घरफिचर्ससारांशफलित शिबिरांचे की आयोजकांचे?

फलित शिबिरांचे की आयोजकांचे?

Subscribe

आजतर शिबीर प्रशिक्षणाचे पेव इतके फुटलेय की, दिवसाकाठी अनेक विषय शिबिरांच्या जाहिराती सोशल मीडियावर डोकं पिकवत असतात. त्यात कहर म्हणजे, कोरोनामुळे तर ऑनलाइन शिबिरांचा नवा फंडाही उगम पावलाय. गावांत घेऊन जाऊन बैलगाडीवर बसवायचे, राहणीमान दाखवायचे, केळीच्या पानावरचं जेवू घालायचे, रात्री कुणी आयात आजीआजोबांकडून गोष्ट ऐकवायची, त्यातून एकत्र कुटुंब पद्धतीची ओळ्ख दाखवायची, याकरिता शिबीर भरवलं जाणं, म्हणजे समाजाचे दुर्दैव नव्हे काय ? यातून नक्की हाती काय लागेल, याचा पालकांनीच सारासार विचार करायला हवा.

होय, या विषयावर आता गांभीर्याने विचार होऊन ‘शिबिरं’ ही कायद्याच्या कक्षेत आणावयाची वेळ आलीय. ‘शिबीर’ शब्द कानावर पडताच मनात संस्कार वर्ग की लूटमार फंडा ही सहज साशंकता निर्माण व्हावी, इतपत वेळ आलीय. ‘शिबीर’ या संकल्पनेचा उदय केव्हा कोणत्या काळापासून झाला, हे सांगता यायचं नाही. पण,अत्यावश्यक गरज म्हणून प्रशिक्षण घ्यायचे तर ते कुणीतरी द्यायचे, या प्राथमिक अवस्थेत शिबिराची सुरुवात झाली असावी. शिबीर म्हणजे एक चार भिंती पलीकडचा खुल्या आसमंतातील ‘संस्कार’ वर्गच असे.

संस्कारा शिवाय संस्कृती टिकू शकत नाही असे सांगितले जाते. पण मूळ प्रश्न, ‘संस्कार’ म्हणजे काय? तो करावा लागतो की, परिस्थितीच्या प्रभावामुळे होत राहतो. ‘संस्कार’ हा सजीव घटकात घडून येणारा बदल असतो, त्यामुळे तो परिणामवाचक होय. जाणिवेच्या आधाराने आपल्या जीवनात आपण घडवून आणलेला विधायक बदल म्हणजेच संस्कार. शिबिरांमागची मूळ संकल्पना हेतू या जाणिवा रुजवणे, वृद्धिंगत करणे हाच होता. जे अनघड अवघड त्याला ज्यामुळे सुलभता प्राप्त होते त्याचे नाव संस्कार, जे शिबीर वर्गात सामुदायिक होत असते. मुलं चौकस असतात. त्यांची ज्ञानाची भूक जागृत असते.त्यामुळे मुलांचेही मनोरंजक जिज्ञासू प्रश्न, विचार करावयास भाग पाडत असतात. भूगोलाच्या तासाला सर म्हणालेत, थंड हवेची ठिकाणे महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा अशी उंचावर आहेत. एक विद्यार्थिनी उठली आणि म्हणाली, सर डोंगरावरचे गाव लवकर तापते. याउलट दरीत ऊन पडत नाही. खरे थंड हवेचे ठिकाण उंचावर असणार नाही ते खालीच कोठेतरी खोलात असणार. गुरुजींना थांबून विचार करावा लागला.

- Advertisement -

स्वामी विवेकानंदांनी आईला विचारलं होतं, रोज उजव्या हाताने जेवायचे कोणी ठरवले; जेवताना हात बदलला तर बिघडलं कुठे? मुलं सहजपणे विचारतात, पंखा थांबला म्हणजे वारा कुठे जातो? सरपटणारी पाल उघडी असूनही पडत कशी नाही? सूर्य उगवताना कोठून येतो व मावळल्यावर कोठे जातो? झाड केव्हा वाढते? नारळात पाणी कसे चढते?असे एक ना अनेक प्रश्न मुलांची भूक असते, ती खर्‍या अर्थाने निसर्ग शिबिरांत क्षमते. यानंतर साहजिकच निसर्ग आणि विज्ञान याचे आकलन कलेकलेने आत्मसात करण्याची अभ्यासू वृत्ती बहरते..

शिबिरांत लहानांच्या वयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न व अभिप्राय जाणून त्यांची आकलन शक्ती संस्कारीत करणे यासारखे आनंददायक कार्य घडत असते. किंबहुना, तेच घडावयास हवेय. त्याप्रमाणे मागील काही वर्षांत विविध क्षेत्रात अनेक उपयुक्त विषयांवर अगदी सेवाभावी वृत्तीनं शिबिरं आयोजित केली जात असत. त्यामुळे सुट्टीला गावी परगावी जाण्याऐवजी मुलं शिबिरांत दाखल होऊ लागलीत. शिबिरात आपल्या पाल्याला घातले, की तो ‘सर्वगुणसंपन्न’ होईल, त्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होईल, अशी पालकांचीही मानसिकता वाढली. यातूनच शिबिरांची संख्याही भूछत्रांसारखी वाढत गेली.

- Advertisement -

याला, गिर्यारोहण क्षेत्र तरी अपवाद कसे ठरेल? मला आठवतंय. पंचवीस तीस वर्षांपूर्वी गिर्यारोहण या साहसी क्षेत्रात काम करणार्‍या राज्यात मिळून अगदी तीस चाळीस संस्थाच असाव्यात. त्यातही साहसी प्रशिक्षण शिबीर भरवणार्‍या हुकमी संस्था हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच होत्या. माझ्या ‘अल्पायनो समिटर्स’संस्थेच्या शिबिरात साहसी खेळांचे प्रशिक्षण असायचेच, पण त्याशिवाय निसर्ग घटकांची ओळख करून दिली जायची. विविध स्थळांवरील भिन्न लोकसंस्कृती, तिथल्या चालीरीती, परिसरातील गड किल्ले-इतिहास, झाडं वेली, पर्यावरण, किडे कीटक, पक्षी, फुलपाखरे. रात्री नभांगण उलगडून दाखवताना ग्रह तार्‍यांची ओळख व्हायची. विषारी-बिनविषारी सापांची प्रत्यक्ष ओळख माहिती दिली जायची. सकाळच्या प्रहरी सूर्योदयापूर्वी वातावरणात निसर्ग गंध भरला असताना आकाशात सहज भरारी घेणारा पक्षांचा थवा पाहून मुलांचे मन मोहरून जायचे. अशा क्षणी ते आकाशव्यापी व्हायचे. सर्वांनाच सखोल अंतर्मुख प्रसन्न पावन अशी एक अनुभूती मिळत असे.

सकाळच्या श्लोक मंत्र प्रार्थनेपासून तो रात्री मुलांच्या अभिजात कलागुणांचे सादरीकरण होणार्‍या कॅम्पफायरपर्यंत मुलं वेगळ्या नैसर्गिक भावविश्वात रमायची.

शिबिर संपल्यावर भावुक होऊन रडणारी मुलं पुढील महिनाभर त्या शिबिराच्या संस्कार आठवणीतून बाहेर पडत नसत. असे शिबिरांचेही चांगले दिवस होते ते. शिबीर आयोजण्यामागे नेमका उद्देश अन सात्विक वृत्ती असे. धंदेवाईक दृष्टी स्वप्नातही नव्हती. पुढे पुढे जसे कळप वाढलेत तशा संस्थां-संघटनांचे गल्लोगल्ली रान वाढू लागले. 2-4 शिबिरं उपक्रमांचा जुजबी अनुभव गाठीशी आला की खोला एखादी संस्था. चालू करा वर्गणी, देणगी, जाहिराती, भरमसाठ फिज आकारून शिबिरं वगैरे वगैरे. यातून संस्था-शिबिरांचा हेतूच मुळी बाजारू झाला. पालकांच्या अज्ञानाचा आणि फाजील हव्यासाचा गैरफायदा घेऊन शिबिरं भरवायची, सरसकट वाट्टेल ती फिज वसूल करायची, हे सत्र सुरू झाले. मग पुन्हा संस्था अंतर्गत व्यवहारावरून वादविवाद झडले की तेवढ्याच नवीन संस्थांचा उदय होत गेला. आजमितीस संस्था आणि शिबिरांचा मूळ हेतू उद्देश आत्ता साफ मागे पडून व्यवसायिकपणा आलाय. त्यात खाजगी शाळांचीही शिबिरं आयोजित करण्यात भर पडलीय. विविध छंदवर्गाचा समावेश करून गल्ला भरायचा, हे एकमेव सूत्रं.

आजतर शिबीर प्रशिक्षणाचे पेव इतके फुटलेय की, दिवसाकाठी अनेक विषय शिबिरांच्या जाहिराती सोशल मीडियावर डोकं पिकवत असतात. त्यात कहर म्हणजे, कोरोनामुळे तर ऑनलाइन शिबिरांचा नवा फंडाही उगम पावलाय. गावांत घेऊन जाऊन बैलगाडीवर बसवायचे, राहणीमान दाखवायचे, केळीच्या पानावरचं जेवू घालायचे, रात्री कुणी आयात आजीआजोबांकडून गोष्ट ऐकवायची, त्यातून एकत्र कुटुंब पद्धतीची ओळ्ख दाखवायची, याकरिता शिबीर भरवलं जाणं, म्हणजे समाजाचे दुर्दैव नव्हे काय ? यातून नक्की हाती काय लागेल, याचा पालकांनीच सारासार विचार करायला हवा.

जीवनाचे सूत्रं समजावून देऊन ‘माणूस’ म्हणून जगण्यात ऐट असावी, सत्ता-संपत्ती-घराणे-वर्ण-जाती-धर्म यांचे अंगरखे आणि बुरखे फेकून देऊन तळमळ, कळकळ, प्रांजळपणा हीच आपली जीवन मूल्ये व्हावीत, हे संस्कार शिबिरांमध्ये व्हावयास हवेत.

मुला-मुलींच्या भावशक्तीचे शुद्धीकरण, संस्करण व भरण-पोषण करण्याचे काम अशा शिबिरांतून होऊ शकते. ‘ओम सहना ववतु’ मधून चार युक्ती-गरजेच्या गोष्टी शिकविणार्‍या, चाकोरीबद्ध आयुष्याहून वेगळा अनुभव देणार्‍या शिबिरांचे आयोजन केव्हाच संपलेय, हे ठळकपणे नमूद करावेसे वाटते. जशी ‘कोचिंग क्लास’ नामक समांतर शिक्षण व्यवस्था निर्माण झाली, तशीच आता सुट्टीतील शिबिरेही निव्वळ व्यवसायाचा भाग झालीयत. अनेक कॉपोर्रेट कंपन्या आपला ब्रँड अधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणूनही शिबिरांचे प्रायोजक म्हणून पुढे येऊ लागल्या आहेत. शिबिरांचे शुल्क काही हजारांमध्ये असते. पैसे गेले तरी मुलांच्या कानावरून चार चांगल्या गोष्टी तरी जातील, या उद्देशाने अनेक मध्यमवर्गीय पालक या शिबिरांना पसंती देतायत. मात्र,पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. आपल्या मुला-मुलींची आवड यांची सांगड घालून त्याच्या आवडत्या विषयाशी संबंधित शिबिरातच प्रवेश घ्यावा. एकाच वेळी सर्व गोष्टी यायला हव्यात,असा अट्टाहास नको.

शिबीर आयोजक संस्थेची पार्श्वभूमी अनुभव याबाबत खातरजमा करून घ्यावयास हवी. अनुभव कागदपत्रे हवी तशी रंगवली जाऊ शकतात, त्याची सत्य सत्यता पडताळून पहावीत. कारण, तुमच्या पोटच्या मुलाच्या जीविताचा प्रश्न असतो. या संस्था दुर्घटनेनंतर कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, हे गंभीरपणे लक्षात असू द्यावे. ‘थ्री स्टार’ फॅसिलिटीच्या नावाखाली पैसे उकळणार्‍या धंदेवाईक शिबिरांच्या नादी लागू नये. मुळात ‘शिबीर’ आणि ‘फॅसिलिटी’ याचा दुरुनही संबंध नसतो आणि नसावा. सर्वांत महत्वाचे म्हणजे मुलांच्या कलांनी घेतले गेले पाहिजे.

शेजारीपाजारी चार मित्र शिबिरात जात आहेत, म्हणून मुलांना इच्छेविरुद्ध पाठवणं अयोग्य. जंगल भ्रमंती शिबिरात जाण्याआधी आयोजकांना आपल्या लहान मुलांच्या झोपेत चालणे, बडबडणे, रात्री ‘सु’ होणे यासारख्या सवयी असल्यास त्याची विनासंकोच पूर्वकल्पना द्यावी. आयोजक संस्थेच्या बेजबाबदारपणामुळे अशा कित्येक दुर्घटना होऊन मुलांना जीव गमवावा लागलाय, हे ध्यानात असू द्यावे. जसे खासगी पातळीवर तसेच शासकीय पातळीवर त्याहून कित्येक पटीने विकृत प्रकार होऊ घातलेयत. शासकीय स्तरावर वेगवेगळ्या विभागात प्रशिक्षण शिबीरं या नावाने हेच धंदे सुरू असून कोट्यवधींची अक्षरशः लयलूट केली जातेय. कुणीही ‘ब्र’ काढीत नाहीय, याचे आश्चर्य वाटते.

एक उदाहरण द्यायचे म्हणून सांगतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिबीर आणि प्रशिक्षण शिबिरावर चक्क हजार, लाख नव्हे तर कोट्यवधीचा निधी खर्च केला गेला. कोल्हापूरचा पूर वगळता इतर ठिकाणी हे प्रशिक्षण कुठेही कामी आले नाही, ही फलश्रुती. नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गतही विविध महाविद्यालयात शिबिरांच्या आयोजनाचा उत्तम फार्स रंगवीला जातोय. तिथेही कोट्यवधी रुपयांचा वर्षानुवर्षे खुलेआम भ्रष्टाचार होतोय. हाच प्रकार दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागात होत असतो. पण यावर दखल घेणारं कुणीही नाहीय. कुणीही भ्रष्ट कारभार तपासत नाही की, ऑडिटची मागणी करीत नाही. पूर्वी संस्कार-शिबिरं वर्ग चालविणारे स्वतः त्या त्या विषय-क्षेत्रांत निष्णात असायचे. समाज राष्ट्राप्रति कर्तव्य भावनेतून शिबिरांचे आयोजन होऊन ज्ञानाचे आदानप्रदान व्हायचे.

मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींचा त्या त्या क्षेत्रात हातखंडा असायचा. त्यामुळे ‘पेशा’ असा शब्दप्रयोग केला जात असे. काळाच्या ओघात ‘पेशा’चं रूपांतर ‘व्यवसाया’त झाले आणि गेल्या पंधरा-वीस वर्षांत त्यावर ‘धंदेवाईक’पणाचीही बाजारू पुटं चढू लागली. हे काळं जग अधिकच ठसठशीतपणे प्रकाशात येतेय. त्यामुळे एकेकाळच्या सेवाभावी व्यक्ती- संस्थांच्या गोष्टी म्हणजे ‘दंतकथा’ वाटू लागल्या. शिबिरांत शिक्षण-संस्कार हे असलेच पाहिजेत, पण तसा अट्टाहास आता दिसत नाही. शिबिरांची वाढती संख्या आणि संस्कारांचे घटते प्रमाण ही एक विसंगती होय. शिबिरांचा ढाचा थ्रिस्टार सुविधांनी संपन्न होणे, पण तिथे संस्कार मूल्य नसणे हे सांस्कृतिक दैन्य होय. हे दैन्य दूर व्हावे यासाठीच संस्कार वर्ग आणि शिबिरे यांची आज परिभाषा निश्चित होऊन त्याला एका सूत्रतेत आयाम देणे गरजेचे झालेय. हे कार्य सुसंस्कृत-सेवाभावी समर्पणशील व्यक्ती आणि संस्थाच करू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -