घरफिचर्ससारांशस्वामिनीच्या हाती पर्यटनाची दोरी!

स्वामिनीच्या हाती पर्यटनाची दोरी!

Subscribe

खेकडा शेती, कालवे शेती, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन आणि पर्यटन यासारख्या अनेक रोजगारांच्या संधी या कांदळवनात दडल्या आहेत. सागरी जैवविविधता सांभाळून रोजगार निर्मिती करता येते, हे यामधून सिद्ध झाले आहे. वेंगुर्लेच्या दाभोसवाडा परिसरातील ‘स्वामिनी’ बचत गटाने एकत्र येत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली असून या महिला पर्यटकांना कांदळवनाने बहरलेल्या मांडवी खाडीतून फेरफटका मारून आणतात. परिसरातील निसर्गाचे महत्व सांगतात तेव्हा निसर्ग अशा दुर्गांच्या हाती सुरक्षित असल्याची खात्री पटते.

कांदळवने (खारफुटी) हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. तो चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणार्‍या भागात वाढतो. विशेष म्हणजे लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप ही कांदळवने थांबवतात. खार्‍या जमिनीतही जिची फूट (वाढ) होते ती खारफुटी. तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे. या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात. खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनार्‍याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पती समूहात झिंगे चांगले वाढतात.

खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते. सागरकिनार्‍याचे रक्षण करण्यासाठी खारफुटीची-तिवरांची जंगले खर्‍या अर्थाने तटरक्षकाची भूमिका चोख बजावतात. तिवरांच्या जतनाची गरज केवळ जमिनीची धूप थांबवण्यासाठी नसून खचणारे समुद्रकिनारे आणि मासे वाचवण्यासाठीही आहे. किनारपट्टीपासून थोडे आत, पुळणीच्या किंवा खाडीच्या भागाकडे बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या नदीचे मुख येऊन मिळालेले असते. या मुखापाशी माशांची पैदास चांगली होते. तसेच माशांना आवश्यक असणारे प्लँक्टनसारखे एकपेशीय जीवही इथे चांगल्या प्रकारे वाढतात. शिवाय विविध प्रकारचे कोळी, पक्षी, पाणकावळे, पाणबगळे, गरुड, साप यांची वाढही इथे चांगली होते. एकंदरीत संपूर्ण जीवसाखळी या भागात आकाराला येऊ शकते. त्यामुळे पुळणीचा किंवा खाडीचा भाग तिवरांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. बॅक वॉटर, खाडी किंवा पुळण या भागात केवळ तिवरांच्या अस्तित्वामुळे किती जैवविविधता असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालचा सुंदरबन प्रदेश.

- Advertisement -

तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होऊ शकतो. हा अनुभव ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टीवर येऊन थडकणार्‍या वादळांच्या वेळी आलेला आहे. तिवरांमुळे जीवसृष्टीही टिकून राहते. समशीतोष्ण हवामानात उत्पन्न होणार्‍या सागरी माशांपैकी 90 टक्के माशांच्या जीवनसाखळीत तिवरांचा संबंध एकदा तरी येतोच. अनेक परजीवी वनस्पती खारफुटीच्या आधाराने वाढतात. खारफुटी वाचविण्यासाठी सुंदरबन परिसरात 1991 पासून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा परिसर वाचला आहे. आता कांदळवने वाचवण्याची महाराष्ट्राची मोठी जबाबदारी आहे. हे सारे सांगण्याची आज गरज निर्माण झालीय ती अशासाठी की निसर्गाचा दिवा असलेले हे कांदळवन वाचवण्याचे मोठे काम आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील स्वामिनी महिला बचत गट करत आहे.

खेकडा शेती, कालवे शेती, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन आणि पर्यटन यासारख्या अनेक रोजगारांच्या संधी या कांदळवनात दडल्या आहेत. सागरी जैवविविधता सांभाळून रोजगार निर्मिती करता येते, हे यामधून सिद्ध झाले आहे. वेंगुर्लेच्या दाभोसवाडा परिसरातील ‘स्वामिनी’ बचत गटाने एकत्र येत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली असून या महिला पर्यटकांना कांदळवनाने बहरलेल्या मांडवी खाडीतून फेरफटका मारून आणतात. परिसरातील निसर्गाचे महत्व सांगतात तेव्हा निसर्ग अशा दुर्गांच्या हाती सुरक्षित असल्याची खात्री पटते.

- Advertisement -

15 डिसेंबर 2016 रोजी स्वामिनी महिला बचत गटाची स्थापना झाली. श्वेता हुले यांच्यासह 10 महिलांनी एकत्र येत हा बचत गट तयार केला. या महिला मच्छीमार कुटुंबातील असून घरातील पुरुष मंडळींनी समुद्रातून आणलेले मासे बाजारात जाऊन विकणे हे या महिलांचे रोजचे काम असायचे. मात्र मासे विक्रीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने काही तरी वेगळे करण्याच्या ध्यासातून या महिला पर्यटन रोजगाराकडे वळल्या. मात्र सुरुवातीला आर्थिक सहकार्याची गरज होती. याच काळात युएनडीच्या समन्वयक दुर्गा ठिगळे-सावंत यांची एका कार्यक्रमात त्यांच्याशी भेट झाली. हा कार्यक्रम कांदळवन संवर्धनाविषयी होता. यावेळी आपल्या आजूबाजूला मोठ्या संख्येने असलेल्या कांदळवनाविषयी आपणच जागृती का करू नये, या उद्देशाने श्वेता आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दुर्गा सावंत यांना मानसी खाडीतून फिरवून आणत कांदळवनासह या भागातील पक्षी, प्राणी दाखवले, त्यांची माहिती दिली. याचा फायदा असा झाला की सावंत यांनी स्वामिनी बचतगटासाठी कांदळवन पर्यटन प्रकल्प तयार करून दिला आणि याचा फायदा होऊन 2 बोटी, 20 लाईफ जकेट आणि गजिबो यासाठी सहा लाखांचा निधी 100 टक्के अनुदानावर मिळाला. होडी चालवणे ही एक कला असून ती पटकन जमते असे नाही, पण श्वेता हुले यांच्या पतीने बचत गटातील सर्व महिलांना प्रशिक्षण दिले आणि अवघ्या दहा दिवसांत महिला होडी चालवण्यात तरबेज झाल्या.

26 जानेवारी 2017 ला पहिल्यांदा स्वामिनीने पर्यटकांना मानसी खाडीची कांदळवन सफर घडवून आणली. महाराष्ट्रातील हा असा पहिलाच प्रकल्प असल्याने त्याची खूप चर्चा झाली. विशेष म्हणजे होडीतून सफर केलेल्या पर्यटकांनी स्वामिनीची एवढी प्रसिद्धी केली की 2017 पासून मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले. याच दरम्यान स्वमिनीच्या सखींनी कांदळवन कक्ष आणि वन विभाग यांच्या सहकार्याने शास्त्रीय पक्षी निरीक्षण, जेवण व्यवस्था, इंग्लिश संभाषण, पर्यटक सन्मान याचे प्रशिक्षण घेतले. यामुळे स्वामिनीच्या सख्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की आज राज्यातील नव्हे तर परराज्यातील आणि परदेशी पर्यटकांना त्या सहज संवाद साधू शकतात.

एका होडीतून 10 पर्यटकांना खाडीतून फिरवून आणताना कांदळवनाच्या विविध जाती, पक्षी, कांदळवनाचे महत्व, औषधी उपयोग याविषयी विस्तृत माहिती देतात. याचबरोबर सफारीसाठी येणार्‍या पर्यटकांना नाश्ता, जेवण दिले जाते. निसर्ग, पर्यटन आणि सोबत मालवणी लज्जतदार जेवण यामुळे वेंगुर्ले येथे सहलीसाठी येणारा माणूस सहजासहजी या भागाला विसरत नाही. विशेष म्हणजे फक्त मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी स्वामिनीच्या महिलांकडे मोठ्या संख्येने लोक येत असल्याने उत्पन्नाचा दुसरा मार्ग आमच्यासाठी खुला झाला आहे, असे श्वेता हुले अभिमानाने सांगतात. जेवून तुप्त मनाने जाणारा पर्यटक निघताना खाली हाताने जात नाही. स्वामिनी बचत गटाने बनवलेल्या वस्तू, मसाले, लोणची, पापड, खाद्य पदार्थ याची खरेदी करतो.

कांदळवन सफारीमुळे आज स्वामिनीच्या महिला आर्थिकदृष्ठ्या सक्षम बनल्या असून आपल्या संसाराला मोठा हातभार लावत आहेत. आज ज्या कांदळवनाने आपल्याला नवी ओळख करून दिली त्याची जाण ठेवत स्वामिनी सख्या कांदळवनाची साफसफाई करण्याचे काम आवर्जून तर करतात, पण मांडवी खाडीत खारफुटीच्या या भागात नसलेल्या प्रजाती लावण्याचे त्या मोठे काम करत असतात. विशेष म्हणजे या भागात चुकून कोणीही प्लास्टिक कचरा टाकणार नाही, याचीही त्या काळजी घेतात. श्वेता हुले यांच्यासह सुशीला हुले, आयेशा हुले, गौतमी हुले, स्नेहा खोबरेकर, प्रियांका दाभोलकर, राधिका लोणे, साई सातार्डेकर अशा स्वामिनींनी आज पर्यटनाची दोरी आपल्या हाती घेऊन रोजगाराची नवनिर्मिती केलीय.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -