Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशKanguva Movie Review : कल्पनाशक्तीचा अवजड डोस...‘कंगुवा’

Kanguva Movie Review : कल्पनाशक्तीचा अवजड डोस…‘कंगुवा’

Subscribe

साऊथ सुपरस्टार अभिनेता सूर्याचा बहुप्रतिक्षित ‘कंगुवा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सूर्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटात बॉबी देओल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटावर टाकलेला एक दृष्टिक्षेप...

 – आशिष निनगुरकर

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या अबरार पात्रामुळे त्याला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाल्यानंतर या चित्रपटाकडे सर्वांचे डोळे लागले होते. दरम्यान, बॉबी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटापूर्वी ‘कंगुवा’ चित्रपट साईन केला होता हे अनेकांना माहीत नसेल. ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर बॉबी देओलने साऊथ चित्रपटांमध्ये डेब्यू केला आहे. हिंदीतही प्रदर्शित झालेल्या या तमिळ चित्रपटाचे नाव आहे ‘कंगुवा’.

- Advertisement -

या चित्रपटात साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार सूर्यादेखील मुख्य भूमिकेत आहे आणि दिशा पटानीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे, मात्र इतकी मोठी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का, हा प्रश्न आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी या चित्रपटाच्या कथेतही अनेक त्रुटी आहेत. चित्रपटाची कथा पेरुमाची बेटापासून सुरू होते, जिथे एक वृद्ध महिला म्हणते की, मानवी जीवनात सर्वात मोठे रहस्य आहे, तो का जन्मला, तो कुणासोबत का राहतो, दुसर्‍यासाठी का मरतो हे कुणालाच कळत नाही.

तिथून कथा २०२४ मध्ये येते, जिथे प्रयोगशाळेत मुलांच्या मेंदूवर प्रयोग केले जात असतात. एक मूल तिथून पळून जाते. मग कथा गोव्यात पोहचते, जिथे फ्रान्सिस (सूर्या), कोल्ट (योगी बाबू) बाउंटी हंटर्स आहेत. ज्या गुन्हेगारांना पोलीस पकडू शकत नाहीत त्यांना हे लोक पकडून पोलिसांकडे देतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. प्रयोगशाळेतून पळून गेलेले मूल फ्रान्सिसपर्यंत पोहचते. फ्रान्सिसलाही मुलाशी आपले नाते असल्यासारखे वाटते.

- Advertisement -

तिथून पुन्हा कथा १०७० पेरुमाची येथे येते, जिथे राजाचा मुलगा कंगुवा (सूर्या) आहे. लॅबमधून पळून गेलेल्या मुलाचे नाव पूर्वा असे आहे. पूर्वाच्या वडिलांचा विश्वासघात केल्याबद्दल कंगुवाने त्याला जिवंत जाळलेले असते, मात्र तो त्याच्या मुलाला दत्तक घेतो. रोमन सम्राटाला एक बेट ताब्यात घ्यायचं आहे. तो उधिरनची (बॉबी देओल) मदत घेतो, जो अराथी बेटाचा प्रमुख आहे. या युद्धात कंगुवाकडून उधिरनची मुले मारली जातात. यामुळे कंगुवा आणि उधिरन यांच्यात वैयक्तिक वैर निर्माण होते. आता या दोघांच्या युद्धात पुढे काय होते हे चित्रपटात पाहायला मिळते.

‘कंगुवा’ हा चित्रपट मुळात तमिळमध्ये बनला होता आणि तो हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कल्पनाशक्तीची कमतरता नाही. १३०० वर्षांच्या फरकाने दोन वेगवेगळ्या कालखंडाचे चित्रण करणार्‍या या चित्रपटाने कल्पनेचे असे उड्डाण घेतले आहे की असा चित्रपट बनवण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही, पण असे असूनही अ‍ॅक्शन-फँटसी चित्रपट ‘कंगुवा’ हा मनोरंजक चित्रपट ठरू शकला नाही. या चित्रपटाची कथा कमकुवत, निर्जीव आणि अविश्वसनीय वाटते, जी तुम्हाला पडद्यावर काहीही घडू शकते हे पटवून देण्यासारखीच आहे.

कधीही न संपणार्‍या युद्धाने चित्रपटाला कंटाळवाणे केले आहे. पेरुमाचीचा नाश करण्याच्या कटात अराथी नावाचे बेटही रोमला सामील होते. यानंतर असे युद्ध सुरू होते की वाटू लागते हे युद्ध कधीच संपणार नाही आणि असेच चालू राहील. दिग्दर्शक शिवा यांनीच स्वत: चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांचे व्हिजन तसे मोठे आहे परंतु स्पष्ट नाही. कंगुवा आणि उधिरन यांच्यातील लढा दाखवायचा होता आणि पुनर्जन्माचा अँगल ठेवायचा होता, मात्र यात रोमन सम्राटाला फार महत्त्व दिलं आहे.

कथा एवढी पसरवण्याऐवजी सरळ रुळावर आणली असती तर ना अनेक पात्रांची नावं यात आली असती, ना चित्रपटाचा कालावधी उगाचच वाढला असता. हा चित्रपट सरतेशेवटी अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सोडतो. कारण या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याचे सूर्याने आधीच सांगितले होते. फ्रान्सिसच्या भूमिकेपेक्षा सूर्या कंगुवाच्या भूमिकेत जास्त प्रभावित वाटतो.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या बॉबी देओलचा लूक आणि अभिनय चांगला आहे, पण दिग्दर्शक त्याचा योग्य वापर करू शकला नाही. दिशा पटानीचा अभिनय बघून असे वाटते की ती ग्लॅमरच्या जोरावर किती काळ इंडस्ट्रीत टिकेल आणि तिला टिकून राहायचे असेल तर तिला अभिनय करावा लागेल. योगी बाबूंनाही मोजकेच सीन्स मिळाले आहेत. क्लायमॅक्समध्ये सूर्याचा धाकटा भाऊ कॅथीची एण्ट्री प्रभावी आहे.

सूर्याचा दमदार अभिनयही चित्रपटाच्या कथेसमोर फिका पडतो. चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या टाईम झोनची आहे, पण याचं कनेक्शन फेव्हिकॉलसारखे मजबूत नाही. कथेमध्ये दोन वेगवेगळे टाईम झोन एकमेकांसोबत कनेक्ट होत नाही आणि इथेच चित्रपटाची कथा कोलमजते. एका मुलाच्या मेंदूमध्ये गंभीर केमिकल लोचा होतो आणि तो गोव्यात येतो. यावेळी तो एका हत्येचा साक्षीदार होतो. हा खून कोणी केला, कंगुवा कोण, हा मुलगा कोण, हीच चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला नेमकं काय सुरू आहे हे कळतच नाही.

त्यानंतर हळूहळू तुम्हाला चित्रपट समजायला लागलाय असं वाटतं, पण त्यानंतर कथा तुम्हाला पुन्हा गोंधळून टाकते. त्यातच चित्रपटातील गाण्यांमुळे तुमचा राग अजून टोकाला जातो. अभिनेता सूर्याने नेहमीप्रमाणे त्याचं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. त्याचं काम चांगलं आहे. कंगुवाची भूमिका सूर्याने चांगली साकारली आहे, पण आधुनिक पात्राची भूमिका तितकी सरस नाही. बॉबी देओलची भूमिका खास छाप पाडू शकलेली नाही, तर दिशा पटानीची दिशा भरकटल्याचं पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवा यांनी केलं आहे आणि हा चित्रपट इतक्या वाईट प्रकारे दाखवण्यास त्यांच्याशिवाय इतर कोणीही जबाबदार नाही. सूर्यासारख्या अभिनेत्याला घेऊन चित्रपट बनवताना कथा आणि स्क्रिन ट्रीटमेंट दमदार असायला हवी. एकंदरीत फक्त सूर्याच्या चाहत्यांनी हा चित्रपट पाहावा आणि तोही त्यांच्या जबाबदारीवर. चित्रपटात काही चांगले सीन्स पाहायला मिळतात, पण फक्त काही सीन्स बघायला आपण थिएटरमध्ये जायचं का, हा प्रश्न आहे. एकूणच तुम्ही संपूर्ण चित्रपट मोठ्या धैर्याने पाहू शकता किंवा मग फक्त सूर्याला पाहायलं म्हणून पाहू शकता. बाकी चित्रपटात सगळेच आलबेल आहे.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -