घरफिचर्ससारांशड्रॅगनचे करोनास्त्र

ड्रॅगनचे करोनास्त्र

Subscribe

‘ड्रॅगनचे करोनास्त्र’ या पुस्तकात अरविंद व्यं. गोखले आणि वासुदेव कुलकर्णी यांनी ते अस्त्रच आहे आणि अर्थातच चीनने त्याचा जाणीवपूर्वक वापर केला आहे, असे सांगितले आहे. (अर्थात याबाबत अद्याप तरी ठोस पुरावा नाही.) पुस्तकाच्या नावावरून यात या रोगाच्या साथीची माहिती असेल, असे वाटण्याची शक्यता आहे, तशी ती आहेही. थोडक्यात. पण या महाप्रचंड साथीच्या संदर्भात आलेल्या अन्य विषयांची सखोल मांडणी केली आहे.

सार्‍या जगाला वेठीला धरणारा करोना अजूनही जायला तयार नाही. मात्र शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, आरोग्यसेवक आणि अन्य करोना योद्धेे यांच्या प्रयत्नांमुळे सर्वांना धीर येेत आहे. आता लसही अनेक संस्थांत तयार झाली असून लवकरच ती सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि काही ठिकाणी प्रादुर्भाव पुन्हा झाला, तरी अनेक ठिकाणी करोनाचा जोरही ओसरू लागला आहे. तरीही पूर्णपणे बेफिकीर राहता येणार नाही.

असा हा करोना जगावरच चालून आला तो प्रयोगशाळांतील अपघाताने की त्याचा संहारक अस्त्र म्हणून उपयोग करण्यात आल्याने? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘ड्रॅगनचे करोनास्त्र’ या पुस्तकात अरविंद व्यं. गोखले आणि वासुदेव कुलकर्णी यांनी ते अस्त्रच आहे आणि अर्थातच चीनने त्याचा जाणीवपूर्वक वापर केला आहे, असे सांगितले आहे. (अर्थात याबाबत अद्याप तरी ठोस पुरावा नाही.) पुस्तकाच्या नावावरून यात या रोगाच्या साथीची माहिती असेल, असे वाटण्याची शक्यता आहे, तशी ती आहेही. थोडक्यात. पण या महाप्रचंड साथीच्या संदर्भात आलेल्या अन्य विषयांची सखोल मांडणी केली आहे.

- Advertisement -

प्रस्तावनेमध्येच अभय टिळक यांनी याला समकालीन इतिहास असे म्हटले आहे. कडव्या इतिहासकारांनी, हा कसला इतिहास, हा तर पत्रकारितेचा नवीन अवतार होयय अशा शब्दांत त्याची बोळवण केली असली, तरी या प्रकाराला आता महत्त्व आले आहे. एक तर अशा समकालीन इतिहासाची कच्ची सामुग्री पत्रकारच अक्षरबद्ध करून ठेवतो. प्रामाणिक पत्रकारितेचा तो धर्मच असतो आणि त्या समकालीन लेखनाला इतिहासाचा पदरही अभिन्नपणे चिकटलेला असतो, असेही नमूद केले आहे.

लुई पाश्चरच्या संशोधनापासून सुरुवात करून आज विषाणूने जगाची विशेषतः भारताची काय दशा केली आहे, याची माहिती, आकडेवारी दिली आहे.. रोगाचा उद्भव, प्रसार व त्याची ओळख, त्याच्याशी लढा देण्यासाठी चाललेले प्रयत्न, चीनमधील हुआन हे शहर या साथीनेच कसे जगप्रसिद्ध केले आणि कवितेचे शहर ही ओळख पुसली जाऊन ते करोनाचा उगम तेथे झाल्याने त्याची काळीकुट्ट छाया पडल्याने, काळवंडलेले शहर म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहे असे म्हटले आहे. चीनबाबतच्या अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेची नोंदही केली आहे. महासंहारक जैवास्त्र या प्रकरणात अशा अस्त्रांचा विकास, त्यांपासून होणार्‍या प्रचंड हानीची माहिती दिली आहे. जैविक अस्त्रेही महाभयानकच आहेत, हे स्पष्ट केले आहे आणि चीनने त्याचा वापर केला असला तरी तो गंभीर गुन्हाच समजायला हवा असे म्हणून आता चीनवर बहिष्काराचे आवाहान जगाला अमेरिकेने करावयास काय हरकत आहे, असा प्रश्न केला आहे. मर्कजचे महापापी हे मात्र एका ठराविक विचारसरणीच्या धाटणीतले प्रकरण आहे. रोगट आरोग्य संघटना या प्रकरणात जागतिक आरोग्य संघटना, तिचे उद्देश आणि काम इ. बरोबरच आज ती चीनच्या आहारी गेल्यासारखीच कशी वागते आहे, हे सांगितले आहे. चीनला तिचा वचक नाही. शिवाय ती आता चीनच्या आर्थिक मदतीमुळे त्याच्या तालावरच नाचत राहण्याची शक्यता सूचित केली आहे.

- Advertisement -

तिसरा सम्राट या प्रकरणात आधुनिक चीनचे पहिले दोन सम्राट आमो झेडाँग आणि श्याओ पिंग यांच्या कार्याचा आढावा घेऊन आता तिसरा सम्राट, अर्थात शी(क्षी) जिनपिंग हे त्यांची इच्छा असेपर्यंत पदी राहू शकतील अशी तरतूद चिनी पार्लमेंटने 2018 मध्ये केली आहे, हे सांगून त्यांच्या कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यांच्या कामाचीही माहिती दिली आहे, त्यामुळे जगाची गाठ कोणाशी आहे, हे कळते. निसर्गाला तुम्ही आडवे गेलात की तोेही तुम्हाला आडवे करणार आहे, जोवर तुम्ही त्याच्याशी सरळ आहात तोवरच तोही सरळ आहे. पण त्याच्याशी मस्ती केल्यास तोही खोड मोडल्याशिवाय राहणार नाही हाच करोनाने घालून दिलेला धडा आहे, हा निसर्गाचा धडा या प्रकरणात सांगितले आहे आणि आजवर आलेल्या आपत्ती, माल्थसच्या सिद्धांताची महती सांगून त्याच्या सिद्धांताचा व्यापक अर्थ करोनाच्या साथीच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवा, त्यावर संशोधनही व्हायला हवे असे लेखकद्वयीचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने पृथ्वीच्या अंताची नांदी हे प्रकरण आहे. त्यात पर्यावरणाचा नाश आणि त्याचे गंभीर परिणाम सोगून त्याचे संरक्षण करण्याची आवश्यकता पटवून दिली आहे.

अर्थकारणाची चर्चा, भारतातील अवस्था, अमेरिका-चीन यांचा कधी मित्र, कधी शत्रू असा खेळ आणि त्याचे भारतावरही परिणाम होऊ शकतात, असे सांगून गाळात रुतलेला हत्ती या प्रकरणाचा शेवट भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती यातून बाहेर पडून वेगाने चालेल असा आशावाद प्रकट करतानाच त्यासाठी काही वर्षे लागतील असे म्हटले आहे. तो चालायला लागल्यानंतर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल महासत्तेच्या दृष्टीने सुरू झालेली असेल, असे सांगितले आहे.

भारतातील श्रमिकांची सध्याच्या परिस्थितीतील दयनीय अवस्था श्रमिक वार्‍यावर या प्रकरणात आहे. त्या हालांचे आपण वाचलेले वर्णनच येथे वाचायला मिळते. टाळेबंदीचा निर्णय, त्याचे लोकांना अधिकच संकटात टाकणारे परिणाम सांगितले आहेत. पंतप्रधानांच्या शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच्या योजना, अनुदान, पेन्शन, सुरू करूनही शेतकरी निराशेतून बाहेर पडलेला नाही, असे लेखक म्हणतात. परंतु पत्रकार असूनही पंतप्रधान म्हणतात तेच खरे मानायचे अणि उत्पन्न वाढले, आर्थिक समृद्धी आली असेच म्हटले जात आहे. हे ते विसरतात. म्हणजे श्रमिक वार्‍यावर आहेत, आणि त्या दरिद्री जनतेच्या समस्याही कायम असतील, असे ते म्हणतात. पण याला कोण जबाबदार याबाबत मात्र मौन!

करोनानंतरचे जग कसे वेगळे असेल ते सांगून प्रकरणाच्या हे शेवटी करोनानंतरचे हे जग धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी, शिक्षण यांबरोबरच प्रशासनावर प्रचंड आणि अनपेक्षित बदल घडवणारे, अस्थिर, बेभरवशाचे वास्तव असेल, असे म्हटले आहे. करोनाचा मुक्काम किती काळ असणार आणि तो गेला तरी परतू शकतो, अशा वेळी काय करायचे असा प्रश्न आहे. त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणून त्याची लक्षणे सांगण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे. या विषाणूचा शिरकाव शरीरात झाला की पुढे त्याचा संपर्क इतरांना कसा होतो, त्यासाठी प्रतिबंधक उपाय इ. माहिती आणि नंतर यापूर्वीच्या मोठया साथींची माहिती अखेरच्या प्रकरणात आहे. आणि शेवटी करोनाला जा म्हणणे एवढेच आपल्या हातात आहे, असे म्हटले आहे.

परिशिष्टांत या रोगाचे मानवी शरीरातील अस्तित्व शोधून काढणार्‍या ब्रिटनमधील संशोधक डॉ. जून आल्मेडा यांचे संशोधन आणि अल्पचरित्र आहे. जगातील साथीच्या रोगांचा घटनाक्रम कालानुसार दिला आहे, त्यामुळे पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. प्रस्तानवनेत टिळक यांनी म्हटलेच आहे की, मकोविड-19ने घातलेल्या धुमाकुळामुळे पुरवलेल्या बी-बियाण्यांद्वारे पुढील काळात उदंड पीकणार्‍या साहित्यशिवाराला, त्या सार्‍या वाताहतीचे साक्षेपी चित्रण करणारे हे पुस्तक पायाभूत खतपाणी पुरवत राहील. गोखले-कुलकर्णींनी साकारलेल्या या अक्षरकृतीचे महत्त्व आणि वैशिष्ठ्य नेमके हेच आहे.

-ड्रॅगनचे करोनास्त्र
-लेखकः अरविंद व्यं. गोखले; वासुदेव कुलकर्णी
-प्रकाशकः गंधर्ववेद प्रकाशन, पुणे 30.
-पाने ः 216; किंमत ः रु. 250.
-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -