दहा रुपये..

आमच्या गावात त्र्यंबक बुवा पाठक म्हणून एक प्रख्यात बुवा आहेत. ते कीर्तनासाठी बाहेर गावी गेल्याने हा त्यांचा मुलगा आलाय. यालाही सर्व देवपूजा, रुद्र वगैरे येतात.आणि विशेष म्हणजे तो कॉलेजमध्ये शिक्षणही घेतो आहे. शेठजींना कौतुक वाटलं.त्यांच्याबरोबर आलेले कुटुंबीय..मित्र या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. वेदांचं अध्ययन..याज्ञिकी तर हे घाटावरचे सगळेच जण करतात. पण हा मुलगा हे करुन कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय याचं त्यांना अप्रुप वाटलं. नानाची मान ताठ झाली. धोतर जोडी..सप्तधान्य..तांब्याचं ताम्हान.. आणि वर दक्षिणा नानाच्या हातावर देण्यात आली. त्याला अजून दहा रुपये द्या. शेठाणींनी सांगितलं. अजून एक दहाची नोट त्यावर ठेवण्यात आली.

त्यावेळी नाना गंगेवर रहात होता. यशवंतराव महाराज पटांगणाजवळ ज्या दगडी पायर्‍या आहेत तिथल्या वाड्यात. त्याचे वडील म्हणजे त्र्यंबक बुवा पाठक. त्या काळातले मोठे कीर्तनकार. गावोगावी त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होत. जोडीला याज्ञिकी होतीच. तर त्र्यंबक बुवा त्यावेळी असेच कुठल्या तरी गावी गेले होते कीर्तन समारोहासाठी. त्याचवेळी पंचवटीतील एका धर्मशाळेत चातुर्मास असल्याने एक प्रयोजन आयोजित केले होते.
कॉलेजमधून घरी आल्यावर आईने पळी पंचपात्र नानाच्या हातात ठेवलं. त्र्यंबकबुवांच्या ऐवजी आज नानाला प्रयोजनाला जायचं होतं. नानानं लेंगा शर्ट काढला. धोतर..सदरा चढवला. कपाळी अष्टगंधाचा टिळा लावला. खांद्यावर उपरणं घेतलं. जवळच्या कापडी पिशवीत तांब्या भांडं ठेवलं. जेवणाचा पास घेतलाय यांची खात्री केली. रामकुंडावर इतर भटजी त्याची वाटच पहात होते. नाना आलेला पहाताच सगळे घाईघाईने निघाले.
खरंतर नानाला हे असं जायला आवडतं नव्हतं. सोवळं नेसून..गंध टिळा लावून असं कोणी बोलावलं म्हणून जेवायला जायची त्याला लाज वाटायची. पण घरची गरीबी. दक्षिणा मिळायची.. वस्त्र वगैरे दान मिळायचं म्हणून आई त्याला पिटाळायची. तेवढाच संसाराला थोडा हातभार लागायचा.
लढ्ढा धर्मशाळेत सगळेजण पोहोचले. पास दाखवल्यावर सर्वांना आत प्रवेश मिळाला. पंगती मांडलेल्या होत्याच. एक एक जण पाटावर बसू लागले. बायका भराभर पानं वाढू लागल्या. चटण्या..कोशिंबीरी..लिंबू..साधा भात.. मसालेभात.. भाज्या..खीर..लाडु अशा क्रमाने पानं वाढली गेली. पदार्थांच्या वासात उदबत्त्यांचा घमघमाट विरला गेला. कधी एकदा जेवायला सुरुवात करतो असं नानाला झालं, पण अजून संकल्प बाकी होता.
तेवढ्यात शेठजींना घेऊन केशव भट पंगतीत आले. आपल्या भांड्यातील पळीभर पाणी त्यांनी शेठजींच्या खोलगट केलेल्या तळव्यावर ठेवले. संकल्प उच्चारला. ताम्हनात शेठजींनी पाणी सोडले.
‘पार्वतीपते हर हर महादेव’ करत सगळ्यांनी सुरुवात केली.
शेठजी शेठाणी पंगतीमधून फिरु लागले. ‘आरामसे..आरामसे..’ म्हणत कोणाला काय हवं नको बघू लागले. हात जोडून आग्रह करुन लागले. मसाले भातावर शुध्द तुपाची पात्रे रिकामी होऊ लागली. खिरीच्या वाट्या..लाडू फस्त होऊ लागले. सगळ्यांची आकंठ भोजने झाली. हात धुवून विडे चघळत सगळेजण बाजूच्या हॉलमध्ये आले.
गाद्या तक्क्यांच्या बैठकीवर सगळेजण स्थानापन्न झाले. समोर खुर्चीवर शेठ आणि शेठाणी बसले होते. एका एकाची नावे पुकारल्यावर एकेक भटजी पुढे जात होते. शेठजी त्यांना नम्रपणे नमस्कार करून दक्षिणा वगैरे देत होते.
त्र्यंबक बुवा पाठक असे नाव पुकारल्यावर नाना पुढे गेला. केशवभटांनी शेठजींना सांगितलं..
आमच्या गावात त्र्यंबक बुवा पाठक म्हणून एक प्रख्यात बुवा आहेत. ते कीर्तनासाठी बाहेर गावी गेल्याने हा त्यांचा मुलगा आलाय. यालाही सर्व देवपूजा, रुद्र वगैरे येतात.आणि विशेष म्हणजे तो कॉलेजमध्ये शिक्षणही घेतो आहे.
शेठजींना कौतुक वाटलं.त्यांच्याबरोबर आलेले कुटुंबीय..मित्र या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. वेदांचं अध्ययन..याज्ञिकी तर हे घाटावरचे सगळेच जण करतात. पण हा मुलगा हे करुन कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय याचं त्यांना अप्रुप वाटलं. नानाची मान ताठ झाली. धोतर जोडी..सप्तधान्य..तांब्याचं ताम्हान.. आणि वर दक्षिणा नानाच्या हातावर देण्यात आली.
त्याला अजून दहा रुपये द्या. शेठाणींनी सांगितलं. अजून एक दहाची नोट त्यावर ठेवण्यात आली.
वस्त्र.पात्र..दक्षिणा घेऊन नाना घरी आला.त्याला मिळालेली दक्षिणा..इतर वस्तू पाहून भावंडांचे चेहरे उजळले.आता काही दिवस तरी घरात पुरेसं धान्य आहे म्हणून आईही निश्चिंत झाली.
आपण कॉलेजमध्ये जातो.. शिक्षण घेतो यामुळे झालेलं कौतुक..अधिकचे मिळालेले ते दहा रुपये नानाला खूप काही शिकवून गेले.
पदवीधर ते पीएचडी असा प्रवास करुन नाना आता डॉ. यशवंत पाठक म्हणून ओळखला जाऊ लागला. मनमाड येथील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी संत साहित्यावर मुबलक लेखन केलं.
‘मातीचं देणं’, ‘ब्रम्हगिरीची सावली’, ‘अंगणातले आभाळ’, अशी सुरस पुस्तकं लिहिणार्‍या डॉ. यशवंत पाठक यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्या ‘दहा रुपयां’मुळे.

–सुनील शिरवाडकर