घर फिचर्स सारांश बस्स.. रुकना नहीं चाहता..

बस्स.. रुकना नहीं चाहता..

Subscribe

वर्षामागून वर्षे गेली. सातशे आठशेच्या गर्दीत बसून पिक्चर पहाणारी एक पिढी..आता एकट्याने पिक्चर पाहू लागली. चित्रपटाचा पडदाही लहान होत गेला. पण त्याच्यातून मिळणारा आनंद.. त्याच्यातून मिळणार्‍या प्रेरणा या अजूनही तश्श्याच आहेत. म्हणून तर हातातल्या मोबाईलकडे पहात..‘दुनिया मेरी मुठ्ठीमे’ म्हणत मिहीर पुन्हा एकदा नव्या उमेदीने बस्स रुकना नही चाहता, म्हणत नवीन आयुष्याला सामोरा जाण्यासाठी तयार झाला.

–सुनील शिरवाडकर

अमर अकबर अँथनी रिलीज होऊन आठवडा झाला होता. पण शिर्‍या आणि त्याच्या गँगला अजून तिकिटे मिळत नव्हती. रोजचे चारही शो हाऊसफुल्ल. अखेर आज त्यांनी मनावर घेतलेच.पहाटपासूनच टॉकिजवर जाऊन बसले,तेव्हा कुठे त्यांना दहा तिकिटे मिळाली.

- Advertisement -

रात्रीच्या लास्ट शो ला ते जेव्हा टॉकिजवर आले तेव्हा सिनेमा नुकताच सुरू झाला होता. आपली सीटस् शोधून ते जागेवर बसले. सातशे आठशे चेअर्स असलेले ते थिएटर गच्च भरले होते. मधल्या रो मध्येही माणसं पाय लांब करुन बसली होती.अमिताभच्या एंट्रीला तर हॉल शिट्ट्या टाळ्यांनी दुमदुमुन गेला. ‘परदा है परदा..’ कव्वाली सुरू झाली. शेवटच्या कडव्यात अमिताभ हातात फुल़ाचा हार घेऊन नाचत स्टेजवर येत तो. तेंव्हा तर सगळं थिएटरच नाचू लागलं..सलग तीन तास एका वेगळ्याच माहौलमध्ये सगळं थिएटर गेलं होतं.

त्या दिवशी शिर्‍याच्या घरी व्हिसीआर आणायचा प्लॅन होता. आधी त्याच्या लग्नाची कॅसेट पहायची. पळवून पळवून. आणि मग ‘धुमधडाका’ पहायचा.

- Advertisement -

चौकातल्या टपरीतून एका मोठ्या बॅगमध्ये घालून व्हिसीआर आणला. त्याच्यासोबत बर्‍याचशा वायरी..पिना. घरी आणल्यावर तो टीव्हीला जोडण्यात बराच वेळ गेला. तोपर्यंत वाड्यातली बरीच चिल्लीपिल्ली जमली होती. शिर्‍याच्या लग्नाची कॅसेट लावली. बराच वेळ तर नुसत्या मुंग्या मुंग्याच दिसत होत्या. अखेर जेव्हा लग्नपत्रिका टीव्हीच्या पडद्यावर दिसली..तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले.

तासाभराने ‘धुमधडाका’ची कॅसेट लावली. पंचवीस तीसजणांनी आख्खं घर भरलेलं. आणि मिनीटा मिनीटाला हास्याचे फवारे. अशोक सराफ म्हातार्‍याच्या वेशात आल्यानंतर तर बघायलाच नको. नुसतं..इह्ही..उह्हु..आह्हा..

रविवार सकाळपासूनच शिर्‍याच्या आईबाबांना वेध लागले होते. ‘साप्ताहिकी’मध्ये सांगितलं होतं..या रविवारी रमेश देव, सीमाचा ‘सुवासिनी’ दाखवणार म्हणून. घरी सगळ्यांनी एकत्र बसून आज पिच्चर पहायचा होता. आईने सकाळीच ठरवलं होतं..रात्री फक्त खिचडी करणार म्हणून. संध्याकाळी सात वाजता ‘सुवासिनी’ सुरु झाला.. आणि सगळेच वेगळ्या जगात गेले. रमेश देव..सीमाचा आभिनय..त्यातील गाणी..

‘सांग कधी कळणार तुला..’ हे गाणं तर बाबांचं फेव्हरिट. घरातीलच पाचही जण तल्लीन होऊन पिच्चर एंजॉय करीत होते.

ऑफिसमध्ये आज काहीच काम नव्हते. शिर्‍याचा मुलगा मिहीर आणि त्याची कलीग..आणि अजूनही बरंच काही असलेली मिथिला पीसीवर ‘जब वुई मेट’ बघत होते. दोघेच. कितीतरी वेळा पाहिला होता पण तरी त्यांना या फिल्मचा कंटाळा कधी आला नव्हता.

लेह लडाखच्या पार्श्वभूमीवर गाणं सुरू झालं.

‘आधा हिस्सा मेरी..

दोघांनी नकळतपणे एकमेकांकडे पाहत सुचक हास्य केलं.

मिहीरचा आज अजिबात मुड नव्हता. खूप नर्व्हस झाला होता तो. सगळीकडूनच निराशा त्याच्या वाटेला आली होती. एकटाच बसला होता रुममध्ये. मोबाईलवर ‘ये जवानी..ये दिवानी’ बघत. पिक्चर बघता बघता हळूहळू त्याचा नर्व्हसपणा कमी होत गेला. आणि..

..आणि रणबीर कपूरचा तो डायलॉग त्याला खूप भावला. पुन्हा पुन्हा तो शॉट पाहु लागला. ऑफिसमध्ये झालेला अपमान.. मिथिलाने दिलेला धोका सगळं सगळं विसरला तो. रणबीर म्हणत होता..

२२ तक पढाई..
२५ तक नौकरी..
२६ तक छोकरी..
३० पे बच्चे..
६० पे रिटायरमेंट..
और फिर मौत का इंतजार
धत् ऐसी घिटीपिटी लाईफ थोडी जीना चाहता हुँ मै!

मैं उडना चाहता हुँ..
दौडना चाहता हुँ..
गिरना भी चाहता हुँ..
बस्स..
रुकना नही चाहता..

वर्षामागून वर्षे गेली. सातशे आठशेच्या गर्दीत बसून पिक्चर पहाणारी एक पिढी..

आता एकट्याने पिक्चर पाहू लागली. चित्रपटाचा पडदाही लहान होत गेला. पण त्याच्यातून मिळणारा आनंद.. त्याच्यातून मिळणार्‍या प्रेरणा या अजूनही तश्श्याच आहेत. म्हणून तर हातातल्या मोबाईलकडे पहात..‘दुनिया मेरी मुठ्ठीमे’ म्हणत मिहीर पुन्हा एकदा नव्या उमेदीने बस्स रुकना नही चाहता, म्हणत नवीन आयुष्याला सामोरा जाण्यासाठी तयार झाला.

- Advertisment -