घरफिचर्ससारांशलोककलेच्या नावानं .....

लोककलेच्या नावानं …..

Subscribe

गेली पाच दशके ही लोककलेची जपणूक करताना परशुराम गंगावणे यांना तीनदा अपघात झाला. वीस वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात गंगावणे यांच्या पायाला जबर दुखापत झाली. मात्र, अशावेळीदेखील त्यांनी आपल्या बाहुल्यांची साथ सोडली नाही. गंगावणे यांनी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून या माध्यमातून ही कला तरुण वर्गापर्यंत कशी नेता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. आपल्या मातीतली ही लोककला समाजात मान्यताप्राप्त व्हावी यासाठी गंगावणे यांनी केलेले प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहेत. या सर्वाची दखल सरकार दरबारी घेतली जाऊन परशुराम गंगावणे यांना पद्मश्री हा देशातला नागरी पुरस्कार देण्यात आला.

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रा. अनंत काणेकर पुरस्कार माझ्या ‘बिटकी’ या ललित संग्रहाला जाहीर झाला आणि सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी कुडाळला गेलो. पुरस्कार आणि इतर कार्यक्रम झाले. थोड्या वेळाने सिंधुदुर्गातील साहित्यिक मित्रांना- प्रवीण बांदेकर, गोविंद काजरेकर आणि वीरधवल परब यांना भेटलो. अनेक गप्पा झाल्या. त्या गप्पांच्या ओघात कुडाळपासून जवळ असणार्‍या पिंगुळी गावाचा विषय निघाला. तेथील लोककला, तेथील लोककलाकार आणि तिथला ठाकर समाज. दुपारच्या जेवणानंतर सगळेजण आपल्या घराकडे पांगले आणि मी रिक्षा करून पिंगुळीला पोचलो.

पिंगुळी येथील लोककलेबद्दल ऐकून होतो; पण पिंगुळी आणि आजूबाजूचा परिसर पहिल्यांदा बघत होतो. तिथे पोहोचल्यावर थेट ठाकर आदिवासी कला आंगण या नावाने उभारलेल्या कलादालनाकडे गेलो. त्या कलादालनात उभारलेल्या लोककलेची अनेक रूपे बघून आपण थक्क होतो; पण ह्या कलादालनाचा निर्माता कोण? ह्या कलादालनाकडे बघितल्यावर ह्या कलादालनासाठी किती मेहनत घेतली असेल याची कल्पना येते. हे कलादालन किंवा अकादमी निर्माण करणार्‍या माणसाचे नाव – परशुराम गंगावणे. ह्या कलादालनाच्या आत बसलेल्या एका कलाकाराने माहिती द्यायला सुरुवात केली.

- Advertisement -

ही अकादमी उघडण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी आपली गोठ्याची जागा वापरली. ह्या जागेत त्यांनी चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या ही लोककला जिवंत रहावी म्हणून 2006 च्या दरम्यान ही अकादमी उघडली.

चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांच्या या लोककलेला जवळपास चारशे वर्षांची परंपरा आहे. ज्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणजे लोककला असे समीकरण होते त्या काळापासून ही लोककला राजाश्रयावर तग धरून होती. शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिलेली ही लोककला पुढील काळात संभाजी महाराजांनी वाढवली. कोकणात विशेषतः तळकोकणात कुडाळ येथील पिंगुळी गावी ठाकर समाज स्थिर झाला आणि ह्या लोककलांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सावंतवाडीच्या बापूसाहेब महाराजांनी राजाश्रय दिल्याचे दिसून येईल.

- Advertisement -

हा ठाकर आदिवासी समाज नऊ प्रकारच्या लोककलेत प्रवीण आहे. त्यात मुख्यपणे चित्रकथी, कळसुत्री, छायाबाहुली, गोंधळ, तमाशा, पांगुळबैल, पोवाडा, पिंगळी आणि गीता (कथन) या कलांचा समावेश होतो. ह्या सर्व लोककला ह्या ठाकर समाजाने वंशपरंपरा म्हणून जपल्या आहेत. कुडाळ, पिंगुळी या गावच्या आसपास काही गावात धार्मिक कार्यप्रसंगी ह्या कलांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे काही ठिकाणी ह्या लोककलांच्या सादरीकरणासाठी गावे नेमून दिली आहेत.

पिंगुळी येथील ह्या अकादमीला भेट दिल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ह्या ठिकाणी ही लोककला जपण्यासाठी लोकांनी केलेले प्रयत्न. इथल्या परिसरात गेल्यावर हे प्रकर्षाने जाणवते. ह्या कलादालनाच्या दाराशी केलेली रंगसाधना ह्या लोककलेची साक्ष आहे. ह्या कलादालनाच्या आजूबाजूला माडा-पोफळीची झाडे आहेत. त्या झाडांवरदेखील येथील लोककलेचा प्रभाव आहे. ह्या झाडांच्या खोडावर राजे, द्वारपाल म्हणून असणार्‍या स्त्रियांची चित्रे अनेक रंगरंगोटी करून चितारलेली आहेत. प्रवेशद्वारावर असणारी कमान देखील बांबूंनी तयार केलेल्या डहाळ्यापासून बनवलेली आहे.

त्यावर खास त्या शैलीत फुले आणि पाने काढली आहेत. दरवाज्याच्या बाहेर प्रवेश करताना दोन्ही बाजूंना ढोल घेतलेले पुरुष आणि एका बाजूला छोट्या घरात एक ठाकर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष आणि त्याची स्त्री यांची प्रतिके ठेवली आहेत. याठिकाणी खास विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांची कार्यशाळा होते, या कार्यशाळा किंवा अशा प्रकारची अकादमी तयार करण्याचे प्रयोजन असे की या माध्यमातून ही लोककला पुढील पिढीपर्यंत पोचेल.

साधारण कळसूत्री बाहुल्यांच्या प्रयोगात दोन्ही हातांनी चार बोटांचा वापर करून ह्या कळसूत्री बाहुल्या रंगमंचावर आणल्या जातात. त्या माध्यमातून पौराणिक कथा मांडली जाते. रंगमंचाचे दोन भाग केले जातात. यात पुढचा भाग हा या बाहुल्यांच्या प्रयोगासाठी असतो तर मागच्या बाजूला सूत्रधार असतो. ह्या सूत्रधाराच्या मदतीने ही कथा पुढे नेली जाते.

बदलत्या काळानुसार ह्या लोककलेचे स्वरूप बदलले गेले आहे. ह्या लोककलेचे मूळ हे राजस्थानात असल्याचे लोक सांगतात. परंतु ह्या लोककलेचे स्वरूप जरी बदलले असले तरी मूळ ढाचा बदललेला नाही. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली ठाकर समाजाची परंपरा काही गावात आजही तशीच आहे. ज्या गावात हा खेळ करायचा आहे, त्या गावात हे ठाकर लोक नदीत मासे पकडून ते मासे त्या गावातील घरोघरी विकतात आणि खेळाचे निमंत्रण देतात. हे निमंत्रण देताना देखील गावात दवंडी पुकारली जाते. अशी ही लोककला केवळ व्यक्तीभिमुख नसून समाजाभिमुख आहे.

ह्या लोककलेचे मूळ हे अर्थात मौखिक स्वरूपाचे आहे. ही कला राजाश्रय गेल्यानंतर मात्र उतरणीला लागली. जनसामान्य लोकांनी ह्या लोकाकलेकडे पाठ फिरवली, परंतु परशुराम गंगावणे यांनी ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी कंबर कसली. ह्यासाठी गंगावणे यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. आजोबा, वडिलांनी जिवंत ठेवलेली ही परंपरा परशुराम गंगावणे यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपलीशी केली. ही कला जोपासण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागले. एकतर वाढती मनोरंजनाची माध्यमे समोर असताना लोकांपर्यंत ही कला पोचवणे किती अवघड गोष्ट होती, त्यात ह्या प्रयोगातून असं कितीसं उत्पन्न मिळणार?, त्यामुळे जेमतेम घर चालू शकेल एवढं उत्पन्न ही लोककला मिळवून देत होती; पण गंगावणे यांच्या चिकाटीचा इथे कस लागला. त्यांनी ह्या अकादमीच्या माध्यमातून लोकांचे लक्ष ह्या लोककलेकडे वेधले. लोकांना ह्या लोककलेची ओळख करून दिली .

गेली पाच दशके ही लोककलेची जपणूक करताना परशुराम गंगावणे यांना तीनदा अपघात झाला. वीस वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात गंगावणे यांच्या पायाला जबर दुखापत झाली. मात्र, अशावेळीदेखील त्यांनी आपल्या बाहुल्यांची साथ सोडली नाही. गंगावणे यांनी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून या माध्यमातून ही कला तरुण वर्गापर्यंत कशी नेता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. आपल्या मातीतली ही लोककला समाजात मान्यताप्राप्त व्हावी यासाठी गंगावणे यांनी केलेले प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहेत. या सर्वांची दखल सरकार दरबारी घेतली जाऊन श्री परशुराम गंगावणे यांना पद्मश्री हा देशातला नागरी पुरस्कार देण्यात आला.

ह्या मातीने अनेक कलावंत, साहित्यिक, चित्रकार, समाजकारणी, नेते ह्या देशाला दिले. अर्थात सर्वांची दखल घेणे शक्य नसते. लोककलेच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. आमच्या गावात वाडीवाडीत भजनी मंडळे आहेत, एकापेक्षा एक सरस भजने म्हणणारी नवीन मुले ही परंपरा पुढे नेताना आढळतात. त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी नावे आम्हाला माहीत; पण बाकीच्या मंडळींचे काय?, दशावताराची लोककला जपणारे अनेक कलाकार आहेत. आम्हाला फक्त ओमप्रकाश चव्हाण माहीत पण बाकीच्यांचे काय? रंगसंगतीत किमया करणारे नामा मोडकसारखे अनेक कलावंत अजूनही लोकांच्या समोर चटकन येत नाहीत. झालेच तर कासार गुरुजी आहेत. त्यांचेदेखील लोक सहजपणे नाव काढत नाहीत. ही माणसे जगापुढे कधी येणार हा प्रश्न आहेच.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका लोककलाकाराला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला याचा आनंद आहेच. त्याहीपेक्षा अभिमान आहे; पण बाकीच्या लोककलाकारांच्या पोटाचा प्रश्न कसा मार्गी लागणार? जर कलावंत जगला नाही तर कलेचे काय होणार? यातील सगळे कलावंत काही बाबी नालंग किंवा बाबी कलींगण होणार नाहीत तरी त्यांच्याबद्दल कुठेतरी, कोणीतरी दखल घ्यावी अशी एक अपेक्षा हा पद्मश्री मिळाल्यानंतर वाढली आहे हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -