घरफिचर्ससारांश..तर ती सकाळ दूर नाही मित्रा!

..तर ती सकाळ दूर नाही मित्रा!

Subscribe

आपल्या प्रत्येकाच्या आतल्या माणूस नावाच्या स्पिरिटवर विश्वास ठेवून निखळ चर्चेच्या संधीची वाट बघणं महत्वाचं असतं. कदाचित आज अशाच एका चर्चेची सुरुवात होऊ शकते असं वाटलं म्हणून हा स्पष्टीकरण प्रपंच! मी टपावर आणि तू खाली उभं राहून केलेल्या विनोदातून आपली चर्चा होणार नाही मित्रा! तर एकदा सारख्या पातळीला येऊन बोलून बघूया प्रश्न सुटतात का? किंवा कुठले नवे प्रश्न तयार होतात? त्यांना सोबत भिडण्याची तयारी असेल तर तू आणू पाहत असलेली राजकीय समानतेची आणि मला हवी असलेली लिंगाधारित समानतेची सकाळ दूर नाही मित्रा!

गेल्या महिन्यात मी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात काही दिवस सहभागी झाले होते. तिकडे जाण्यायेण्याचा प्रवास महाराष्ट्रातल्या अनेक शेतकर्‍यांसोबत, शेतकरी नेत्यांसोबत म्हणजे मुख्यत: पुरुषांसोबत केला. आंदोलनात बायकांची संख्या जितकी बोटांवर मोजण्याइतकी होती तशाच प्रमाणात ह्या प्रवासातलीसुद्धा होती. एखाद्या हाताची अर्धी बोटं पुरून उरतील इतक्या बायका. अनेक गाड्यांपैकी मी ज्या गाडीत प्रवास केला त्यात मी धरून आम्ही दोन मुली आणि भरगच्च पुरुष! प्रत्येकवेळी मुक्कामाला थांबताना आणि निघताना गाडीच्या टपावर सगळ्यांचे सामान ठेऊन बांधावे लागायचे आणि उतरतांना पुन्हा वर चढून ते सोडून खाली उतरवावे लागायचे. आणि नेहमीप्रमाणे अशी कामं गटातल्या धडधाकट आणि ज्याचं पौरुषत्व शरीरयष्टीतून दिसेल अशा पुरुषांकडे सन्मानाने जातात.

तशी ती इथेही गेली. पण एका रात्री अचानक कुणाची वाट न बघता गाडीवर चढून मी तितक्याच सहजतेने सगळं सामान सोडून खाली उतरवायला सुरुवात केली आणि उगीचच खाली उभं सगळ्या क्रांतिकारी पुरुषांचे डोळे चमकले. त्यातला एक मित्र तर चटकन टाळी वाजवून म्हणाला, वाह! ही खरी स्त्रीवादी मुलगी! विनोदावर हसावं तसं सगळे खळखळून हसले आणि विषय तिथे संपलासुद्धा! पण हे खरी स्त्रीवादी आणि खोटी स्त्रीवादी म्हणजे काय हा प्रश्न माझ्या डोक्यातून संपला नाही. मी टपावर न चढता खालूनच स्त्रियांना मिळणार्‍या असमान संधीविषयी आणि तरीसुद्धा त्यांच्याकडे असलेल्या समान शक्ती आणि ताकदीविषयी बोलत राहिले असते तर माझा स्त्रीवाद खोटा ठरला असता का? मला माझं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आणि त्याची सत्यता सगळ्यांना पटवून देण्यासाठी अशी नेहमीच टपावर चढून ‘पुरुषी’ मानली जाणारी कामं करण्याची किंबहुना करून दाखवण्याची गरज आहे का? एखादी स्त्री स्त्रीवादाविषयी बोलत असेल तर दरवेळी तिला सगळ्यांच्या नजरेतला ‘पुरुष’ होऊन दाखवण्याची गरजच असते का? त्याशिवाय आपण ती मांडत असलेल्या मानववादाकडे गंभीरपणे पाहूच शकत नाही का?

- Advertisement -

आज हा लेख प्रसिद्ध होतोय आणि उद्या लगेच महिला दिन. सकाळपासूनच आजूबाजूचं वातावरण स्त्रीवादी होईल. सोशल मीडिया, वर्तमानपत्रं, वृत्त वाहिन्या आणि अलीकडे तर झूम, गुगलमीटसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या डिजिटल जागा महिला आणि महिला विषयक पोस्ट्स, कार्यक्रमाने काठोकाठ भरतील. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या महिलांचा आपण कसा सन्मान करतो हे सांगणार्‍या सगळ्या पुरुषांच्या पोस्ट्स बघून आणि त्यावरच्या इतर सगळ्या बायकांच्या कमेंटस बघून कदाचित सारं किती आलबेल आहे असं वाटेल, पण महिला दिवस वगळता इतर दिवशी बायकांविषयी, विशेषत: स्त्रीवादी बायकांविषयी आणि एकूणच स्त्रीवादाविषयीची कलुषित मतं आणि चुकीचे समज याच पुरुषांना किंवा ‘मी फेमिनिस्ट नाही’ असं म्हणणार्‍या प्रत्येकाला गैरसमाजाच्या कुठल्यातरी दावणीला बांधून ठेवत असतात. आणि अशा गैरसमजांवर चर्चा फारशी होत नाही, होते तर फक्त कुणीतरी टपावर चढलेलं असताना खालच्या वर्तुळातली शेरेबाजी! पण ह्या अशा शेरेबाजी आधी आणि मोठ्या समूहाचा फायदा घेऊन एखाद्या विचारसरणीविषयी फुटकळ विनोद करून तात्पुरती हिरोगिरी करण्याआधी काही खूप महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात आणि स्त्रीवादाकडे बघण्याच्या आपल्या चष्म्यावर लागलेली धूळ जरा साफ करून घ्यायला हवी.

ह्यातली सगळ्यात महत्वाची आणि आपली दृष्टी सर्वात जास्त अंधुक करणारी धूळ म्हणजे स्त्रीवाद म्हणजे पुरुषद्वेष! स्त्रीवाद म्हणजे पुरुष नाकारणं! स्त्रीवाद म्हणजे आधी पुरुषांची बरोबरी करून मग त्यांना मागे लोटणं! ह्या प्रचलित समजामुळे स्त्रीवादाची संकल्पना नेहमीच स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध उभं केलेलं सुडाचं राजकारण इतकीच मर्यादित केली जाते. पण स्त्रीवादाची लढाई पुरुषांविरुद्धची लढाई नाही तर पुरुषसत्तेविरुद्धची लढाई आहे. त्यामुळे हा संघर्ष स्त्री विरुद्ध पुरुष किंवा इतर सत्ताहीन जेंडर्स आणि सत्ताधारी पुरुष असा अजिबात नाही तर स्त्री-पुरुष-एलजीबीटीक्यूआय+ विरुद्ध पितृसत्ता असा आहे. त्यामुळे स्त्री पुरुषांना गुंगवत ठेवून त्यांच्यामध्येच एक भिंत उभी करून आपलं अस्तित्व अबाधित ठेवणं हीसुद्धा पितृसत्तेचीच एक खेळी आहे हे समजायला आपल्याला आपल्या डोळ्यांवरची झापडं काढून खुलेपणाने बघावं लागेल. पितृसत्ता फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा कसं एका विशिष्ट चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करते हे समजून घ्यावं लागेल. हातात सत्तेचा चाबूक दिल्याचा भास निर्माण करून पितृसत्ताच कशी आपल्यावर नियंत्रण ठेवत असते हे स्वीकारावं लागेल. म्हणून स्त्रियांचे आंदोलन म्हणजे पुरुषांविरुद्ध सूड उगवणे नाही तर ती न्यायासाठीची एक लढाई आहे. पण अन्यायाचा प्रतिकार अन्यायाने करताच येत नाही आणि एका दमनचक्राचे उत्तर दुसरे दमनचक्र असू शकत नाही ह्याची स्त्रियांना आणि स्त्रीवादालासुद्धा पुरेपूर जाणीव आहे.

- Advertisement -

दुसरा एक चुकीचा समज म्हणजे, स्त्रीवादी बाईला तिच्या क्षमतांची जाण नसते आणि त्यांना पुरुषांशी बरोबरी करायची असते. निसर्गाने स्त्री पुरुष ह्यांना वेगळ्या क्षमता दिल्या आहेत, त्यांच्या शरीरांमध्ये मूलभूत असे फरक ठेवले आहेत आणि स्त्रीवादी बायका ते फरक नाकारून समानतेची अपेक्षा करतात आणि ही अपेक्षा कशी निसर्गनियमाला धरून रास्त नाही अशी आवई बर्‍याचदा आपली असुरक्षितता झाकण्यासाठी पुरुषांकडून उठवली जाते. स्त्रीवादाचा उद्देश नैसर्गिक भेद नाकारून पुरुषांशी बरोबरी करणं हा कधीच नव्हता फक्त सुरुवातीला पुरुष हेच समानतेचं, स्वातंत्र्याचं प्रारूप असल्याने सुरुवातीचा काळ पुरुषांचे अनुकरण करण्याचा होता पण नंतर नंतर स्त्रीवादाची चळवळ जसजशी मोठी, विस्तृत आणि व्यापक होत गेली तसतसा स्त्रीवाद संधींच्या आणि संसाधनांच्या असमान वाटपाबद्दल बोलतो. लिंगभेदाचे निकष वापरून स्त्रियांसोबत होणार्या विषम व्यवहाराबद्दल बोलतो. स्त्रियांना माणूस म्हणून वागणूक मिळण्याबद्दल बोलतो. स्त्रीवाद प्रत्येक स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करतो, जो विचार पितृसत्ता करत नाही. म्हणून सत्तेचे हस्तांतरण पुरुषांकडून स्त्रियांकडे व्हावे अशी स्त्रीवादाची मागणी अजिबात नाही तर मुळात ‘सत्ता’ ह्या दमनकारी संज्ञेलाच स्त्रीवाद प्रश्न विचारतो, मोडीत काढतो आणि परस्पर सामंजस्याने, प्रेमाने सहजीवन आनंददायी कसं करता येईल ह्याचे नवे पर्याय रेखाटू पाहतो.

स्त्रीवादी बायका ह्या घरफोड्या असतात, त्यांना कुटुंब नको असते लग्न नको असते, मोनोगॅमी नको असते म्हणून त्या भांडतात, प्रश्न विचारतात आणि व्यवस्था नाकारतात अशी तर स्त्रीवाद्यांची एक सरसकट ओळख तयार झालेलीच असते. पण स्त्रीवादी बायका म्हणून आम्ही हे का नाकारतो? हे नाकारण्याची अशी काय कारणं आहेत ज्यामुळे बहुसंख्याकांना सुरक्षित वाटणारी व्यवस्था आम्हाला असुरक्षित आणि अन्याय्य वाटते हे जाणून घेण्यासाठीची चर्चा कुठे होत नाही. लग्नसंस्था, कुटुंबसंस्था ह्या दमनकारी पितृसत्तेला किंवा जातीव्यवस्थेला अबाधित ठेवण्यासाठी काम करत असलेल्या संस्था आहेत. आणि स्त्रीवाद ह्यातल्या अन्याय्य गोष्टी नाकारतो. स्त्रीवाद सहजीवन नाकारत नाही पण त्यातल्या भेदावर आधारित गोहस्ती नाकारून समतेच्या पायावर हे सहजीवन उभं करता येईल का असे प्रश्न विचारतो. आणि असे प्रश्नच मुख्य व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी झटणार्‍या सार्‍यांना असुरक्षित करतात आणि त्याच असुरक्षिततेतून स्त्रीवादावर आणि स्त्रीवाद मानणार्‍या प्रत्येकावर अशी लेबल्स लागतात.

आणखी एका गैरसमजामुळे ही विचारसरणीच फोल ठरवून दुर्लक्षित केली जाते तो समज म्हणजे स्त्रीवाद हा पाश्चात्य विचार आहे. तो आपल्या मातीतला विचार नाही. त्यामुळे स्त्रीवाद मानाने म्हणजे पाश्चात्यांचे अनुकरण करून स्त्रीचे दैवतीकरण करणारी आपली संस्कृती नाकारणे. पण भारतीय संदर्भात हा पूर्णपणे पाश्चात्त्य विचार नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, महात्मा गांधी ह्या सगळ्यांनी अनेक शतकांपासून स्त्री-पुरुष समता व स्त्रियांचे स्वातंत्र्य याबद्दलची मांडणी केलीय. पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता जेव्हा सर्वसामान्य स्त्री शिक्षित होऊन आपल्या हक्काबाबत स्वत:च जागृत झाली आहे तेव्हा त्याला पाश्चात्य किंवा संदर्भहीन असे लेबल लावून नाकारणे सोपे आहे. आणि बव्हंशी विचारवंत म्हणवल्या जाणार्‍या गटाकडूनसुद्धा हीच चूक होते. स्त्रीवाद हा काही फक्त शहरी आणि शिक्षित स्त्रियांचा मुद्दा नाही. तर स्त्रीवाद अतिशय सर्वसामान्य, गरीब, अशिक्षित, कुठल्यातरी कोपर्‍यातल्या खेड्यात राहणार्‍या बाईबद्दलसुद्धा बोलतो. सर्वसमावेशकता हे महत्वाचं मूल्य घेऊन आपली मांडणी करणारा स्त्रीवाद सर्वसमावेशक आहे.

ग्रामीण भागातली आणि कुठलही प्रीव्हीलेजेस न मिळालेली बाईसुद्धा आज आपल्या हक्कांविषयी जेव्हा सार्वजनिक जागांवर भांडते, प्रश्न विचारते, स्वतःची ओळख तयार करण्यासाठी झगडते तेव्हा स्त्रीवाद हे प्रीव्हिलेज्ड स्त्रियांचे भरल्या पोटाने करायचे चर्वण आहे हा समज ती प्रत्येक बाई मोडीत काढते. पण झोपलेल्याला उठवणं सोपं असत, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही या न्यायाने झापडं लावून बसलेल्या या सामाजिक सत्ताधार्‍यांना सत्य पटवून देणं तितकंच अवघड आहे.
बर्‍याचदा सामूहिक चर्चांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा मित्रांमधल्या अगदी कॅजूअल गप्पांमध्येसुद्धा आपण बर्‍याचदा कळत नकळतपणे अशा कमेंट्स करतो, सेक्सिस्ट विनोद करतो आणि गटातल्या स्त्रीवादी बायकांचे चेहरे न्याहाळतो. तिने किंवा एखाद्या स्त्रीवादी पुरुषाने त्यावर प्रत्युत्तर दिलं की, कसं आपण त्यांना उकसावण्यात यशस्वी ठरलो ह्याचा आनंद गटाला त्या विनोदाइतकाच निखळ वाटतो.

पण प्रत्येकवेळी आणि शब्दश: प्रत्येकवेळी हातात प्रतिवादाच्या बंदुका घेऊन उभ्या पुरुषांसमोर आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी शब्दबंबाळ मांडणी करणं, त्यांच्या भाषेत भांडणं खूप दमवणारं असतं. त्यामुळे कितीतरी वेळा आम्ही चेहर्‍यावर कुठलेच भाव न आणता गप्प राहणं स्वीकारतो. पण गप्पं राहणं म्हणजे पुन्हा दुसरी बाजू मान्य करणं नसतं. तर आपल्या प्रत्येकाच्या आतल्या माणूस नावाच्या स्पिरिटवर विश्वास ठेवून निखळ चर्चेच्या संधीची वाट बघणं असतं. कदाचित आज अशाच एका चर्चेची सुरुवात होऊ शकते असं वाटलं म्हणून हा स्पष्टीकरण प्रपंच! मी टपावर आणि तू खाली उभं राहून केलेल्या विनोदातून आपली चर्चा होणार नाही मित्रा! तर एकदा सारख्या पातळीला येऊन बोलून बघूया प्रश्न सुटतात का? किंवा कुठले नवे प्रश्न तयार होतात? त्यांना सोबत भिडण्याची तयारी असेल तर तू आणू पाहत असलेली राजकीय समानतेची आणि मला हवी असलेली लिंगाधारित समानतेची सकाळ दूर नाही मित्रा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -