सूर्य न पाहिलेली माणसं…

मकरंद साठेंनी लिहिलेल्या आणि अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या सूर्य पाहिलेला माणूस नाटकाचा आशय विषय हे नाटक एकदाच पाहून आवाक्यात येत नसतो. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान, मानवी मूल्ये, नातेसंबंध अशा अनेक संकल्पनांचे अनेकविध पदर या नाटकातून उलगडत जातात. या नाटकाला काळाचे संदर्भ नसतात, असं नाही, मात्र तरीही हे नाटक कालातीत ठरतं. माणूस जन्मतःच धार्मिक असतो का...तर होय, मात्र धर्माच्या बदललेल्या अर्थाने नाही, संपूर्ण सत्य समजून घेण्याचा प्रवास म्हणजेच माणसाचं शहाणपण असा अर्थ असल्याची साक्ष डेल्फीची देवता देते....अथेन्समध्ये डेल्फीच्या देवतेने केलेली ही दैववाणी म्हणूनच कुठल्याही काळाला लागू पडते. म्हणजेच संपूर्ण सत्य समजल्याच्या अविर्भावात या शहाणपणाची मक्तेदारी घेतलेल्यांना सॉक्रेटीस आजही भर चौकात उभं करतो आणि त्यांना प्रश्न विचारतो.

माणसाला संपूर्ण शहाणपण कधीच येत नाही, हे मला समजतंय म्हणून मी सॉक्रेटिस सर्वात शहाणा असल्याची दैववाणी ग्रीकमध्ये डेल्फिच्या देवतेनं केली असावी…हे शहाणपण स्वयंप्रकाशित असावं सूर्यासारखं, म्हणूनच हे शहाणपण समजलेला ‘सूर्य पाहिलेला’ माणूस म्हणून सॉक्रेटिसला या शहाणपणाची जहरी शिक्षा कायद्याच्या कल्याणकारी राज्यानं तातडीने अंमलात आणलेली असते. ‘सूर्य पाहिलेल्या माणूस’च्या प्रयोगात सुरुवातीला सावल्यांची एक प्रकाशाच्या दिशेनं जाणारी रांग दिसते. या रांगेतल्या प्रत्येकाचा सूर्य वेगवेगळा असेल तर…? अशी शंका अथेन्सध्ये निर्माण होते. ही शंका आजपर्यंतच्या इतिहास अनुभवाच्या कसोटीवर रास्तच असावी, आपापला सूर्य शोधणारे आणि आपल्याला दिसलेला सूर्यच कसा खरा आणि इतरांचा बोगस ठरवणारे कुठल्याही काळात लढाया करतात आणि त्याला धर्मयुद्धाचं नाव देतात.

सूर्य पाहण्यासाठी आवश्यक डोळ्यांची क्षमता गमावून बसलेले लोक अंधार, प्रकाशाचे वस्तुनिष्ठ संदर्भ अर्थात खरं खोटं ठरवणारा साधा दिवाही पाहू शकत नाहीत, असा त्यांचा देदीप्यमान इतिहासच सांगत असतो. अंधार हेच एकमेव सत्य आणि प्रचलित धर्म हाच प्रकाश, या सूत्रावर हजारो वर्षांपासून त्यांचं सत्तेचं राजकारण सुरू असतं. अशा परिस्थितीत काय करावं…? तर जगात सगळाच अंधार पसरल्याची आवाई उठवून सत्तेसाठी मूठभरांनी बहुसंख्यांकांना कथित, काल्पनिक अंधारातून बाहेर पडण्याचं आमिष दाखवून त्यांचे मेंदू ताब्यात घ्यावेत, आपली निरंकुश सत्ता अबाधित ठेवण्यासाठी त्यांंना अंधाराविरोधातल्या काल्पनिक लढाईला जुंपावं आणि या युद्धाच्या आगडोंबात आपली सत्तेची भाकरी शेकून घ्यावी, हाच सांप्रदायिक अस्मितांची नावं दिलेल्या जगाचा खरा इतिहास आहे.

ज्या ठिकाणी धर्म राजकीय सत्तेचा पाया असतो. ज्या ठिकाणी राजकीय व्यवस्थेत समाज, अर्थ, विभाजनवादी समूह आणि अस्मितांवर आधारित तत्वज्ञानाचे दाखले राष्ट्रवादाच्या नावाखाली दिले जातात, तिथं माणसाच्या निर्धास्त जगण्यासाठी कमालीचा धोका असतो, या धोक्यातून सुस्त जनावरासारख्या ढिम्म पडलेल्या समाजाला जागं करण्यासाठी सॉक्रेटिस नावाच्या गोमाशीची नितांत गरज असते. बहुसंख्य समुदायाला ईश्वर मान्य असतो, मात्र भगवंत, देव, प्रेषितांच्या वादात हजारो वर्षांपासून जुंपलेल्या झुंडीना नियंत्रणात ठेवण्यासाठी सॉक्रेटिस नावाचा शहाणा माणूस आवश्यक असतो. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही तिथं अती शहाणपण असावं लागतं. या अतीव शहाणपणातून आणि निरंकुश सत्तेसाठी सॉक्रेटीसचा बळी नेहमीच दिला जातो.

सत्तेच्या राजकारणासाठी ‘सूर्य पाहिलेला माणूस’ नाटकातल्या मिलिटस, सॅनिटस आणि लायकॉनसारखं अतिमानवी शहाणपण आवश्यक असतं. सॉक्रेटिसकडे ते मुळात नसल्यानं त्याला मृत्यूदंड स्वीकारण्यापासून पर्याय नसतो. सूर्य पाहिलेला माणूस नाटकातली प्रत्येक ओळ सामाजिक जीवनाचं राजकीय तत्त्वज्ञान असते आणि हरेक शब्द लेखाचा विषय असू शकतो.

आपल्यावर झालेल्या देशद्रोहाच्या आरोपानंतर ज्युरीसमोर आपली बाजू मांडताना झालेल्या गदारोळामुळे ‘मी साक्ष देताना कृपया मला मधेच थांबवू नका, मला माझं म्हणणं पूर्ण करू द्या,’ अशी विनंती सॉक्रेटिस करतो. त्याला हे पक्के माहीत असते की बहुसंख्याकांच्या गोंधळ, आवाजी गदारोळात अभिव्यक्तीचे आवाज दाबले जातात. विचार आणि मत मांडण्याचं स्वातंत्र्य हरवलं जातं. समाज किंवा राजकारणाची सूत्रे सत्तेकडे जाणारी अशी एकच असतात. दोन्हीकडे इतिहासाचा गंड असतो, अस्मितेचा माज, राष्ट्रवादाची भूल आणि धर्माची धुंदी असते. सॉक्रेटिसने पाहिलेल्या सूर्य प्रकाशात हे सर्व त्याला लख्ख दिसतं, म्हणून तो शहाणा माणूस समजला जातो.

अंधाराच्या भ्रमीत करणार्‍या इतिहासात समाज हजारो वर्षे आंधळा प्रवास करत राहिला, हे सत्य पचवणं कठीण झाल्यावर प्रकाश आणि सॉक्रेटिस या दोघांनाही नाकारलं जातं. प्रकाशाला रोखणं शक्य नसतं, मग तावडीत सापडलेल्या सॉक्रेटिसलाच संपवलं जातं. ते तुलनेत सोपं असतं. सॉक्रेटिस आपल्यावरील झालेल्या आरोपांबाबत बाजू मांडताना वेगळ्याच देवतेची आराधना करण्याचा आरोप तो सप्रमाण खोडून काढतो, सॉक्रेटिसवर झालेले आरोप हे कुठल्याही काळात प्रज्ञावंतांवर होतच असतात, त्या त्या काळातील सांप्रदायिक उन्मादात ही मांडलेली बाजू सत्ता आणि धर्माधिष्ठितांकडून विचारात घेतलीच जात नाही. सॉक्रेटिसला संपवणं हा राजकीय कटाचा भाग असल्याचं स्पष्ट असतानाही आणि सॉक्रेटिसला हे माहीत असतानाही, मी पळून जाणार नाही, असं तो क्रिटोला सांगतो. त्यावेळी सॉक्रेटिसने दिलेली कारणे ही कुठल्याही काळातील उन्मादी, हिंसक, कट्टरवादी विचारसरणीतील धोके, फोलपणा उघड करणारी असतात. तो म्हणतो, राज्यव्यवस्था, कायद्याचं राज्य टिकणं हे सत्ता टिकवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. या वाक्यातील राजकीय तत्वज्ञानाचे संदर्भ हे डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही भूमिकेशी थेट जोडता येतील, इतके एकमेकांशी एकरुप झालेले आढळतील, मात्र या लेखाचा तो विषय नाही.

सॉक्रेटिसच्या पायाला झालेली जखम अल्केबियाडीसला दिसते. हा अल्केबियाडीस समाजातील सुज्ञ, प्रज्ञावान आणि विवेक शिल्लक असलेल्या माणसाचं प्रतिनिधित्व करतो. अशा जखमा बुद्ध, येशू, ज्ञानेश्वर, तुकाराम, गॅलिलिओ, गांधी, चोखामेळ्यापासून ते डॉ दाभोलकरापर्यंत अनेकांना मिळालेल्या असतात. या जखमांवर लक्ष ठेवणारे, त्यावर मलपट्टी करणारे कवी, साहित्यिक, विचारवंत हे आपापल्या ठिकाणी हातात काठी घेतलेले अल्केबियाडीसंच असतात, ही मंडळी सामाजिक, राजकीय समस्यांवर थेट उत्तरं सांगत नाहीत, पण त्यावर शोधलेल्या उत्तरांचं परिक्षण करतात, त्यातला खरेखोटपणा स्पष्ट करून त्याच्या उपयोगमूल्यावर चर्चा करतात.

बायकांना कायम मूर्ख, बेअक्कल, परावलंबी, उपभोग्यवस्तू आणि म्हणूनच कमकुवत ठरवून त्यांना प्रतिष्ठेच्या मखरात बसवणारा समुदाय कधीही समकालीन असतो. सॉक्रेटिसने तत्वज्ञानासोबतच व्यवहारी जगाचं शहाणपणही शिकावं अशी अपेक्षा असलेल्या सॉक्रेटिसची पत्नी झांटिपीला क्रिटो मूर्ख ठरवतो, त्यावेळी प्लेटो त्याला गप्प करतो आणि आपल्या सर्वांपेक्षा झांटिपीला सॉक्रेटीस जास्त कळलाय, असं निक्षून सांगतो, बायकांना, बायकांच्या तुलनेत पुरुष जास्त कळत असावेत, इतकाच हा विचार नाही, सॉक्रेटीसचं मन आणि मेंदू त्याहीपलिकडे जाऊन त्याच्या मनात वसणारं सत्य हे झांटिपीला त्या आधीच कळल्याचं यातून स्पष्ट व्हावं, तिथं या दांपत्याच्या पती-पत्नीतल्या नातेसंबंधाचा विषय नगण्य ठरावा. नाटकातल्या सॉक्रेटिसनंही हे मान्य केलेलं असावं, त्यामुळेच तर सर्वच गोष्टी माझ्या बुद्धीला समजतील असं नाही.

सत्य आकलनात येतंय, असं वाटत असताना ते कायम दूरच पळत असतं का, मी तुला ओळखत होतो, पण नव्हतोही अशी प्रश्नवजा कबुली सॉक्रेटिस देण्याआधी झांटिपीने त्याच्यासमोर मांडलेली बाजू हे सॉक्रेटिसच्या सत्य आणि तत्त्वज्ञानाच्या आग्रहापेक्षा जास्त परिणामकारक, व्यवहारी ठरावं, झांटिपी म्हणते, आपल्यातील वयाचा फरक आणि तुझं जगण्याचं तत्वज्ञान मला मान्य होतं, पण दोन माणसांत फरक असतोच ना, सगळ्या मनोवृत्ती सामावून घ्याव्यात एवढा मोठा आवाका, हवाच का कुठल्याही तत्वज्ञानाचा. झांटिपीने सांगितलेलं हे प्रखर निसर्गसत्य सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानाच्या प्रश्नांचं उत्तर असावं….सम्यक संबुद्ध झाल्यानंतर तथागतालाही तुम्हाला समजलेला सद्धम्म समजण्यासाठी घरदार बायकामुलं सोडून सन्यस्त जीवन जगण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्न यशोधरेने विचारला होता. अर्थात घर प्रपंचातही सत्य आणि परमार्थ साधता येतो हे महामानवांना जवळून ओळखणार्‍या महिलांना काकणभर जास्तच समजलं असावं, असा अर्थ काढता येईल. जगातील सर्व धर्म आणि क्रांत्या, राजकीय सामाजिक मूल्यांचा उद्घोष करणारे लढे यात महिलांचा वाटा कितीसा होता? का त्यांना कायमच डावलले गेले, किंबहुना सत्याचं संपूर्ण तत्वज्ञान पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आकलानाबाहेरच असावं, असा इतिहासावर नियंत्रण मिळवलेला पुरुषी विचार त्यामागे असावा का, हा प्रश्नही कायम आहे.

सॉक्रेटिस काळानं सत्यावर चढलेली धर्माची पुटं खरवडून काढतो, जहर पाजल्यानंतर मरणाच्या दारात असलेला देवाला कोंबडं पोहचवण्यासाठी सांगणारा सॉक्रेटिस हा जाणिवेच्या स्तरावर मुळातंच धार्मिक आणि सश्रद्ध असल्याचा डॉ. लागूंनी साकारलेल्या सॉक्रेटिसच्या व्यक्तीरेखेने दिलेला पुरावा ठरावा. मरणाच्या दारात सॉक्रेटिस तत्वज्ञ, राजकीय अभ्यासकातून फारकत घेत केवळ नितळ माणूस बनतो, ज्याला निसर्गाचं गूढ पुरतं उलगडलेलं नाही, तो हे गूढ समजण्याच्या शहाणपणाच्या वाटेवर आहे, मात्र संपूर्ण शहाणा अजूनही झालेला नाही, त्यामुळे तो सश्रद्धच असावा. सॉक्रेटिससोबत होणारा ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकाचा अखेरही हेच तत्वज्ञान समोर आणतो, जे सॉक्रेटिसने जगलेलं असतं.