Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश ग्रामीण भागातील ज्ञानदात्यांवर जबाबदारीचे ओझे

ग्रामीण भागातील ज्ञानदात्यांवर जबाबदारीचे ओझे

शहरी भागात मुलांना अध्यापन करण्यासाठी सुविधा भरपूर होत्या. मात्र, ग्रामीण भागात संकटांची यादीच होती. मुलांपुढे तर अनेक यक्षप्रश्न होते. मात्र, शिक्षकांपुढे त्याहून जास्त प्रश्न होते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क प्रॉब्लेम्स, विजेच्या समस्या, पालकांची मनस्थिती अशा एक ना अनेक समस्या होत्या. मात्र, यावर अनेक शिक्षकांनी संघटितपणे उपाययोजना करत मुलांचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले. मात्र, हे कार्य सोपे नव्हते आणि आजही सोपे नाही.

Related Story

- Advertisement -

पूर्वीच्या काळी शिक्षण हे गुरुगृही आत्मसात केले जात होते. गुरुकुल परंपरा शिक्षणपद्धतीमध्ये प्रचलित होती. सर्व संस्कार यामध्ये मुलांना दिले जात होते. आजही विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्यशाळेतील शिक्षक करत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांतील कोरोना संकटाचे सावट पाहता शिक्षकांना खर्‍या अर्थाने ज्ञानदानात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. खासकरून शहरी भागातील ज्ञानदात्यांपेक्षा ग्रामीण भागातील ज्ञानदात्यांची कसोटी लागली. मुलांना शाळेत येणे दुरापास्त असताना शिक्षकांसाठीही शाळेत जाणे अवघड होऊन बसले. यात भरास भर म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकांच्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदार्‍यांचे ओझे टाकले गेले. मात्र, अशा संकट काळातही ज्ञानदात्यांनी मोठी तारेवरची कसरत करत मुलांना ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडले.

शहरी भागात मुलांना अध्यापन करण्यासाठी सुविधा भरपूर होत्या. मात्र, ग्रामीण भागात संकटांची यादीच होती. मुलांपुढे तर अनेक यक्षप्रश्न होते. मात्र, शिक्षकांपुढे त्याहून जास्त प्रश्न होते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क प्रॉब्लेम्स, विजेच्या समस्या, पालकांची मनस्थिती अशा एक ना अनेक समस्या होत्या. मात्र, यावर अनेक शिक्षकांनी संघटितपणे उपाययोजना करत मुलांचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले. मात्र, हे कार्य सोपे नव्हते आणि आजही सोपे नाही. यामुळेच आजच्या या शिक्षकदिनी या गुरूजनांचे योगदान खर्‍या अर्थाने वाखणण्यासारखे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वीजेच्या समस्या आणि दळणवळणाची साधने हा ग्रामीण भागातील शिक्षकांपुढील सर्वात मोठा प्रश्न होता. मात्र, त्यावरही मात करण्यात शिक्षकांनी कसूर केली नाही.

- Advertisement -

अनेकांनी मुलांना ज्ञानदान करण्यासाठी स्वत: हायटेक होण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. त्यासाठी काहींनी टेक्नोलॉजीचे धडे गिरवले. स्थानिकांसह गाव कारभार्‍यांकडून समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या निराकरणासाठी मनापासून प्रयत्न केले. अखेर याचा फायदा मुलांना झाला, असंच म्हणावे लागेल. पीडीएफ, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, इमेजेस, ग्राफिक्स आणि तत्सम साधनांचा वापर करून अनेक शिक्षकांनी मुलांना ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे मुलांना घरी राहूनही शाळेतील अभ्यासाची गोडी कायम राहिली. मुलांसाठी काही शिक्षकांनी स्वत: त्यांच्या दारी जाऊन शंकांचे निरसन केले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या गेल्याने मुलांसह पालकांचीही बरीचशी चिंता मिटली.

नाण्याची ही एक बाजू आपण पाहिली, परंतु, दुसरी बाजू बघताना अनेक शिक्षक कोरोना संकट येईपर्यंत पुरेसे टेक्नोसॅव्ही नव्हते. त्यांना ऑनलाईन शिक्षणाची धुरा सांभाळणे शक्यही नव्हते. मुळात ग्रामीण भागात सेवा देताना अडचणीही भरपूर होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर सर्वाधिक मोठे आव्हान या कोरोना संकटकाळात होते. मात्र, अशा स्थितीतही जवळपास सर्वच शिक्षकांनी आपापली जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडली. यासाठी अनेकांनी स्वत: विद्यार्थ्याच्या भूमिकेत सोशल मीडिया हाताळण्याचे, टेक्नॉलॉजीचे धडे गिरवले. ज्याची फलनिष्पत्ती म्हणून त्यांना या ‘लॉकडाऊन’ मध्येही मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवणे सहज शक्य झाले.

- Advertisement -

स्वामी विवेकानंद म्हणतात, “शिक्षण केवळ डोक्यात माहिती भरणे नव्हे तर मानवातील सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय” हे वाक्य तंतोतंत खरे आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कलागुणांचा भरणा असतो तो शोधून त्या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे न्याय देण्याचे कार्य शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षकांचे कार्य थोर असते. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला महासत्ता बनवण्याचे पाहिलेले स्वप्न जर कोणी पूर्ण करु शकत असेल तर तो फक्त शिक्षक. शिक्षकाने नवनिर्मितीची कास पकडून शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक असा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. ही जबाबदारी तो वर्षानुवर्षं पार पाडत आहे. तसेच राष्ट्रीय जीवनमूल्ये त्यांच्या अंगी रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. “गुरु हा मातीच्या अपरिपक्व गोळ्याला आकार देऊन त्याचं सुंदर असं नंदनवन तयार करतो”.

आता शिक्षकाच्या जोडीला ई-गुरुकुल आले आहे. खडू-फळा यांची जागा इंटरअ‍ॅक्टिव्ह फळ्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे संगणक, फेसबुक लाईव्ह, व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग, स्मार्ट पीडीएफ, झूम अ‍ॅप, गुगल मीट यांचा समावेश झालेला आहे. गुगलवर कोणतीही माहिती विद्यार्थी आता सहज शोधू शकतो. वाड्या-वस्त्यांवरील मुले प्रोजेक्टवर व संगणकावर शिकत आहेत. लोकांनी कोट्यवधीचा निधी शाळेसाठी जमा करून आदर्श शाळा घडवल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील मराठी शाळेचे रूपड पालटलं आहे. हे फक्त पालक व शिक्षकांच्या मदतीने शक्य आहे. यासाठी शिक्षकांबरोबरच प्रत्येक घटकाचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे.

शिक्षकाला आधुनिकतेची कास धरून आपले कार्य करत राहावे लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात माणूस पुस्तकांपासून दूर जात आहे ही खरंच खेदाची गोष्ट आहे. पुस्तक ज्ञान वाढवणारे साधन आहे साध्य नव्हे हे शिक्षकांनी जाणावे. आधुनिकतेच्या युगात शिक्षकांनी स्वतःमध्ये संगणक प्रोजेक्टर व इतर गोष्टींची माहिती करून घेणे अगत्याचे आहे. कारण शिक्षण हे नुसते पुस्तकावर अवलंबून नसून ते पर्यावरण, सामाजिक, क्रीडा, संस्कार या गोष्टीवर पण आधारित आहे. त्यामुळे काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेणे आवश्यक झाले आहे.

विद्यार्थी कसे घडतात यावर त्या शिक्षकाचे यश अवलंबून असतं. कृती, प्रात्यक्षिक, प्रयोग, विद्यार्थ्यांच्या समस्या, त्याच्या अडचणी, आवडी निवडी शोधून जो काम करतो तोच खरा शिक्षक. आदिवासी पाड्यावरील वंचित मुलांचा शिक्षणामध्ये समावेश करून घेणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. मात्र, आजघडीला शिक्षकांच्या माथी अनेक वेगवेगळ्या कामांचा बोजा टाकला जात आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. निवडणुका, जनगणना, शौचालय सर्वे, शाळाबाह्य सर्वे, कोरोना चेकपोस्टवर ड्युटी, कोरोनाचा सर्वे अशा ६० प्रकारची कामे शिक्षकांवर सोपवली जातात. यामुळे शिक्षक हा विद्यार्थ्यांपासून दूर जातो की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. शिक्षकांवरील या कामाचा बोजा शासनाने कमी करावा. ज्या कामासाठी त्यांची नेमणूक आहे तेच (अध्यापन) त्याला फक्त करण्याची मुभा द्यावी, अशी ओरड सातत्याने या कोरोना संकटकाळात केली गेली. त्याचा सन्मानपूर्वक विचार आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणे खर्‍या अर्थाने होणे गरजेचे आहे.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात…”Teacher is backbone of the education system”.

शिक्षक आपल्याला भरभरून देतात. कितीतरी भूमिकांतून ज्ञानप्रसारक, सहसंशोधक, प्रशिक्षक, कृतीदर्शक, कौशल्यदाता, संस्कारदाता, समुपदेशक, उपदेशक, प्रबोधक, मूल्यसंवर्धन, मार्गदर्शक, मित्र, आधारस्तंभ आणि सुभलक अशी विविध पात्रे तो करत असतो. त्यामुळे त्यांच्या योगदानाप्रति सहानुभुतीपूर्वक विचार करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावरूनही प्रयत्न होणे गरजेचे आहे.

— बालाजी नाईकवाडी

- Advertisement -