घरफिचर्ससारांश‘सुटकेसची अदलाबदल’ करणारी माणसं

‘सुटकेसची अदलाबदल’ करणारी माणसं

Subscribe

साऊथच्या प्रभासी प्रभावामुळं आता हिंदी पडद्यावर गॉगल घातलेल्या निरागस मंडळींकडून निर्जन ठिकाणी सुटकेसची अदलाबदल होत नाही. अक्षयकुमारच्या मोहरातल्या मस्त मस्त...गाण्यानंतर कुठल्याशा पब किंवा बार, डिस्कोथेक नावाच्या रम्य ठिकाणी सोज्वळ मंडळींकडून होणारी सुटकेसची अदलाबदल शेवटची पाहण्यात आली. अशी नितळ मनाची शांतताप्रिय माणसं पडद्यारून अचानक दुर्मीळ झालीत.

विक्रम, विकी, जॉनी किंवा जिमी असलं व्हिलनिस्टीक नाव असलेला शक्ती कपूर हा निर्मळ मनाचा माणूस तरुण मुलींना पडद्यावर केवळ आणि केवळ आई बहिणीच्या नजरेने पाहतोय. त्याच्या ‘आऊ…म्हणून विव्हळण्यात आता विलक्षण सोज्वळता काठोकाठ भरली आहे. दुसरीकडं रंजित आणि सुधीर हे गरीब चेहर्‍याचे भाऊ आपली वडिलोपार्जित ‘दो भिगा जमिन’ सोडवण्यासाठी सावकाराच्या आसूडाचे वळ पाठीवर सहन करत त्याच्याच गहाण पडलेल्या शेतात बैलासारखे राबताहेत. सुधीर आणि रंजितनं हिरॉईनवर अत्याचार करतानाचे फोटो काढून पडद्यावरच्या समस्त महिलांना ब्लॅकमेल करायचं सोडून दिलंय, ते आता इज्जत लुटायची सोडून करुण चेहर्‍यानं ‘इज्जत कि दो वक्त की रोटी’ कमावताहेत.

अजित नावाच्या भल्या माणसाला इंधन दरवाढीमुळं आता हेलिकॉप्टर परवडत नाही, त्यानं स्वतःसकट मोनेला (मोना डार्लिंग) कर्जतच्या आपल्या फार्महाऊस अड्ड्यावर जाण्यासाठी लोकलचा तीन महिन्यांचा पास काढून दिलाय…शोलेच्या टायटल स्क्रिनवर येणारं मॅकमोहन हे खरंखुरं नाव स्वतः विसरलेला आणि सांभा म्हणून त्रिखंडात ओळखल्या जाणारा लांबुळक्या चेहर्‍याचा हा दाढीवाला नट आता लोचट राहिलेला नाही. तो हिंदी पडद्यावर संस्कारी मुलीचा बाप असलेला डॉक्टर झालेला आहे. हेमा, रेखा आदी सुंदरींवर असलेली त्याची कायम वाईट नजर आता शुद्ध, सात्विक आहे. त्यात आयाबहिणींसाठी असलेला अतिव आदर आहे.

- Advertisement -

प्रेम चोप्रा नावाप्रमाणेच आता कमालीचा प्रेमळ झालेला आहे, ‘कटी पतंग’ल्या आशा पारेखला ‘मै भी बदल गया हूँ’ म्हणताना खरोखरंच तो आंतरबाह्य बदललेला आहे. तर गुलशन ग्रोव्हर ऋषिकेश मुखर्जींच्या हलक्या फुलक्या चित्रपटात पडद्यावर एका नावाजलेल्या विद्यापीठात हिंदी साहित्यावर प्राध्यापक झालाय. ‘भारतीय महिलांचे सामाजिक स्थान, त्यांचे शोषण आणि त्यामागील व्यवच्छेदक कारणे’ अशा कुठल्याशा आकलनाबाहेरच्या डॉक्टरकीच्या प्रबंधाचा तो मालक आहे. तर उजव्या गालावर थोड्याशा वरच्या बाजूला स्वर्ण कोंदणात बसवलेल्या रत्नासारखी चामखिळ मिरवणारा जीवन त्याच विद्यापीठाचा तत्वज्ञानाचा विचारवंत कुलगुरू झालाय.

आता डॅनीचा ‘हम’मधला बख्तावर सेठ, अग्निपथमधला कांचा चिना ‘जवाब’मध्ये स्मिता पाटील, राज बब्बरला जेरीस आणणार्‍या डॅनी नावाच्या सेठ जगमोहनचं नाक्यावर पावसाळ्यात छत्री दुरुस्तीचं दुकान आहे. आपल्या शुद्ध सात्विक व्यक्तीरेखांनी या मंडळींनी एकेकाळी हिंदी पडद्यावर जी कमाल केली आहे. ती आज इतिहासजमा झालेली आहे. डॅनीतला व्हिलन गुलशन, शक्तीसारखा लोचट नसे, पडद्यावरील तत्कालीन सोंदर्यवतींवर अत्याचाराचे परवाने खिशात घेऊन फिरणारा डॅनी कधीही नव्हता.

- Advertisement -

तर हेमामालिनीवर वाईट नजर टाकली म्हणून तिच्याकडून सत्तरच्या दशकात कायम पडद्यावर मुस्काट भडकावून घेणारा आणि पुढं तिनं धर्मेंद्र नावाच्या माणसाला त्याचं नाव सांगितल्यावर त्याचा मरेस्तोवर मार खाणारा प्रेम चोप्राची गादी पुढं शक्ती कपूरनं चालवली. शक्ती कपूरला याच गंभीर मुद्द्यावर मुस्काटात भडकावणारी ऐंशीच्या दशकातली श्रीदेवी होती. हेच सात्विक काम रेखाच्या बाबतीत अमजदनं नेटानं पुढं नेलं. अमजदनं पडद्यावरची हिर्‍याची स्मगलिंग, बॉम्ब, वेपन्सची फॅक्ट्री कधीचीच बंद केलीय आणि ‘मेरे घर कि इज्जत अब आपके कदमों में है’ असं म्हणत तो आज ऐन लग्नाच्या मांडवात साश्रूनयनांनी दहेज मागणार्‍या वरपित्याच्या पायावर आपल्या घराण्याची शान असलेली मानाची पगडी ठेवतोय.

आता मनोज कुमारचं नाव आता भारत राहिलेलं नाही. तो क्लर्क, कलियुग और रामायण असले सिनेमे काढत नाही. नाना पाटेकर आता उसळपाव खात ‘बिजली का खंबा’ वरील पालिकेचा बल्ब फोडून सामान्य माणसाला जीवनाचं विद्रोही तत्वज्ञान सुनावत नाही. करण जोहर तल्लीन होऊन ‘कॉफी विथ करन‘मध्ये फँड्रीतल्या सोमनाथ अवघडेला म्हणजेच जब्याला ऐकतोय. अनुपम खेरनं अंगविक्षेपी पाणचट विनोद बंद केले आहेत. कादर खानच्या संवादातल्या शाब्दिक कोट्या शांत झाल्यात. राजकुमारनं तोंडातल्या तोंडात पाईप फिरवणं सोडलंय. आजच्या पडद्यावर शत्रुघ्न सिन्हा ‘खामोश’ म्हणत नाही. आजच्या हिंदी पडद्यावर कमालीची शांतता पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -