Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश बच्चा भी खेले, बच्चे का पुरा खानदान खेले...

बच्चा भी खेले, बच्चे का पुरा खानदान खेले…

Subscribe

लहान मुले ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडली आहेत. त्यांच्यासाठी एक्स बॉक्ससारखे वेगवेगळे खेळाचे गॅजेट्स घरात येऊ लागले आहेत. अगदी आई-बाबांसोबत आजी-आजोबादेखील नातवंडांच्या हट्टाला दुजोरा देत असतात. इतरांनादेखील मोठ्या फुशारकीने सांगत असतात, ‘अहो आमचा नातू कौशल ना काय पटापट ऑनलाईन गेम्स खेळत असतो. त्याला सगळं माहीत आहे कसं डाऊनलोड करायचं वगैरे. आजकाल आम्ही पण त्याच्याकडे धडे घेतो आणि खेळतो बरं का. म्हातारपणी तेवढाच आपला विरंगुळा हो,’ असं म्हणत हसत राहतात.

– अर्चना दीक्षित
आता ही एक नवीनच फॅशन. आपण सगळे आधी सुट्टी मिळाली की आजी-आजोबा सगळे मिळून सापशिडी, लुडो, पत्त्यांचे विविध प्रकार असे घरात बसल्या बसल्या खेळ खेळायचो किंवा कधी बॅडमिंटन, टिकरी, लंगडी, विटीदांडू असे अनेक खेळ खेळायचो, पण आता तेच सगळे खेळ कॉप्युटरवर खेळायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक खेळ घरात काय एका खुर्चीवर बसून खेळता येऊ लागले आहेत. त्यात घरातील सर्व मंडळी सहभागी होतानादेखील दिसतात. अहो, कॉम्प्युटर काय पण फोनवरसुद्धा ही सोय झाल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीला अगदी तोंड वर करून संवाद साधायलादेखील वेळ नाही असं झालं आहे.

बरं त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद पण असेच सुरू असतात. ‘अहो ऐका ना परवा ना आपल्याकडे माझी किट्टी आहे बरं का. मला एखादा छानसा गेम सुचवा ना. मागच्या महिन्यात त्या चौधरी वहिनींनी एक खेळ घेतला होता. बाई गं उभं राहून पाय दुखायला लागले आमच्या बायकांचे. त्यांच्या समोर कोणी बोललं नाही, पण जाऊ दे काय सांगायचं म्हणा, मात्र तुम्ही मला फोनवर खेळता येईल असा खेळ सांगा हो. आजकाल फॅशन आहे हो याचीच. राहावं लागतं बाबा फॅशनप्रमाणे. नाहीतर सगळे ऑर्थोडॉक्स म्हणतात.’ नवरा पण लगेच ढिनच्याक खेळ सुचवून मोकळा होतो.

- Advertisement -

हं इकडे पुरुष पण काही कमी नाही. तेदेखील तितकेच या ऑनलाईन खेळात सहभागी होत असतात. जरा निवांतपणा मिळाला की लगेच गेम सुरू करून मग्न होऊन जातात. चुकून जरी कोणी आवाज दिला तर ‘अबे रुक आ रहा हूं यार. इतना गेम खतम होने दे. मग येतो. काय यार तिकडे बायको, इकडे तू मला आवाज देऊन देऊन बेजार करता राव. एक गेम पूर्ण करू देत नाहीत.’

इतकेच काय तर लहान लहान मुलेसुद्धा त्याच्या विळख्यात सापडली आहेत. त्यांच्यासाठी एक्स बॉक्ससारखे वेगवेगळे खेळाचे गॅजेट्स घरात येऊ लागले आहेत. काही आई वर्गाला या खेळाविषयी माहिती नसते. त्यामुळे या काय आऊटडेटेड आहेत, असे म्हटले जाते. त्यादेखील बिचार्‍या अज्ञानी समजून बुजतात, तर काही आई वर्ग म्हणजे ‘ए जा रे बाबा हा घे मोबाईल. मी हा गेम डाऊनलोड केला आहे. जा बस तिकडे खेळत आणि माझ्या डोक्याशी भुणभुण करू नकोस,’ असं म्हणत मुलांना गप्प करतात.

- Advertisement -

काही आजी-आजोबादेखील नातवंडांच्या हट्टाला दुजोरा देत असतात. इतरांनादेखील मोठ्या फुशारकीने सांगत असतात, ‘अहो आमचा नातू कौशल ना काय पटापट ऑनलाईन गेम्स खेळत असतो. त्याला सगळं माहीत आहे कसं डाऊनलोड करायचं वगैरे. आजकाल आम्ही पण त्याच्याकडे धडे घेतो आणि खेळतो बरं का. म्हातारपणी तेवढाच आपला विरंगुळा हो,’ असं म्हणत हसत राहतात.

पण काही घरांमध्ये याबाबत वाद असतात. आईचे म्हणणे असते, ‘नको या नादाला लागू बाळा. हे एक प्रकारचे व्यसन आहे. याच्या आहारी जाणे योग्य नाही. थोडा वेळ खेळणे गोष्ट वेगळी आहे, पण तासन्तास नको रे घालवू. आयुष्याचे नुकसान होईल. त्यापेक्षा आपण ते तुझ्या आवडीचे पुस्तक आणले आहे, ते वाच ना राजा.’ अशा वेळी बाबांनी आईला साथ दिली तर पाल्य तिथेच सुधारू शकतो, पण वडील जर मागून गेम खेळण्यासाठी परवानगी देत असतील तर आई हतबल होऊन जाते. आईच्या समजावून सांगण्याला, रागवण्याला काही अर्थच राहत नाही. घरात अजून क्लेश वाढण्यापेक्षा अजून वाद निर्माण होऊ नये म्हणून आई गप्प बसते.

या नसत्या फॅशनच्या आहारी न जाता आपण सर्वांनी मिळून यावर वेळीच योग्य उपाय करणे खूप गरजेचे आहे. मुलांचा वाचनाकडे, मैदानी खेळांकडे कल वाढवला पाहिजे. थोडा वेळ त्यांच्याबरोबर अभ्यासाविषयी चर्चा केली पाहिजे आणि इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या घरातून ही सुरुवात झाली तर त्याला खरा अर्थ आहे.

- Advertisment -