– संजय देवधर
पूर्वी घरोघरी ८ दिवस आधी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार केले जायचे. आजकाल असे पदार्थ वर्षभर हवे तेव्हा केले जातात किंवा सहजपणे विकत मिळतात. त्यामुळे त्यांचे फारसे अप्रूप राहिलेले नाही. हल्ली तर नोकरदार महिला रेडिमेड फराळ आणणेच पसंत करतात. महागाईचा परिणाम फराळावर नक्कीच होतो. पूर्वी घरातील लहान मुले मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश कंदील तयार करीत. त्यांची चढाओढ लागत असे. कलाकौशल्य, सौंदर्यदृष्टी, रात्ररात्र जागून केलेली मेहनत यांचा कस लागे. अंगणात मातीचा किल्ला केला जाई. तो करताना उत्साहाला वेगळेच भरते येई. कल्पकतेने किल्ला केल्यावर छोट्या मावळ्यांच्या चेहर्यावर वीरश्री पसरे.
फटाके उडवण्याची धमाल वेगळीच. मुली, युवती अंगण रांगोळ्यांनी सजवत. घरांच्या भिंती नव्या रंगाने उजळत. हा रंगही घरातले सगळे मिळून देत. मुलांना नवे कपडे दसरा, दिवाळीला मिळत असत. महिला नवे पातळ, साडी हक्काने वसूल करत व वर्षभर मिरवत. आता फ्लॅट्समध्ये पुरेशी जागाच नसेल तर अंगण कुठून असणार? गेले ते दिन गेले. तरीही दिवाळी ही सर्व सणांची महाराणी असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने ती उत्साहात साजरी करतो. अलीकडच्या काळात दिवाळी घरी साजरी करण्याऐवजी बाहेरगावी जाऊन डेस्टिनेशन सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड आला आहे. नव्या पिढीचे नवे नवे फंडे अशा वेळी समोर येतात. लहान मुलांना पूर्वी दिवाळी कशी साजरी व्हायची हे समजले तर आश्चर्य वाटेल.
दिवाळीचं दुसरं नाव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा उत्सव! दिव्यांच्या असंख्य ओळी घरासमोर लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. या सणाची सुरुवात वसुबारसेपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व आबालवृद्ध, मुले, स्त्रिया यांचा हा लाडका सण. दिवाळीत दागिन्यांची, घरातील वस्तूंच्या खरेदीचीही पर्वणी असते. फटाक्यांची आतषबाजी अन् चविष्ट दिवाळी फराळाचा आस्वाद हे या सणाचं आणखी एक वैशिष्ठ्य. आपला भारत हा कृषिप्रधान देश. आपली थोर संस्कृतीसुद्धा सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी.
म्हणूनच वसुबारसेच्या संध्याकाळी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दूध-दुबत्यासाठी होणारा गायीचा उपयोग, शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा! धनत्रयोदशीच्या तिन्हीसांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. या दिवसाशी एक पौराणिक कथा जोडली आहे. ती अशी की, श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीशाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाश आणि मुक्तीचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून, सोन्या-चांदीच्या पेढ्यांतून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातलं सोनंनाणं-रोकड यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतो. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) हिची पण पूजा करतात.
लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो. सारे आकाश उजळून जाते. अलीकडे जनजागृती होत असल्याने आवाजी फटाक्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहीण-भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस. बहीण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या सणातला लहान मुलामुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाश कंदील तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे. दीपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन आनंद दिला-घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. साधारण १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अशीच दिवाळी साजरी व्हायची. अशा सुखद दीपावलीच्या अनेक रम्य आठवणी पुढे अनेक दिवस मनात रेंगाळत राहायच्या. आता सगळे फास्ट झाले आहे. या आठवणींत रमायलादेखील कोणाकडे वेळ नाही.
आदिवासी पाड्यांवरचे चित्रही बदलले
मी वारली चित्रशैलीच्या संशोधनासाठी आदिवासी पाड्यांवर नेहमीच जातो. तेथेही शहरी बदलांचे लोण पोहचत आहे. मोबाईल क्रांतीमुळे सारे जग एका मुठीत व स्क्रीनवर आले आहे. पूर्वी तेथे दिवाळीला काकडभाकरी हा गोड पदार्थ केला जाई. आता शहरातील दिवाळीसारखे गोडधोड पदार्थ केले जातात. तारपा नृत्यात सारे पाडे दंग होत. त्यांचेही प्रमाण कमी होत आहे. तारपा हे वाद्य बनवणे व वाजवणे या कला अनेकांना आत्मसात असत. आता वेगळेच चित्र दिसते. तारपा बनवणारे अनेकजण असले तरी नवी पिढी ते वाजवण्यापासून दूर जात आहे. चांगल्या गोष्टींऐवजी वाईटाचे अनुकरण केले जाते याची खंत वाटते. निसर्गपूजक आदिवासी पाड्यांवरचे चित्र आता बदलत आहे.
आकाश कंदील का लावावा?
दिवाळी हा प्रकाशाचा, ऊर्जेचा उत्सव आहे. अंधाराकडून तेजाकडे नेणार्या शक्तीचा व माणसाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा हा उत्सव आहे. माणसाच्या इच्छाशक्तीचे प्रतीक म्हणजे आपण लावलेला आकाश कंदील. वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणजे आकाश कंदील. दिवाळीच्या निमित्ताने सर्वांनी मनाने एकत्र येऊन प्रकाशरूपी सकारात्मक बीज रूजवावे हा यामागचा उद्देश असतो. पुढचं वर्ष आनंदात व्यतीत करण्याच्या इच्छेचा हा आनंदी क्षण ठरावा. या आनंदी क्षणाचे साक्षीदार म्हणून वास्तूवर लावलेले प्रतीक म्हणजे आकाश कंदील. सुख, समाधान, भरभराट घेऊन येणारा आकाश कंदील हा यश, विजय यांचेही प्रतीक आहे. म्हणून आकाश कंदील लावण्याची प्रथा आहे.
-(लेखक वरिष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीचे अभ्यासक आहेत)