Homeफिचर्ससारांशLos Angeles Wildfire : लॉस एंजेलिसचा वणवा म्हणजे एक इशारा !

Los Angeles Wildfire : लॉस एंजेलिसचा वणवा म्हणजे एक इशारा !

Subscribe

गेल्या काही आठवड्यात लॉस एंजेलिसला एक तीव्र आणि विध्वंसक वणवा पेटला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट झाली, घरे जळली आणि हजारो रहिवाशांना आपले प्राण आणि मालमत्ता वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. कॅलिफोर्नियामध्ये ‘वणवे’ ही सामान्य घटना आणि व्यवस्थेचा नैसर्गिक भाग असली तरी आगीची तीव्रता, वारंवारता आणि प्रमाण यामुळे हवामान बदलाच्या चर्चा अधिक गंभीर होत आहेत. या आगी फक्त जागरूकतेचा इशारा नाहीत तर हे एक मोठ्या जागतिक समस्येचे ठळक उदाहरण आहे, ज्याकडे आता दुर्लक्ष करणे शक्य नाही.

-सुजाता बाबर

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पृथ्वीचे सरासरी तापमान अंदाजे १.२ अंश सेल्शियसने वाढले आहे. याला मुख्यत्वे इंधन जाळणे, जंगलतोड आणि औद्योगिकीकरण कारणीभूत आहे. या उष्णतेच्या वाढीमुळे कॅलिफोर्नियामध्ये वातावरणातील मोठ्या बदलांचे संकेत मिळाले आहेत. दीर्घ आणि तीव्र उन्हाळे, कमी पर्जन्यवृष्टी आणि दीर्घकाळ चालणारा दुष्काळ हे मुख्य संकेत आहेत. हे बदल म्हणजे जंगलातील आगींसाठी एक परिपूर्ण ठिणगी आहे.

वणव्यांच्या हंगामाच्या कालावधीचा विस्तार आता फक्त उन्हाळा नाही, तर संपूर्ण वर्षभर पसरला आहे. दरवेळी आगींनी आधीपेक्षा जास्तच विध्वंस केला आहे. नॅशनल इंटरएजन्सी फायर सेंटरच्या अहवालानुसार २०२३ हे कॅलिफोर्निया वणव्याचे अत्यंत विध्वंसक वर्ष होते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले जळून खाक झाली आणि हजारो घरांचे नुकसान झाले. या आगी फक्त भयानक नाहीत तर विध्वंसक होऊ लागल्या आहेत. जशी पृथ्वी गरम होत चालली आहे तसे जंगलातील आगींच्या तीव्रतेला मदत करणारे घटकही वाढले आहेत.

जास्त उष्णता : तापमान वाढल्यामुळे हवा अधिक कोरडी होते आणि वनस्पती अधिक ज्वलनशील झाल्या आहेत. जास्त उष्णतेमुळे झाडे, गवत आणि झुडपे कोरडी होतात आणि यामुळे आग लागणे सोपे होते आणि एकदा आग लागली की ती चटकन पसरते.

दीर्घकाळ दुष्काळ: जगातील अनेक भागांमध्ये दीर्घकाळ दुष्काळ होणे वाढले आहे. दुष्काळामुळे जमिनीला ओलावा मिळत नाही, आणि अधिक आगी लागण्याची शक्यता वाढते.

पर्जन्यवृष्टीमध्ये बदल: हवामान बदलामुळे पर्जन्यवृष्टीचे स्वरूप बदलले आहे. पर्वतांवर बर्फवृष्टी कमी होते आणि उन्हाळ्यात पाणी कमी जमा होते. यामुळे मातीतील ओलावा कमी होतो आणि दुष्काळाची स्थिती निर्माण होते आणि जास्त आगी लागतात.

वेगवान वारा: वातावरण गरम झाल्यामुळे वार्‍याचे स्वरूपही बदलले आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामधील सॅन्ता अ‍ॅना वारे लहानशा आगीला प्रचंड वणव्यात बदलू शकतात. हे वारे हवा अधिक कोरडी करतात ज्यामुळे आगी अधिक वेगाने पसरतात आणि अग्निशामक दलासाठी ती नियंत्रित करणे कठीण होते.

लॉस एंजेलिसमधील अलीकडील आगी फक्त पर्यावरणीय आपत्ती नाहीत. त्यांचा मानवी जीवनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. हजारो लोक त्यांची घरे सोडून गेले आहेत आणि काहींनी तर सर्व काही गमावले आहे. विशेषत: जंगल आणि शहरांच्या सीमारेषेवर राहणारे समुदाय मोठ्या जोखमीला सामोरे जातात. कारण त्यांची घरं अनेकदा दाट जंगलांजवळ किंवा कोरड्या गवताजवळ वसलेली असतात.

वणव्यांचा धोका असलेल्या भागातील लॉस एंजेलिसच्या रहिवाशांसाठी धोक्याची तीव्रता वाढली आहे. अगदी लहान, नैसर्गिक आगीही परिसंस्थेच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मृत लाकूड आणि कोरड्या वनस्पतींच्या संचयाकडे दुर्लक्ष केले जाते आणि यामुळे मोठ्या आणि अधिक विनाशकारी आगींना ‘इंधन’ मिळते.

याचे मानसिक आणि भावनिक परिणामदेखील प्रचंड आहेत. जे लोक आपले घर गमावतात त्यांना मानसिक दुःख आणि शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. आगी सर्वसाधारणपणे गरीब आणि अल्पसंख्याक समुदायांवर जास्त परिणाम करतात. या लोकांकडे आपत्कालीन परिस्थितीत पळून जाण्याची किंवा पुनर्बांधणीची संसाधने नसतात. संरचनात्मक नुकसान, शाळा आणि व्यवसायांचे विध्वंस यामुळे पुनर्निर्माण प्रक्रिया अधिक कठीण होते. हवामान बदलाचा परिणाम फक्त पर्यावरणावर नाही, तर समाजावर आणि अर्थव्यवस्थेवरही होतो.

मानवी जीवितहानीसोबतच जंगलातील आगींचे आर्थिक परिणामसुद्धा गंभीर असतात. आगी विझवण्यासाठी होणारा खर्च, घरांचा पुनर्बांधणी खर्च आणि बाधित समुदायांना मदत पुरवण्यासाठी लागणारे साधनस्रोत प्रचंड असतात. एकट्या कॅलिफोर्नियामध्येच जंगलातील आगींचा आर्थिक बोजा अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. कॅलिफोर्नियाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या पर्यटन आणि कृषी क्षेत्रावरही या आगींमुळे झालेल्या नुकसानीचा गंभीर परिणाम होतो.

लॉस एंजेलिसमधील आगी जरी स्थानिक असल्या तरी त्या एक जागतिक घटनाचक्राचा भाग आहेत. ऑस्ट्रेलिया ते अ‍ॅमेझॉनपर्यंत जगभरात आगींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आणि आता हे संशोधनाने सिद्ध झाले आहे की याचे मुख्य कारण हवामान बदल आहे. जंगल आणि वनस्पती जळल्यामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. यामुळे हवामान बदल आणखी तीव्र होतो. याशिवाय या आगींमुळे जैवविविधतेलादेखील धोका पोहोचतो. आगीमध्ये प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याची शक्यता असते.

या आगींचा परिणाम प्रत्यक्षात फक्त त्याच भागात नाही तर जागतिक पातळीवर होतो. कॅलिफोर्नियामधून उठणारा धूर न्यूयॉर्कपर्यंत पोहोचतो आणि तिथल्या वायूची गुणवत्ता कमी करतो. वणव्यांच्या धुरामुळे श्वसन समस्यांपासून हृदयविकार आणि अकाली मृत्यू होण्याचे प्रकार समोर आले आहेत. ज्यांना अस्थमा किंवा इतर फुफ्फुसाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी हे परिणाम अधिक गंभीर असू शकतात.

जसजसे हवामानबदल तीव्रतेने वाढत आहेत तसतसे लॉस एंजेलिसमधील आगी हे एक विशेष लक्ष देण्याचा मुद्दा आहे. शासन, उद्योग आणि नागरिकांना हवामान बदलाशी लढण्यासाठी सामूहिकपणे कार्य करावे लागेल. युद्धपातळीवर कृती करणे आवश्यक आहे. हा फक्त अमेरिकेचा मुद्दा नाही तर जगाचा, आपल्या भारतासाठीदेखील गंभीर विषय आहे.

हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे. यासाठी अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे, ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे, आणि परिवहन आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्सर्जन कमी करणारी धोरणे आणणे आवश्यक आहे. जंगलातील आगींसाठी तयार असलेल्या समुदायांनी आगविरोधी संरचना तयार केल्या पाहिजेत. यात आगविरोधी बांधकाम सामुग्री आणि अधिक चांगल्या शहरी नियोजनाची आवश्यकता आहे. घरांभोवती संरक्षणक्षम जागा तयार करणे, तसेच अधिक प्रभावी अग्निशामक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.

नियंत्रित आगी आणि सुकलेल्या झाडांची छाटणी यांसारख्या सक्रिय वन व्यवस्थापन धोरणांद्वारे वणव्यासाठी उपलब्ध असलेल्या इंधनाच्या प्रमाणात घट करता येते. या उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणात आगी रोखण्यास मदत होतेच, शिवाय जीवनचक्राचा नैसर्गिक भाग म्हणून आगीवर अवलंबून असलेल्या परिसंस्था पुनर्संचयित होण्यासही मदत होते.

हवामान बदल ही एक जागतिक समस्या आहे जी आंतरराष्ट्रीय सहकार्याने सोडवली जाऊ शकते. पॅरिस हवामान करारांसारख्या करारांची अंमलबजावणी करणे आणि शाश्वत पद्धतींमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामुळे पृथ्वीच्या भवितव्याचे रक्षण करता येईल.

जंगलातील आगीच्या धोक्याला सामोरे जाणा-या भागांतील रहिवाशांनी योग्य तयारी केली पाहिजे. यामध्ये स्थलांतर योजना तयार करणे, आगीच्या धोक्यांची माहिती ठेवणे आणि इंधनाचा साठा कमी करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांमध्ये सहभाग घेणे असे प्रयत्न केले जाऊ शकतात. आग सुरक्षा आणि आपत्कालीन साधनसंपत्तीबाबत जागरूकता वाढवली तर अनेक जीव वाचवता येतील.

लॉस एंजेलिसमधील अलीकडील वणव्यांनी सिद्ध केलंय की हवामान बदलाचे परिणाम फक्त सैद्धांतिक नाहीत तर ते तीव्र रूपामध्ये घडताना दिसत आहेत आणि लाखो लोकांवर परिणाम करत आहेत. यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. या प्रयत्नांमध्ये शाश्वतता, जास्त टिकाऊपणा(लवचिकता) आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वीचे आरोग्य ही प्राधान्ये असतील. वनवणव्याचा धूर नाकातोंडात केंव्हाच गेला आहे, पुढील आगीच्या हंगामाच्या आगमनापूर्वी युद्धपातळीवर कृती करण्याची वेळ आता आहे.