बालक शिक्षणाचा कानमंत्र

अनेक अंगानी शिक्षण तज्ज्ञांना पालंकांना आणि शिक्षकांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे पुस्तक म्हणजे ‘शिक्षणाचे दिवास्वप्न’. संदीप वाकचौरे यांच्या शिक्षण चिंतनातून पालकांना आणि शिक्षकांना आपल्या पाल्य व विद्यार्थी यांबाबत डोळसपणे व सहृदयतेने शिक्षणविषयक दिलेला सल्ला म्हणजे शिक्षणाचे दिवास्वप्न. विविध कृतीद्वारे विद्यार्थ्यांचे होणारे शिक्षण म्हणजे कायमस्वरुपी संस्कार असतो हा विचार या पुस्तकातून लेखकाने पानोपानातून पेरलेला आहे. हा विचार जाणून घेऊन पालक आणि शिक्षकांनी मुलांची वाढ आणि विकास याला कसा वाव आणि प्रोत्साहन द्यायचे याचे सुंदर विवेचन लेखकाने केलेले आहे.

भारताच्या प्राथमिक शिक्षणात ज्यांचे प्रयोग आणि दृष्टी आजही शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयोगी ठरते असे विचारवंत म्हणजे ‘गिजुभाई बधेका’. त्यांचे शिक्षणविषयक तत्वज्ञान छोट्या छोट्या कवितेतून मांडले आहे. त्या कवितांच्या ओळीत दडलेले शिक्षण तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत सांगण्याचा उत्कृष्ट प्रयत्न संदीप वाकचौरे यांनी केलेला आहे. गिजुभाईंच्या कवितेतून लेखकाला गवसलेला अर्थ यथार्थपणे यात मांडलेला आहे. गिजुभाईंची शिक्षण दृष्टी म्हणजे वर्तमानातील शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रश्नावर मात करणारी वाट आहे असे लेखकाला वाटते. गिजूभाईंनी लिहिलेल्या कवितांतील अर्थ नेमकेपणाने लेखकाने या पुस्तकात शब्दांकीत केला आहे.

शिक्षणात ‘मूल’ हाच सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सर्व शिक्षण प्रक्रिया या मुलांभोवतीच फिरत रहाते. मुल शाळेत येऊन शिक्षण घेते, तेव्हा त्याला जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या व्यवहारापासून तोडले जाते. बालकाची ‘बहरु दे ना मजला आता’ ही आर्त हाक पालक आणि शिक्षकांपर्यंत वेळीच पोहोचावी यासाठी लेखकाने विविध अनुभवाच्याद्वारे अत्यंत समर्पकपणे लेखन केले आहे. मुलांच्या बाबतीत आपण घेत असलेली काळजी म्हणजे त्याला जीवनानुभवापासून दूर नेणे आहे. त्याचा अर्थ शिक्षणाच्या गुणवत्तेची वाट दूर सारणे आहे. आपण मुलांना काहीच करु न देण्यामुळे त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लेखकाने गिजुभाईंच्या ‘सांगा मला’ या कवितेतून मुलांच्या भावनांचे दर्शन घडविले आहे.

सांगा मला मी कुठे खेळायचे?
उडी कुठे मारायची?
मी कोणाशी बोलायचे?

पालक व शिक्षकांनी हे प्रश्न जाणीवपूर्वक ऐकून घ्यायला हवे. त्याला याची उत्तरे मिळतील आणि मुले त्यातून शिकतील अशी व्यवस्था उभी करायलाच हवी. हा मौलिक सल्लाही यातून लेखकाने नकळतपणे दिला आहे. ‘मूल’ वाचायला हवी.. यातून लेखकाने आजच्या शिक्षकांना मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले आहे. जगात जी राष्ट्रे प्रगत आहेत त्या देशातील शिक्षक अधिक प्रगत आहेत. शिक्षकांची जितकी उंची तितकीच राष्ट्राची उंची असते. समाजमनात स्वप्न पेरण्याचे काम शिक्षकच करतात. विनोबा भावे यांचा ‘Teacher is a Social Engineer’ हा विचारच लेखकाने आपल्या लेखणीतून शब्दबद्ध केला आहे.

मुलं म्हणजे मोठ्यांचे प्रतिबिंब असा आपला समज आहे. खरेतर प्रत्येक मूल हे स्वतंत्र असते. मुलांना स्वतंत्र वातावरणात आणि विचारात वाढू देण्यापेक्षा त्यांच्यावरती लादण्यातच मोठ्यांचे मोठेपण सामावले आहे. खरे तर आपण लहान मुलांना पूर्ण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार की नाही, हा प्रश्न यातून लेखकाने उपस्थित करत प्रत्येक बालक म्हणजे पूर्णत्वाचा अविष्कार असतो हे प्रकर्षाने मांडले आहे.

मुले स्वत:चे स्वतः खेळ खेळत असतात. त्यांचे खेळ ते शोधून काढतात. त्यांचे नियम ते तयार करतात. पण त्यात ते आपला जीव ओतत असतात. त्यातून त्यांची एकाग्रता उंचवण्याबरोबर सामाजिक जीवनाचा, विकासाचा पाया घातला जातो. त्यामुळे खेळता खेळता शिक्षण होण्याचा महत्वपूर्ण पैलू यातून हळूवारपणे उलगडला गेला आहे. मुलांना आत्मनिर्भरतेकडे कसे न्यावे याबाबतही पालक व शिक्षकांना यातून मार्गदर्शन होत आहे. आपण मोठी माणसे बालकांच्या विकासाची जबाबदारी पूर्णत: स्वत:च्या मस्तकी घेतो. त्यांच्या विकासाची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणजे सर्वच गोष्टी आपण करणे अपेक्षित नाही. त्याच्या विकासाची पाऊलवाट त्याची त्यालाच शोधता आली पाहिजे. त्यामुळे त्याला स्वत:लाच चालू दिले पाहिजे. आपण स्वत:च्या मस्तकी जबाबदारी न घेता केवळ वातावरण निर्माण करण्याची आणि संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. आपल्या मदतीने तो अपंग न होता त्याला आत्मनिर्भय होऊ देण्याची गरज लेखकाने यातून प्रतिपादली आहे.

या पुस्तकातून लेखकाने दिलेला सुंदर विचार म्हणजे बालक शाळेत शिकण्यासाठी येते याचा अर्थ ते बाहेर काही शिकत नाही असे नाही, तर बालक शाळेत येण्यापूर्वी जगण्यासाठी लागणार्‍या बर्‍याच गोष्टी शिकलेले असते हा होय. लेखक एवढेच सांगून थांबत नाही तर बालक म्हणजे कोरी पाटी हा आपला पारंपरिक विचारही खोडून काढतो. मुलांना सारे काही माहीत असते. ते बोलत नाही, प्रतिसाद देत नाही, याचा अर्थ त्यांना कळत नाही असे नाही. ते बोलत नाही त्याचे कारण ते मोठ्यांना जाणून असतात इतकेच, आपण बालकांपासून जे काही लपवत असतो ते त्यांना माहीत नसते असे अजिबात नाही. त्यामुळे बालक सारे जाणून असते. हा विचार पालक आणि शिक्षक या दोघांनाही आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

मुलांना कधीच महागड्या वस्तूंची, महालवजा शाळांची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त आई-बाबांच्या वेळेची. त्यांना भूक असते, त्यांच्या प्रेमाची कुशीत घेऊन त्यांना गप्पा मारणारे आई-बाबा हवे. आजचे आई-बाबा मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी दिनरात्र कष्ट घेताना दिसतात. धावपळ करतात. जीवतोड मेहनत करतात. यातून बालकांकडे त्यांचे नाही म्हणाले तरी दुर्लक्ष होते. बालकाला आवश्यक असणार्‍या आई-बाबांच्या सहवासाला ती मुकतात. यातून ती दुरावण्याची स्थिती निर्माण होते. यामुळे लेखकाने ‘तुम्ही फक्त इतकेच करा की, आपला सहवास आपल्या बालकाला द्या.’ तो सहवास त्याच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी वरदान ठरणारा आहे हे आग्रहाने सांगितले आहे.

शिक्षणातून मुले निर्भयी बनावेत अशी अपेक्षा असते. समाज उत्तम आणि समृद्ध होण्यासाठी निर्भय विचारांची गरज असते. निर्भय नागरिकांमधून निर्भय समाज आणि राष्ट्र उभे राहत असते. असे असताना आपण आपल्या अवती भोवती असलेल्या बालकांच्या मुक्त आणि स्वातंत्र्याच्या वातावरणात अभिव्यक्त होण्याच्या प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भीती पेरत असतो. त्या भीतीनेच आपण समाजच भीतीयुक्त करीत असतो. त्यामुळे यातून लेखकाने बालकांचा मानसिक स्वास्थाचा खर्‍या अर्थाने विचार केला असल्याचे जाणवते. यातून मुलांना जीवन निर्भय बनवण्यासाठी विवेकाचा मार्ग ते सुचवतात. खरे तर जीवन निर्भय असायला हवे असेल तर तो प्रवास विवेकाच्या दिशेने घडायला हवा यासाठी त्यांनी नरेंद्रदत्त यांचे उदाहरण चपखलपणे दिले आहे. भीती पेरण्याचे काम जी माणसे करतात ती मुले घडवित नाहीत तर बिघडवत असतात यातून लेखकाची वैचारिक वेगळेपण दिसून येते.

अनेकदा मुलांना काय कळते असे समजून आपण त्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत असतो. मुलांना काही कळतच नाही असेच आपले गृहीतक असते. मुले मात्र प्रत्येक क्षणी विचार करतात. मुलांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी शिक्षक म्हणून आपण समृद्ध होत जातो. म्हणूनच मुले बरेच काही शिकवत असतात. फक्त गरज आहे ती त्यांना समजून घेण्याची. त्यातून आपण शिकत जातो. समृद्ध होत जातो. म्हणूनच मुले आपले खरे शिक्षक असतात. असे वेगळ्या द़ृष्टिकोनातून लेखकाने मांडलेला हा विचार पालक आणि शिक्षकांना एक वेगळी दृष्टी प्रदान करतात.

अनेक लेखांमध्ये प्रत्येकाला अंतर्मुख करायला भाग पाडणारे भाष्य लेखकाने केले आहे. हे पुस्तक सर्व शिक्षक पालक व शिक्षण क्षेत्रातील कार्य करणार्‍या सर्वांनाच एक व्यापक दृष्टी देणारे आहे. संवेदनशीलतेने केलेली मांडणी प्रत्येकाला विचार व कृती करण्यासाठी प्रेरित करेल. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षक यांचे आपल्या बालकांच्या ‘शिक्षणाचे दिवास्वप्न’ पूर्ण करण्यासाठी निश्चितच उपयोगी आहे.

=पुस्तकाचे नांव :- शिक्षणाचे दिवास्वप्न
=लेखक:- श्री. संदीप वाकचौरे
=प्रकाशन :- चपराक प्रकाशन, पुणे
=पृष्ठे १३६- किमंत – २५० /- रु.

–रवींद्र खंदारे