महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर देशासह जगाचे संपूर्ण लक्ष होते. कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्त्व होते. त्यामुळे महायुतीसह भाजपचे संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर होते. त्याच पद्धतीने त्यांनी व्यूहरचना आखली, परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आपापसातील समन्वयाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला.
कारण निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाचा दावा होत होता, त्याचप्रमाणे शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा होत होती तर दुसरीकडे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व नाना पटोले यांच्या नावाची चर्चा, अशा प्रकारे तिन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदाची दावेदारी करताना दिसत होते.
त्याचप्रमाणे जागावाटपामध्ये शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्सीखेच दिसून आली. लहान भाऊ-मोठा भाऊ अशी चर्चा रंगू लागली. कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना लोकसभेच्या विजयाचा गर्व झाला. आपण जर महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील विजयाचा विचार केला तर त्यांच्या खासदारांच्या तुलनेत प्रत्येक खासदारांच्या मतदार क्षेत्रातून कमीत कमी ४ आमदार तरी निवडून यायला पाहिजे होते.
परंतु प्रत्येक खासदारांच्या तुलनेचा विचार केला तर एका खासदारांच्या मतदार क्षेत्रातून फक्त १.५० खासदार निवडून आल्याचे दिसून येते. म्हणजेच काँग्रेसचे-१६, उद्धव ठाकरे गटाचे-२० व शरद पवार गटाचे- १० अशा प्रकारे महाविकास आघाडीचे ४६ आमदार निवडून आलेत. एका खासदार क्षेत्रात कमीत कमी ६ आमदार असतात, त्या पद्धतीने लोकसभा क्षेत्रानुसार महाविकास आघाडीचे अर्धेही आमदार निवडून येऊ शकले नाहीत, ही महाविकास आघाडीच्या बाबतीत शोकांतिका म्हणावी लागेल.
महाविकास आघाडीच्या काही लोकसभा क्षेत्रात तर संपूर्णपणे सुपडा साफ झाल्याचेसुद्धा दिसून आले. यावरून असे लक्षात येते की महाविकास आघाडीला वाटत होते की आपल्या जवळ २९ खासदार आहेत. म्हणजेच जवळपास आपले १४५ आमदार अवश्य निवडून येतील, असे गृहीत धरून ते निश्चिंत होते आणि हाच अहंकार आज त्यांच्या मानगुटीवर बसला. पराजयाचे कारण बनले आहे.
आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विरोधी पक्षनेते पदासाठी पाहिजे असलेल्या २९ जागासुद्धा आघाडीतील कोणताही पक्ष प्राप्त करू शकला नाही. हे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल. आघाडीचा अहंकार आणि त्यांच्यातील समन्वयाचा अभाव याचाच सटीक आणि अचूक फायदा महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांनी घेतला. त्याच पद्धतीने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळेच आज महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले तर महाविकास आघाडीची गाडी ४६ जागांवर अडकली.
-(लेखक नागपूरचे माजी विद्यापीठ प्रतिनिधी आहेत.)