घरफिचर्ससारांशमेंदू ताब्यात घेणे आहे!

मेंदू ताब्यात घेणे आहे!

Subscribe

पुछता है भारत... असं जोरजोराने हातवारे करत, किंचाळत, आरडाओरडा करत ते बोलत असतात तेव्हा तो एक मेंदू ताब्यात घेण्याचा प्रकार असतो. खोटे बोला, पण रेटून बोला, असा खोट्याचा खरा अभिनय केला की, मग एक आभासी चित्र तयार होते. जणू गारुडी पुंगी वाजवत असतो आणि समोरच्या न ऐकू येणार्‍या सापाला तो पुंगीवर डोलवत असतो तसाच हा बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रकार आहे. बाबा, बुवा, माँ जसे भक्तांना ताब्यात घेतात तसेच हे मायाजाल असून एकदा हा या मोहमयी जगात तुम्ही अडकलात की, मेंदू चालेनासा होतो आणि शरीर थंड पडते. त्याच्या हालचाली मंद होतात. समोरचा बाबा एक इशारा करतो. तुमचे शरीर त्याच्या स्वाधीन होते. कारण तुमचा मेंदू त्याच्या ताब्यात असतो.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, कंगना रानौतचा थयथयाट, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांची आक्रस्ताळी मीडिया ट्रायल बघून भारताचे सध्या सगळे प्रश्न संपले आहेत, असा गेल्या काही महिन्यांपासून एक भास तयार केला जात आहे. कोरोनाच्या काळात लोकांच्या नोकर्‍या गेल्या, आहे त्यांचे निम्म्याने पगार कमी झाले, लोकांच्या हाताला काम नाही, सरकारकडे पैसा नाही, पैसा नाही म्हणून विकास नाही आणि विकास नाही म्हणून देश भकास झाला असताना आता लोकांच्या वाढत्या संतापाला रोखायचे कसे? असा प्रश्न असताना एक सोपी गोष्ट सध्या केली जातेय ती म्हणजे जनतेचा मेंदू ताब्यात घेण्याची. सध्या मध्यवर्ती निवडणुका नसताना या ना त्या कारणामुळे लोकांची मती भ्रष्ट करता येत नाही, मग काय करायचे? यावेळी सरकार काहीच करत नसते. ते करून घेत असते. मागच्या दरवाजाने.तेच आज रिपब्लिक टीव्ही आणि भाजप आयटी सेलच्या 80 हजार बोगस अकाऊंटच्या माध्यमातून समोर आले आहे.

भाजपची आणि मोदी सरकारची तळी उचलताना रिपब्लिकने काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे या देशाच्या अधोगतीला कारणीभूत असून भाजप हा एकमेव पक्ष राष्ट्रवाद आणि देशाशी प्रामाणिक असल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळा झाला आहे. गंमत म्हणजे हे करताना आपल्या देशाचे सर्व सभ्यतेचे निकष आपल्या आक्रस्ताळी बोलण्यातून अर्णव या माणसाने पायदळी तुडवलेत. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री या पदाचा एक मान आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून आपली सारी हयात त्यांनी राजकारण आणि समाजकारण करण्यात घालवली आहे. या दोघांचा मान राखताना त्यांना आदराने बोलणे हे सभ्यपणाचे लक्षण झाले आणि भारतात आपण समोरच्या माणसाचा आदर करूनच बोलतो. पण, या देशात आपणच आता न्यायाधीश असून त्यांचा न्यायनिवाडा करण्याचा हक्क फक्त आपल्याला आहे, अशा तोर्‍यात सध्या अर्णव महाशय ज्याला त्याला शिक्षा सुनावत सुटले आहेत.

- Advertisement -

पुछता है भारत… असं जोरजोराने हातवारे करत, किंचाळत, आरडाओरडा करत ते बोलत असतात तेव्हा तो एक मेंदू ताब्यात घेण्याचा प्रकार असतो. खोटे बोला, पण रेटून बोला, असा खोट्याचा खरा अभिनय केला की, मग एक आभासी चित्र तयार होते. जणू गारुडी पुंगी वाजवत असतो आणि समोरच्या न ऐकू येणार्‍या सापाला तो पुंगीवर डोलवत असतो तसाच हा बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रकार आहे. बाबा, बुवा, माँ जसे भक्तांना ताब्यात घेतात तसेच हे मायाजाल असून एकदा हा या मोहमयी जगात तुम्ही अडकलात की, मेंदू चालेनासा होतो आणि शरीर थंड पडते. त्याच्या हालचाली मंद होतात. समोरचा बाबा एक इशारा करतो. तुमचे शरीर त्याच्या स्वाधीन होते. कारण तुमचा मेंदू त्याच्या ताब्यात असतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना तरी कुठे माहीत होते की, त्यांना हत्येची सुपारी कोणी दिली होती? एकदा काम सोपवले की, विषय संपला. एखाद्या यंत्रासारखे काम करायचे. येणार्‍या सूचनांचे पालन करायचे. काही प्रश्न विचारायचे नाहीत. कारण मेंदू ताब्यात दिलेला असतो.

आज देश आर्थिक अराजकतेच्या खाईत लोटला गेला असताना पालघरचे साधू हत्याकांड, सुशांत सिंहची आत्महत्या, कंगना, हाथरस या प्रकरणात घटनेच्या मुळाशी जाण्यापेक्षा भाजप, केंद्र सरकार कसे बरोबर आहे, यासाठी अर्णव हे आपले रक्त आटवत असतील आणि हे एकमेव सोडून देशाची सारी मीडिया दुसरी बाजू दाखवत असेल तर कुठला आणि कोण भारत कोणाला विचारतोय? याला काहीच अर्थ उरत नाही. उरतो फक्त थयथयाट… शेवटी त्यामधून उघड होतो मोठा टीआरपी घोटाळा. यात तीन टीव्ही चॅनल्स असून त्यामध्ये अर्णव गोस्वामी यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ चा समावेश आहे. आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल. या टीव्हीचा मालक भाजपचा एक नेता असून यात भाजपचा पैसा असेल तर अर्णव हे भाजपचे गाणे गाणार हे आता लपून राहिलेले नाही. ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते आणि टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला, असे सांगत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अर्णव गोस्वामी यांचा भांडाफोड केला आहे. या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे. या रॅकेट अतंर्गत प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला 400 ते 500 रुपये दिले जायचे. शिवाय रिमोट कन्ट्रोल घेऊन टीव्ही लावा की, पहिला दिसणार तो रिपब्लिक चॅनेल, असा हा सारा खोटारडेपणा आहे.

- Advertisement -

हे कमी म्हणून की काय भाजपच्या आयटी सेलचे रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट उघडून बदनामी वा अपप्रचाराची मोहीम राबवण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा त्यांनी जणू विडा उचललाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट-कारस्थान असल्याचे पुरावे पोलिसांना देण्यात आले आहेत. ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट किंवा पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला 25 ट्विट्स केल्याचे दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेत ते म्हणजे सुशांत सिंह राजपूत प्रकरण. त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. भाड्याने घेतलेल्या सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही पद्धत असून याच माहितीच्या आधारावर मग रिपब्लिक चॅनेल जोरजोरात अपप्रचार करताना दिसतात.

सुशांतच्या आत्म्याशी बोललो असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर व्हायरल झाला होता. मुंबई पोलिसांच्या तपासात अशा 80 हजार बोगस अकाऊंटच्या माध्यमातून बदनामीची मोहीम राबवल्याचे उघड केले आहे. पालघरमधील दोन साधूंच्या हत्येवेळी, दिल्ली दंगलीतही हीच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती आणि भविष्यातही अशाच पद्धतीने हे उपद्व्याप करुन समाजात अशांत पसरवली जाऊ शकते, तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. भाजप आयटी सेलने 80 हजार बनावट नावांनी याप्रकरणी समाजमाध्यमी राळ उडवली. याचा अर्थ हे सर्व पद्धतशीरपणे केले गेले आणि त्यासाठी आवश्यक पैसा हाती असल्याखेरीज इतका राडा होणे अशक्य आहे.

पुछता है भारत आणि भाजपच्या भाडोत्री आयटी सेलने केलेले हे राडे म्हणजे आधुनिक पगारी, कंत्राटी गोंधळी समाजमाध्यमे आहेत. जीव घेणे आणि गेलेल्या जीवाची उस्तवारी करणे हे खर्चिक असल्याचे माणसांना न मारता त्यांची विचारक्षमता बधिर करून म्हणजे त्यांचा मेंदू ताब्यात घेऊन आपले लक्ष्य ते निश्चित करतात आणि तेच आताच्या सर्व प्रकरणात विरोधकांना बदनाम करण्यावरून दिसून आले. एके काळच्या गुन्हेगारी टोळ्यांपेक्षाही हे सारे प्रकार अधिक धोकादायक असून. त्या काळी गुन्हेगारी टोळ्यांचा सामान्यजनांना फारसा काही उपद्रव नसे. जी काही लढाई व्हायची ती त्यांची त्यांची आपापसांत. मात्र हातात सामान्यांच्या होतात असलेल्या मोबाइलमध्ये घुसून थेट मेंदूच ताब्यात घ्यायचा आताच हा सारा प्रकार आहे. कोण भारत, कुठला भारत तुम्हाला विचारतोय, सारा बकवास प्रकार आहे. भाजपची तळी उचलण्याचा, आरती ओवाळण्याचा हा प्रकार असून लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कृपया आपला मेंदू कोणाच्या ताब्यात देऊ नका… सारासार विचार करा. तीच आपली सर्वसामान्य माणसाची ताकद आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -