-नारायण गिरप
इसवी सन १८९३ मध्ये अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेमध्ये ‘माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो’ असे उद्गार काढून विश्वबंधुतेचे नाते प्रस्थापित करणारे नि आचरणारे स्वामी विवेकानंद विश्वाला परिचित आहेतच. स्वामी विवेकानंद अर्थात बालपणीचे नरेंद्रनाथ यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकता(कलकत्ता) येथे वकील विश्वनाथ दत्त व आई भुवनेश्वरी या दांपत्याच्या पोटी झाला.
आईची कुशाग्र बुद्धी धार्मिक वृत्तीच्या स्वामी विवेकानंदांमध्ये पण होती. माता-पित्यांचा उदार व दु:खितांविषयी कणव असणारा स्वभाव नरेंद्रमध्येही बालपणापासूनच होता. बालपणी नरेंद्र फारच चंचल व खोडकर वृत्तीचा होता, परंतु त्याच्या ठिकाणी धार्मिक बाबींविषयी फार ओढ होती.
राम-सीता, शंकर वगैरेंच्या मूर्तीची पूजा करणे व त्यांच्यासमोर ध्यान करणे हा त्यांच्या खेळातला भाग होता. आईकडून तो रामायण- महाभारतादिकांच्या गोष्टी ऐकत असे.त्याचा विलक्षण ठसा त्याच्या बालमनावर उमटला होता. साहस,गरिबांविषयीची सहानुभूती आणि परिव्राजक साधुसंतांविषयीचे आकर्षण हे त्याच्या ठिकाणी आढळणारे स्वसिद्ध गुण होते.
कुशाग्र बुध्दीमुळे बालपणीदेखील त्याला प्रत्येक विधानाला सबळ प्रमाण द्यावे लागे. मेंदू आणि हृदय दोन्हींचा उच्चविकास झाल्यामुळे नरेंद्रनाथ लवकरच एका ओजस्वी युवकात परिणत झाला. युवक नरेंद्रच्या ठिकाणी सिंहसदृश्य पराक्रमाच्या जोडीला तेजस्वी सौंदर्य होते. सुदृढ देहयष्टी, खणखणीत आवाज आणि कुशाग्र बुद्धी यांचा तो धनी होता.
खेळ, व्यायाम, तत्त्वज्ञान, संगीत सर्वच विषयात विशेष पारंगत असून आपल्या मित्रमंडळींचा तो निर्विवाद नेता बनला होता. महाविद्यालयात असताना त्याने पाश्चात्त्य विचारांचा अभ्यास करून ते आत्मसात केले व परिणामी त्यांच्या मेंदूत तर्कपूर्ण शोधकवृत्तीचे विलक्षण बीज पेरले गेले. त्यांच्या ठिकाणी एकीकडे धर्म-अध्यात्माकडे जन्मजात ओढ व प्राचीन धार्मिक रूढी व परंपरा याविषयी आदर होता तर दुसरीकडे प्रखर बुद्धीची जोड असणारा तार्किक स्वभाव होता.
दोन्हीमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर ब्राम्होसमाज या लोकप्रिय धार्मिक-सामाजिक संस्थेत ते जाऊ लागले.नोव्हेंबर १८८० साली नरेंद्रचा परिचय दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंसांशी झाला.त्यांना नरेंद्रविषयी अनिवार जिव्हाळा होता. ते नरेंद्रचे गुरू झाले. त्यांनी योगमार्गाचा आपला वारसा नरेंद्रकडे सोपवून पुढे कार्य करण्यास सांगितले. येथेच नरेंद्रच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
श्री रामकृष्णांच्या आश्रयाने विवेकानंदांनी एक गहन आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणले. त्यांनी ध्यानचिंतन आणि आत्मसाक्षात्कार या पद्धतीचा सखोल अभ्यास केला. पुढे त्यांची योग्यता जाणलेल्यांनी अमेरिकेतील शिकागो येथे भरणार्या जागतिक सर्वधर्मपरिषदेस जाण्याचा आग्रह धरला. नरेंद्राने परिषदेस जायचे मान्य करून संन्यासाचा स्वीकार केला आणि स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. ३१ मे १८९३ रोजी ते शिकागोस गेले.
तेथे परिषदेस उपस्थित असणारे सर्व जगभरातले, नानाधर्मीय लोक स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. वेद आणि योग या भारतीय तत्त्वज्ञानाची पश्चिमेला ओळख करून देण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांना जाते. शिक्षणासंबंधी स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले आहेत, प्रत्येक राष्ट्राच्या घडणीमध्ये शिक्षणाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. राष्ट्र जेवढे शिक्षित तेवढेच ते सर्व क्षेत्रांमध्ये शक्तीसंचय करून जगामध्ये गौरवपूर्ण स्थान प्राप्त करण्यास समर्थ झाले.
शिक्षणाचा उद्देश चारित्र्य निर्माण करणे, चांगले विचार आत्मसात करणे हा हवा. विद्यार्थ्याला विद्या प्राप्त झाली पाहिजे. जीवनातील समस्या सोडविता आली पाहिजे. शिक्षणाने विचारच नाही तर संस्कृतीसुद्धा देता आली पाहिजे. हे विचार मांडत असताना स्वामीजींनी छान उदाहरणे दिलेली आहेत,
‘यथा खर: चन्दन भारवाही
भारस्य वेत्ता न तु चंदनस्य’
(चंदनकाष्ठे वाहणार्या गाढवाला ओझ्याचीच जाणीव होत असते. चंदनाच्या गुणांची नव्हे)म्हणून शिक्षण व माहिती ही एकच मानली तर ग्रंथालयांना थोर महात्मे व ज्ञानकोषांना ऋषी म्हणावे लागेल. एखाद्या माणसाला केवळ कित्येक पुस्तके पढवून शल्य-वैद्य ( सर्जन)बनविण्याची आशा धरणे योग्य होणार नाही. सद्यस्थितीत आपण स्त्रियांवरील अत्याचार व अन्याय ह्याची परिस्थिती पाहत आहोत.
परंतु स्वामींनी स्वातंत्र्यपूर्व काळातच स्त्रियांनी स्वतःला निडर,स्वाभिमानी, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती शिक्षणामुळेच मिळेल असे प्रतिपादन केले होते. म्हणूनच थोर विभुती पंडिता रमाबाईंबद्दल त्यांना अतिव आदर होता. भारतीय महिलांकरिता स्वामीजी अशी शिक्षणपद्धती सुरू करू इच्छित होते की, जिच्या मदतीने त्या पवित्र, संयत, नि:स्वार्थ व धर्मपरायण होऊ शकतील आणि आपल्या संतांच्या हृदयात बळ व उत्साह संचारित करून भारत देशाला पुन्हा एकदा आत्मस्य आणि जिवंत करू शकतील.
स्वामीजींनी शिकणार्याला मार्गदर्शनपर विचार दिले. त्याचप्रमाणे शिकविणार्यालाही विचारांचे दालन खुले करून दिले. आजच्या काळात जे वरवरचे ज्ञान, पुस्तकी माहिती आणि शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे तसेच शिक्षणासाठी दुकाने उघडली गेली आहेत, त्यांना स्वामींनी अगोदरच विचाररुपी सल्ले दिले आहेत, पण त्याचे पालन होताना दिसत नाही. आपल्या देशाच्या लोकांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्या.
सामान्य लोकांच्या दुःखाने, वेदनांनी त्यांना नेहमीच स्पर्श झाला आणि त्या दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी प्रत्येक जीव किंवा मानवामध्ये भगवान शिव पाहिले नि त्यांच्या सेवेत सदैव मग्न राहिले. संपूर्ण जगाच्या उन्नतीचा विचार त्यांनी केला. मानवी जीवनाचे भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन पैलू आहेत. त्यांनी शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पैलूंच्या विकासावर भर दिला. आजच्या काळात स्वामीजींचे भाषण राष्ट्र आणि नेत्यांसाठी दीपस्तंभ नि सत्याचा स्त्रोत म्हणून कार्य करते.
स्वामी विवेकानंद सर्व विषयांवर विचार करताना एकच लक्षात ठेवून होते ते म्हणजे वयोवृद्धांनी लिहून ठेवलेली
नीतीतत्त्वे. ती आजच्या आणि उद्याच्या मानवाने आत्मसात केली तर नवा भारत घडू शकेल असे वाटते.
गावाच्या कल्याणासाठी कुटुंबाचा त्याग करावा;
देशाच्या कल्याणासाठी गावाचा त्याग करावा;
मानवाच्या कल्याणासाठी देशाचा
त्याग करावा;
विश्वाच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करावा.
-( लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत)