमान प्रथेनुसार मास्तरांपुढे दामटवण्याचा प्रयत्न करत होता. पण मास्तरांनी स्वत:च्या नियमांनुसार त्याची ही वर्तमान खोडी मोडीत काढली.
…तर मास्तर म्हणाले, आधी आपण हे लक्षात घेऊया की, कोण भेटले?…भेटणारे दोघे होते की तिघे होते की चौकडी होती?
आगाऊ विद्यार्थी म्हणाला, पण मास्तर, मूळ दोघेच एकमेकांना भेटायला गेले असतील, बाकीचे सगळा सपोर्ट स्टाफ असेल!
मास्तरांना तो प्रश्न आवडण्यासारखा नव्हताच. मास्तर म्हणाले, ती काय विराट कोहली आणि रोहित शर्माची भेट होती काय सपोर्ट स्टाफ न्यायला?
सॉरी, सॉरी मास्तर, ती राजकारणाच्या विकेटवरच्या चाणक्य आणि भीष्म पितामहांची भेट होती, आगाऊ विद्यार्थ्याने स्वत:ला चटकन दुरूस्त केलं. पण ह्या उत्तराने मास्तरांची कळी खुलली होती. कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं होतं.

ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे वळुया -कोणास भेटले?
आगाऊ विद्यार्थ्यांसकट सगळ्यांनाच हा प्रश्न खरंतर मास्तरांच्या बावळटपणाचा नमुना वाटला. मनातल्या मनात सगळ्यांना कोरसमध्ये सांगावंसं वाटलं-कोणास भेटले काय कोणास भेटले, चाणक्य भीष्म पितामहांना भेटले हे आता काय गोपनीय राहिलं आहे काय?
अर्थात मास्तरांपुढे आ वासण्याचीही कुणाची प्राज्ञा नव्हती. मास्तर पुन्हा म्हणाले – कोणास भेटले?
विद्यार्थ्यांचा चेहरा फळा पुसल्यासारखा कोरा झाला. टायवाल्या आगाऊ विद्यार्थ्याने आधी सवयीप्रमाणे थोडी चुळबुळ केली. पण नंतर मानेजवळ टाय घट्ट करण्यापलिकडे दुसरं काही केलं नाही.
मास्तरांनी पुन्हा प्रश्न केला – कोणास भेटले?

- Advertisement -

सगळ्यांच्याच तोंडाचा चंबू झाल्याचं लक्षात आल्यावर मास्तर म्हणाले-कोणास भेटले?…म्हणजे आधी कोण कोणास भेटले?…म्हणजे कोणी कोणापुढे भेटीचा प्रस्ताव ठेवला?…
हा प्रश्न इंटरेस्टिंग होता. आधीचे कोरे चेहरे ह्या प्रश्नाने चांगलेच खुलले. गळ्याला टाय लावलेला नसतानाही ह्या प्रश्नावर सगळ्यांनी ठरवून आगाऊपणा केला.

चाणक्यांनीच आपल्या मध्ययुगीन नीतीप्रमाणे भीष्म पितामहांना आवतण दिलं असेल, एक जण छातीठोकपणे म्हणाला.
नाही, नाही, भीष्म पितामहांची गाडी धाब्यावर नाश्त्यासाठी थांबली असेल, त्याच वेळी तिथे चाणक्यही आले असतील, अचानक भेट झाली असेल, पण सगळ्यांना वाटलं असेल की स्क्रिप्ट कुणीतरी आधीच लिहून ठेवलं आहे, एकाने कल्पनेचा विस्तार करत सांगितलं.

मास्तर मला वाटतं, ही भेट नक्की, जेथे सागरा धरणी मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते टाइप झाली असणार…आधीच व्हेन्यू, मेनू ठरला असणार, आधीच कुठे सुरू करून कुठे संपवायचं ठरलं असणार…आणि नंतर कुणी कोणत्या दिशेने निघायचं हेही ठरलेलं असणार! एकाने कल्पनेचा पार विस्फोटच करून टाकला.
मास्तरांनी शांतचित्ताने प्रत्येकाचे कयास ऐकले…आणि नंतर तितक्याच शांतचित्ताने ते म्हणाले, हे पहा, काही मंडळींना राशीभविष्य पहायची सवय असते. त्यांनी राशीभविष्य पाहिलं. त्यात त्यांना त्यांच्या राशीसमोर, मोठ्यांची भेट घ्या, चर्चेत या असं छापलेलं दिसलं, लागलीच त्यांनी मोठ्या माणसाची भेट घेतली, माझा वर्तमानाचा अभ्यास मला असं स्पष्ट सांगतोय.
मास्तर हे इतकंच बोलले…आणि थांबले…विद्यार्थी एकमेकांकडे बघत बसले.
कोठे भेटले? मास्तरांनी शेवटचा प्रश्न फासे टाकावे तसा टाकला. ह्या प्रश्नावर सगळेच गोंधळले.
मॅच संपून गेलेल्या क्रिकेटच्या स्टेडियममध्ये?
बारामती ते साबरमती प्रवासात?
मग नक्कीच कुणाच्या तरी साखरपुड्यात!

मास्तर पुन्हा शांतचित्ताने म्हणाले, वर्तमान राजकारणातल्या भेटी कुणा महापुरूषाच्या बंद खोलीत होतात, पण त्यावेळी कुणाला तरी बाहेर ठेवलं जातं हा इतिहास नाही तर ताजं वर्तमान आहे.
आता आगाऊ विद्यार्थ्याने ‘का भेटले?’ असा जो आगाऊ प्रश्न विचारला होता तो मास्तरांच्या लक्षात होता. मास्तरांना तोपर्यंत विद्यार्थ्यांचा वकुब कळला होता. त्यामुळे त्याचं उत्तर मास्तरांनीच देऊन टाकलं. मास्तर म्हणाले, आयुष्यभर गुगली टाकणारे गोलंदाज गुगली टाकल्याशिवाय स्वस्थ बसतील का?

- Advertisement -