घरफिचर्ससारांशस्वत:चं क्षितीज शोधणार्‍या स्त्रिया!

स्वत:चं क्षितीज शोधणार्‍या स्त्रिया!

Subscribe

‘अ स्पेस ऑफ हर ओन’ या पुस्तकातल्या बारा स्त्रियांनी आपल्या जीवनाबद्दल सांगताना त्यांच्या जगण्यावर परिणाम करणार्‍या घरातल्या आई, आजी यांच्याविषयीही सांगितलंय. त्रिवेंद्रम इथल्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’च्या वतीने १९९८ साली स्त्री प्रश्नाच्या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात बारा पैकी आठ स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या आठ स्त्रियांनी कार्यशाळेत आपल्या कहाण्या शब्दांकित केल्या. पुस्तकाचा परीघ व्यापक होण्यासाठी त्यात अजून चार स्त्रियांच्या कथनांचा समावेश करण्यात आला.

–प्रवीण घोडेस्वार

‘अ स्पेस ऑफ हर ओन’ हे लीला गुलाटी व जसोधारा बागची यांनी संपादित केलेलं पुस्तक सेज प्रकाशनाने २०१५ मध्ये प्रकाशित केलं. पुस्तकाच्या संपादकद्वयी स्त्री प्रश्नाच्या अभ्यासक आहेत. भारतीय स्त्री जीवनाचं अध्ययन करत असताना आपल्या समाजातली पितृसत्ता, पुरुषप्रधानतेची अनेकविध रूपे प्रत्ययास येतात. संस्कृती-रूढी-परंपरा-धार्मिकतेच्या नावाखाली स्त्रियांवर पुरुषांकडून होणारे अन्याय-अत्याचार-शोषण-दुय्यमत्व सर्व स्तरातल्या भारतीय समाजात आढळतं. पुस्तकात नवनीता देव सेन, वीणा मुजुमदार, झरिना भट्टी, हेमा सुंदरम, लीला गुलाटी, मैत्रयी कृष्ण राज, प्रीती देसाई, सरोजा कामाक्षी, विजया मेहता, सुशील नरुल्ला, जसोधारा बागची आणि मेरी रॉय या बारा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कहाण्या समाविष्ट आहेत. या स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे. पुस्तकासाठी कॅरोलिन इलियट यांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.

- Advertisement -

भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांची-समस्यांची-समाजातल्या तिच्या स्थानाची चर्चा करणारी अनेक पुस्तकं प्रकाशित होत असतात. अलीकडच्या काळात स्त्रीवादी अभ्यासक-कार्यकर्ते-लेखक फक्त स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार-शोषण यावरच भर न देता त्या पलीकडे जाऊन मांडणी करताना दिसत आहेत. स्त्रीवादाची एकांगी मांडणी कमी होतेय. स्त्री प्रश्नाचे इतरही पैलू विचारात घेतले जात आहेत. या अध्ययनात विविध ज्ञानशाखांचाही अंतर्भाव केला जातोय. समीक्षाशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, विधीशास्त्र यांची मदत घेऊन स्त्री प्रश्नांची व्यापक चर्चा केली जाते. परिणामी अशा अध्ययनातून प्राप्त होणारी निरीक्षणे, निष्कर्ष अंतर्मुख करणारे असल्याचं दिसतं.

‘अ स्पेस ऑफ हर ओन’ या पुस्तकातल्या बारा स्त्रियांनी आपल्या जीवनाबद्दल सांगताना त्यांच्या जगण्यावर परिणाम करणार्‍या घरातल्या आई, आजी यांच्याविषयीही सांगितलंय. त्रिवेंद्रम इथल्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’च्या वतीने १९९८ साली स्त्री प्रश्नाच्या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात बारा पैकी आठ स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या आठ स्त्रियांनी कार्यशाळेत आपल्या कहाण्या शब्दांकित केल्या. पुस्तकाचा परीघ व्यापक होण्यासाठी त्यात अजून चार स्त्रियांच्या कथनांचा समावेश करण्यात आला. भारतीय कुटुंब संस्थेत पितृसत्ताक संरचनेचा पगडा असल्याने स्त्रियांच्या संदर्भातल्या अनेक बाबी प्रकाशात येत नाहीत.

- Advertisement -

सहभागींनी आपल्या आई आणि तिच्या नातलगांशी संबंधित घटकांवर भर द्यावा, असं कार्यशाळेत सांगण्यात आलं होतं. विवाहानंतर सासरी आल्यावर तिथल्या वातावरणात कशा समरस झालो, कोणती कर्तव्ये पार पाडली, कोणत्या जबाबदार्‍या पूर्णत्वास नेल्या यांचं वर्णन न करता आपल्या आईशी, आजीशी, माहेरच्या लोकांशी कशी नाती होती/आहेत, याबाबत त्यांना लिहायला सांगितलं. या प्रकल्पातून त्यांनी पितृवंश, पुरुषप्रधानता, पितृसत्तेच्या चौकटीत राहताना आपल्या मातृवंशाबाबत भावनिक विचार करून ती वांशिक रेष आपल्यात कशी आणि कुठवर आली आहे, याचा शोध घ्यावा, ही अपेक्षा होती. या अपेक्षेची पूर्तता बर्‍याचअंशी झाली असल्याचं पुस्तक वाचताना जाणवतं.

या स्त्रियांच्या जीवनकहाण्यांमधून काही प्रमुख बाबी लक्षात येतात. एक म्हणजे यांच्या कुटुंबातल्या मागच्या पिढीत कोणीतरी बंडखोर स्त्री होती. तिचं एक उदाहरण समोर होतं. परिणामी या स्त्रिया प्रेरित झाल्यात. झरिना भट्टी यांनी आपल्या आत्याचा उल्लेख केलाय. त्या बालपणापासूनच वाद-विवाद करायच्या. म्हणून त्यांना वकीलन (अर्थात वकील स्त्री ) संबोधलं जायचं. घरच्यांनी ठरवलेलं लग्न त्यांना मंजूर नव्हतं म्हणून त्या घरातून पळून गेल्या. दिल्लीला जाऊन एकटे राहण्याचं साहस त्यांनी त्या काळात केलं. वीणा मजुमदार यांनीही मागच्या पिढीतल्या सुनेची बंडखोरी विशद केली आहे. या सुनेने तत्कालीन प्रथेनुसार सती जायला नकार देऊन जाहीरपणे या प्रथेस आव्हान दिलं. तेव्हा सतीप्रथा बंदीचा कायदा अस्तित्वात आला होता. सती गेल्यावर या कायद्यामुळे तिच्या कुटुंबाला काय त्रास होईल याची जाणीव तिने करून दिली. अशा काही उदाहरणांमुळे या लेखिकांच्या ध्यानात आलं की, स्त्रियांनी जरासं धाडस दाखवलं तर त्यांना पाहिजे असलेला पर्याय निवडता येणं साध्य होतं.

या लेखिकांच्या आया आणि आज्यांनी जीवनातल्या अवघड प्रसंगात अनपेक्षितरित्या दाखवलेल्या साहसाचं, त्यांच्या वागण्यातल्या लवचिकतेचं वर्णन महत्वाचं आहे. लीला गुलाटी यांच्या आईला पतीच्या निधनानंतर सासरच्यांनी वार्‍यावर सोडल्यावर आपल्या लेकरांना घेऊन त्या बाहेर पडल्या. सुशील नरुल्ला यांच्या आई फाळणीच्या सुमारास निर्वासित छावणीत वास्तव्य असताना कुटुंबासाठी पोलीस व नोकरशहांच्या जाचाला धैर्याने सामोर्‍या गेल्या. तर १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराने हल्ला केला त्यावेळी जसोधरा बागची यांच्या म्हातार्‍या व कृश आईने पूर्व बंगालमधल्या अनोळखींना आपल्या घरात सहारा देण्याची हिंमत दाखवली. तसेच जीव द्यायला गेलेली प्रीती देसाई यांची आईसुद्धा व्यवस्थेची बळी आणि जगण्याची उमेद असणारी होती, हे मनावर ठसतं. ह्या सर्व हकीकती व्यक्तिगत ध्येयपूर्ती करणार्‍या अथवा आपलं महत्व अधोरेखित करणार्‍या नसूनही त्यांच्या मुलींसाठी प्रेरणादायी आहेत. आपल्या जीवन इतिहासाचा हिस्सा म्हणून लेखिकांनी या कहाण्या वाचकांपर्यंत पोहचवल्या आहेत.

मराठी नाट्य रसिकांना परिचित असलेल्या विजया मेहता यांनी म्हटलंय की, नाटक लिहिताना अथवा ऐतिहासिक स्त्रीभूमिका साकारताना मला आजी आणि आई यांची ताकद कशात आहे, हे स्पष्ट झालं. मेरी रॉय यांनी मुलींवर अन्याय करणार्‍या संपत्तीविषयक सिरीयन ख्रिश्चन कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यातल्या सर्व लेखिकांनी त्यांच्या जीवनातल्या स्त्रियांना समाजाकडून जी वागणूक मिळाली त्याविषयी फार कडवट भावना व्यक्त केल्या आहेत. स्त्रियांची परंपरागत गृहिणीची भूमिका बागची आणि मुजुमदार यांच्याखेरीज कोणालाही उदात्त वाटत नाही. या लेखिकांना आपल्या जीवनाचं योग्य नियोजन करण्यासाठी शिक्षणाची शिदोरी कामी आली. शिक्षणाने त्यांना नव्या शक्यता धुंडाळता आल्या. नोकर्‍या प्राप्त झाल्या. स्वत:कडे पाहण्याची एक वेगळी नजर त्यांना मिळाली. शिक्षणामुळेच त्या उच्च पदांवर विराजमान झाल्या. संशोधक-प्राध्यापक-स्त्रीवादी विचारवंत, कवयत्री-लेखिका-कादंबरीकार, कलादिग्दर्शक-अभिनेत्री होऊ शकल्या त्या केवळ शिक्षणामुळेच!

ह्या बारा स्त्रियांचं कर्तृत्व कसं आकारास आलं, आपला मुक्तिदायी अवकाश मिळवण्यासाठी त्यांनी कोणता त्याग केला याचं सम्यक दर्शन या कहाण्यांमधून होतं. या सर्व हकीकती यशाच्याच आहेत असं नाही. मात्र लेखिकांच्या आजी नि आईचा अपयशी संघर्षसुद्धा पुढील पिढीला प्रेरणा देणारा ठरला असल्याचं दिसतं. निरनिराळ्या भौगोलिक भागातल्या, भिन्न आर्थिक-सांस्कृतिक-सामाजिक स्थितीतून आलेल्या या लेखिकांनी स्वत:चा अनुभव कथन करून सांकृतिक परिवर्तनाचं दर्शन घडवलं आहे. बारा स्त्रियांमध्ये केवळ एकच महाराष्ट्रीयन स्त्री आहे. यात अजून एक-दोन मराठी स्त्रियांचा समावेश असायला हवा होता. ही एक बाब वगळता या पुस्तकाचं संदर्भमूल्य फार मोठं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -