घरफिचर्ससारांशती येते आणिक जाते...

ती येते आणिक जाते…

Subscribe

आरती प्रभू, ग्रेस यांच्यासारख्या कवींच्या शब्दांना चाल देताना आणि ती देता देता त्या शब्दांना, त्यातल्या आशयाला, त्यातल्या अर्थाला, त्यात मांडलेल्या विचाराला न्याय देताना तो त्या सुरांतून पूरक होतो की नाही हे पाहणं तर संगीतकाराची निश्चितच तारेवरची कसरत असल्याचं स्पष्ट दिसून येतं.

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका,
कारण ती ज्या वाटा चालते आहे,
त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या,
मोडून पडाल!

अशी आपल्या कवितेची मुळातच नागमोडी ओळख करून देणारे कवी आरती प्रभू. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातच एक गुढता होती असं त्यांना जवळून पाहिलेले सांगायचे. त्यांना न पाहू शकलेली माणसं त्यांना त्यांच्या साहित्यातून पाहू शकली; पण या माणसांनाही त्यांच्या साहित्यातून त्यांच्या गूढ व्यक्तिमत्वाचाच अंदाज आला. जीवनाला स्पर्श करणार्‍या, जीवनाचा तळ ढवळून काढणार्‍या, जीवनाचा शोध घेणार्‍या त्यांच्या साहित्याचा ओझरता धांडोळा घेतला तरी त्यांच्या साहित्यातली घनगर्द खोली कळून यायची.

- Advertisement -

…तर असे हे कवी आरती प्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर. त्यांना एखादी कविता सुचायची तेव्हा त्या कवितेतले शब्द ते कधी एखाद्या चिठोर्‍यावर लिहायचे, कधी वहीत लिहून ठेवायचे, कधी कधी काही शब्द मनात साठवून ठेवायचे. साक्षात मरण समोर दिसत असतानाही त्यांच्या मनात कविता दाटून आली आणि ती त्यांनी आपल्याजवळ उभ्या असलेल्या लोकांना सांगितली असे नखशिखांत कविता जगलेले हे कवी.

‘अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असो फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा’

- Advertisement -

ही त्यांची मृत्यूशय्येवरची कविता वाचताना सहज कळून येतं की या कवीने आपल्या कवितेतून जीवनाला जितक्या सहजतेने कवटाळलं तितक्याच सहजतेने त्या जीवनाचा अंतही स्वीकारला. आरती प्रभू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचं कवी आणि संगीतकार म्हणून एक वेगळं नातं होतं. आपल्या कविता आरती प्रभू कधी कधी हृदयनाथ मंगेशकरांना आणून देत असत. एकदा असंच एक चिठोरं घेऊन ते हृदयनाथ मंगेशकरांकडे आले. हृदयनाथ मंगेशकरांच्या हातात ते चिठोरं त्यांनी सोपवलं आणि काही सेकंदांतच तिथून निघून गेले. हृदयनाथ मंगेशकरांनी ते चिठोरं उघडलं आणि पाहिलं तर त्यावरचे शब्द होते –

ती येते आणिक जाते,
येताना कधी कळ्या आणते
तर जाताना फुले मागते.

हृदयनाथ मंगेशकरांनी ते शब्द वाचले. त्या कवितेतली ‘ती’ ही कुणाची प्रेयसी नाही हे त्यांना लगेच उमगलं…आणि खरंच आरती प्रभूंच्या मते, ती ही जगता जगता जगणार्‍याला मिळणारी स्फूर्ती किंवा जगण्याच्या वाटेवर कधी तरी येणारी उदासी होती. ती कविता अनेकदा वाचल्यानंतर काही दिवसांनी हृदयनाथ मंगेशकरांना तिच्यासाठी चाल सुचली. आरती प्रभू आपल्या कवितेला ती नागमोडी स्वभावातून स्फुरलेली आहे असं म्हणायचे. हृदयनाथ मंगेशकरांना सुचलेली ही चाल आरती प्रभूंच्या नागमोडी वळणाच्या कवितेसारखीच नागमोडी वळणाची होती.

यमकांचा खेळ केलेल्या किंवा चालीवर बेतलेल्या एखाद्या गाण्याला चाल लावणं आणि आरती प्रभूंसारख्या कवीच्या गूढगहन कवितेला चाल लावणं यातला फरक संगीतकाराकडूनच कळायला हवा असं काही नाही. नीट लक्ष दिलं तर कुणालाही तो फरक सहज कळून येतो. हृदयनाथ मंगेशकरांनी ‘काजळ रातीनं ओढून नेला सये साजण माझा’ या शब्दांना लावलेल्या चालीला कमी लेखण्याचा हेतू नाही; पण ‘रात्रीस खेळ चाले’ नावाच्या एका सिनेमातल्या त्या गाण्यासाठी लावलेली चाल आणि आरती प्रभूंनी लिहिलेल्या ‘ती येते आणिक जाते’ या वेगळा अन्वयार्थ लेवून आलेल्या शब्दांसाठी लावलेली चाल यातला फरक हा दिसून येतोच. कवितेला लागली जाणारी चाल ही कवितेचीच बोली आणि खोली घेऊन आली तर ती कवितेत व्यक्त झालेल्या जाणीवेची, संवेदनेची पातळी अधिक उंचावर नेऊन ठेवत असते.

घिसेपिटे शब्द नेहमीप्रमाणे समोर आले की त्याला तशीच नेहमीची ठोकळेबाज चाल लावणं आणि वेगळ्या शब्दांतून वेगळ्या आशयाचं लावण्य लेवून आलेली निथळती कविता समोर आली की तिला चाल लावताना संगीतकार म्हणून आपली संगीतकला पणाला लावणं या संगीतकारासाठी परस्परविभिन्न गोष्टी आहेत. त्यातही आरती प्रभू, ग्रेस यांच्यासारख्या कवींच्या शब्दांना चाल देताना आणि ती देता देता त्या शब्दांना, त्यातल्या आशयाला, त्यातल्या अर्थाला, त्यात मांडलेल्या विचाराला न्याय देताना तो त्या सुरांतून पूरक होतो की नाही हे पाहणं तर निश्चितच तारेवरची कसरत असल्याचं स्पष्ट दिसून येतं.

आरती प्रभूंसारखा कवी गद्यात लिहितानाही लिहून जातो –
‘आणि आकाशाकडे तोंड करून त्याने गर्जना केली, बाप्पा, तुला क्षमा नाही. वाड्यावरचे लोक दोंदे वाढवतात. माझ्या काश्याचे पाय लंगडे होतात आणि मोगरा मात्र फुलतच राहतो.’
अशा असामान्य प्रतिभेच्या कवीची रचना ही आजच्या काळातल्या जंक फूडसारखी नसते. ती एका प्रतिभेची कारागिरी लाभलेली अनन्यसाधारण रेसिपी असते.
हृदयनाथ मंगेशकरांसारखे कविता तिच्या खोलात जाऊन जाणणारे संगीतकार असल्याशिवाय अशी कविता संगीतात तिचं अस्तित्व निर्माण करत नाही हेच खरं!
‘ती येते आणिक जाते’ परवा सहज ऐकलं आणि हे सगळं आठवलं. आरती प्रभू आठवले, हृदयनाथ आठवले…त्यानिमित्त विसरता येणार नाही ते ते आवर्जून आठवलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -