Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश सन्मान ज्ञानवंतांचा!

सन्मान ज्ञानवंतांचा!

आज शिक्षकदिन साजरा केला जात आहे. सरकारी पुरस्काराबरोबर सामाजिक संस्थादेखील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान करतील. शिक्षकांच्या संबधी भरभरून बोलतील. शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्याला राष्ट्रनिर्माता ठरवतील. आचार्य देवो भव म्हणून देवाच्या पंगतीत नेऊन बसवतील. मात्र यातील अंत:करणातून आलेला हुंकार किती हा प्रश्न आहे. शिक्षकांचा सन्मान हा त्याच्याकरीता जितका म्हणून गरजेचा आहे तितकाच समाजाच्या विकासाकरीता गरजेचा आहे. मात्र, शिक्षकांप्रती असणारी कृतज्ञता केवळ एकच दिवस व्यक्त होणार असेल तर त्याचा परिणाम फारसा सकारात्मक होणार नाही.

Related Story

- Advertisement -

खरेतर शिक्षकी पेशा ही नोकरी नाही. केवळ वेतन मिळते म्हणून शिक्षकी पेशात प्रवेशित होऊन शिक्षक म्हणून अपेक्षिलेले कार्य घडण्याची शक्यता नाही. शिक्षकी पेशा ही ध्येयवृत्ती आहे. येथे त्याग आणि भक्तीचा संगम आहे. येथे निरपेक्षवृत्तीचा दर्शन आहे. शिक्षकी पेशातील काम आणि प्रयोग हे प्रदर्शनीय नाही तर दर्शनीय आहे. शिक्षकाच्या कार्याचे मोल कशानेच करता येत नाही. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी शिक्षकांच्या प्रति असलेली कृतज्ञता पैशात मोजता येत नाही. ज्ञानाची किंमत कोणत्याही परिस्थितीत होत नाही. शिक्षकांच्या कार्याची दखल व्यवस्था वेळोवेळी घेत असते. नाही घेतली तरी खरा शिक्षक आपल्या परीने कार्यरत असतो. त्यामुळे प्रसिध्दीसाठी काम करणारी माणसं या पेशात फार अभावाने येतात. हे कार्य समाज उभे करण्याचे आहे. राष्ट्राच्या जडणीघडणीचे आहे. त्यामुळे त्या कार्याचे मोल कसे ठरविणार हा प्रश्न आहे.

शिक्षकी पेशाइतका समाजाच्या दृष्टीने महत्वाचा असा कोणताही दुसरा पेशा असू शकत नाही. कलामांनी शिक्षकाला शिडीची उपमा दिली आहे. शिडी एकाच जागी उभी असते आणि हजारोजण तिचा उपयोग करतात. प्रत्येकजण त्या शिडीचा उपयोग करीत उंच भरारी घेत असतो. त्यातून हजारोजणांच्या जीवनात प्रकाशवाटा निर्माण करीत असतो. त्यातून अनेकजण शिखरावर चढाई करतात, मात्र शिडी जागच्या जागी असते. शिक्षकांचे तसेच आहे. त्याच्या हातून निर्माण होणारे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, अधिकारी बनतात, अनेक क्षेत्रात भरारी घेतात. येथे प्रत्येक शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांच्या यशाचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो. कबिराने म्हटल्याप्रमाणे, गुरूसाठी शिष्याची वाढलेली उंची हा सर्वात आनंददायी क्षण असतो. असा हा एकमेव माणूस असेल, की ज्याला आपला विद्यार्थी सर्वात यशस्वी व्हावा असे मनापासून वाटत असते.

- Advertisement -

ज्याच्या मनात द्वेष, मत्सर,राग ,लोभ असत नाही. या व्यवसायाचे स्वरूप अत्यंत उद्दात आहे. त्यामुळे शिक्षकांचा त्याग आणि निरपेक्षता लक्षात घेऊन येथील वैदिक पंरपरेतही देवत्वाच्या पंरपरेतील स्थान मिळाले आहे. मातापित्या नंतर मुलांच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान महत्वाचे आहे. हा त्या पेशाचा मोठेपण आहे. आज हे मोठेपण आपण हरवत चाललो आहोत का? याचा विचार करण्याची हिच संधी मानायला हवी. व्यासपीठावर बसलेल्या अऩेक पाहुण्याच्या रांगेत शिक्षक असेल आणि एखादा पाहुणा उशिरा आला तर प्रथम शिक्षक उभे राहून ती खुर्ची सोडतो. हे सोडणे लाचारी नाही तर ती संस्कृती आहे. मात्र समाजातील घटकांना त्यानेच उठावे असे वाटत असले तर तो व्यवस्थेचा पराभव आहे. जो समाज शिक्षकांना सन्मान देत नाही. तेथे शिक्षकांचे किती नुकसान होते, त्यापेक्षा समाजाचे नुकसान अधिक होते. पाश्चात्य व्यवस्थेत शिक्षकीपेक्षा ही अधिक गुणवत्तेचा मानला जातो. त्यामुळे एकेकाळी राजसत्तादेखील शिक्षकांच्या समोर नतमस्तक होत होती. ती व्यवस्था आम्ही अनुसरणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.

शिक्षकांचे कार्य जात, धर्म, पथांच्या पलीकडे असते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेले आडनाव हे एका शिक्षकांनी दिले आणि ते बाबासाहेबांनी जीवनभर जपले. आंबेडकर गुरूजी ज्या काळात जातीपातीच्या आणि धर्मभेदाच्या भिंती अधिक दृढ होत्या त्या काळात त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे जपले. बाबासाहेबांना त्यांनी प्रामाणिकपणे ज्ञानदान केले. वेळप्रसंगी आपल्या डब्यातील भोजनही दिले. त्या शिकविण्याबद्दल कोणताही भेदभाव न करता ते ज्ञानदान करीत राहिले. निसर्गातील सूर्य, नदी, झाडेवेली कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता देत राहतात. त्याप्रमाणे शिक्षकांनी काम सुरू ठेवायचे असते. शिक्षकाच्या प्रेमापोटी बाबासाहेबांनीदेखील गुरूजींचे आडनाव आपल्या नावाच्या मागे कायमस्वरूपी लावून स्मरण केले. हा शिक्षकाच्या निरपेक्षतेला केलेला सलाम आहे. ही निरपेक्षता या पेशात पाळावीच लागते. ती पाळतात तेच आदराला पात्र ठरतात. त्यासाठी शिक्षकांनीदेखील सक्षमता दर्शवायला हवी.

- Advertisement -

शिक्षकी पेशात येणारी माणसं अधिक ज्ञानोपासक असायला हवीत. जुन्या ज्ञानावर नवी पिढी कशी घडविणार हा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षकाने सतत साधना करायला हवी. ती ज्ञानाची साधनाच शिक्षकाला आदर मिळवून देत असते. आज ज्ञानाचे स्त्रोत आणि माध्यमे बदलली आहेत. त्या सर्वांचा विचार करीत शिक्षकांनी स्वतःला समृध्द करीत मार्गक्रमण करण्याची गरज आहे. नवेनवे जे काही येत आहे. त्यासाठी तयार राहून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरच शिक्षक पेशासाठी तयार आहे असे म्हणता येईल. म्हणून या पेशात येणारी माणसं सरकारी नोकरी म्हणून दाखल होऊ लागली, पैसा मिळेल म्हणून नोकरी करू लागली तर या पेशाची उंची खालावण्याची शक्यता असते.

येथे येताना पदवीपेक्षाही खरंतर तळमळ आणि स्वतःच्या पेशाविषयी अभिमान बाळगणारी माणसं यायला हवी. स्वतःच्या पेशाबद्दल त्या पिढीला आत्मसन्मान वाटायला हवा. आपले कार्य देश व समाज घडविण्याचे आहे म्हणून देशाकरीता कोणत्याही परीस्थितीत तडजोड न होता कार्यरत राहायला हवे. सरकारने या पेशात काम करणार्‍या माणसांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याकरीता कटीबध्दता स्वीकारायला हवी. शिक्षकीपेशातील प्रत्येकाचा सन्मान करणे. शिक्षकी पेशातील कर्मचार्‍यांकडे कर्मचारी म्हणून न पाहता ते व्यवस्थेची घडी बसविणारे व राष्ट्राची जडणघडण करणारे निर्माते म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज आहे. राजसत्ता शिक्षकी पेशाचा सन्मान करील तर समाज त्यांना आदराचे स्थान देईल. त्यामुळे राजसत्तेनेदेखील गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

समाजात आज जे काही चित्र आहे त्याला शिक्षण जबाबदार आहे. पण ही परीस्थिती का निर्माण झाली याचा विचार करण्याची गरज आहे. मात्र शिक्षकांनी व्यवस्थेच्या अशुध्द प्रवाहासोबत कधीच प्रवाहपतीत होता कामा नये. विवेकाच्या जोरावरती सतत आपल्या मागे समाजाला वळविण्याचे आव्हान वर्तमानाने पेलायला हवे. वर्तमानात गुणवत्ता ढासळत असेल तर आपण जबाबदार आहोत हा विचार स्वीकारत, सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करीत राहणे हे कर्तव्य आहे. काम करावे वाटत नसेल आणि ती माणसं काम करत नसतील तर त्यांना शिक्षक कसे म्हणावे? अशी माणसं या प्रवाहात का आली? या मागील कारणांचादेखील विचार करण्याची गरज आहे. गुणवत्ताहिन समाज उभा करणे हे कोणाच्याही हिताचे नाही.

आजच्या शिक्षक दिनांच्या निमित्ताने सर्वांनी एकत्रीतपणे देश उभा करण्याचा संकल्प करायला हवा. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा व त्याग करत प्रवास सुरू ठेवला तर देशात परीवर्तन घडवून आणणे फार अवघड नाही. शिक्षकांनी स्वतःची ज्ञानशक्ती ओळखून कोणाच्या मागे न लागता स्वतःच्या मागे उभी राहणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातच या पेशाचे भले आहे. त्यामुळे समाज जसा हवा आहे, तसा विचार वर्गात पेरला गेला तर येत्या काही वर्षात ती व्यवस्था आपोआप उभी राहील. त्याकरिता मात्र स्वतःची ओळख स्वतःला झाली तर बदल अवघड नाही. बदलाची मानसिकता हेच मोठे आव्हान आहे. आजच्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने इतके घडेल तर देश पुन्हा वैभावाने उभा राहील. हे काम राजकीय शक्तीपेक्षा शिक्षण आणि शिक्षकच गतीने करू शकणार आहेत.

–संदीप वाकचौरे

- Advertisement -