-अमोल पाटील
सबंध जगातील विद्वानांनी, शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या अमोघ वाणी व लेखनीतून ज्ञानार्जनासाठी अभ्यासाचे असलेले अतीव महत्त्व विशद केले आहे. अभ्यास म्हणजे ढोबळमानाने समजून घ्यायचे म्हटले तर एखादी अज्ञात बाब यत्ने प्रयत्ने ज्ञात करून घेणे होय. हा ज्ञात करून घेण्याचा म्हणजेच जाणून घेण्याचा प्रवास विविध मार्गी घडू शकतो. अध्ययनार्थी आपापल्या परीने व आपल्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाने विविध पद्धतींचा आवलंब करून ज्ञान आकलन उपयोजन व शेवटी कौशल्यप्राप्तीचे उद्दिष्ट साधने येथे क्रमप्राप्त असते. उपलब्ध परिस्थितीला सामोरे जात यत्ने प्रयत्ने परिपूर्णतेकडे झेप घेणे व त्याद्वारे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जाणे हे यातून अपेक्षित असते.
या जगातील सर्वात सुंदर प्रवास कुठला असू शकेल? असे जर कुणी मला विचारले तर मी निश्चितच सांगेन की, या जगातील सर्वात सुंदर प्रवास जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाने जिज्ञासेपोटी नित्यनूतन ज्ञान प्राप्तीकरिता मन, बुद्धी आणि शारीरिक क्षमतेचा सुयोग्य वापर करीत अपरिपक्वतेकडून परिपक्वतेकडे केलेला प्रवास होय. त्याचे कारण असे की या जगात खूप काही शिकण्यासारखे आहे. शिकणे ही प्रक्रिया कधीच थांबणारी नसून ती निरंतर सुरू राहणारी आहे.
या जगात बुद्धिमान प्राणी म्हणून मानवजातीचा नावलौकिक आहे, तो मानवजातीने मिळवून सिद्ध केला तो या शिकत राहण्याच्या आणि स्वत:ला अद्ययावत करीत राहण्याच्या प्रक्रियेमुळेच हे लक्षात घेतले पाहिजे. एकदा का हा प्रवास समजला की जीवन समजू लागते आणि त्यातून माणूस आनंद मिळवू लागतो. स्वयंपरिपूर्णतेकडील प्रवास माणसाला सर्वोच्च आनंद मिळवून देतो. प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकावे इतके अनंत ज्ञान येथील चराचरात सामावलेले आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घडणारी प्रत्येक घटना, भेटणारे प्रत्येक जीव, येणारे प्रत्येक अनुभव हे एकदा का वाचण्याची कला अवगत झाली की जीवनात ज्ञानार्जनाचे भांडार उघडलेच म्हणून समजा.
आपल्याकडे वाचन म्हणजे केवळ पुस्तकाचे वाचन एवढाच वाचनाचा मर्यादित अर्थ घेतला जातो. पुस्तकाचे वाचन हे तर या ठिकाणी अभिप्रेत असतेच असे नाही, पंरतु यासोबतच जसे पुस्तकाच्या वाचनाअंती पुस्तके आपल्या ज्ञानात भर घालतात तसेच आपल्याला भेटलेल्या व्यक्ती, आपल्याभोवती घडणार्या घटना व प्रसंग, रोजचे आपल्याला येणारे अनुभव व इतरांनी त्यांना आलेल्या अनुभवांचे आपल्यापुढे केलेले कथन हेसुद्धा त्रयस्थपणे आपण वाचू शकलो.
त्यातून शिकू शकलो तर आपल्या आयुष्यात ज्ञानाचे थोर भांडार उघडलेच म्हणून समजा. जसे पुस्तकाच्या वाचनातून मनाची प्रगल्भता वाढते तशीच प्रगल्भता वर नमूद बाबींच्या वाचनातूनही प्राप्त होते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता भासत नाही. या ठिकाणी आवश्यकता असते ती निरंतर अध्ययनार्थी होऊन जीवन जगण्याची. निरंतर वाचनाची आणि त्याद्वारे सखोल चिंतनाअंती प्रगल्भतेकडे होणार्या वाटचालीचे आयाम समजले की माणूस आपले विद्यार्थीपण साजरा करू लागतो.
आपल्याकडे एखाद्या चतुर माणसाचे वर्णन करताना ‘तो माणूस बारा गावचे पाणी प्यायलेला आहे’ अशा प्रकारे केले जाते. यातून हेच सिद्ध होते की त्याच्या गाठीशी अनुभवाची भरभक्कम शिदोरी असल्याने त्याचा पाडाव करणे जवळजवळ अशक्यच. आता याहीपुढे जाऊन थोडेसे असे नमूद करावेसे वाटते की केवळ स्वत:ला आलेल्या अनुभवांपासून जीवन समृद्ध करण्यासह इतरांच्या अनुभवांपासूनही शहाणे होत जाणे उत्तमच म्हणावे लागेल. त्याचे कारण असे की आपल्या सर्वांना मर्यादित जीवन प्राप्त असते. जगण्याचे सर्व आयाम शिकवणारे व स्वयंला समृद्ध करणारे अनुभव गाठीशी जमा करण्यासाठी आपल्याला इतरांच्या अनुभवापासूनही धडे घेण्याची आवश्यकता असते.
आपण जेव्हा एखाद्या प्रतिभासंपन्न महान लेखकाचे पुस्तक वाचतो तेव्हा त्या महान, प्रतिभासंपन्न, सिद्धहस्त लेखकाच्या जीवनात आलेल्या अनुभवांशी त्या पुस्तकाच्या रूपाने आपण एकरूप होत असतो. आपण वाचत असलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण ते पुस्तक लिहिलेल्या सिद्धहस्त लेखकाच्या सहवासात असतो. त्यांचे विचार, मांडणी, तत्त्व आणि प्रकटीकरणाच्या वाचनातून आपले मन थेट त्यांच्या विचारांशी जोडले जाऊन एका उच्च पातळीवर ज्ञानाचे मंथन घडते.
चांगल्या पुस्तकाचा सहवास हा माणसाला, त्याच्या मनाला अधिकाधिक प्रगल्भ करतो तो यामुळेच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट वाचनामुळे घडते ती म्हणजे वाचनातून कल्पनाशक्ती व सृजनशीलतेचा उदय होतो. जेव्हा आपण एखादी रम्य दीर्घ कादंबरी किंवा कथेचं वाचन करतो तेव्हा आपले मन त्या कादंबरीतील पात्र, घटना, प्रसंग कल्पनेच्या जोरावर तंतोतंत पाहू लागतं.
कादंबरीतील रम्य वर्णन वाचकाच्या कल्पनाशक्तीला सहाय्यक ठरते आणि वाचक कल्पनेच्या विश्वात अलगद प्रवेश करून ती कादंबरी अनुभवू लागतो. त्यामुळेच वाचक कादंबरीतील भावनिक प्रसंगी नकळत अश्रू ढाळताना व मजेशीर प्रसंगी अलगद स्मितहास्य करताना स्वत:ला आवर घालू शकत नाही. हेच त्या कादंबरीच्या सिद्धहस्त लेखकाचे यश असते. थोरांचे विचार चरित्र, तत्त्वज्ञान वाचताना वाचक जीवनाचे मर्म जाणून घेत असतो. यासमयी त्याचे मन आणि बुद्धी कमालीचे प्रतिसाद नोंदवत असते.
स्वत:च्या जीवनातील घटना, अनुभव, प्रसंग याचा धांडोळा घेत घेत खर्याखोट्याचे मूल्यमापन होते आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन वाचकांना यातून गवसतो. यावेळी वाचकांची सृजनशीलता अंकुरित होऊन तो विचारप्रवण होतो व नवनिर्मितीकडे पहिलं पाऊल टाकतो. आपल्याला जे ज्ञात झाले आहे व ते इतरांना ज्ञात नसल्यामुळे तमाम मानवजातीचे कसे नुकसान होत आहे हे याक्षणी समजल्यामुळे तो कमालीचा हळवा होऊन आपल्या ठायीची ज्ञानशिदोरी यथाशक्ती इतरांनाही वाटत सुटतो. त्या समयी जगण्याचं खरं मर्म त्यास उमगते ते असे की या पृथ्वीतलावर जे देण्यात सुख आहे ते अन्य कशातही नाही.
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात पुस्तके जरी डिजिटल झाली असली तरी माणूस आणि त्या माणसात असलेले मन डिजिटल न होता ते अजूनही भावभावनांचेच भुकेलेले आहे. ही भूक वाचनाने शमवता येते हा मूळ मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. आपण पुस्तक कोणत्या स्वरूपात वाचतोय हे महत्त्वाचे नाही तर ते खरंच वाचतोय का हे महत्त्वाचे आहे.
काळ पूर्वीपासून बदलत आला व यापुढेही बदलत राहीलच. प्रत्येक काळ नवनवीन साधने घेऊन येईलही, मात्र साध्य हे कालही, आजही आणि उद्याही बदलणार नाही. साधने विभिन्न असतील, मात्र त्या विभिन्न साधनांचा उपयोग करून समान साध्याकडेच येथील सर्वांची वाटचाल असणार आहे. वाचनाबाबतही हा नियम लागू आहे. डिजिटल बुक, डिजिटल लायब्ररी, ब्लॉग, वेबसाईट, सोशल मीडिया वॉल आदी ठिकाणी आपणास आता साहित्य वाचायला मिळेलही, मात्र येथील सकस साहित्य हेरणे, वाचणे व त्यातून मनाची प्रगल्भता साधने हे पूर्वीप्रमाणेच आताही आणि भविष्यातही महत्त्वाचेच राहणार आहे.
काळ बदलेल तसं व्यक्ती, समाज, घटना, प्रसंग, अनुभव बदलतील. या सर्व बदलांना तटस्थपणे वाचून त्यातील चिरंतन समान धागा वेचून व्यक्तिमत्त्व बहरत व फुलवत नेणारा वाचकच एक उत्तम प्रतिभासंपन्न सृजन म्हणून पुढे येईल. स्वत:सह समाजाचे जीवन आनंदी करण्यासह येथील ज्ञानरूपी शिदोरीत भर घालून ती समृद्ध करण्यास मोलाचे योगदानही देईल.
वाचनातून व्यक्ती घडते
घडतो अंतिमत: समाज
रोज काही नेटके वाचता
सजतो नवनिर्मितीचा साज!