घरफिचर्ससारांशपर्यावरणाला हवा स्वदेशी झाडांचा ऑक्सिजन !

पर्यावरणाला हवा स्वदेशी झाडांचा ऑक्सिजन !

Subscribe

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षात आपण औदुंबर,वड,पिंपळ,कडुनिंबासारखी झाडे लावणे बंद केल्याने राज्याला आणि देशाला प्रचंड उष्णता, पाण्याची वाणवा, पावसाची अनियमितता आणि त्यातून उद्भवणार्‍या दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आज केला नाही तर भविष्यात ही समस्या अधिक भयावह होणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. विदेशी झाडांनी आपल्याकडील पर्यावरणाचा श्वास कोंडून त्याचे अतोनात नुकसान केले आहे, पर्यावरणाला मोकळा श्वास मिळून त्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन होण्यासाठी स्वदेशी झाडांच्या ऑक्सिजनची गरज आहे. आजच्या पर्यावरण दिनी आपण हे लक्षात घ्यायला हवे.

पिंपळ वड,कडूनिंब ही झाडे वातावरणातील कार्बन-डायऑक्साइड ग्रहण करण्याचे काम करतात. टक्केवारीत सांगायचे तर पिंपळ १०० टक्के, वड ८० टक्के आणि कडूनिंब ७५ टक्के कार्बन-डायऑक्साइड शोषून घेतो आणि ही झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देऊन नैसर्गिक पध्दतीने ताजेतवाने करण्याचे काम करतात. मात्र मागच्या काही वर्षात शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर याच गोष्टींकडे हेतुत: दुर्लक्ष केले गेल्याने देशी झाडांची जागा गुलमोहर, कारंजे, निलगिरीच्या झाडांनी अक्षरशः बळकावून घेतली. आणि तेव्हा लावलेली ही झाडे आता धोकादायक आणि जीवघेणी ठरत आहेत.

पाश्चात्य देशातून आलेल्या यूकेलिप्टसची वाढ खूप झपाट्याने होते. ही झाडे जमिनीतील पाणी वेगाने शोषून घेत असल्याने दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी ही झाडे लावली जातात. मात्र आपल्याकडे गेल्या ४०/५० वर्षांत ही झाडे सर्व महामार्गांच्या दोनही बाजूंना मोठ्या संख्येने लावली गेली आहेत. ही झाडे ना नैसर्गिक गारवा देऊ शकत ना पर्यावरणासाठी त्यांचा काही उपयोग होत. परिणामी दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वरच्या दिशेनेच सरकतांना दिसतो आहे.

- Advertisement -

पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला सर्वार्थाने समृद्ध करणार्‍या पिंपळाच्या झाडाला झाडांचा राजा असे म्हणतात. ही बाब आधुनिक विज्ञानाने सप्रमाण सिद्ध केलेली असली तरी भारतीय संस्कृतीत पिंपळाचे महत्व अनादी काळापासून अधोरेखित केलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या ऋषि-मुनींनी आणि पूर्वसूरींनीही पिंपळाच्या झाडाचे महत्व उधृत केलेले आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे –

मूले ब्रह्मा, त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच पत्रे पत्रे सर्वदेवायाम्
वृक्ष राज्ञो नमोस्तुते ।

- Advertisement -

(अर्थ:- ज्याच्या मुलांमध्ये ब्रम्हा,सालीत विष्णु, फांद्यांमध्ये शंकर आणि प्रत्येक पानात देवी-देवतांचा वास आहे त्या वृक्षराजाला वंदन असो)

मात्र आपल्या दुर्दैवाने आपल्याला याचा अर्थच कळला नाही आणि आजही आपल्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पुढची पिढी जिवंत ठेवायची असेल आणि नैसर्गिक आपत्ती व ग्लोबल वॉर्मिंगपासून बचाव करायचा असेल तर आज आपल्याला विदेशी झाडांचा अट्टहास सोडून प्रत्येक १०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक औदुंबर,वड,पिंपळ आणि कडूनिंबाचे झाड आणि प्रत्येक घरासमोर, परसबागेत आणि जिथे जागा मिळेल तिथे तुळस लावलीच पाहिजे. तुळस ही औषधी तर आहेच पण त्याहीपेक्षा २४ तास ऑक्सिजन वायू पुरवणारी गुणकारी वनस्पती आहे. त्यामुळे आपला परिसर,आपले गाव,शहर,राज्य आणि देश प्रदूषणमुक्त होण्यास मोठा हातभार लागेल.

विदेशी झाडांचा अट्टहास नकोच

मादागास्कर येथून भारतात आलेला गुलमोहर, ऑॅस्ट्रेलियातून आणलेली निलगिरी, १९७२ च्या दुष्काळात आयात केलेल्या गव्हाबरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम,अकेशिया, स्पॅथोडिया,कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी लाखो एकर जमिनीवर बस्तान बसविले आहे. या झाडांच्या आम्लधर्मी पानांमुळे भोवतालची जमीन नापीक केली. अमेरिकेकडून आलेल्या पार्थेनियम तण म्हणजेच ज्याला आपण गाजर गवत किंवा काँग्रेस गवत म्हणतो ते बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि अल्पावधीतच या गवताची सगळ्या देशात बेसुमार वाढ झाली. या गवताला कोणतीही जनावरे, किटक, प्राणी खात नसल्याने त्याची वाढ अतिशय जलद गतीने होत गेली, ती इतकी वाढली की गाजर गवत ही कृषिप्रधान भारतासाठी एक समस्या ठरली.

१९७० च्या दशकात जागतिक बँकेच्या कर्जाच्या बदल्यात ग्लिरिसिडीया हे झाड भारतात लावण्याची अट घातली गेली अन आर्थिक स्थिती वर मात करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारने ती अट नाईलाजातून आलेल्या अविचाराने स्वीकारली. तेव्हापासून ग्लिरिसिडीया हे झाड आपल्याकडे आले आणि फोफावले. परिणामी भारतातले पावसाचे प्रमाण हळुहळु कमी होत गेले. ग्लिरिसिडीयाच्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी त्यांना अपंगत्व आणि मृत्यू ही येतो. ही झाडे विषारी वायु उत्सर्जित करीत असल्याने या झाडांखालून चालताना धाप लागते. असे असूनही आपल्याकडच्या बहुतांश जंगलात आणि नर्सरींमध्ये ग्लिरिसिडीयाची झाडे मुबलकतेने भरलेली आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या झाडांचे विदेशीपण लपविण्यासाठी त्यांना नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी भारतीय नावे दिली गेली आहेत. भारतीय नावांमुळे ही झाडे बेमालूमपणे इथल्या वाड्या-वस्त्यांपासून मोठ-मोठ्या शहरांपर्यंत इतकी फोफावली आहेत की, सर्वसामान्य माणसाला ही झाडे स्वदेशी झाडांपेक्षाही जवळची वाटू लागली आहेत.

झाडांच्या विदेशी प्रजाती कशा ओळखाव्या ?

आपल्यापेक्षा पशु-पक्षी अधिक समजदार आहेत. देशी-विदेशी झाड कोणते याची समज त्यांना अधिक आहे. त्यामुळे कोणते झाड विदेशी आहे हे समजायचे असेल तर त्या झाडाचे थोडे निरीक्षण करावे. ज्या झाडांवर आपल्याकडील कावळे, चिमणी, साळुंकी, कोकिळा, कबुतर यासारखे पक्षी बसत नाहीत आणि त्या झाडावर घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे.

परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदिक उपयोग नाहीत किंवा त्यापासून ऑक्सिजनदेखील मिळत नाही. या झाडांच्या फुलात परागकण नाहीत. त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने भूगर्भातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय या झाडांच्या पानांनी आणि सावलीने मातीची उत्पादन क्षमता कमी होऊन जमिनी निकृष्ट झाल्या आहेत. या झाडांची पाने, फुले, फांद्या, खोड, लाकूड, मुळे यांचा कोणताही उपयोग होत नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी,साळुंकी, घार, गिधाडे, गरुड, घुबड, भारद्वाज अशा सर्रास दिसणार्‍या पक्षांचे दर्शनही दुर्लभ होऊ लागले आहे. विदेशी झाडांवर होणार्‍या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणार्‍या बीजप्रसाराच्या साखळीत खंड पडल्याने कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी आणि पर्यायाने अन्नसाखळी कमकुवत होऊ लागली आहे. परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय,बैल,शेळीसुद्धा खात नाही. एवढेच काय माकडे देखील या झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते ते आपल्याला अजून कळले नाही हेच मोठे दुर्दैव आहे.

परदेशी झाडांच्या वाढत्या विस्ताराने भारताच्या नैसर्गिक अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेल्या अनेक जीवांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. या प्राणी-पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणार्‍या माकड,वाघ,हत्ती, बिबटे,रानगव्यांचा मोर्चा अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ही निसर्गसाखळी टिकवून ठेवण्यासाठी आजच उशीर झालेला असला तरी वेळ गेलेली नाही. या दुष्परिणामांकडे गांभीर्याने लक्ष दिले तर पुढचा धोका टळू शकतो.

देशी झाडेच का ?

अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।

कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।

पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे लावणार्‍याला कधीही नरकात जावे लागणार नाही, हे आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. वडाला, उंबराला देवाचा दर्जा देऊन त्यांच्या पूजनाचे महत्वही विशद करण्यात आले आहे.

भारतीय वृक्ष आपल्या भोवतालच्या पर्यावरणाचा समतोल साधत असतात. या झाडांच्या अस्तित्वावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीमध्ये मनुष्य, प्राणी,पक्षी,कीडे, कीटक यांचा समावेश झालेला दिसतो. देशी झाडांमुळे प्राणी,पक्षी,किटकांनाअन्न,निवारा मिळतो. निसर्गनियमाने या झाडांच्या गळालेल्या पानांपासून तयार झालेले खत जमिनीच्या गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेचा कस वाढवत असतो… पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण झालेली पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची मुळे इमाने इतबारे करीत असतात. जैवविविधतेचा भाग असलेल्या विविध प्रकारच्या किडे-कीटक आणि सरपटणार्‍या जीवांसाठी अशी जमीन उपयुक्त ठरत असते आणि यातूनच एक परिपूर्ण पर्यावरण चक्र निर्माण होत असते.

ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता या देशी झाडांमध्ये आहे. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाऊस, चुकलेले ऋतुचक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे. देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांना आसरा बनतात. वटवाघळाकडून साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे निसर्गात रोपण केली जातात. यात आंबा,जांभूळ, चिकू,बोर,उंबर,वड, पिप्रण,नांदरूक,मोहा, सीताफळ,रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकले हे वटवाघळाला समजते. झाडावरचा आंबा वटवाघळाने खाल्ला की,शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते. जी गोष्ट मुक्या प्राण्यांना कळली ती माणसाला कधी कळणार ?

पांगारा, सावर, सीताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, महारुख, बेहडा, बरगुंड, मोई, शिरीष, सालई, रुद्राक्ष, मेडशिंगी, बिबा, भोकर, लकुच, भेरली माड, रोहितक, हिरडा, बोंडारा बोर, मुचकुंद, बाभूळ, हीवर, वाळुंज, शिवण, वावळ, मोह, शिसम, शृंगी, भुत्या, दुरंगी बाभूळ, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन,कदंब, फणस,आवळा,आंबा,कवठ,बेल,कडुनिंब,मोह,पळस ही झाडे न लावता निव्वळ वृक्षारोपणाच्या फसव्या फोटोगिरीसाठी चुकीच्या झाडांचे वृक्षारोपण करणार्‍या लोकांना थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा नुसती हिरवळ दिसली तरी जैवविविधता दिसणार नाही हे कितीही कटू असले तरी वास्तव सत्य आहे आणि हे समजून घेऊनच आपण कोणते झाड लावतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -