घरफिचर्ससारांश‘प्रेम’ शब्दकोशातून व्यवहारकोशात उतरेल?

‘प्रेम’ शब्दकोशातून व्यवहारकोशात उतरेल?

Subscribe

जत्रेत ‘एक लोखंडी चिमटा’ हमीदचे सगळे लक्ष आकर्षून घेतो.त्याला वाटते, आज्जी चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा तिची बोटे भाजतात. रोटी तयार करताना, तवा उचलताना तिच्या हाताला चटके बसतात. हा चिमटा विकत घेतला तर तिला चटके बसणार नाहीत, तिची बोटे भाजणार नाहीत.....खेळणी काय लगेच फुटतील, भूक काय, पुन्हा भागवता येईल; पण आजीची भाजणारी बोटे जपायला हवीत. त्यासाठी चिमटा घ्यायलाच हवा. तो चिमटा विकत घेतो तेव्हा त्याचे सवंगडी त्याला पुन्हा खिजवतात. पण तो ‘आजीबद्दलची माया आणि चिमट्याची उपयुक्तता’ मित्रांना पटवत राहतो. प्रेमचंद यांच्या ‘इदगाह’ या कथेचा नायक हमीद खरे प्रेम म्हणजे काय हे दाखवून देतो.

‘प्रेम’
हा आपल्यासाठीचा प्रिय शब्द!
प्रतिज्ञा असो वा लग्नपत्रिका नाहीतर साहित्य असो अथवा सिनेमा तिथे ‘प्रेम’ हा शब्द मध्यवर्ती असतो.
महाविद्यालयातल्या मुतारीच्या भिंती असोत वा पर्यटनस्थळातल्या झाडांचे बुंधे तिथेही ‘प्रेम’भाव ओसंडून वाहताना दिसतो.
परंतु आजूबाजूला घडणार्‍या घटना मात्र प्रेमाला फाट्यावर मारणार्‍या. तिने नकार दिला म्हणून तोंडावर अ‍ॅसिड नाहीतर त्याने नकार दिला म्हणून पटरीवर उडी…..बरं हे फक्त एवढ्यावर थांबत नाही; तर आईने अमुक दिले नाही म्हणून आत्महत्या आणि वडिलांनी तमुक कर म्हटले म्हणून त्यांची हत्या…अशी ही यादी वाढतच जाते.
याचा अर्थ एकीकडे आपली सगळी तत्त्वज्ञाने, साहित्य, सिनेमे हे प्रेमाची महती सांगणारे; परंतु वास्तवात मात्र ‘प्रेम’ हा आपल्या अ‍ॅलर्जीचा विषय…प्रेम म्हणजे हक्क, अधिकार, सत्ता, संपत्ती यांची उतरंड जणू.
एकीकडे बाजारपेठ उच्चरवात सांगते आहे. अमुक ‘डे’ साजरा करा म्हणजे तुमचे प्रेम सफल, तमुक दिवशी आईला ‘आय लव्ह यु’ म्हणा तिचे मातृत्व सफल आणि तमुक दिवशी बाबांना ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ म्हणून दाखवा म्हणजे पितृत्वाच्या साठा उत्तराची कहाणी सफल.
थोडक्यात काय तर ‘प्रेम ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक नियोजन करून ‘असे-असे’ करण्याची आणि ‘तसे-तसे’ न करण्याची गोष्ट आहे’ हे प्रमेय हळूहळू रूढ करण्याचे जोरकस प्रयत्न अगोदरही सुरु होते…आजही सुरु आहेत…उद्याही सुरुच राहतील.
खरेतर वात्सल्य, माया, प्रणय आणि भक्ती ही ‘प्रेम’ या संकल्पनेची सर्वसाधारण चार रूपे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत जाणारी. रूपे वेगळी, टप्पे वेगळे; पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र सारखी-ती म्हणजे स्वतःबरोबर समोरच्याचा अधिक विचार करण्याची वृत्ती, सोप्या शब्दांत-समर्पणाची वृत्ती!
….आणि समर्पण ही काही नियोजन करून साकारण्याची गोष्ट नसते तशीच अनाहूतपणे उद्भवणारी गोष्टही नसते. बालपणापासून व्यक्तिमत्वाची घडण कोणत्या पर्यावरणात होते? सभोवताली दात्यांचा प्रभाव असतो की घेत्यांचा? देणार्‍याला मान मिळतो की निव्वळ घेणार्‍याची प्रतिष्ठा असते? अशा गोष्टींवरून व्यक्तिमत्वातील ‘प्रेम/समर्पण भावाचे’ विकसन होत जाते.
थोडक्यात बालपणापासून ‘आर्ट ऑफ गिव्हिंग’चा संस्कार अनाहुतपणे होत गेला की ‘आर्ट ऑफ लव्हिंग’चा स्वभाव साकारत जातो.

अशा समर्पणभावी संस्काराचे समर्पक उदाहरण म्हणून आपणाला थोर लेखक प्रेमचंद यांच्या ‘इदगाह’ या श्रेष्ठ कथेचा नायक असलेल्या ‘हमीद’कडे पाहता येईल!

- Advertisement -

हमीद हा पाच वर्षांचा कोवळा पोरगा. त्याच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. आई काविळाने तर वडील कॉलर्‍याच्या साथीत दगावले आहेत. यावरून या कुटुंबाच्या दारिद्य्राची कल्पना यावी. हमीद आपल्या जर्जर झालेल्या आजीच्या कुशीत वाढतो आहे. ‘वडील खूप पैसे कमवायला दूरदेशी गेलेत; तर अम्मी अल्लामियांच्या घरून छान-छान वस्तू आणण्यासाठी गेली आहे’ असे त्याला सांगण्यात आले आहे. दारिद्य्र, दु:ख, हलाखी पराकोटीची असूनही त्याबद्दलची कटुता आणि त्यातून उद्भवणारा कडवटपणा हमीदच्या जगण्यात उतरू नये, याची म्हातार्‍या आजीने पुरेपूर काळजी घेतलेली आहे. दुसर्‍यांच्या घरी मोलकरणीची कामे करून आज्जी हमीदचे बालपण सावरत आहे. दूरदेशी गेलेले अब्बा, अम्मी आणि जवळ असलेली आज्जी एवढेच त्याचे भावविश्व आहे.

कथेचा काळ जवळपास शंभर वर्षांपूर्वीचा आहे. कथेची सुरुवात होते तेव्हा ‘इद’चा दिवस असतो. गावातील पोरेसोरे गावापासून जवळच असलेल्या शहरी वस्तीतील इदगाहच्या दर्शनाला आणि तिथे भरलेल्या जत्रेत मौजमजा करायला निघतात. हमीदच्या पायात चप्पल नाही, डोक्यावर मळकी, फाटकी टोपी आहे, कपडेही तसेच उसवलेले आहेत; पण यापैकी कशाचीही खंत करायला हमीदपाशी वेळ नाही. तो त्याच्याच धुंदीत चालतो आहे.

- Advertisement -

ईदचा दिवस असल्याने त्याच्या आजीने त्याला जत्रेत खर्च करण्यासठी तीन पैसे दिलेत. शंभर वर्षांपूर्वीच्या काळाचा विचार करता तीन पैसे ही तशी फार मोठी रक्कम नसली तरी खूप कमीही नाही. जत्रेची मौज लुटायला ही रक्कम पुरी पडणारी आहे.

गप्पा-टप्पा करत ही पोरे जत्रेच्या ठिकाणी पोचतात. तिथे मिठाई, खेळणी, लोखंडी वस्तूंची तर्‍हेतर्‍हेची दुकाने आहेत, राहाटपाळणे आहेत, छोटी-मोठी हॉटेल्स आहेत…आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी खिसाही उबदार आहे.

सोबतच्या सवंगड्यापैकी कुणी मातीचा शिपाई घेते, कुणी पाणक्या घेते, कुणी वकील घेते तर कुणी सरबत, मिठाईवर पैसे खर्च करतात.पण जवळपास सगळी जत्रा फिरून झाली तरी हमीदने अद्यापही काही घेतलेले नाही की काही खाल्लेले नाही. सोबतची पोरे त्याला हसायला लागतात, खिजवायलाही लागतात; पण हमीदचे त्याच्याकडे मुळी लक्षच नाही. ‘अम्मी-अब्बा सोबत नाहीत. आज्जी एकटी आहे, ती सगळ्यांकडे कामाला जाऊन आपला खर्च भागवते; म्हणून आपण वायफळ खर्च करायचा नाही’ असे तो स्वतःला बजावतो आहे.

जत्रा संपायला येते, तेव्हा शेवटच्या टोकाला त्याला एक लोखंडी वस्तूंचे दुकान दिसते. हमीद थबकतो. खरेतर त्याला भूक लागलेली असते, राहाटपाळणा लक्ष वेधून घेत असतो, मातीची खेळणी बोलावत असतात; पण या सगळ्यात ‘एक लोखंडी चिमटा’ त्याचे सगळे लक्ष आकर्षून घेतो.त्याला वाटते, आज्जी चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा तिची बोटे भाजतात. रोटी तयार करताना, तवा उचलताना तिच्या हाताला चटके बसतात. हा चिमटा विकत घेतला तर तिला चटके बसणार नाहीत, तिची बोटे भाजणार नाहीत…..खेळणी काय लगेच फुटतील, भूक काय, पुन्हा भागवता येईल; पण आजीची भाजणारी बोटे जपायला हवीत. त्यासाठी चिमटा घ्यायलाच हवा. तो चिमटा विकत घेतो तेव्हा त्याचे सवंगडी त्याला पुन्हा खिजवतात. पण तो ‘आजीबद्दलची माया आणि चिमट्याची उपयुक्तता’ मित्रांना पटवत राहतो.

मित्रांनी घेतलेली खेळणी वाटेत जायबंदी होतात. ज्यांनी मिठाई खाल्ली त्यांना पुन्हा भूक लागते; पण हमीदचा चिमटा मात्र जशाला तसा राहतो. हमीदच्या चिमट्याचे महत्त्व आणि त्याच्या मायेचे मोल मित्रांनाही पटते.
हमीद घरी येतो. आजी त्याला जवळ घेते. हातातला चिमटा बघून विचारते,
हा कुठून आणलास?
जत्रेतून.
केवढ्याला?
तीन पैशाला !
म्हातारी चिडून म्हणते, जत्रेत गेलास, काही खाल्लं नाही, प्याला नाहीस आणि जत्रेतून हा काय चिमटा आणलास वेड्यासारखा?
हमीद उत्तरतो, तुझी बोटं भाजतात ना तवा उतरताना!
म्हातारी गहिवरते. पुढचं बोलणंच विसरते. एवढेसे लेकरू,जत्रेत गेले. पण मौज नाही, मज्जा नाही; आणि तिथेही आपल्या आज्जीला विसरले नाही. या जाणिवेने लहान पोरीसारखी रडू लागते. आणि हमीद मोठ्या माणसासारखा तिला थोपटत राहतो.
येथे कथा संपते.
पण ‘प्रेम’ या अडीच अक्षरांचा खरा अर्थ आणि अन्वयार्थ सांगून.
‘अमुक-तमुक-ढमुक करा’ असे खूप सांगते बाजारपेठ आपणाला; आणि आपणही ‘नंदी बैल गुबूगुबू’ करू लागतो. पण काहीही न बोलता आज्जीने ‘जे’ हमीदला सांगितले होते, ते काही आपण आपल्या वर्तनव्यवहारातून पोराबाळांच्या रुधीरात संक्रमित करत नाही.
परिणामी कितीतरी सण, उत्सव आणि ‘डे’ साजरे करताना, साहित्य, सिनेमा, अन्य कला यातून भले आपण प्रेमाचा बारोमास उदोउदो करत असू; पण आपण ‘हमीद’ व्हायचे विसरून गेलेलो असतो.
म्हणून तर अजूनही आपणाला ‘प्रेम’ हा शब्द प्रिय आहे; पण त्याची जागा व्यवहारात नाही, फक्त शब्दकोशात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -