घरफिचर्ससारांशधर्मभेद्यांचा अनाठायी कंठशोष!

धर्मभेद्यांचा अनाठायी कंठशोष!

Subscribe

अनेक गावांमध्ये एखादा पीर दर्गा असतोच आणि त्या दर्ग्याच्या दर्शनाला काही हिंदू लोकदेखील जात असतात. त्या त्या गावाची ती संस्कृती असते. आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेरच्या पायरीशी धूप दिली जाते. तिथे ही परंपरा आहे. गावातल्या प्रथा, परंपरा यामध्ये कोणताही धर्म आडवा येत नाही. ते सामाजिक सलोख्याचे एक चांगले, सुंदर असे प्रतीक असते. त्र्यंबकेश्वरच्या स्थानिकांनी कधी या उरूस परंपरेतील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला विरोध केला नव्हता आणि करणार नाही, मात्र काही संधीसाधू लोकांनी तसेच सोशल मीडियावीरांनी या प्रकाराला जातीय रंग चढवून तो अधिक तापवण्याचा प्रयत्न केला, पण सुजाण नागरिकांनीच ते मिटवले ही जमेची बाजू होय. धर्मभेद करणार्‍या अशा प्रवृत्तीला सुजाण हिंदू धर्मियांनी वेळीच चाप बसवायला हवा.

–प्रा. अमर ठोंबरे

त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये मुस्लीम बांधवांनी त्यांच्या उरूसच्या अर्थात संदल उत्सवाच्या मिरवणुकीवेळी त्र्यंबकराजाच्या चरणावर प्रथा परंपरेप्रमाणे धूप दाखवून आपला श्रद्धाभाव प्रकट केला, मात्र त्यांची ही भोळीभाबडी श्रद्धा त्यांच्याच जीवावर उठली. मुस्लीम धर्माचे काही लोक आपल्या पारंपरिक प्रथेप्रमाणे देवळाच्या पायरीपाशी आले. त्यांनी धूप दाखवला म्हणून मंदिरातील पुजार्‍यांनी आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या काही संघटनांनी एकच हलकल्लोळ केला. जसे काही मंदिरावर आणि हिंदू धर्मावर आकाश कोसळले आहे, असा आव आणून त्यांनी लगेचच मंदिराची घटना समोर आणली. या घटनेतून सोयीने बनवलेले कायदेकानून समोर आले.

- Advertisement -

मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश इतर धर्मियांनी ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यायचे नाही, असा जणू दंडकच असल्याचे हे मंडळी ओरडून सांगू लागली. फक्त हिंदू धर्मियांसाठी प्रवेश असे संकुचित बोर्ड अलीकडच्या काळात काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये झळकू लागले आहेत. यातून आपण कसे दिवसेंदिवस अधिकाधिक संकुचित बनत चाललो आहोत हेच हे मंदिर प्रशासनाचे लोक दाखवून देऊ लागले आहेत. इतकेच नव्हे तर तिथे येणार्‍या भाविक हिंंदूंच्या मनात ती संकुचित भावना भरवत आहेत. त्यामुळे एकूणच हिंदू समाज संकुचित करण्याची प्रक्रिया या लोकांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही मूठभर मंडळी एकूण भाविक हिंदूंना अधिक संकुचित बनवून हिंदू धर्माचेच नुकसान करीत आहेत. त्या मुळात व्यापक असलेल्या धर्माला संकुचित करीत आहेत.

नाशिकच्या भूमीत हे असे का व्हावे, याची कारणमीमांंसा करायला गेले तर अलीकडेच कर्नाटक विधानसभेचा लागलेला निकाल हेही यापाठीमागे एक कारण असू शकेल असे वाटल्यावाचून राहत नाही. कारण ज्यांनी मुस्लिमांनी धूप दाखवण्यावरून हलकल्लोळ केला, त्यांच्या बोलण्यातून ते एका विशिष्ट राजकीय पक्षाची वकिली करीत असल्याचे दिसून येत होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण बिघडले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिंदूंची मते आपल्याकडे खेचण्यासाठी एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात येत आहे का, अशी शंका बळावू लागली आहे. कारण तशा घटना घडताना दिसत आहेत. त्र्यंबकेश्वर हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. प्रभूरामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली नाशिक ही पुण्यभूमी आहे.

- Advertisement -

अशा भूमीत हिंदू धर्माला आणि एकूणच समाजाला घातक ठरणारे पापकर्म करणार्‍यांना सकल हिंदू समाज आणि त्यातील सुधारणावादी लोक कधीच माफ करणार नाहीत. हिंदू धर्माचे आम्हीच रक्षक आहोत असा आव आणून काही संघटनांच्या लोकांनी त्र्यंबकेश्वराच्या पायर्‍यांवर जाऊन गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण केल्याचा आव आणला. मीडियासमोर चमकून घेतले, पण त्यांचे ते वर्तन सुजान हिंंदूंना अजिबात पटलेले नाही. कारण अशाच कर्मठ आणि जातीयवादी बडवे आणि पुजार्‍यांनी असाच दुजाभाव निर्माण करून हिंदू धर्माचे नुकसान केले आहे. पिढ्यान्पिढ्या आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. मंदिराच्या दानपेट्यांमध्ये सामान्य हिंदू श्रद्धेने दान अर्पण करीत असतो, पण त्याच दानावर शिरजोर झालेले हे लोक सामान्य भाविकाला आपल्या तालावर नाचवत असतात. नाशिक ही पवित्र भूमी असली तरी तिथेच हिंदू धर्माला धोक्यात आणणार्‍या घटना घडलेल्या आहेत.

नाशिकच्या काळाराम मंदिरात पूर्वाश्रमीच्या दलितांना मंदिरातील बडव्यांनी प्रवेश रोखला होता. तेव्हा त्यांना प्रवेश मिळावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. हिंदू धर्मातील अशा मूठभर लोकांमुळे धर्माचे मोठे नुकसान झाले आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात आहोत, त्यांच्यातीलच लोकांकडून आपल्याला सापत्न वागणूक दिली जात असेल, आपल्याला मंदिर प्रवेश नाकारला जात असेल तर आपण या धर्मात कशासाठी राहायचे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

यातून हिंदू धर्मात फूट पडली, पण याला जबाबदार ही दुही माजवणारी प्रवृत्ती आहे. आज भारतात जे मुस्लीम आहेत, त्यातील बहुसंख्य हे पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत हे लक्षात घ्यायला हवे. भारतातील ज्यू आणि पारशी हे धर्मीय बाहेरून आलेले आहेत. बाकीचे बिगर हिंदू लोक हे धर्मांतरित आहेत. इतर धर्मांनी आपली व्याप्ती वाढवण्यासाठी अन्य धर्मातील लोकांना आपलेसे केले आणि हिंदू धर्मातील धर्माचे मक्तेदार बाटलेल्यांना पुन्हा धर्मात घेण्याची शास्त्राज्ञा नाही, असे म्हणत त्यांना हिणवत राहिले. त्याचीच फळे आज आपल्याला भोगावी लागत आहेत.

नाशिकमध्ये अलीकडेच काळाराम मंदिरात कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे पूजेसाठी आल्या असताना वेदोक्त आणि पुराणोक्त असा वाद निर्माण झाला होता. याचा अर्थ महंत आणि पुजार्‍यांचा सुंभ जळाला तरी पीळ अजून कायम आहे असेच दिसते. खरंतर अशा प्रवृत्तीला हिंदू समाजाच्या सामूहिक शक्तीने रोखायला हवे. जनसामान्यांच्या देवाप्रति असलेल्या आस्था आणि श्रद्धेमुळे पुजारी आणि बडव्यांची पोटे भरत असतात, हे त्यांना खडसावून सांगायला हवे.

राज्यातला आणि राज्याबाहेरचा येणारा पर्यटक नाशिककडे दक्षिण काशी म्हणूनच बघत आला आहे, परंतु त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या या प्रकाराने नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासाला गालबोट लागणार नाही याची काळजी मंदिर प्रशासनाने घ्यायला हवी, जी आज त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक नागरिक घेत आहेत. मंदिराच्या आतील पुजार्‍यांना हे शहाणपण कधी येणार, हा प्रश्न आहे. ते जर कुणा राजकीय नेत्यांच्या तालावर नाचत असतील तर हिंदू समाजाचा रोष त्यांना आणि राजकीय नेत्यांना पत्करावा लागेल यात शंका नाही. कारण सुज्ञ हिंदू हा विभाजनवादी प्रवृत्तीला थारा देत नाही. मुळात संदलप्रकरणी कोणताही वाद निर्माण करण्याची मानसिकता स्थानिकांची नाही आणि ती कधी नव्हती. कारण हिंदू-मुस्लीम वादाची ठिणगी थेट अनेकांच्या व्यवसायावर पडते. जाणीवपूर्वक दंगल घडवणारी चार-दोन डोकी त्यांचं हित साधून घेतात.

त्यात काही राजकीय पक्षांचीही माणसं थेट उतरलेली असतात. जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करून नामानिराळं राहणं हे प्रकार आता लोकांच्या लक्षात आले आहेत. मशिदीवरच्या भोंगे प्रकरणातील हवा काढून घेणे हे केवळ सुजाण नागरिकच करू शकतात आणि तोच समंजस आणि सुजाणपणा काल परवा घडलेल्या प्रकाराबाबत स्थानिकांनी दाखवला. यावरूनच याला राजकीय रंग देण्यात येत आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. दंगलीचे पडसाद अतिशय खोलवर आणि दूरगामी असतात. सामान्यांचा हकनाक बळी या दंगलीत जातो. कोणतेही विकासाचे मुद्दे समोर न ठेवता एखाद्या धर्माचं हत्यार पुढे केले जाते. गेल्या काही वर्षांपासून हाच मुस्लीम समाज दंगली घडवणार्‍या राजकीय पक्षांच्या टार्गेटवर आहे, मात्र या दोन जातीय लढ्यांमध्ये हिंदूही तितकाच चिरडला जातो. मध्यंतरी संभाजी महाराज हे धर्मरक्षक की स्वराज्यरक्षक यावरून वाद पेटला. त्यालाही असाच राजकीय मुलामा देण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे करण्यात आला.

देवाला धूप देणे, आरती करणे, नैवेद्य दाखवणे हे काही फक्त हिंदू धर्मातच नाही तर अनेक धर्मांमध्ये आहे आणि मग याच धुपाचा त्रास का व्हावा? धर्माच्या नावाखाली उभ्या केलेल्या या तटबंदी अजूनही तितक्याच तीव्र आहेत. ज्योतिर्लिंग मंदिर हे आदिनाथ भगवान शंकराचे आहे आणि भगवान शंकर यांची परंपरा जर आपण बघितली तर ती भारतीय आध्यात्मिक परंपरेतील पहिली परंपरा आहे. नाथ संप्रदायाने जी माणसे भारतभर जोडली, त्याचा मुख्य आधार आणि त्या अध्यात्माचा पाया हा भगवान शिव होता. शैव आणि वैष्णव यांचा समन्वय साधून त्यांनी अफगाणिस्थानपर्यंत आपले अनुयायी निर्माण केले. या अनुयायांमध्ये मुस्लीम लोकही होते हा इतिहास आहे. कोणताही धर्म हा नाथ संप्रदायाला वावगा नव्हता आणि याच नाथ संप्रदायाचे शंकर भगवान हे मुख्य दैवत आहेत.

‘आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा’ असं त्यासाठीच म्हटलं जातं. एवढ्या थोर परंपरा जर भारतीय अध्यात्मात आहेत, तर धर्माच्या पखाली वाहणार्‍यांचा हा कंठशोष कशासाठी? त्र्यंबकेश्वर प्रकरणाची पार्श्वभूमीची पाळमुळं खरंतर संभाजीनगरच्या एका जाहीर सभेत दडली होती, मात्र दोन्ही समाजातल्या सुजाण नागरिकांमुळे मशिदीवरच्या भोंग्यांचे प्रकरण पेटले नाही. हे प्रकरण थांबते न थांबते तोच पुन्हा रामनवमीच्या मिरवणुकांच्या वेळी काही ठिकाणी तणाव निर्माण करण्यात आला. पद्धतशीरपणे धर्माच्या विखारी अस्मिता निर्माण करून हा वनवा कायम भडकत ठेवण्याचा डाव हा दिल्ली ते गल्ली सुरू आहे. हिंदू धर्म व त्याभोवती सुरू असलेले मतांचे ध्रुवीकरण हे त्यामागील मुख्य कारण आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामधले प्रकरण हा याच प्रक्रियेतला एक भाग होय.

दोन महिन्यांपूर्वी याच आदिवासीबहुल भागात एका हिंदू धर्मसंसदेने एक ठराव पारित केला की, धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींच्या सवलती बंद करण्यात याव्यात आणि या धर्मसंसदेत अनेक मान्यवरदेखील उपस्थित होते. धर्मसंसदेतले ठराव, मंदिरांमधल्या मंदिर समितीच्या घटना आणि भारतीय संविधानाने पारित केलेल्या तरतुदी यामध्ये गल्लत करून स्वतःचे नीतीनियम आणि कायदेकानून तयार करून धर्माच्या कडवेपणाला तेवत ठेवण्याचे काम महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. त्र्यंबकेश्वर घटनेप्रकरणी ज्या कुणावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्या प्रकरणाची साधी चौकशीही न करता त्या युवकांना थेट तुरुंगातच डांबून ठेवण्याचा आदेश मुंबईहून दिला जातो? हे कशाचे द्योतक आहे? कोणत्याही गावातल्या स्थानिक परंपरा या कधीही नष्ट होत नाहीत.

प्रत्येक गावामध्ये थोड्याफार प्रमाणात एक पीर दर्गा असतोच आणि त्या दर्ग्याच्या दर्शनाला काही हिंदू लोकदेखील जात असतात. त्या त्या गावाची ती संस्कृती असते. आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेरच्या पायरीशी धूप दिली जाते. तिथे ही परंपरा आहे. गावातल्या प्रथा, परंपरा यामध्ये कोणताही धर्म आडवा येत नाही. ते सामाजिक सलोख्याचं एक चांगलं, सुंदर असं प्रतीक असतं. त्र्यंबकेश्वरच्या स्थानिकांनी कधी या उरूस परंपरेतील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला विरोध केला नव्हता आणि करणारही नाही, मात्र काही संधीसाधू लोकांनी तसेच सोशल मीडियावीरांनी या प्रकाराला जातीय रंग चढवून तो अधिक तापवण्याचा प्रयत्न केला. सुजाण नागरिकांनीच ते मिटवले ही जमेची बाजू होय. संत शेख मोहम्मद बाबा, अंबर हुसेन यांचे नाव वारकरी संतांच्या मालिकेत गौरवाने घेतले जाते.

नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदू साधूसंतांना याच मुस्लिमांनी बिसलेरीच्या थंड पाण्याच्या बाटल्या वाटल्या. हनुमानाच्या मिरवणुकीवर फुले उधळली. हे कोणालाच कसे दिसले नाही? मुळात ज्या ज्या ठिकाणी मठ, मंदिरं आहेत, त्या ठिकाणची दुसरी काळी बाजू अशी असते की त्या ठिकाणी देवाच्या नावावर अवैध धंद्यांचा बेसुमार सुळसुळाट असतो, पण धर्माच्या नावावर ते दाबून टाकले जाते. लोकही सगळं माहीत असून गप्प बसतात, तर थोडक्यात प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेतच सांगायचे झाल्यास धर्मांच्या देवळाभोवती आणि देवळाभोवतीच्या धर्मात अशी सारी बजबजपुरी सुरू आहे. येणार्‍या काळात ती संपेल ही अपेक्षा आहे, पण त्यासाठी सगळ्या हिंदू धर्मियांना जागरूक राहून मूठभर कर्मठांची मक्तेदारी मोडून काढायला हवी. कारण अशा स्वयंघोषित मक्तेदारांनीच हिंदू धर्माचे मोठे नुकसान केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -