Homeफिचर्ससारांशWomen Liberation Organization : बदलाचे अर्धशतक !

Women Liberation Organization : बदलाचे अर्धशतक !

Subscribe

सन १९७५ मध्ये स्थापन झालेली स्त्री मुक्ती संघटना पाच दशके एवढा काळ महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे. ज्योती म्हापसेकर, शारदा साठे आणि इतर काही धडपड्या मैत्रिणीनी संघटनेचा पाया रोवताना लिंग समतेचे न्याय्य जग निर्माण करण्यासाठी ‘मुलगी झाली हो!’ या नाटकाने महिलांना संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या अधोरेखित करण्याची दारे उघडली. कौटुंबिक समुपदेशन केंद्रे, घरातील हिंसा निवारण, मासिक प्रकाशन ‘प्रेरक ललकारी’, किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम, डे केअर सेंटर्स, कचरा वेचकांसाठी कार्यक्रम, अशी अनेकविध कार्ये संघटनेने सुरू केली आहेत.

-डॉ. प्रतिभा जाधव

सक्षमा तू रणरागिणी अपराजिता तू ना बंदिनी
निर्भये ये पुढे हो नेता, सखी, म्होरकी हो संगिनी
भीती संकोचा सार दूर चुकत माकत शिक बये
गिरव अक्षरे मुक्तीची गं अन मुक्ता तू हो सये
घर सांभाळशी नेटके तू पण स्वतःलाही आवर थोडी
किती पसारा मनात तुझिया तुला तूच सावर थोडी
नकाराची भीती कशाला आशेचे दीप ठेव उशाला
तुझा दीप तूच हो अन उजळव तुझिया भविष्याला
द्वेष असूयेचे जहर नको कि अज्ञानाचा अंध:कार
तुझ्यातील साऊला घालून साद सखे विवेक अंगीकार
बुद्धीला तुझ्या धार हवी अन विवेकाची चाड तुला
सत्याची तू कास धर आत्मविश्वास बघ येई फळा
पंच्याहत्तरी जरी स्वातंत्र्याची आजही तुजला पाश किती
म्हणून सये जग तग लढ ध्येय गाठ उंचच उंच घे भरारी!

- Advertisement -

नुकताच स्त्री मुक्ती संघटनेचा पन्नासावा वर्धापन दिन मुंबईत उत्साहात साजरा झाला. अर्थात स्त्री मुक्तीच्या आजवरच्या प्रवासाचा धांडोळा घेणारा व पुढिलांना बळ देणारा हा एक वैचारिक सोहळा होता. आपण कोण? ह्या चार वर्णाच्या व्यवस्थेत स्त्रीचा वर्ग कोणता? नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील ‘तुही यत्ता कंची? सारखा प्रश्न मुठभर सजग विवेकी शिक्षित महिलांना पडू लागला.

ह्या प्रश्नांचा पाठलाग करताना त्यांना उमजले की, शुद्र वर्गाच्याही खाली स्त्रीचे स्थान आणि सेवा हाच तिचा धर्म. हे असे का? ह्या प्रश्नाचा पाठलाग करताना स्त्री मुक्तीसारखी महत्वाची संघटना जन्मास आली आणि तिच्या माध्यमातून स्त्रियांच्या हिताची अनेक मुलभूत कामे झाली व होत आहेत.

- Advertisement -

सन १९७५ मध्ये स्थापन झालेली स्त्री मुक्ती संघटना पाच दशके एवढा काळ महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे. ज्योती म्हापसेकर, शारदा साठे आणि इतर काही धडपड्या मैत्रिणीनी संघटनेचा पाया रोवताना लिंग समतेचे न्याय्य जग निर्माण करण्यासाठी ‘मुलगी झाली हो!’ या नाटकाने महिलांना संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या अधोरेखित करण्याची दारे उघडली.

कौटुंबिक समुपदेशन केंद्रे, घरातील हिंसा निवारण, मासिक प्रकाशन ‘प्रेरक ललकारी’, किशोरवयीन मुलांसाठी कार्यक्रम, डे केअर सेंटर्स, कचरा वेचकांसाठी कार्यक्रम आणि घनकचरा व्यवस्थापनाने महिलांसाठी शाश्वत उपजीविका सक्षम करण्यासाठी अनेकविध कार्ये संघटनेने सुरू केली. महिलांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी पथनाट्य, कार्यशाळा आणि प्रकाशनांसह विविध पद्धतींचा वापरही संघटना करते.

आपल्या आजूबाजूला सर्वच क्षेत्रांत अनेक घटकांवर विभिन्न स्वरुपात अन्याय होत असताना १९७५ हे महिलांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आणि म्हणून समविचारी लोकांनी महिलांच्या हितासाठी ठोस भूमिका घेतली. त्यात सातत्य ठेवले. विविध पातळ्यांवर कृतीशीलता अंगिकारली आणि आजही हे कार्य उमेद व भरीवपणे सुरू आहे.

ही एक स्वायत्त, नोंदणीकृत संस्था आहे जी कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय गटाशी संलग्न नाही. त्याची मुंबईत दादर, चेंबूर, परळ आणि गोवंडी, नवी मुंबई आणि ठाण्यात वाशी आणि कोपरखैरणे येथे केंद्रे आहेत. पुणे, बुलडाणा आणि उस्मानाबादसारख्या इतर शहरांमध्येदेखील केंद्रे आहेत. महिलांचे हक्क, शिक्षण, आरोग्यसेवा, लैंगिक समानता आणि पर्यावरण या क्षेत्रात भरीव व चिरस्थायी असे काम ती करते.

ही संस्था नोकरदार मातांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर चालवते. त्यांचा ‘जिज्ञासा’ (कुतूहल ) नावाचा किशोरवयीन संवेदना कार्यक्रम लिंग समस्या, तणाव व्यवस्थापन, ड्रग्जला नाही म्हणणे याबाबत जागरूकता करते. घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत करणारी सात कौटुंबिक समुपदेशन केंद्रे संघटनेने स्थापन केली आहेत.

१९९८ मध्ये परिसर विकास काम करण्यास सुरुवात केली. कचर्‍याचा पुनर्वापर करणे, कचरा वेचणार्‍यांना संघटित करणे, त्यांना शिक्षित करणे. शहराच्या अर्थव्यवस्थेत कचरा उचलण्याला योग्य स्थान मिळावे हे स्त्री मुक्ती संघटनेचे उद्दिष्ट आहे. या संस्थेच्या सततच्या प्रयत्नाचा आतापर्यंत ५००० हून अधिक महिलांना फायदा झाला आहे. कचरा वेचक महिलांच्या मुलांसाठी शहरातील पहिले बाल-संगोपन केंद्र स्थापन करण्यासाठी स्त्री मुक्ती संघटनेने पुढाकार घेतला.

प्रौढ साक्षरता मोहीम आणि १९८९-९० मध्ये कचरा वेचक युनियनच्या स्थापनेला मदत केली. २००४ मध्ये, कचरा वेचकांच्या स्वयंसहायता गटाची नोंदणी झाली. कचरा वेचक महिलांच्या ५००० पेक्षा जास्त मुलांना शिक्षित करण्यासाठी आतापर्यंत संघटनेने संसाधने उभारली आहेत. एकूणच आमूलाग्र बदलाचे अर्धशतकच यशस्वीरित्या स्त्री मुक्ती संघटनेने पूर्ण केले आहे.

एकंदर विचार केला तर असे लक्षात येते की, अशा मानवी मूल्ये, न्याय, स्वांतत्र्य, समता जपणार्‍या, रुजवणार्‍या संघटना समग्र समाजाला, समाजातील प्रत्येक घटकाला सुरक्षित आणि आश्वस्त करणारी हक्काची विसावणारी, लढायला बळ देणारी आणि जिंकण्याची हमी देणारी अशी जागा देत असतात. आजही राजकीय पक्ष, क्षेत्र, निवडून आलेले उमेदवार, त्यातील स्त्रियांची संख्या वा निर्णय प्रकियेत तिचे असणारे स्थान याबाबतचे स्त्री मुक्ती संघटनेचे चिंतन व कृतिशीलता बहुमोल ठरणार आहे हे निश्चित!

-(लेखिका साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -