Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशMarathi Language : समाजाच्या अनिच्छेमुळे भाषेचा मृत्यू!

Marathi Language : समाजाच्या अनिच्छेमुळे भाषेचा मृत्यू!

Subscribe

भाषेत जितका लोकव्यवहार होईल तितकी भाषा टिकण्याचा प्रवास अधिक सक्षम होत असतो. त्याच संदर्भाने भाषेत वाङ्मय प्रकाशित करायला हवे, लोकांची गरज लक्षात घ्यायला हवी. ती भाषा घेऊन जगणार्‍या लोकांच्या गरजा भाषेच्या माध्यमातून पूर्ण करायला हव्यात. शासनाने भाषेची सक्ती केली म्हणजे भाषा टिकत नाही. मुळात भाषा टिकवण्यासाठी ती समाज संवादाची भाषा बनायला हवी. तिचा व्यवहार वाढला तर तिच्या मृत्यूची शक्यता नाही. ज्या भाषा जगात मरण पावल्या आहेत, त्याला सरकारपेक्षा समाजाची अनिच्छा अधिक जबाबदार आहे हे लक्षात घ्यायला हवे.

-संदीप वाकचौरे

भाषा ही प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. भाषा हा केवळ शब्दांचा प्रपंच नाही तर भाषेचे व्यक्तीशी भावनिक नाते असते. समान भाषा बोलणारी माणसं एकमेकांशी नात्याने अधिक पक्की बांधली जातात. त्यामुळे माणसं एकत्रित येतात. माणसं माणसांशी जोडली जाण्यासाठी भाषा हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.

भाषा ही स्वातंत्र्याची वाट आहे. भाषा टिकली तरच स्वातंत्र्य अबाधित राहण्यास मदत होते. प्रत्येकाची स्वातंत्र्याची प्रेरणा भाषा राहिली आहे. भाषा ही कोणत्याही समूहासाठी संस्कृतीचा प्रवास असतो. आपल्या भाषेचा इतिहास गौरवशाली आहे. ती अभिजात असल्याचे अनेक पुरावे इतिहासाच्या पानावरती दिसत आहेत आणि केंद्र सरकारनेदेखील त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

त्यामुळे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमान बाळगायला हवाच, मात्र तो भविष्यातही कायम राहाण्यासाठी सातत्याने आणखी काही प्रयत्न करण्याची गरज आहे. ते प्रयत्न कितपत यशस्वी होतात त्यावर भाषा, संस्कृती, विकासाची प्रक्रिया अवलंबून असणार आहे. जगात इंग्रजी भाषा ज्ञानाचे प्रवेशद्वार मानली जाते. त्या भाषेच्या विकासासाठी जितक्या मोठ्या प्रमाणावर विविध स्वरूपाचे प्रयत्न होतात, तेथील माणसं ते प्रयत्न करतात तितके प्रयत्न आपण करत नाही हे वास्तव आहे.

आपण भाषा विकासासाठी गंभीरपणे प्रयत्न केले नाही तर आज आपल्या भाषेचा इतिहास अभिमानास्पद असला तरी तो इतिहासच राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भविष्यासाठी आणखी काही पाऊले सातत्याने चालण्याची गरज आहे. भाषा ही समृध्दतेच्या दिशेने प्रवाहित राहण्याची गरज असते. आपल्या अवतीभोवती जे काही बदल घडत असतात त्या बदलाचा परिणाम भाषेवर होत असतो.

समाज व्यवस्थेत सातत्याने नवनवीन संशोधने, उद्योग, विविध व्यवसाय सुरू असतात. नवनवीन शोध लागत असतात. समाजात सातत्याने स्थित्यंतरे घडत असतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनात बदलही अपरिहार्य असतात. अशा वेळी या बदलाची नोंद स्वभाषेत घेण्याची क्षमता अधोरेखित होण्याची गरज असते. या बदलांचा वेध भाषेच्या माध्यमातून घेताना भाषेत नवनवीन शब्दांची भर पडत जात असते. अनेकदा समाज व्यवहारातही बदल होत असतात.

त्या बदलांचा वेध भाषेतून घेताना नवनवीन शब्द निर्माण करण्याचे आव्हान भाषातज्ज्ञांनी पेलण्याची गरज असते. कधीकाळी माहिती तंत्रज्ञानात वेगाने बदल होत होते. त्यातील अनेक शब्द परकीय भाषेतील आहे. त्या शब्दांना प्रतिशब्द देण्याची गरज असते. ते दिले गेले नाहीत तर मूळच्या मातृभाषेत परकीय शब्द येत राहतात. तेच उपयोगात आणले जातात. मग त्या शब्दांचे उपयोजन करताना त्याबद्दल खंतही वाटत नाही. मात्र अशा स्वरूपाचे शब्द उपयोगात आणताना आपल्या भाषेचे लावण्य आणि समृध्दतेचा प्रवास कुंठीत होत असतो हे लक्षात घ्यायला हवे.

आज समाजात जेव्हा मराठीत बोलतो तेव्हा अनेक इंग्रजी शब्दयुक्त मराठीत संवाद केला जातो. माझा मोबाईल लाईफ टाईम रिचार्ज फ्री आहे. असे मराठी संवादातील वाक्य सहजपणे आपल्या कानावरती येते. आता यात किती शब्द मराठीत आहे याचा शोध घेतला तर मराठी वाक्यात मराठी शब्द कमी आणि इंग्रजी शब्द अधिक आहेत, असे दिसेल. त्यामुळे अशा स्वरूपाच्या भाषिक संवादाने भाषा समृध्द होते का? याचाही विचार करण्याची गरज आहे. आपली गरज म्हणून भाषेत नवनवीन शब्दांची भर टाकली जाते का? याबाबत प्रत्येक भाषिकाने विचार करण्याची आवश्यकता आहे.

असे घडले तरच भाषेचा विकास होत असतो. भारतात क्रिकेट आले तेव्हा त्यातील संकल्पनांना मराठी शब्द नव्हते. मात्र क्रिकेट जसा लोकप्रिय होऊ लागला, त्या खेळाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापणे वाचकांची गरज म्हणून अपरिहार्य ठरले. तेव्हा अनेक वर्तमानपत्रांनी इंग्रजी भाषेतील शब्द वापरणे पसंत केले होते. मात्र तत्कालीन वर्तमानपत्राची गरज लक्षात घेता खाडिलकरांनी नवाकाळमध्ये फलदांज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज, धावा अशा शब्दांची भर टाकून बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. वर्तमानपत्रात असे पर्यायी शब्द देण्यात आले. ते शब्द मराठी भाषेत सहजतेने वापरले जाऊ लागले.

वर्तमानपत्रात येणारे शब्द हळूहळू लोकांच्या भाषेत मिसळले जातात आणि ते लोकव्यवहाराचे शब्द बनतात. त्याप्रमाणे नित्य नूतन शब्दांची भर भाषेत पडली तर भाषा काळाच्या सोबत टिकते. जी भाषा काळाच्या सोबत समृध्द होत जाते ती भाषा बोलणार्‍या माणसांची संख्या वाढवत जाते. मात्र भोवतालच्या बदलाची दखल घेण्यासाठी भाषेत गरजेप्रमाणे पुरेसे शब्द नसतील तर तिचा उपयोग करण्याकडचा कल आपोआप कमी होतो. नवनवीन शब्द केवळ पुस्तकात छापले म्हणजे झाले असे म्हणून चालत नाही तर त्यांचा लोकभाषेत सातत्याने संवाद होण्याची गरज असते.

त्यामुळे भाषा विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असते. आपण नवनवीन शब्दांची दरवर्षी किती प्रमाणात भर टाकतो हे महत्त्वाचे. जगातील अनेक भाषांमध्ये अशी शब्दांची भर सातत्याने पडत राहते. त्यामुळे त्यांचे शब्दकोश समृध्द होत राहतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. प्रत्येक भाषेत सातत्याने विविध प्रकारचे शब्दकोश विकसित करण्याची गरज भाषेची असते त्याप्रमाणे ती समाजाचीदेखील असते. असे शब्दकोश जी भाषा अधिकाधिक प्रमाणात विकसित करेल तर ती भाषा काळाच्या सोबत टिकतेच आणि तिचा प्रवास ज्ञानभाषेच्या दिशेने होणे घडत जाते.

इंग्रजी ही भाषा सातत्याने समृध्द होते याचे कारण जगात जे जे नवनवीन शब्द इतर भाषेत येतात त्या अर्थाच्या नवीन शब्दांनी इंग्रजी भाषेत भर पडत जाते. त्यांचा शब्दकोश सातत्याने वृद्धिंगत होत असतो. जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषेचे जितके शब्दकोश आहेत तितके शब्दकोश इतर कोणत्या भाषेत असण्याची शक्यता नाही. इंग्रजी भाषा शब्दकोश मुळात भाषा विकासाचा गाभा राहिला आहे.

अगदी मराठी भाषेचा पहिला शब्दकोशदेखील एक इंग्रज व्यक्ती म्हणजे प्रोफेसर कँडी यांनीच विकसित केला होता. भाषा शब्दकोश हे त्या भाषेच्या विकासाला हातभार लावणारे सर्वात महत्त्वाचे साधन होते. इंग्रजीचे शब्दकोश नियमित वापरणार्‍यांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे तेथील वाङ्मय समृध्द होते आणि त्याचबरोबर तेथील संस्कृतीचा प्रवास समृध्दतेने होण्यास मदत होत असते. त्यामुळे सहाजिकच ज्या भाषेत शब्दकोशांचा अभाव आहे ती भाषा आणि संस्कृती समृध्द होण्यापासून दुरावते हेही लक्षात घ्यायला हवे.

भारतातील विविध भाषांचा अभ्यास केला तर मराठी भाषेत सर्वाधिक शब्दकोश निर्माण केले जात होते. त्यामुळे भारतातील इतर भाषिक मराठीच्या या प्रयत्नाकडे अत्यंत कौतुकाने पहात होते. गेल्या काही दशकात मात्र असे प्रयत्न मराठीच्या बाबत तितक्या प्रमाणात आणि गुणवत्तेत होताना दिसत नाहीत. त्यामुळे या स्वरूपाचे प्रयत्न शासन स्तराबरोबर सामाजिक स्तरावरदेखील करण्याची गरज आहे.

वर्तमानात उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी शब्दसंपदा निर्माण करणे, मराठी भाषेत उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करणे. तसे घडले तर आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा आनंद जसा भाषिकांना आहे, त्याप्रमाणे मातृभाषेतील उच्च शिक्षणाचा प्रवास घडल्याने मातृभाषेत अनेक पर्यायी शब्दांचा समावेश होईल. त्यामुळे भाषादेखील समृध्द होण्यास मदत होत असते. असे प्रयत्न भाषा विकासासाठी काम करणार्‍या संस्थांनी नियोजनबध्दतेने करणे गरजेचे आहे. सध्या मराठी भाषेच्या विकासासाठी गांभिर्याने पावले उचलायला हवीत.

ती पावलेच मराठीचे इतिहासातील अभिजातत्व भविष्यातदेखील कायम ठेवील. भाषा जितकी समृध्द असेल तितके तिचे उपयोजन उंचावेल. या प्रयत्नाबरोबर मराठी भाषकांनी कोणत्याही प्रकारे न्यूनगंड न ठेवता मराठी भाषेत संवाद करणे. जिथे जिथे पर्यायी शब्द उपलब्ध नाहीत तेथे तेथे आपण नवीन शब्द जन्माला घालून ते लोकव्यवहारात आणण्याची गरज आहे. मुळात भाषा टिकविण्यासाठी ती समाज संवादाची भाषा बनायला हवी. तिचा व्यवहार वाढला तर तिच्या मृत्यूची शक्यता नाही. ज्या भाषा जगात मरण पावल्या आहेत, त्याला सरकारपेक्षा समाजाची अनिच्छा अधिक जबाबदार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.