घरफिचर्ससारांशकुलंग-मदन-अलंगाच्या दुर्गम घेर्‍यात !

कुलंग-मदन-अलंगाच्या दुर्गम घेर्‍यात !

Subscribe

नाशिक किंवा भंडारदर्‍याकडे जाताना इगतपुरी दक्षिणेस सह्याद्रीची ही बेलाग रांग हमखास लक्ष वेधून घेते. या पूर्व पश्चिम रांगेवर थोर कळसूबाई असल्यानं हे आख्खं कुटुंब तिच्या नावानं ओळखलं जातं. नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवरील या रांगेत एका बाजूने अलंगगड मदनगड कुलंगगड या भल्याभक्कम गडांचा तर दुसर्‍या बाजूनं आड, औढा, पट्टा, बितनगड किल्ल्यांचा पहारा वसलाय. सह्याद्रीच्या या उंचधारेला निसर्गाचाही असा काही जबरदस्त वरदहस्त लाभलाय, त्यामुळे हा प्रदेश अधिकच दुर्गम. प्रवरा नदीच्या खोर्‍यातलं अलंग, मदन, कुलंग हे दुर्गत्रिकुट गिरिदुर्ग प्रेमींस पार वेड लावतं. या रांगेची भटकंती कुलंगगडापासून सुरू होते.

खरं सांगू,सह्याद्री भ्रमंतीत मला पामरासच काय सर्वांस अंतर्मुख होता येतं. निश्चित आत्मनिरीक्षण होतं म्हणून तर हा छंद जडतो. मलातरी माझ्या गुणदोषांसह मर्यादांचे स्वरूप कळत गेले आणि असणार्‍या क्षमतांचे परिणत रूप जाणून घ्यावेसे सतत वाटत राहिले. सह्याद्रीमधील काही दुर्गम खडतर वाटा, जिथे आयुष्य कळेल अशा गूढगंभीर मार्गाचा नाद केल्याशिवाय भ्रमंती पूर्ण होऊच शकत नाही.

मग यात ऐन तुफान पावसात नदीचा पूर ओलांडून माळशेज धबधब्याच्या पायथ्याशी किर्रर्र जंगलात प्लास्टिक शीट खाली जागवायची रात्रं असो, बेलपाड्यातून कोकणकडा मार्गे नळीच्या उभ्या चढावातून हरिश्चंद्र गडमाथा गाठणं असो(न गाठल्यास जंगलातील ती रात्रं असो), खंडाळ्याच्या कोणत्याही घळीतून उतरून ड्युक्स नोज बेस गाठून ड्युक्स-डचेजच्या मधल्या घळीतून वरचे प्रस्तरारोहण असो किंवा सरसगड-सुधागड करून ठाणाळे लेण्यांवरील डोंगरास भीडून त्या माथ्यावर तेलबैला गाठणे असो. एकापेक्षा एक अथक तंगडतोड आणि एखाद्या वेळेस ‘पुन्हा नको असे साहस’ म्हणायची वेळ आणणारे ट्रेक्स.

- Advertisement -

बहुतांशी माझा रूट फिक्स नसे. ऐनवेळी चॅलेंज घ्यावेसे वाटेल तो आणि तसाच रूट निवडायचो. अशाचपैकी एक खतरुड ट्रेक ‘पावसाळ्यात, कुलंग-मदन-अलंगगड’! सह्याद्रीमधील सर्वात टेक्निकली टफ ट्रेक. येरव्हीही इतर सिजनमध्ये मानसिक शारीरिक क्षमतेच्या कसोटीचा हा ट्रेक. तर पावसाळ्यात याचे चॅलेंज काय असेल,याची कल्पना ज्यांनी हा ट्रेक केलाय तेच करू शकतील. जिथे कल्पनेच्या पलीकडे तेच करायचे हा आपला अट्टाहास होता. माझ्या आयुष्याचा तो एक भाग होता.नेहमीच्या मळलेल्या वाटेवर ? आं हां शक्यच नाही. एकदा का, कुलंगवाडी सोडली की पुढे 3 दिवसांच्या खडतर वाटचालीत बेलाग बुलंद कडेकपारीच्या त्या अवाढव्य पसार्‍यात जंगलातील वाटचाल, तीन किल्ल्यांचा उभा ताशीव चढ आणि फक्त तुमचे तुम्ही. कुणीही वाटसरू या वाटेस चुकूनही सापडणार नाही. कुणी पडलं-आपटलं, कुणास काही चावलं त्यावर मध्ये उपाय कोणताही नाही. आपले आपण सोसायचे, निभवायचे किंवा जवळच्या अंतराची वस्ती गाठायची. पावसाळ्यात कुलंग- मदनगडाच्या कातळभिंतीवरील कातळात खोदलेल्या त्या शेवाळलेल्या पायर्‍या आणि केवळ त्याच्या खोबणीत दोन बोटं रुतवून निसटणार्‍या पायावर जोर देऊन पुढे व्हायचे, म्हणजे दिव्यच ते. एका बाजूस हजारो फूट खोल दरीवरून बिले नसता पाठीवरील सॅकसह शरीराची काळजी घेत तोल सांभाळत, धीमे धीमे अंतर कापत ओल्या अंगानं गडमाथा गाठायचा. ही, खाजच हवी.

नाशिक किंवा भंडारदर्‍याकडे जाताना इगतपुरी दक्षिणेस सह्याद्रीची ही बेलाग रांग हमखास लक्ष वेधून घेते. या पूर्व पश्चिम रांगेवर थोर कळसूबाई असल्यानं हे आख्खं कुटुंब तिच्या नावानं ओळखलं जातं. नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवरील या रांगेत एका बाजूने अलंगगड मदनगड कुलंगगड या भल्याभक्कम गडांचा तर दुसर्‍या बाजूनं आड, औढा, पट्टा, बितनगड किल्ल्यांचा पहारा वसलाय. सह्याद्रीच्या या उंचधारेला निसर्गाचाही असा काही जबरदस्त वरदहस्त लाभलाय, त्यामुळे हा प्रदेश अधिकच दुर्गम. प्रवरा नदीच्या खोर्‍यातलं अलंग, मदन, कुलंग हे दुर्गत्रिकुट गिरिदुर्ग प्रेमींस पार वेड लावतं. या रांगेची भटकंती कुलंगगडापासून सुरू होते. उत्तर पायथ्याच्या कुलंगवाडीतून किंवा कळसूबाईच्या बारी घाटातून इंदोरे-आंबेवाडी मार्गे कुलंगगड गाठता येतो. तिन्ही गडांची कातळकड्यांनी घेरलेली नैसर्गिक बुलंद तटबंदी पाहूनही नवख्यास घाम फुटावा. हे अजस्त्र कातळकडे जणू हेटाळणी करून बजावीत असावेत, ‘मानवा, किती रे तू क्षुद्र’.
कुलंगवाडीतून दीड दोन तासात गडाच्या पहिल्या घेर्‍यात येऊन कुलंगगडाच्या मुख्य कातळास भिडतो. पुढील मजल म्हणजे समजतो तशी सरळ वाट नसून चक्क उभ्या एकसंध कातळ भिंतीत कोरलेल्या पायर्‍या. काय काम असेल हे?

- Advertisement -

डाव्या बाजूस खोल दरी आणि उजव्या बाजूस गडाची कातळ भिंत. उत्तुंग उंची-अफाट दरी, साथ अफाट पाण्याची शेवाळल्या कातळावरती, भीती सांडते मरणाची अशा स्थितीत, गडाच्या पहिल्या दरवाजातील देवड्यांपाशी पोहोचायला दीड तासाचा अवधी लागतो. टप्प्या-टप्प्यावर सह्याद्री पुराण पुरुषाचा हा राकट देह त्याखाली चिंचोळ्या दर्‍या आणि पुढे त्यांची रुंदावलेली खोरीत्यावरचे पावसाळी हिरवेगार रूप थक्क करते. अजून शे-सव्वाशे कातळपायर्‍या पार करता, एकदाचा गडमाथा मिळतो. गडमाथ्यावर वार्‍याचा भन्नाट वेग थरकाप उडवतो. प्रत्येक गडा-वास्तूचं आपलसं असं सौंदर्य आणि इतिहास हमखास असतो. ‘इथे प्रत्येकाजवळ प्रत्येकाचा भूतकाळ आहे, यवनाने खूप छळलं प्रत्येकाचा आळ आहे’.

गडाचे भौगोलिक स्थान मोक्यावरचे त्यामुळे पूर्वी चेंढ्या-मेंढ्या-कसारा घाटमार्गाची रखवालदारी हा गड सांभाळे. गडावर आजही उध्वस्त-पडक्या वाड्यांची जोती शेष आहेत. तीसेकजण मावतील अशा गुंफा आहेत. दहा टाक्यांच्या समूहापाशी कातळात कोरलेले शिवलींग आवर्जून आठवतं. टाक्यांकडूनच पुढे एका घळीपाशी आल्यावर गडावरील तत्कालीन वास्तू-व्यवस्थेचं आणखी एक कुतूहल पहाता येतं. घळीत वरच्या बाजूने येणारे धबधब्याचे पाणी अडवणारा पूर्वीचा बंधारा आहे. बंधार्‍याच्या वरच्या बाजूस पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. म्हणजे अगोदर धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल आणि टाकी पूर्ण भरल्यावर ते बंधार्‍यात साठेल अशी व्यवस्था होती. बंधाराही ओव्हर फ्लो झाला की त्यातील पाणी एका गोमुखातून खाली दरीत झेपावते. कुलंगगडाची उगवती बाजू म्हणजे डोळे दिपवणारी. तासंतास इथे बसून सृष्टीच्या रुपात एकरूप होऊन जावं. कळसुबाईपासून धुक्याचा गडद पडदा अलंगगडावर आच्छादिलेला. वातावरण निरभ्र स्वच्छ असेल तर दूरपर्यंतचा इलाखा अगदी धुतल्यागत स्पष्ट गमतो. खेटून असलेला मदनगड, अलंगगड त्यापलीकडे कळसूबाईचे थोरले शिखर. दूरवर पाबरगड, रतनगड, कात्राबाई, भैरवगड, हरिश्चंद्रगड, सिद्धगड, माथेरान-पेब, चंदेरी, मलंगगड, माहुलीची रांगही दिसू लागते. निसर्गाचे विलोभनीय रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे यांचा जणू सुंदर आविष्कार इथे मनास भुरळ घालतो.

बाहेर पावसाच्या नित्य सरीत आणि भन्नाट वार्‍याच्या आवाजात आणि उबदार गुंफेत गडावरची रात्रं अनुभवायची, यासारखं सुख दुर्मीळच. कल्पनेनं जाता आलं तर इतिहासात डोकवावं, कसा काळ असेल तो ? रात्री गुंफेबाहेर एकट्यानं यायचं साहस न केलेलं बरं. वार्‍याच्या वेगाची आणि आवाजाचीही भीती वाटते. सूर्यदेव प्रसन्न असतील तर नशीब मानायचं आणि लवकरच गड उतरावयास सुरुवात करायची. चढाईपेक्षा गडाचा रॉकफेस उतार अधिक भीतीदायक असतो. मदनगड म्हणजे राजस सुकुमार, मदनाचा पुतळाच जणू. कुलंग-अलंगच्या कुशीत विसावलेला हा मदन. चढाईस दुर्गम अत्यंत कठीण. अगदी दूरवर मुंबई आग्रा रस्त्यावरूनसुद्धा ज्या पर्वताच्या माथ्यावर भलं मोठं आरपार छिद्र (नेढं) दिसतं तो निश्चित मदनगड समजावा.

कुलंगगडाकडून अलंगगडाच्या वाटेवर उजव्या बाजूने मधेच एक चढ मदनगडाकडे वळतो. काही अंतरावर पायर्‍या चढून गेल्यावर पन्नास एक फुटाची कातळ भिंत वाट रोखते. यावर अनुभवी आरोहकाने प्रस्तरारोहण करून मग इतरांस रोपच्या सहाय्याने वरती घ्यायचे. पुढे कातळ पायर्‍यानी गडमाथा गाठण्यासाठी 2 तास पुरेसे. गडमाथा आटोपशीरच. पाण्याची दोन टाकी आणि मुक्कामी राहता येईल अशी गुहा आहे. पण,या गडावर मुक्काम न करता, लगबगीने अलंगची वाट धरायची. मदनगड सावधपणे उतरून पुढे अलंगगडास जावयास गडाच्या दक्षिण पूर्वबाजूने अर्ध वळसा मारून मुख्य वाटेवर येता येतं.(पूर्वीची वाट मदन अलंगच्या खिंडीतून पुढे अलंगच्या मावळतीकडून होती. पण मधला कातळ पायरी मार्ग उध्वस्त केला गेला असल्याने आपण दुसरा मार्ग अवलंबितो) मी जितकं एका वाक्यात सहज लिहितोय, तेवढं सोप्प नाहीय बरं. पुरता दम निघतो. मला आठवतंय, काहींनी तर कुलंग-मदनाचाच धसका घेऊन अलंगगडाचा अर्ध्या वाटेतच नाद सोडून उधवणे गाठलेय.आम्हीसुध्दा तिसर्‍या वेळेस अलंगगडावर पोहोचू न शकल्याने मध्येच कातळ कपारीचा आडोसा घेऊन बिनाईटमेंट हॉल्ट केला होता. त्यामुळे लेखातील शब्द-मर्यादित वाक्यावर अजिबात जाऊ नका बरं.

अलंगगडाच्या अगदी खालच्या पदरात कातळमाथ्याला खेटून दक्षिण बाजूने एक लहानसा सुळका आहे ‘लिंगी’. लिंगीपासून डावीकडे तिसर्‍या घळीतून गडावर चढाईचा मार्ग, ही खूण लक्षात ठेवायची. पावसाळ्यात या चढाई वाटेवर तोंडावर पाण्याचा सततचा मारा असतो. घळीतून चढाई करीत असता मधे झाडाची बेचकी किंवा वासा लावलेला दिसतो. इथेही गडमाथ्या अलीकडे कातळ पायर्‍या आणि प्रस्तरारोहण चुकत नाही. मदनगडाच्या पायथ्यापासून अलंगगड माथा मिळवावयास किमान 4-5 तास लागतात. अलंग गडमाथा म्हणजे एक प्रशस्त पठारच. राहण्यासाठी दोन गुहा आणि पाण्याची 11 टाकी आहेत. पडक्या वास्तूंचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिरही. कुलंग मदन आणि अलंगच्या माथ्यावरून सभोवतालचा आसमंत थोड्या फार फरकाने तोच असतो, पण वेगळेपण दिसतेच.त्यातही विशेषतः प्रत्येक गडावरून दुसर्‍याचं रूप अधिक खुलून प्रकटतं. कळसुबाई पश्चिमेचे हे उत्तुंग पाषाणपुरुष कळसुबाईस खेटून असले तरीही या इलाख्याचा समावेश सह्याद्रीच्या घाटमाथ्यात नाहीय हे मला नवल वाटायचं.

वास्तविक ठाणे-नाशिक-नगर या जिल्ह्यांच्या सीमेवरील कळसुबाईपासून पुढे हरिश्चंद्र गड ते फोंडा घाटापर्यंत घाटमाथा पसरलाय. पण ‘घाटमाथा’ ही संज्ञा कोकण आणि देश यांच्या दरम्यानच्या संबंधावरून लागू केलीय. त्यादृष्टीने या दुर्ग त्रिकुटाचा भाग स्वतंत्र मोडतो. बरं,जसे भौगोलिक तसे अजून एक सामाजिक कारणही दिले जाते,ते म्हणजे या भागात कोळी-ठाकूर यांच्या वसाहती पूर्वी मागास जंगली होत्या. या वसाहती मराठेशाहीशी तश्या कधीच एकजीव झाल्या नव्हत्या.असो, आपण गडभटक्यांनी हे नावीन्यपणही अनुभवायचं जगायचं. ट्रेकच्या शेवटची अलंगगडावरची मुक्कामी रात्रंही स्मरणीय ठरते. अशा प्रत्येक क्षणी मला वाटत असते, पुन्हा आयुष्यात इथवर येणं होईल न होईल. आपण आत्ता इथे आहोत, हा कोणता तरी योग असावा. पण तो कोणता? हे कळत नसते. कुलंग मदन ते इथपर्यंतच्या तंगडतोडीची आठवण स्मरत मधेच डोळे मिटायचे.

अलंगगडावरून सकाळी उधवणे उतार गाठल्यावर एकदाचा ट्रेक संपता संपतो. जास्तच दमछाक झालीय असे झाल्यास शेंडीतून भंडारदरा रंधा धबधब्यापाशी एक मुक्काम बिनधास्त वाढवायचा. जाताना किंवा येताना शेंडीतून लॉन्चने रतनगड पायथ्याचे अमृतेश्वर पाहून यावं. ‘कुलंगगड मदन अलंगगड’ ट्रेकनंतर किमान चारसहा रात्री तरी झोपेत पाय घसरून पडून दचकल्याचा अनुभवही पाठ सोडत नाही. आयुष्यात असे काही स्थळप्रवास घडतात, अशा काही व्यक्ती-संस्थांचा परिसस्पर्श होतोकी आयुष्याचा तो टर्निंग पॉईंट असतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो. मी हे खात्रीने सांगेन. पर्वत दर्‍याखोर्‍यांच्या संगतीत आयुष्य जगायचे किमान उमजले. बाकी प्रारब्ध कुणास चुकलेय. मला निसर्गवाद्यांचा सिध्दांत पटतो. मानव समाजाची उत्क्रांती, प्रवृत्ती आणि कर्तृत्व हे सर्वस्वी भौगोलिक परिस्थितीवर आणि निसर्गाच्या प्रेरणेवर अवलंबून असतात. नैसर्गिक स्थिती पालटली म्हणजे समाजाच्या वृत्ती, कृती ,संस्कृतीत फरक होतो. आणि त्यांची प्रगती किंवा परागतीही होते. कुलंग-मदन-अलंगगडाचे हे उत्तुंग पाषाण पहाड युगानुयुगे आहेत, उद्याही राहतील. आपण मात्र नसणार. आपलं पुसटसंही अस्तित्व नसणार. ही समजणारी सुखद भावना मला, ‘मी केव्हाच कुणी नाही अन नसेन’ समजावते.

–रामेश्वर सावंत

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -