Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश विठ्ठल नामाचा रे टाहो...

विठ्ठल नामाचा रे टाहो…

सुरेश वाडकरांनी त्यांच्या मिठ्ठास आवाजाने संगीताच्या दुनियेत त्यांची जबरदस्त छाप पाडली. संगीताच्या भाषेत सांगायचं तर सुरेश वाडकर हा एक ‘सुरीला’ माणूस म्हणून ओळखला गेला. संगीताच्या व्याकरणाप्रमाणे सुरीला त्याला म्हटलं जातं, ज्या गायकाचा सूर त्याने लावल्या लावल्या अर्ध्या सेकंदात लागतो. याच आवाजातून पुढे ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’ अशा भक्तिभावाने दणाणला की ऐकणार्‍याची भक्ती देवाच्या पायाशी पोहोचली.

Related Story

- Advertisement -

ही गोष्ट तशी साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची. एका अशाच कोणत्या तरी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुरेश वाडकरांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं, ज्या शोचे चलाख आणि चटपटीत परीक्षक अवधूत गुप्ते याने सुरेश वाडकर सर्वांसमोर येण्यापूर्वी त्यांची शोमधल्या स्पर्धक आणि प्रेक्षकांना ओळख करून दिली होती. ओळख करून देताना अवधूत गुप्तेने म्हटलं होतं, ‘…तर आज आपल्याकडे आलेले पाहुणे सुरेश वाडकर यांची ओळख करून देण्याची गरज मला वाटत नाही. पण गाणं हा विषय निघाला की देवानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं ते सुरेश वाडकर आज या ठिकाणी इथे आले आहेत.’ ही ओळख करून दिल्यानंतर खुद्द सुरेश वाडकरांनीही अवधूत गुप्तेंचा खांदा किंचित दाबला होता.

कुणाचीही ओळख करून देतानाचा यातला उपचाराचा भाग सोडा किंवा देवादिकांच्या रांगेत बसवण्याची अतिरिक्त प्रशस्तीही सोडा, पण ही ओळख सुरेश वाडकर नावाच्या एका गायक कलाकारातल्या कलेचं महात्म्य सांगणारी होती.

- Advertisement -

परवा सुरेश वाडकरांना पद्मश्री मिळाल्यानंतर हाच विचार मनात आला की अशा या अव्वल दर्जाच्या कलाकाराला, संगीताला बरंच देणं दिलेल्या एका गायकाला इतक्या उशिरा हा किताब मिळावा?

श्रीकांत ठाकरेंच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुरेश वाडकरांचं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं. गाण्याचे शब्द कवयित्री वंदना विटणकरांनी लिहिले होते – अबोली भावनांचे गीत हे उमलून झाले, कळीचे फूल झाले!. गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर श्रीकांत ठाकरे सुरेश वाडकरांवर अगदी फिदा झाले, म्हणाले, सूर आणि ताल, अशा दोन्ही गोष्टीमध्ये पक्का असलेला हा मुलगा लंबी रेस का घोडा आहे!

- Advertisement -

…आणि खरंच सुरेश वाडकरांनी त्यांच्या मिठ्ठास आवाजाने संगीताच्या दुनियेत त्यांची जबरदस्त छाप पाडली. संगीताच्या भाषेत सांगायचं तर सुरेश वाडकर हा एक ‘सुरीला’ माणूस म्हणून ओळखला गेला. संगीताच्या व्याकरणाप्रमाणे सुरीला त्याला म्हटलं जातं, ज्या गायकाचा सूर त्याने लावल्या लावल्या अर्ध्या सेकंदात लागतो. अगदी स्पष्ट करून सांगायचं तर धनुर्धार्‍याने एक डोळा बारीक करून लक्ष्यावर नेम धरला की त्या क्षणी त्याचा नेम लागतो तसा ज्याचा सूर लागतो तो सुरीला! सुरेश वाडकरांचं हे सुरीलेपण सगळ्यात आधी कुणी ओळखलं असेल तर ते संगीतकार रवींद्र जैन यांनी. सूरसिंगार संसदच्या स्पर्धेत सुरेश वाडकर एक स्पर्धक होते. खरंतर त्या स्पर्धेच्या वेळी त्यांच्या अंगात ताप होता. पण त्यांचे गाण्याचे शिक्षक आचार्य जियालाल वसंत यांनी त्यांना धीर दिला. त्याही परिस्थितीत तू गाणं गा, मंचावर गेल्यावर तुझा आजार कुठल्या कुठे पळून जाईल अशी त्यांची समज काढली. सुरेश वाडकरांनी गुरूजींची ही आज्ञा शिरसावंद्य मानली आणि ते मंचावर गेले. अजहून आये बालमा आणि तू कहाँ ये बता ही दोन गाणी त्यांनी अशी गायली की गाण्यात जीव ओतणं म्हणजे काय असतं हे सगळ्यांना कळलं. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रवींद्र जैन, सुधीर फडके काम पहात होते. दोघंही सुरेश वाडकरांच्या गाण्यावर फिदा झाले. काही काळाने पहेली नावाचा सिनेमा रवींद्र जैन यांच्याकडे आला. त्यातल्या ‘मन मोहके ये सारा सारा गाव ओ मितवा’ आणि ‘बृष्टी पडे टापूर टिपूर’ या दोन गाण्यांना जेव्हा त्यांनी चाली लावल्या तेव्हा सूरसिंगारच्या स्पर्धेतल्या सुरेश वाडकरांच्या गाण्याची त्यांना आठवण झाली. त्यांनी सुरेश वाडकरांना बोलवून ती गाणी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतली. देवळाच्या गाभार्‍यात घुमावा तसा तो धीरगंभीर आवाज किंवा पाखरांनी निरभ्र आकाशात सचैल विहारताना पंख सैल सोडावेत तसा तो मनमोकळा आवाज ती गाणी ऐकणार्‍यांच्या मनात भरून राहिला…आणि पुढे सुरेश वाडकर नावाच्या एका गाण्याचा सिलसिला सुरू झाला.

हा सिलसिला सुरू असतानाच लता मंगेशकरांसोबत ‘चल चमेली बाग में मेवा खिलाउंगा’ हे गाणं गाण्याचा योग त्यांना आला. ते गाणं तसं साधंसुधंच होतं. त्या गाण्यात गाण्यातली कलाकारी दाखवण्यासारखंही काही नव्हतं. पण त्या निमित्ताने लतादिदींनी सुरेश वाडकरांच्या आवाजाची एक वेगळी जातकुळी ऐकली. ती त्यांना पसंत पडली. त्यांनी कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासारख्या तेव्हाच्या आघाडीच्या संगीतकारांना सुरेश वाडकरांच्या नावाची शिफारस केली. ती करताना, एक नवा मुलगा आला आहे, खूप चांगला गातो अशी पुस्ती जोडायला त्या विसरल्या नाहीत. या अशाच एका काळात ‘प्यासा सावन’मधलं ‘मेघा रे, मेघा रे’ हे नितांतसुंदर गाणं सुरेश वाडकरांकडे चालून आलं. लतादिदींंसोबतचं हे गाणं सुरेश वाडकरांच्या गायक म्हणून कारकिर्दीतलं टर्निंग पॉइंट ठरलं. याचं कारण हेच गाणं शोमन राज कपूरनी ऐकलं. राज कपूर हे संगीतातले दर्दी होते, छान जाणकार होते. त्यांना सुरेश वाडकरांच्या आवाजातली ती मिठ्ठास खूप भावली. ते तेव्हा ‘प्रेमरोग’ नावाच्या सिनेमाच्या जुळवाजुळवीत दंग होते. त्यांनी ‘प्रेमरोग’ची गाणी गाण्यासाठी सुरेश वाडकरांना बोलवायचं ठरवलं. ‘प्रेमरोग’च्या त्या गाण्यांनी भलतीच कमाल केली. सुरेश वाडकर या नावाला त्या गाण्यांमुळे राज कपूर या मोठ्या बॅनरच्या वलयाची किनार लाभली आणि सुरेश वाडकर हे नाव झळाळून निघालं.

गंमत पहा, मुंबईतल्या डिलाइल रोडवरच्या एका चाळीत राहणार्‍या सुरेश वाडकरांचं नाव एव्हाना सर्वदूर पोहोचलं. ज्या कलाकाराचे वडील कोहिनूर मिलच्या कपडा खात्यात नोकरी करत होते म्हणजे गिरणी कामगार होते, जे चाळीतल्या भजन मंडळीत पायपेटी वाजवता वाजवता ‘पुंडलिक वरदे’ अशी प्रासादिक हाळी द्यायचे तेव्हा त्यांचा हा मुलगा त्यांना ‘हरी विठ्ठल’ म्हणत तितक्याच खड्या आवाजात प्रतिसाद द्यायचा, त्याच वयस्कर भजन मंडळींमध्ये हा मुलगा एखादं भजन आपल्या सुरेल आवाजात गायचा, त्याचा आवाज नंतर सातासमुद्रापार पोहोचला, ज्या आवाजाचे लक्षावधी चाहते निव्वळ त्या आवाजासाठी पुढे जीव टाकू लागले. याच आवाजातून पुढे ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’ अशा भक्तिभावाने दणाणला की ऐकणार्‍याची भक्ती देवाच्या पायाशी पोहोचली. पण काही लोकांनी तो आवाज निष्कारण भक्तिसंगीताच्या चौकटीत बंदिस्त करून टाकला. खरंतर त्या आवाजात चतुरस्त्रता होती, अष्टपैलुत्व होतं. पण सी शार्प, डी मेजरवाल्या पाश्चिमात्य लोकांनी त्या ढंगाची गाणी सुरेश वाडकरांना जमणार नाहीत असं स्वत:च ठरवून त्यांच्यावर त्या बाबतीत पराकोटीचा अन्याय केला. अर्थात, हा आवाज बंदिस्त राहिला नाही. तो प्रेमगीत, गझल, कव्वाली, अभंग असा चौखुर उधळला…आजही कुणीतरी देवानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं असं म्हणतं तेव्हा ते अतिरंजित वाटलं तरी ती त्याची खूप मोठी कमाई असते!एके काळी महंमद रफी, मन्ना डे, हेमंतकुमार, किशोरकुमार याचं एक पर्व होतं, ते पर्व अस्तंगत होत असतानाच सुरेश वाडकर हे नाव उदयाला आलं, जणू ते त्या काळातल्या अखेरच्या शिलेदाराचं नाव ठरलं. आज त्या नावाला उशिरा का होईना पद्मश्री बहाल करण्यात आला, हा त्या नावाच्या एका देदीप्यमान काळाचा निश्चितच गौरव आहे!

- Advertisement -