घरफिचर्ससारांशचंद्र होतोय छोटा!

चंद्र होतोय छोटा!

Subscribe

लहानपणापासून चंद्र आपल्या आयुष्याचा भाग झालेला असतो. रात्रीच्या आकाशात पौर्णिमेचा सुंदर वाटोळा चंद्र दाखवत आजी किंवा आई प्रेमाने घास भरवत असे. ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ अशी गाणी ऐकत आम्ही मोठे झालोय. तरुण प्रेमाने प्रेयसीला ‘चांदसा मुखड़ा’ म्हणून खूश करत, परंतु हा सुंदर चंद्र आता हळूहळू आकसत चालला आहे. हो, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. सध्याच्या त्याच्या बदललेल्या आकाराने मात्र आपल्याला म्हणजे सामान्यांना फारसा फरक पडत नाही, परंतु चंद्रावरील भावी मोहिमांच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या बदलत्या आकाराचे संशोधन महत्त्वाचे असेल.

– सुजाता बाबर

पृथ्वीच्या चंद्राचा परिघ 150 फुटांपेक्षा जास्त कमी झाला. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या कोट्यवधी वर्षांत त्याचा गाभा हळूहळू थंड होत गेला. द्राक्षं सुकत ठेवली की हळूहळू सुरकुत्या पडून त्याचे किसमिस किंवा बेदाणे होतात तसेच चंद्रही आकुंचन पावताना त्यावर सुरकुत्या निर्माण झाल्यात. द्राक्षाची साल नाजूक व लवचीक असते, परंतु चंद्राचा पृष्ठभाग ठिसूळ असतो. संकोच पावताना त्याच्या कवचाचे भाग एकमेकांना ढकलतात आणि त्या जागेवर तडे जातात आणि मोठ्या भेगा (फॉल्ट्स) पडतात. यामुळे चंद्राच्या आकारावर फरक पडतो आणि तो कमी कमी होत जातो.

- Advertisement -

शास्त्रज्ञांच्या चमूने पुरावे शोधून काढलेत की चंद्राच्या सततच्या आकुंचित होण्याने दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पृष्ठभागावर लक्षणीयरीत्या वाकडा झाला. नासाने आर्टेमिस III या मानवी मोहिमेच्या लँडिंगसाठी याच्याच आसपासचे ठिकाण निवडले. चंद्राच्या आकुंचित होण्याने निर्माण तड्यांमुळे अनेकदा चंद्रकंप होतात. असे फॉल्ट झोन किंवा त्याच्या जवळच्या जागा भविष्यातील मानवी शोध प्रयत्नांना धोका निर्माण करू शकतात.

हे संशोधन ‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात असलेल्या भेगांचा समूह 50 वर्षांपूर्वी अपोलो भूकंपमापकांनी नोंदवलेल्या शक्तिशाली चंद्रकंपांपैकी एक असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांना आढळले की काही भागात विशेषत: भूकंपाच्या धक्क्यांमुळे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. उथळ चंद्रकंप दक्षिण ध्रुवीय प्रदेशात जोरदार भूकंप निर्माण करतात. सध्या निर्माण झालेल्या भेगा किंवा नवीन थ्रस्ट फॉल्ट्सच्या निर्मितीमुळे अजून उथळ चंद्रकंप होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागावर नव्याने निर्माण झालेल्या भेगांचे प्रदेश कुठे आणि किती तीव्र आहेत, त्यांची सक्रिय राहण्याची क्षमता, चालू जागतिक आकुंचनातून नवीन भेगांचे प्रदेश तयार करण्याची क्षमता यांना संभाव्य चंद्रावरील स्थायी चौक्यांचे स्थान आणि स्थिरता यांचे नियोजन करताना विचारात घेतले पाहिजे.

चंद्राच्या पृष्ठभागाजवळ कवचाच्या अगदी शंभर किंवा त्याहून अधिक मैल खोलवर उथळ चंद्रकंप होतात. भूकंपांप्रमाणेच उथळ चंद्रकंपांमुळे चंद्रावर बांधलेल्या मानवी रचना, उपकरणे आणि इतर मानवनिर्मित संरचनेचे नुकसान होऊ शकते. पृथ्वीवरील भूकंप काही सेकंद वा मिनिटांचे असतात. याच्या विपरीत उथळ चंद्रकंप काही तास आणि अगदी संपूर्ण दुपारभर टितात. 1970च्या दशकात अपोलो पॅसिव्ह सिस्मिक नेटवर्कने 5 तीव्रतेचा चंद्रकंप नोंदवला आहे. लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटरने अलीकडेच शोधलेल्या भेगांचा समूह चंद्रकंपांमुळे झाला असावा असा अंदाज आहे. उथळ चंद्रकंप चंद्रावरील काल्पनिक मानवी वसाहती उद्ध्वस्त करू शकतात.

चंद्राचा पृष्ठभाग कोरडा, खडबडीत, धुळीने माखलेला आहे. कोट्यवधी वर्षांपासून पृष्ठभागावर लघुग्रह व धूमकेतूंचा आघात झाला. परिणामी या प्रभावांमुळे सतत टोकदार तुकडे पृष्ठभागावरून बाहेर पडत आहेत. पुन्हा तयार झालेला पृष्ठभाग सूक्ष्म आकारापासून मोठ्या आकाराच्या सामुग्रीतून बनतो, परंतु ही सर्व सामुग्री अतिशय सैलपणे एकत्रित होते. या सैल गाळामुळे कंप आणि भूस्खलन होण्याची शक्यता वाढते.

यामुळे चंद्राच्या कोणत्या भागात चंद्रकंप अधिक होतात, अशा जागा शोधण्यासाठी शास्त्रज्ञ काम करीत आहेत. यामधून मानवी शोधासाठी धोकादायक ठरू शकतील अशी आणखी ठिकाणे ओळखण्याची आशा आहे. चंद्रावर मानवी किंवा रोबोटिक मोहिमांची संख्या हळूहळू वाढेल. नासा वर्षाखेरीस मानवी आर्टेमिस मोहीम पाठवणार आहे. यातून प्रथमच महिला अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहे. अशा मोहिमांमधून चंद्रावर दीर्घकालीन उपस्थिती प्रस्थापित करण्याची व अखेरीस चंद्र-आधारित वेधशाळा, स्थानके आणि वस्त्यांमधून दुसर्‍या जगावर राहणे, कार्य करणे शिकण्याची आशा आहे. जसजसे आर्टेमिस मिशनच्या प्रक्षेपण तारखा जवळ येत आहेत तसे अंतराळवीर, उपकरणे व पायाभूत सुविधा शक्य तितक्या सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे चंद्रकंपांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतील किंवा अंतराळवीरांना खरोखर धोकादायक झोनपासून संरक्षण देतील अशा अभियांत्रिकी रचना निर्माणासाठी मदतच होत आहे.

आपल्या सूर्यमालेतील वयोमानानुसार आकुंचित होत जाणारी वस्तू म्हणजे एकमेव चंद्र नाही. बुधावरही अशा प्रचंड भेगा पडल्या आहेत. त्या सुमारे एक हजार किलोमीटर लांब व तीन किलोमीटरपेक्षा जास्त खोल आहेत. चंद्रावरील पडलेल्या भेगांच्या आकाराच्या तुलनेत त्या मोठ्या आहेत. याचा अर्थ असा की बुध ग्रह चंद्राच्या तुलनेत जास्त आकसला आहे. खडकाळ पृष्ठभाग जेव्हा तापतो तेव्हा तो थंड होताना आकुंचन पावतो. बुधावरील मोठ्या भेगा सांगतात की, त्याच्या निर्मितीनंतर तो पूर्णपणे वितळला जाण्याइतपत गरम होता. चंद्राच्या उत्पत्तीविषयी पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करणार्‍या शास्त्रज्ञांना वाटते की चंद्राबाबतही असेच घडले असेल किंवा तो फक्त अर्धवट वितळला असेल, कदाचित हळूहळू गरम होणार्‍या त्याच्या खोल गाभ्यात मॅग्मा महासागर असेल.

चंद्र म्हणजे आपल्याला सर्वात जवळची अवकाशीय वस्तू! आपला एकमेव उपग्रह! चंद्र व आपल्यात सरासरी 3,84,400 किलोमीटर अंतर आहे. त्याचा व्यास 3474 किलोमीटर आहे. चंद्राच्या व पृथ्वीच्या विशिष्ट परिभ्रमण गतींमुळे चंद्राच्या सुंदर कला दिसतात. चंद्र पृथ्वीसाठी महत्त्वाचा आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण आपल्या पृथ्वीला स्थिर करून भरतीची शक्ती तयार करते. जोपर्यंत चंद्र त्याचे वस्तुमान कायम राखेल तोपर्यंत त्याच्या अर्ध्या आकारापर्यंत आकुंचित झाला तरी फरक पडणार नाही, परंतु आकार बदलताना चंद्राचे वस्तुमानही कमी झाले तर अनेक मनोरंजक गोष्टी घडतील. वस्तुमान कमी झाल्यामुळे पृथ्वी व चंद्राचा बॅरीसेंटर बदलेल. तो पृथ्वीच्या जवळ येईल. चंद्राची कक्षाही लंबवर्तुळाकार होईल. खग्रास स्थिती दिसणार नाही. त्याच्या बदललेल्या आकाराने आपल्याला फारसा फरक पडत नाही, परंतु चंद्रावरील भावी मोहिमांच्या सुरक्षेसाठी त्याच्या बदलत्या आकाराचे संशोधन महत्त्वाचे असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -