-हेमंत भोसले
भारताची ओळख ही धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांनी समृद्ध आहे. यामधला एक ठळक आणि जागतिक प्रसिद्धी मिळवणारा सोहळा म्हणजे कुंभमेळा. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधल्या भव्य दिव्य कुंभमेळ्याने डोळ्यांचं पारणं फेडलं आहे. धार्मिक विधी, साधुसंतांचे सत्संग, वादसंमेलन, गंगास्नान आणि आध्यात्मिक साधनेसाठी जगभरातून लोकांनी या मेळ्यात लावलेली हजेरी यामुळे हा कुंभमेळा विशेष लक्षवेधी ठरलाय.
या कुंभमेळ्यात हात वर करून जगणारे महंत दिसतात तर कुठं काट्यांनाच बिछाना केलेले साधू… अनेकांना ही साधना म्हणजे विक्षिप्तपणा वाटू शकतो. या मंडळींची थट्टाही सोशल मीडियावर जोरदारपणे होतेय. खरंतर, कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुणाला अंधश्रद्धा आणि थोतांड यावर चिकित्सा करायची असल्यास ती निश्चितपणे करावी.
पण ती उथळ नसावी तर तिला तथ्यांचा आधार असावा. ती केवळ प्रसिद्धीसाठी नसावी तर लोकांच्या ज्ञानात भर टाकणारी असावी. हे करताना परदेशातल्या धार्मिक सणांकडेही डोळसपणे पाहिलं पाहिजे. तिथंही धर्म, शास्त्र, विज्ञान यांची चिरफाड होते. पण त्यात साधनशुचिता जपली जाते. आपल्याच राष्ट्रातल्या बहुसंख्यांच्या धर्माला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं जात नाही.
धर्मातल्या उणिवा सांगितल्या जातात; पण धर्मच भ्रष्ट आहे असं कधी म्हटलं जात नाही. या भ्रष्टतेचं प्रदर्शन मांडण्यासाठीच काही अर्धवट भेजाचे युट्यूबर्स साधूंना विदूषकाच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच काही साधूंनी युट्यूबर्सला अक्षरश: चोप दिल्याचेही दृश्य व्हायरल झाले आहे. हे पहिल्यांदाच झालं असं नाही. तर गेल्या दीड दशकापासून या धार्मिक समारंभाला वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या उदयानंतर कुंभमेळा हा काही लोकांसाठी केवळ ‘करमणूक’ बनलाय.
या मेळ्यात साधू, साधना, धर्म, अध्यात्म तसंच करोडोंच्या गर्दीचं व्यवस्थापन करणारं प्रशासन आणि जगभरातून होणारी संशोधनं यावर चर्चा होणं क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात ‘आयआयटी बाबा’ अभयसिंह आणि घार्या डोळ्यांची मोनालिसा ही दोनच नावं सध्या सोशल मीडियावर वादळी चर्चेत आहेत. यामध्ये अभयसिंह हा आयआयटी पास होऊन परदेशात तीन लाख रुपये महिन्याची नोकरी करणारा तरुण होता.
पण अध्यात्माने त्याला इतकं झपाटलं की, तो विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत साधू समाजाकडे झुकला. अर्थात तो साधू आहे की नाही याबद्दल संशय आहे. साधुसंतांचं जग नेहमीच रहस्यमय आणि आकर्षक मानलं गेलं आहे. त्यामुळेच, जेव्हा एखाद्या आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थेतील विद्यार्थी संन्यासाचा मार्ग निवडतो, तेव्हा तो समाजासाठी कुतूहलाचा विषय बनतो. मीडिया या कुतूहलाचा फायदा घेत आयआयटी बाबा सारख्या उपाध्या देत अशा व्यक्तींना ‘विचित्र’ साधू म्हणून पेश करतात.
अभयसिंहनं स्वत:च आपल्या पूर्वायुष्याविषयी जाहीरपणे बोलायला सुरुवात केलीय. पण याचा फायदा घेत मीडियाने त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक घटनेला सनसनाटी बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या भूतकाळातल्या प्रेयसीबद्दल बोलणं, त्यांच्या करियरविषयीच्या तपशीलांना सनसनाटी बनवणं आणि त्याच्या भगव्या वस्त्रांमागे कोणता ‘गुप्त’ हेतू आहे हे शोधण्याचा खेळ सुरू आहे.
शिक्षण, करियर, प्रेयसी आणि आयुष्याच्या इतर गोष्टी उघड करताना त्याच्या आयुष्यातली प्रायव्हसीची चौकट पूर्णत: गमावली गेलीय. एका उच्चशिक्षित व्यक्तीने संन्यासाचा मार्ग का निवडलाय, याची कारणमीमांसा करणं आवश्यक आहेच. पण भगवे वस्त्र घालणं आणि आयआयटीचं शिक्षण मिळवणं, यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न चुकीचाच आहे.
अध्यात्माला शिक्षणाचा आधार घेऊन न पाहता, तो एक अंतर्मनाचा शोध आहे, हे विसरलं जातंय हेच दुर्दैव. खरं तर, अभयसिंहसारख्यांना माध्यमं ‘सेलिब्रिटी साधू’ बनवतात. पण यामुळे साधुत्व ही आध्यात्मिक प्रक्रिया राहात नाही, ती केवळ मजकूर आणि आकर्षणाचं साधन बनते. साधुत्वाच्या मूळ संकल्पनेवर अधिक विचार होण्याऐवजी, अशा व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यावरच चर्चा होऊन अध्यात्माकडे दुर्लक्ष होतं.
परंपरेनुसार, साधू हा मूळ, कुळ आणि भूतकाळ यांचा त्याग करतो. त्याच्या अस्तित्वाचा फोकस ‘वर्तमान साधनेवर’ असतो. पण अभयसिंहचं मी आयआयटीयन होतो, किंवा माझ्या प्रेयसीने मला संन्यास घ्यायला शिकवलं, असं विधान साधुत्वाच्या संकल्पनेला आव्हान देणारं ठरतं. साधना आणि तपश्चर्या या साधू समाजाचा मुख्य आधार असतो. पण अभयसिंहचा प्रवास पाहता, त्यात साधनेपेक्षा प्रसिद्धी आणि चर्चेचा प्रभाव जास्त जाणवतो.
शिवाय तो मानसिक आजारातून जातोय हे स्पष्टपणे जाणवतंय. खरं तर माध्यमं ही समाजातली तटस्थ मार्गदर्शक असावीत. पण सध्या सोशल मीडिया केवळ व्ह्यूज, लाईक्स, रेटिंग्स आणि आकर्षक कथांवर लक्ष केंद्रित करतंय. अभयसिंहला नायक बनवताना, त्याच्या आयुष्याचे असे पैलू उघड केले जातायत, जे खरं तर वैयक्तिक पातळीवर मर्यादित राहायला हवे होते.
भगव्या वस्त्रांना केवळ चर्चेचा विषय बनवणं आणि त्यामागची धार्मिक साधना दुर्लक्षित करणं हा अध्यात्माचा अपमानच आहे. साधू समाज हा आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवणारा घटक आहे. अशा परिस्थितीत, माध्यमं फक्त सनसनाटी साधूंवर लक्ष केंद्रित करून खर्या साधूंना दुर्लक्षित करत आहेत. म्हणूनच माध्यमांनी अशा विषयांवर सनसनाटी बातम्या तयार करण्याऐवजी, साधुत्व, अध्यात्म आणि समाजासाठी खर्या अर्थाने प्रेरणादायक गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक आहे.
दुसरीकडे, मण्यांची माळ विकणारी आणि सौंदर्यामुळे ओळखली जाणारी घार्या डोळ्यांची मोनालिसा ही कुंभमेळ्यातल्या एका वेगळ्याच वादळाचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिच्या डोळ्यांचा रंग, तिच्या साधेपणाची चमक आणि तिच्या भोवती उभी राहिलेली गर्दी… या सगळ्या गोष्टींनी तिला कुंभमेळ्यातला एक चर्चेचा विषय बनवलं आहे. पण या सगळ्यात तिच्या कलेचा, तिच्या कौशल्याचा आणि तिच्या व्यवसायाचा विचार कुठं आहे? मण्यांची माळ विकणं हे तिचं कौशल्य आहे.
तिच्या हातातल्या माळा म्हणजे तिच्या मेहनतीचं फळ आहे. पण लोक तिच्या माळा न पाहता तिच्या डोळ्यांत हरवून गेले आहेत. तिच्या डोळ्यांपलीकडे पाहायला हवं. तिच्या आयुष्याच्या संघर्षाची, मेहनतीची आणि तिच्या व्यवसायाची कहाणी जास्त महत्त्वाची आहे. मात्र ते न करता मोनालिसाच्या वैयक्तिक आयुष्यावर लोकांच्या ‘अनधिकृत नजरा’ आहेत.
सोशल मीडियाचा प्रभाव इतका मोठा की, तिच्या साध्या आयुष्याला एका उथळ वादळात बदलून टाकलं आहे. ही गोष्ट केवळ तिच्या माळा विकण्याच्या व्यवसायासाठी हानिकारक नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यालाही धक्का देणारी आहे. कोणत्याही व्यक्तीला तिच्या परवानगीशिवाय त्रास देणं, फोटो काढणं आणि तिच्या आयुष्याबद्दल सार्वजनिक चर्चा करणं हा नैतिकतेचा भंग आहे.
सोशल मीडियावर मोनालिसाच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी तिला रातोरात सेलिब्रिटी बनवलं. पण गरीबाने सेलिब्रिटी होणं हे कधी कधी शाप ठरतं. विशेषत: अशा व्यक्तीसाठी जी सेलिब्रिटी होण्याच्या मार्गावर नाही. तिच्या भोवती गर्दी जमा होणं, लोकांनी तिच्यावर कॅमेर्याचा मारा करणं आणि तिच्या वैयक्तिक जागेत अतिक्रमण करणं हे केवळ अनैतिक नाही, तर तिच्या सुरक्षेसाठीही धोकादायक आहे. अशा परिस्थितीत तिच्या मानसिक आणि शारीरिक सुरक्षेचा विचार करणं आवश्यक आहे.
सौंदर्याचा अतिरेक करून जेव्हा ते व्यक्तिमत्त्वावर ओझं बनतं, तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या नेहमीच्या आयुष्यापासून दूर नेतं. मोनालिसासारख्या साध्या स्त्रीसाठी ही प्रसिद्धी ओझं ठरण्याची शक्यता जास्त आहे. तिचं सौंदर्य तिच्या व्यवसायाच्या मार्गात अडसर ठरू शकतं. कारण लोक तिच्या कलेऐवजी तिच्या दिसण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.
सोशल मीडियावर अचानक प्रसिद्ध होणं ही आजच्या काळाची सगळ्यात अनिश्चित गोष्ट आहे. अनेक वेळा, अशी प्रसिद्धी क्षणभंगुर ठरते.
२०१६ मध्ये पाकिस्तानमधल्या चहा विकणारा अरशद खान एका छायाचित्रामुळे रातोरात स्टार बनला. त्याच्या निळ्या डोळ्यांनी आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने त्याला आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग क्षेत्रात घेऊन गेलं. पण, प्रसिद्धी टिकली नाही. अरशद खानची ओळख हळूहळू मिटली. आज तो पुन्हा त्याच्या जुन्या साध्या आयुष्यात परतलाय. भारताची रानू मोंडलदेखील एका गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या आवाजाने तिला स्टार बनवलं. पण, तिच्या वर्तनावरून उठलेल्या वादांनी आणि सोशल मीडियावरच्या उथळ चर्चांनी तिचं करियर पुन्हा अंधारात टाकलं.
तिच्या अचानक आलेल्या प्रसिद्धीने तिला जितका फायदा झाला, तितकंच नुकसानही झालं. तसंच मोनालिसाचं भविष्य काय असेल? सोशल मीडियावर लोकांचं लक्ष हलकंफुलकं असतं. कोणतीही व्यक्ती कालच्या चर्चेचा विषय असते, तर आज ती विसरली जाते. मोनालिसासाठीही ही प्रसिद्धी तात्पुरतीच ठरणार आहे. लोक नवीन विषयांच्या शोधात जातील आणि मोनालिसाला विसरून जातील. पण तिच्या आयुष्यावर पडलेला हा प्रसिद्धीचा ताण कितपत सकारात्मक असेल, हे सांगता येत नाही. म्हणून, सौंदर्याच्या या आकर्षणाला बाजूला ठेवून तिच्या आयुष्याचा आदर करायला हवा.