घरफिचर्ससारांशसृष्टीचं सदाबहार रंगवैभव

सृष्टीचं सदाबहार रंगवैभव

Subscribe

गर्द हिरव्या, पोपटी रंगाच्या नाजूक लुसलुशीत फुटव्यांनी भर उन्हातही नजाकत कायम ठेवलेली वनराई... अग्नीपंख घेऊन नखशिखांत बहरलेला पळस, उन्हाचा रंग ल्यालेला पांगारा, स्पॅतोडिया आणि हळद लावलेल्या नववधूसारखा अंगोपांग नटलेला बहावा... वसंत आणि ग्रीष्मातलं सृष्टीचं हे सदाबहार रंगवैभव. शिशिरातल्या पानगळीनंतर नवचैतन्याचा हा उत्सव डोळ्यांचं पारणं फेडतो. वसंतपंचमी, होळी, रंगपंचमीचे संकेत देणार्‍या सृष्टीचा उत्सव अनुभवायलाच हवा...

मृगजळाची अनुभूती देणारे गुळगुळीत रस्ते, उंचच उंच इमारती, शेकडो खिडक्या, त्यातून डोकावणारी लाखो डोकी आणि अनंत विचार…. एखाद्या म्हातारीने कुणाला त्रास होऊ नये म्हणून घराच्या कोपर्‍यात स्वतःची वळचण बांधून राहावं, तसं दुभाजकांत शिस्तीने उभी झाडं.. ऑफिस ते घर एवढंच अंतर दररोज कापण्यासाठी सुसाट निघालेली वाहनं… वेदनांनी भरलेली हॉस्पिटल्स… ठिकठिकाणी आनंद शोधणारी तरुणाई… आणि चकचकीत हॉटेल्स… हा कोलाहल संपला की मातीशी नातं सांगणार्‍या पायवाटा नजरेस पडतात. अंग झटकून टाकलेली ओकीबोकी झाडं, अंग भाजून काढणारं ऊन, तहानलेली गावं, रखरखीत वाटा, धुळीचे लोट उधळणारी हवा… हे सारे बदल सृष्टीच्या नवचैतन्याची चाहूल देऊ लागलेत.

आयुष्यभर जपून ठेवलेलं दुःखं क्षणात झटकून मोकळं व्हावं तसं ग्रीष्मात पानगळ करून ओकीबोकी झालेली झाडं जणू जगण्याचा उत्सव कसा असावा, हे सांगताहेत. अंग भाजून काढणार्‍या उन्हाचा जराही बाऊ न करता, तितक्याच तीव्र रंगांनी प्रतिसाद देणारा पळस, पांगारा, स्पॅतोडिया जगण्याचं मर्म सांगून जातो. माळरानात एकटाच उभा असूनही सुवर्णालंकारांनी सज्ज राजासारखा पिवळ्याधम्मक फुलांनी बहावा अंगोपांग फुललाय. अंगावर एकही पान नसताना फुलांनी डवरलेला गुलमोहोर आपल्या मातीत रुजलाय.

- Advertisement -

शिशिरानंतर आलेल्या वसंत ऋतुच्या स्वागतासाठी सुरू झालेला हा सृष्टीचा रंगोत्सव आता ग्रीष्मापर्यंत आपली नजाकत खुलवत राहील. म्हणूनच वसंत ऋतुला ऋतुंचा राजा अर्थात ऋतुराज म्हटलं गेलंय. महाकवी कालिदास यांनीही ऋतुसंहार या आपल्या पहिल्या काव्यात वसंत ऋतुचं अत्यंत ओघवतं निरुपण केलंय. त्यामुळे या ऋतूचा थाट आणि महत्व आपोआपच लक्षात यावं. वसंतपंचमीपासून निसर्गात जो बदल सुरू झालाय, फुलझाडं बहरू लागलीत हे सारे वसंताच्या आगमनाची चाहूल देताहेत. होळीनंतर ऊन जसजसं वाढेल तसा या फुलांचा बहरही शिगेला पोहोचेल. शहरापासनं थोडं दूर गेल्यावर सृष्टीचा रंगोत्सव नजरेस पडतो.

पळस, पांगारा, स्पॅतोडिया, रेन ट्री अर्थात शिरिष, काटेसावर, गुलमोहोर हे सारे रक्तवर्णी फुलांचे स्वामी. बहावा, टॅब्युबिया ही पिवळ्या फुलांचा संभार केलेली झाडं. कुंती, कुडा, मुचकुंद हे शुभ्रवर्णी आणि महाराष्ट्राचं राज्यपुष्प म्हणून मिरवणारा लालसर जांभळ्या रंगाचा ताह्मण अनेक ठिकाणी फुललाय. फुलांचं हे वैभव त्यांच्या दुनियेत गेल्यावरच लक्षात येतं.

- Advertisement -

पळस
धार्मिक, सांस्कृतिक आणि वनस्पतीशास्त्रात आवर्जुन स्थान मिळवलेला पळस जवळपास प्रत्येक भागात दिसतो. उन्हाळ्याच्या प्रारंभीच होळी आणि रंगपंचमीचे संकेत देणारा पळस आता चांगलाच फुललाय. जंगलात गेलं की पळसाची अनेक झाडं चंदेरी भगव्या फुलांनी सजलेली दिसतात. एरवी जाडसर पानांनी बहरलेलं हे झाड शिशिरात मात्र वेड्यावाकड्या काळ्या फांद्यांमुळे अगदीच कुरुप दिसतं. मात्र, वसंताचं आगमन होताच अंगोपांग लालभडक फुलांचे घोस लगडतात. फुलांना वास नसला तरीही पोपटाच्या चोचीसारख्या बाकदार आकारामुळे तो चटकन लक्ष वेधून घेतो.

बहिणाबाईंच्या शब्दांत सांगायचं तर,
पयसाची लाल फुलं, हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू, गेले कोठी उडी..

मधमाशा, मैना, सूर्यपक्षी यांच्यासाठी तर पळसाची फुलं पर्वणीच ठरतात. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. नैसर्गिक रंग, सरबत तयार करण्यासाठीही याच्या फुलांचा वापर करतात. आयुर्वेदातही या फुलांचा उल्लेख दाहनाशक, पित्तविकार, कफशामक म्हणून आढळतो. पळसाला पाने तीन ही म्हण तर परिचित आहेच. ही पानं ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची प्रतिक मानली जातात.

बहावा
अमलताश, गोल्डन शॉवर, गोल्डन रेन, इंडियन लॅबर्नम ट्री अशा कितीतरी नावांनी परिचित असलेल्या बहाव्याचं सौंदर्य शब्दांपलिकडचं. पानगळ झाली की या झाडाला सोनेरी स्वप्न पडू लागतात आणि अलवार घुंगरांसारखी हवेत माळलेल्या सुवर्णालंकारांसारखी ती वास्तवात येतात. बहाव्याची ही सोनेरी गुंफण बघणार्‍याला स्वप्नवत ठरावी, अशीच असते. फांद्यांमधून, खोडांतून नाजूक बाकदार देठाची फुलं झुंबरासारखी बाहेर पडतात. मंद सुगंध हवेत पसरतो. थायलंडचा राष्ट्रीय वृक्ष आणि केरळचा हा राज्यवृक्ष महाराष्ट्रातही आपला थाट टिकवून आहे. नाशिकमध्ये बालाजी मंदिर, गोदाकाठ, भोसला स्कूल भागात याचं सौंदर्य आता खुलू लागलंय.

नीलमोहोर (जॅकरांडा)
आपल्याकडे निळ्या रंगाची छटा असलेली फुलं तशी कमीच. पण त्यातही लक्ष वेधून घेणारं झाड म्हणजे निलमोहोर अर्थात जॅकरांडा. मूळचा दक्षिण अमेरिकेतलं हे झाड शहराच्या रस्त्यांवर नजरेस पडतं. एरवी फुलं नसताना हे झाड अगदी गुलमोहोरासारखं दिसतं. हिवाळ्यात पानगळ होते आणि वसंत ऋतुचं आगमन होताच कोवळी लुसलुशीत पालवी आणि सोबत जांभळ्या फुलांचे तुरे दिसू लागतात. याचा जांभळा रंग चटकन लक्ष वेधू घेतो. कडाक्याच्या उन्हात डोळ्यांना सुखावणारी याची फुलं वाटसरूंचा प्रवास सुखद करतात. बहर आल्यानंतर साधारण 15 दिवसांत झाडाखाली लहान घंटेच्या आकारातील तलम मुलायम फुलांचा सडा पडतो.

तामण
निळ्या जांभळ्या फुलांचा पानझडी वृक्ष तामण कोकणात मोठ्या प्रमाणावर आढळतो. महाराष्ट्राचं राज्यपुष्प म्हणून तामणची ओळख. मार्च महिन्याच्या मध्यात कोवळ्या पालवीतून गुलाबी-जांभळ्या फुलांचे तुरे डोकावू लागतात. ही निळी-गुलाबी-जांभळी फुलं उठून दिसतात आणि नजरेला सुखावून जातात.

पांगारा
पळस, पांगारा आणि काटेसावर यांची ओळख पटवताना अनेकांचा गोंधळ होतो. मात्र, फुलांना निरखून पाहिल्यावर त्यांचं वेगळेपण लक्षात येतं. पळस हा पांगार्‍याचा चुलत भाऊ असं गंमतीने म्हटलं जातं. कदाचित म्हणूनच दोघांच्या पानांमध्येही काहीसं साम्य आढळतं. वसंताचं आगमन झाल्यानं आता या झाडाच्या निष्पर्ण फांद्यांवर भडक शेंदरी फुलं यायला सुरुवात झालीय. फांद्यांच्या टोकांवर कळ्या आणि फुलांचे गुच्छ आले आहेत. भडक रंगामुळे त्याची ओळख पटते. पांगार्‍याच्या ़फुलांना जराही सुगंध नसतो. मात्र, त्यातलं मध चाखण्यासाठी अनेक पक्षी आणि किडे त्याकडे आकर्षित होतात.

काटेसावर
अंगभर काटे असूनही थाटात उभा असलेला काटेसावर वसंतात रंगोत्सव साजरा करतो. त्याचं शाल्मली हे संस्कृत नाव अधिक साजेसं वाटतं. शिशिरात पानगळ झाल्यानंतर वैराग्य पत्करल्यासारखी याची अवस्था असते. तटस्थ उभ्या या झाडाला मग हळूच लालभडक गोलाकार फुलं यायला सुरुवात होता. फांद्यांवर लहान-लहान कळ्या दिसतात आणि भराभर मोठ्या होऊन मांसल फुलं उमलू लागतात. आत मकरंद असल्यानं खारी, द्याळ, मैना, बुलबुल, मधमाशांच्या गजबजाटाने हे झाड उत्सवमूर्ती बनतं. वजनामुळे ही फुलं ताजी असतानाच धपकन खाली पडतात. रानात असलेल्या या झाडांची फुलं शाकाहारी प्राणी आवडीने खातात. लाल आणि पिवळी सावरही यात आढळते.

या प्रमुख झाडांसोबत फिकट गुलाबी गोलाकार इवल्याशा फुलांचा शिरिष अर्थात रेन ट्री, पिचकारी अर्थात स्पॅतोडियाची झाडंही आता फुलू लागलीत. याशिवाय शिवण, मेडशिंगी, अर्जून, अशोक, रानपांगारा, करंज, कांचन अशा शेकडो झाडांचा रंगोत्सव सुरू झालाय. सृष्टीचं हे रंगवैभव म्हणजे ऋतुबदल आणि त्या अनुषंगाने येणार्‍या सणोत्सवांचं निमंत्रणच ठरावं. निसर्गाचा हा थाट आनंदोत्सव, संक्रमणावस्था आणि जगण्याचं मर्म सांगून जातो!

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -