घरफिचर्ससारांशसमग्र शिक्षणाचा विचार!

समग्र शिक्षणाचा विचार!

Subscribe

आपण शिक्षणाचा जो विचार करीत असतो तो विचार केवळ औपचारिक शिक्षणाचा आहे. शिक्षणात शिकवल्या जाणार्‍या विषयांची कौशल्ये प्राप्त केली की शिक्षण झाले असे मानले जाते. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास यासंदर्भाने अजूनही आपण कितीतरी दूर आहोत. समग्र शिक्षणाचा विचार वर्तमानात दिसत नाही. शिक्षण आणि जीवन समस्यांच्या निराकरणाची शक्ती शिक्षणातून प्राप्त होण्याची गरज व्यक्त केली जाते. आज शिक्षण घेतल्यानंतरही समस्या निराकरणाची शक्ती प्राप्त झाली आहे असे दिसत नाही. शिक्षणाचा पारंपरिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहिला आहे. अशा वेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते. त्यादृष्टीने विविध विषयांसंदर्भात शिक्षणाचा विचार शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे  यांनी ‘परिवर्तनाची वाट’ या पुस्तकातून मांडला आहे.

-प्रवीण शिरसाठ
शिक्षण हा वर्तमानातील सर्वांसाठी अधिक चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे. समाज व राष्ट्र विकासासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. वर्तमानात शिक्षणाविषयी सर्वदूर बोलले जाते. शिक्षण हे जसजसे समजून घ्यावे तसतसे ते अधिक खोलवर जाऊन जाणून घ्यावे लागते. शिक्षण हा विचार केवळ एखाद्या पदवी अथवा पदविकेने जाणता येईलच असे नाही. त्यामुळे शिक्षणाचा व्यापक पट जाणून घेतल्याशिवाय शिक्षणाचा खरा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. शिक्षणाविषयी चपराक प्रकाशनाकडून शिक्षण मालेतील संदीप वाकचौरे यांचे ‘परिवर्तनाची वाट’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.
पुस्तकात शिक्षणासंबंधी अनेक लेख असले तरी त्यातील धागा केवळ शिक्षणाची गुणवत्ता हाच आहे. शिक्षणातील समस्या अनेक असल्या तरी त्यावर मात करता येईल, असा विश्वास पुस्तकात सातत्याने व्यक्त होताना दिसतो. शिक्षणात अजूनही बराच मोठा टप्पा पार करायचा राहिला आहे हेही अनेकदा पुस्तक वाचताना समोर येते. शिक्षणाच्या ध्येयाचा प्रवास अजूनही कितीतरी दूर आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत जाते. त्यामुळे पुस्तक वाचताना शिक्षणाचा अर्थ उलगड जातो. आपण वर्तमानात शिक्षणाचा जो विचार करीत आहोत तो खर्‍या शिक्षणापासून कितीतरी दूर आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत राहते.
आपण शिक्षणाचा जो विचार करीत असतो तो विचार केवळ औपचारिक शिक्षणाचा आहे. शिक्षणात शिकवल्या जाणार्‍या विषयांची कौशल्ये प्राप्त केली की शिक्षण झाले असे मानले जाते. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास यासंदर्भाने अजूनही आपण कितीतरी दूर आहोत. समग्र शिक्षणाचा विचार वर्तमानात दिसत नाही. शिक्षण आणि जीवन समस्यांच्या निराकरणाची शक्ती शिक्षणातून प्राप्त होण्याची गरज व्यक्त केली जाते. आज शिक्षण घेतल्यानंतरही समस्या निराकरणाची शक्ती प्राप्त झाली आहे असे दिसत नाही. शिक्षणाचा पारंपरिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहिला आहे.
अशा वेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते. शेवटी शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असते. त्यादृष्टीने या पुस्तकात उहापोह करण्यात आला आहे. अशा विविध विषयांच्या संदर्भाने शिक्षणाचा विचार ‘परिवर्तनाची वाट’ या पुस्तकात करण्यात आला आहे. शिक्षण मालेतील हे पुस्तकही वाचकांना शिक्षणाची नवी दिशा देण्याचेच काम करीत आहे. पुस्तकाचं शीर्षक बरंच काही सांगणारं आहे.
 या पुस्तकातून शिक्षणासंदर्भात जशी प्रश्नांची चर्चा आहे त्याप्रमाणे वर्तमानातील शिक्षणावरील उपायांचीदेखील  मांडणी करण्यात आली आहे. पुस्तकात त्याच स्वरूपातील विविध अनुभवाची मांडणी करणार्‍या लेखांचे दर्शन घडते. आपल्याकडे सातत्याने विविध प्रकल्प, कार्यक्रम, चळवळी, मोहिमा येत असतात. अशा वेळी त्यामागील भूमिका समाजमनात पेरण्याचे काम घडवण्याची गरज असते. तो पेरणीचा विचारही गरजेप्रमाणे पुस्तकात झालेला दिसत आहे. त्यामुळे पुस्तकात अशा कार्यक्रमाची ओळख, त्यामागील भूमिका आणि त्याचा परिणाम यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करून वाचकांना शिक्षणातील विविधतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण केंद्राने जाहीर केले आहे. त्या धोरणांचा प्रासंगिक लेखांचे लेखन करताना गरजेप्रमाणे अनुषंगिक संदर्भ देत वाचकांना बर्‍यावाईटाचे दर्शनही ते घडवत आहे. त्यामुळे वाचकांना नवे काय येत आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज येण्यास मदत होत आहे. शिक्षणाचा विचार करताना केवळ परीक्षेद्वारे होणार्‍या भरतीचा विचार हा फारसा परिणामकारक ठरणार नाही. त्यापलीकडे अनुभव आणि दृष्टिकोनाची गरजदेखील त्यांनी अधोरेखित केली आहे. अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा विचार शिक्षणात रूजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शाळा अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न आहे. लोकांना शिक्षण स्मार्ट हवे आहे, पण ते करताना शिक्षणाच्या मूलभूत हेतू आणि ध्येयापासून आपण विचलित तर होत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आपल्याला अब्राहम लिंकन यांच्या पत्रातील संदर्भाने विद्यार्थ्यांची जडणघडण महत्त्वाची असल्याचेही ते नमूद करतात. पत्राच्या संदर्भातील अत्यंत आश्वासक विचार मांडून लेखक शिक्षणातून बरंच काही अपेक्षित करीत असल्याचे दिसत आहे. शिक्षणातून माणूस निर्माण करण्याचे आव्हान आहे आणि ते आव्हान वर्तमानातील शिक्षण पेलण्यास सक्षम असल्याचे दिसत नाही हेही अधोरेखित केले आहे.
शिक्षणाचा मूलभूत साक्षरतेचा टप्पा जसा महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा शिकण्यासाठी प्रेरित करण्याची गरजही ते अधोरेखित करतात. शिकणे ही प्रेरणा असायला हवी. बालकांसाठी शिक्षक हा मार्गदर्शनापेक्षा सुलभक म्हणून उभा राहील तर बरेच काही वर्गात घडू शकेल, असेही मत व्यक्त करतात. विद्यार्थ्यांचे शिक्षण जेव्हा सुरू असते तेव्हा शिक्षणाचा नेमका अर्थ काय असतो याची ओळख वाचकांना ते अत्यंत कौशल्याने अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत करून देतात.
देशातील विविध सर्वेक्षणांचा विचार करताना केलेली मांडणी वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरते. शिक्षणातून जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती प्राप्त करण्याची गरज आहे. किंबहुना शिक्षणाचा मूळ हेतूच मुळी शिक्षणातून व्यक्ती समर्थ बनणे हाच आहे. असे असताना शिक्षणच आज अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या पुढे येत असल्याचे विविध माध्यमांतून समोर येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक, समाज संभ्रमित होत आहे. त्या समस्यांचा समग्रपणे वेध घेऊन त्यावरील व्यवहार्य उपाय संदीप वाकचौरे यांनी अनेक ठिकाणी सुचवले आहेत.
शिक्षणविषयक धोरणे, अंमलबजावणीतील प्रश्न, नवे सिद्धांत, वेगळे उपक्रम, योजना अशा अनेक विषयांवर अनेक लेखांत त्यांनी केलेली मांडणी वाचकांना शिक्षणाचा परीघ समजून घेण्यास मदत करते. वर्तमानातील समस्यांमुळे निर्माण होणार्‍या प्रश्नांविषयी अनेक ठिकाणी केलेला ऊहापोह वाचकांना वाचावयास मिळतो. वाकचौरे यांची ही पुस्तकमाला म्हणजे शिक्षक, पालक आणि शैक्षणिक यंत्रणेतील घटकांचे सातत्याने उद्बोधन करणारी ठरत आहे. गरजेप्रमाणे विविध ठिकाणी विचारवंतांचे दाखले देत एखादा विषय ते वाचकांच्या गळी उतरू पाहतात. त्यामुळे एखादी कठीण गोष्ट सहजतेने समजण्यास मदत होते.
शिक्षण परिवर्तन या पुस्तकात लेखकाने शिक्षणाशी संबंधित लेखांचा समावेश केला आहे. त्यामध्ये अध्ययन अध्यापनविषयक बदलेला दृष्टिकोन, विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता, स्टार प्रकल्प, वाचन, कोविड काळातील ऑनलाईन शिक्षण, परीक्षा आणि मूल्यमापन, शैक्षणिक गुणवत्ता, सुट्ट्यांचा उपयोग इत्यादी विषयांचा समावेश आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही विद्यार्थ्यांमधील मूलभूत साक्षरतेचा प्रश्न आपणास भेडसावत आहे. त्या संदर्भानेही केलेले विवेचन वाचकांना विचार करायला भाग पाडते. शिक्षणात शिक्षा अधिक वरचढ ठरत होती. शिक्षा केली म्हणजे शिक्षण होते अशी धारणा पालकांची आहे. शिक्षणात काम करणार्‍यांनाही तसेच वाटते. शिक्षा केल्यामुळे शिक्षण होत नाही. शिक्षा केली म्हणजे विद्यार्थी अभ्यास करतात ही धारणा चुकीची आहे. शिक्षणासाठी यापेक्षा बरेच काही हवे आहे. शिक्षा हा गुणवत्तेचा मार्ग नाही हे सांगण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आला आहे.
शिक्षण प्रशिक्षणात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षण हे गुणवत्तापूर्ण हवे असेल तर प्रशिक्षणही अधिक दर्जेदार असायला हवे, अशी मांडणीही ते  करतात. पर्यवेक्षण यंत्रणाही शिक्षणाच्या उद्दिष्टांची उत्तम जाण असणारी हवी हेदेखील नमूद केले आहे. शिक्षणाचे  वास्तव दर्शन या पुस्तकात घडते. शिक्षणाची प्रक्रिया संवादाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. संवादाचे मोल अधिक असल्याचे ते अधोरेखित करतात. जगात शिक्षणाचे नवनवीन प्रवाह येत आहेत. हॉवर्ड गार्डनर यांनी आणलेल्या बहुबुद्धिमत्ता सिध्दांत आणि वर्तमानातील शिक्षण यासंदर्भाने वर्गातील आंतरक्रिया बदलायला हवी हे ते सांगू पाहतात. बहुबुद्धिमत्तेचा विचार केला जातो, तेव्हा वर्गात एकाच दिशेचा प्रवास अपेक्षित नाही. प्रत्येक बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला  गरजेप्रमाणे अपेक्षित अनुभव देण्याची गरज ते व्यक्त करतात.
 पुस्तकात शिक्षणातील अनेक वाटा कठीण असल्याची जाणीव ते करून देतात. त्या वाटा अशक्य आहेत असे मात्र कुठेच प्रतिबिंबीत करीत नाही. शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भाने वास्तवाचे दर्शन घडवताना आपली मते परखडपणे नोंदवतात. त्यासंदर्भाने  प्रामाणिकपणाच्या वाटेचे ते दर्शन घडवू पाहतात. त्यामुळे या पुस्तकातील लेख शिक्षक, शिक्षण यंत्रणेतील विविध घटक आणि पालक यांच्यासाठी निश्चित दिशा देण्यास मदत करणारे ठरतील. सर्व वाचकांना हे पुस्तक आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते आणि त्याचवेळी पुस्तकातून शिक्षणाचा खरा अर्थ उलगडण्यासही मदत होते.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अनुष्का वाकचौरे हिने अत्यंत समर्पक स्वरूपात रेखाटले आहे. शिक्षणाची वाट उत्तमतेने चालू लागलो तर परिवर्तन निश्चतच घडेल, असा विश्वास हे पुस्तकाचे मुखपृष्ठ सांगून जाते. पुस्तकाला माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांची अत्यंत समृद्ध आणि पुस्तकाचे महत्त्व सांगणारी प्रस्तावना लाभली आहे. घनशाम पाटील यांनी मलपृष्ठावर दिलेला ब्लर्बदेखील पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करतो. हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला मदत करणारे आहे. त्याचप्रमाणे पालकांनाही शिक्षणाचा आनंद देणारे आणि शिक्षणाचा अर्थ उलगडून दाखविणारे ठरेल. पुस्तक वाचताना वाचक म्हणून पुस्तकासोबतचा प्रवास आत्मपरीक्षणाच्या वाटेने घेऊन जाणारा ठरतो.
-लेखक- संदीप वाकचौरे
-प्रकाशक-चपराक प्रकाशन
-किंमत-२५०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -