विवेकाची कास सोडू नये

व्यक्तीला विवेक प्राप्त झाला की त्याला चांगुलपणाची ओढ निर्माण होते. आपण कोणता विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे हेही निश्चित करण्याचे शहाणपण येते. त्यामुळे आपण धर्मग्रंथाचे तत्वज्ञान शिकविण्याच्यापेक्षा विवेक आणि शहाणपण रूजविण्यासाठीच्या दिशेने प्रयत्न होण्याची निंतात गरज आहे. विवेकाने जगण्याचा प्रयत्न म्हणजे खर्‍या धर्माचे आचरण आहे. धर्म हा माणसाच्या मनात सद्विचाराची पेरणी करण्यासाठी असतो हे लक्षात घ्यायला हवे. आपण शहाणपण आणि विवेक न पेरता एखादा धर्मग्रंथ शिकविण्याचा प्रयत्न केला तर त्यातून कट्टरता आणि अविवेकाचीच वाट निर्माण होण्याचा अधिक गंभीर धोका आहे.

शालेय शिक्षणात श्रीमद्भगवतगीता शिकविण्याचा विचार काही राज्यात घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातही तशी मागणी पुढे आली. अशा प्रकारचे धार्मिक ग्रंथाचे शिक्षण औपचारिक शिक्षणात देणे योग्य आहे का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. प्रत्येक माणसाला जन्मजात सोबत काय मिळते तर, धर्म आणि जात आणि त्यांच्या पंरपरा मिळत असतात. मात्र त्या परंपरा सर्व धर्मीयांना मिळत असल्या तरी समाज म्हणून आपल्या सामाजिक जीवनात त्या प्रतिबिंबीत करण्याचा हट्ट न ठेवता आपण त्या उंबर्‍याच्या आतच जोपासणे समाज हिताचे असते. आपल्या सामाजिक जीवनात आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी आपल्याच धर्माची मूल्य जोपासण्याचा प्रयत्न करतो. सर्व धर्माची मूल्य ही कमी अधिक प्रमाणात समान आहेत. धर्म पंरपरेने केल्या जाणार्‍या पूजा-अर्चा घरातच केल्या जातात. स्वतःच्या घरात धर्माचे आचरण करण्यावर कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही.

आपल्या देशात एकाच वर्गात सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत असतात. त्यांच्या औपचारिक शिक्षणात उदात्त आणि उन्नत म्हणून जे काही असेल त्याची पेरणी करण्याचा एक समान धागा असतो. आपण शिक्षणातून सर्वधर्मसमभावाचा विचार रूजविण्याचा आग्रह करत असतो. सर्वधर्माचा सन्मान, आदर करणे हीच खरी धर्मनिरपेक्षता. छत्रपती शिवरायांनी कोणत्याही धर्माचा कधी उपमर्द केला नाही. सर्वधर्मीयांना जगण्यासाठी स्वातंत्र्य आणि पूजा अर्चाचे स्वातंत्र प्राप्त करून देणे हे राज्यधर्माचे काम असते ते त्यांनी केल्याचे दिसते. धर्म ही व्यक्तीच्या आयुष्यातील खासगी गोष्ट असली तरी धर्म तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी माणूस निर्माण करणे, माणुसकी जोपासणे, समाज एकसंध ठेवणे हेच उद्दिष्ट आहे. सत्याच्या पलिकडे कोणताही धर्म जात नाही. त्यामुळे धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ शिक्षणात शिक्षण नसले तरी सर्व धर्माचे सार सांगणारे बरेच काही अभ्यासक्रमात असतेच. जगातील सर्वधर्माचे तत्वज्ञान सांगणारे शिक्षण असायला हवेच, पण ते शिक्षण म्हणजे कोण श्रेष्ठ ? कोण कनिष्ठ ? असे नाही तर जगातील सर्वधर्माच्या केंद्रस्थानी नेमके सूत्र काय आहे ? याचा शोध घ्यायला आणि विचार करायला शिकविण्याची औपचारिक शिक्षणात गरज आहे.

जगातील सर्वधर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, धर्माच्या खर्‍या तत्वज्ञानाने जगण्यासाठीची दिशा मिळावी, माणसांचे जीवन उन्नत व्हावे याकरिता धर्मग्रंथाच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगणारा विचार पुढे आला. अनेक धर्मानी आपला एक विशिष्ट धर्मग्रंथ असा उल्लेख केला असला, तरी हिंदू धर्माचे तत्वज्ञान सांगणारा कोणताही एक धर्मग्रंथ नाही. मात्र या सार्‍या धर्मग्रंथाच्या तत्वज्ञानात काय सामावलेले आहे याचा विचार करणे आणि त्या विचाराच्या दिशेने मार्गक्रमन करणे हे प्रत्येक धर्मीयांचे जणू कर्तव्य आहे. आपण आपल्या धर्माच्या तत्वज्ञानाचा जीवन उन्नत करण्यासाठी उपयोग आवश्यक आहे. आपल्या धर्माच्या तत्वज्ञानावर चालत राहणे म्हणजे इतर धर्मियांच्या तत्वज्ञानावर, धर्मावर हल्ला करणे असा होत नाही. धर्माच्या तत्वज्ञानात सत्याची उपासना आहे. अंहिसेचे पालन आहे. अन्याय न करणे आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा विचार आहे.

मात्र मूळ धर्म तत्वज्ञानाचा विचार बाजूला सारत धर्ममार्तंड आणि कर्मठांनी धर्माचा चुकीचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच्या केलेल्या प्रयत्नांनी समाजात संघर्षाची बीजे पेरल्याचे दिसते. महात्मा गांधी म्हणत असत की, चांगला हिंदू होण्याच्या प्रयत्नात मी आपोआप चांगला ख्रिश्चन होतो, त्याचप्रमाणे चांगला बौद्ध होतो आणि मुसलमानदेखील होत असतो. इतर सर्व धर्माचे नेते आणि संत माझे होत आहेत. जो स्वतःचा खरा धर्म आचरण करत असतो त्याला इतर धर्मदेखील आपले वाटत असतात. खरा धर्माचा विचार मस्तकी घेणार्‍या प्रत्येकाला इतर धर्माविषयी ममत्व, आदर आणि अभिमान वाटायला हवा असतो. आपल्याला जेव्हा कुराण आणि महंमद पैंगबर यांच्याविषयी ममत्व वाटू लागेल तेव्हा आपण खर्‍या अर्थाने हिंदू बनलेले असतो. अर्थात प्रत्येक धर्मीयांनी असाच विचार पुढे घेऊन जाणे आवश्यक असते. आपला धर्मग्रंथ आणि त्यांच्या महापुरूषांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असतोच, पण त्याचवेळी आपल्या मनात इतर धर्मियांच्याबद्दलही आदर असायला हवा. कारण कोणत्याही धर्माने कोणत्याही परिस्थितीत तिरस्कार, द्वेष, अंहकार, मत्सर या भावनांचा स्वीकार केलेला नाही. प्रत्येक धर्माचा विचार माणूस घडविणे हाच असणार असेल तर आपण खर्‍या धर्माच्या शोधात सतत रहायला हवे.

आपण धर्माचा मूलभूत विचार समजावून घेण्याची गरज आहे. सर्व धर्माच्या मूलभूत प्रेरणा नेमक्या काय याचा शोध घ्यायला हवा. जो धर्म आणि धर्मग्रंथ माणसा माणसात भेद करतो तो विचार मी नाकारतो असे गांधी म्हणत. त्याचे प्रामाण्य न स्वीकारता मी ते टाळून नवा विचार स्वीकारत पुढे जाणार आहे. त्यामुळे गांधीजींनी अस्पृश्यतेचा स्वीकार केला नाही. जर एखादा धर्म अस्पृश्यता स्वीकारत असेल तर तोही मी नाकारतो. आपण जे जे उन्नत आणि उदात्त आहे त्याचा स्वीकार करत पुढे जाण्याची गरज आहे. विज्ञानात प्रचंड मोठी क्रांती झाली आहे त्या क्रांतीचे दर्शन शिक्षणातून घडावे, त्यातून कार्यकारण भावाचा विचार रूजविला जावा. विवेक आणि शहाणपण पेरले जावे. तसे काही घडले तर समाजातील अंधश्रध्दा आणि कर्मठपणा याचे दर्शन घडण्याची शक्यता नाही. मुळात व्यक्तीला विवेक प्राप्त झाला की त्याला चांगुलपणाची ओढ निर्माण होते. आपण कोणता विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे हेही निश्चित करण्याचे शहाणपण येते.

त्यामुळे आपण धर्मग्रंथाचे तत्वज्ञान शिकविण्याच्यापेक्षा विवेक आणि शहाणपण रूजविण्यासाठीच्या दिशेने प्रयत्न होण्याची निंतात गरज आहे. विवेकाने जगण्याचा प्रयत्न म्हणजे खर्‍या धर्माचे आचरण आहे. धर्म हा माणसाच्या मनात सद्विचाराची पेरणी करण्यासाठी असतो हे लक्षात घ्यायला हवे. आपण शहाणपण आणि विवेक न पेरता एखादा धर्मग्रंथ शिकविण्याचा प्रयत्न केला तर त्यातून कट्टरता आणि अविवेकाचीच वाट निर्माण होण्याचा अधिक गंभीर धोका आहे. आपण जे काही वाचतो, ऐकतो ते कितपत योग्य व चांगले आहे याचा विचार करता येणे महत्वाचे आहे. अन्यथा विवेकाशिवाय आपण हे करत गेलो तर त्यात समाज व राष्ट्राचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. धर्मग्रंथाचे व पंरपरांचे प्रामाण्य आपण दूर सारल्यानंतर काय उरते तर त्यात केवळ आध्यात्मिक प्रेरणा शिल्लक राहते. त्या प्रेरणा केवळ सार्वत्रिक प्रेमभावनेच्या असतात.

या प्रेमभावनेमुळेच संत एकनाथांनी एका दलित वर्गातील मुलाला कडेवर घेणे असेल किंवा काशीवरून आणलेले पाणी गर्दभाला पाजणे असेल हे घडले होते. संत तुकारामांनी आपले धान्याचे कोठार दुष्काळाच्या काळात सामान्य लोकांसाठी खुले करणे असेल किंवा उधारीच्या वह्या नदीत बुडविणे असेल. चंद्रभागेच्या वाळवंटावर. यारे यारे सान थोर. अवघ्या जातीचे नारीनर ही जातीभेद निर्मूलनाची उद्घोषणा करणे असेल. हे सारे संतांनी उच्चतम आध्यात्मिक प्रेरणेद्वारे केले आहे. त्यात तत्कालीन व्यवस्थेच्या परंपरेच्या विरोधातील पावले होतीच. पण त्यांच्या मनातील सार्वत्रिक प्रेमभावनेतून हे घडत गेले. संतानी प्राणी मात्रात देव पाहिला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भंगवत असे म्हणत त्यांनी नवा विचार आणि दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे म्हणत त्यांनी कर्मात देव पाहण्याच्या दृष्टिकोनाची पेरणी केली. नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती, असा सवाल करत पंरपंरेवर आणि अंधश्रध्देवर ठोका घालण्याचे काम संतानी अत्यंत विवेकाने केले. संतानी शहाणपण आणि विवेकाची वाट दाखविण्याचा प्रयत्न केला. संतानी दाखविलेल्या आणि वैज्ञानिकांनी रूजविलेल्या विवेकाच्या वाटा शिक्षणात रूजविण्याची वर्तमानात निंतात गरज निर्माण झाली आहे.

कोणत्याही एका धर्माचा विचार असे न म्हणता मानवाच्या कल्याणाचा विचार जगातील सर्वधर्मात सामावलेला आहे तोच शिक्षणातून पुढे नेण्याची गरज आहे. धार्मिक शिक्षणाची गरज वाटत असेल तर त्याचा अर्थ व्यक्तीच्या उन्नतीचा विचार असा आहे. तो जेथे जेथे सामावलेला आहे त्या सर्वच धर्मातील विचारांची पेरणी करण्याची गरज आहे. आपण जे पेरणार आहोत त्यातून कट्टरता आणि अंधश्रध्देचा विचार पुढे जाणार नाही यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. शेवटी मार्क्स जे म्हणाले होते, धर्म ही अफूची गोळी आहे, त्यामुळे आपण कोणता धर्म विचार कसा पेरतो याला अधिक महत्व असणार आहे. आपण विज्ञान युगात अधिक विज्ञानवादी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षणाची ही मोठी जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे काय शिकवायचे याचा विचार करता करता विवेकाची कास सुटणार नाही याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.