तू ही तू, तू ही तू सतरंगी रे…

भारतात ‘दिल से’ हा चित्रपट लोकप्रिय झालाच, त्याचबरोबर इंग्लड, अमेरिका, जपानमध्येही चित्रपटाने उल्लेखनीय कमाई केली. त्यावर्षी इंग्लडमध्ये विक्रमी कमाई करणार्‍या सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या निमित्ताने गुलजार आणि ए.आर. रहमान पहिल्यांदा एकत्र आले. वर म्हटल्याप्रमाणे यातली सर्वच गाणी सरस आहेत. प्रत्येक गाण्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल इतकी ती वैशिष्ठ्यपूर्ण नि हटके झालेली आहेत. या भागात आपण ‘सतरंगी रे...’ या गाण्याचा आस्वाद घेऊ या...

मणी रत्नम, शेखर कपूर आणि राम गोपाल वर्मानिर्मित आणि मणी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से…’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आसाम राज्यातल्या परिस्थितीची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटांत शाहरूख खान, मनीषा कोईराला, प्रीती झिंटा, रघुवीर यादव, पियुष मिश्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. तीग्मांशू धुलिया व मणी रत्नम यांच्या लेखणीतून साकार झालेला हा एक ‘समांतर सिनेमा’ म्हणता येईल. मणी रत्नमच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतली रोजा (१९९२) आणि बॉम्बे (१९९५) नंतरची ही तिसरी कलाकृती. संतोष सिवन यांचं उत्कृष्ट छायाचित्रण असलेल्या ‘दिल से…’ ला ए. आर. रहमान यांचं संगीत असून गाणी अर्थातच गुलजार यांनी लिहिलीयत. चल छय्या छय्या… (सुखविंदर सिंह, सपना अवस्थी), दिल से रे… (ए.आर. रहमान, अनुराधा श्रीराम, अनुपमा, फेबी मणी), सतरंगी रे… (कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम), ए अजनबी, तू भी कभी आवाज दे… ( महालक्ष्मी अय्यर, उदित नारायण), जिया जले जान जले… ( लता मंगेशकर, एम. जी. श्रीकुमार व सहगायक ) ही यातली सारीच गाणी श्रवणीय असून त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती.

विशेषतः धावत्या रेल्वेगाडीवर शाहरुख- मलायका अरोरावर चित्रित झालेलं ‘छय्या छय्या…’ खूप गाजलं होतं. शिवाय या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी ए.आर. रहमानकडे पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मूळ हिंदी भाषेतला हा चित्रपट तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषेत डब्ड करण्यात आला. लतादीदींच्या ‘जिया जले’ या गाण्यात मधे-मधे मल्याळम भाषेतल्या ओळी पेरल्या आहेत. हे याचं अजून एक वेगळेपण. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय तर सहा फिल्म फेअर पुरस्कार लाभले. हा चित्रपट Era New Horizons Film Festival आणि Helsinki International Film Festival मध्ये दाखवण्यात आला. इंग्लड, अमेरिकेसोबतच जपानमध्येही चित्रपटाने उल्लेखनीय कमाई केली. त्यावर्षी इंग्लडमध्ये विक्रमी कमाई करणार्‍या सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या निमित्ताने गुलजार आणि ए.आर. रहमान पहिल्यांदा एकत्र आले. वर म्हटल्याप्रमाणे यातली सर्वच गाणी सरस आहेत. प्रत्येक गाण्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल इतकी ती वैशिष्ठ्यपूर्ण नि हटके झालेली आहेत. या भागात आपण ‘सतरंगी रे…’ या गाण्याचा आस्वाद घेऊ या…

तू ही तू, तू ही तू सतरंगी रे हे ए
तू ही तू, तू ही तू मनरंगी रे…

दिल का साया हमसाया, सतरंगी रे, मनरंगी रे
कोई नूर है तू, क्यो दूर है तू
जब पास है तू, एहसास है तू
कोई ख्याब है या परछाई है, सतरंगी रे, मनरंगी रे
इसबार बता, मुंहजोर हवा, ठहरेगी कहां

इश्क पर जोर नही है ये वो आतिश गालिब
जो लगाये न लगे और बुझाए न बुझे…

आंखो ने कुछ ऐसा छुहा, हल्का हल्का उन्स हुआ
हल्का हल्का उन्स हुआ, दिल को महसूस हुआ
तू ही तू, तू ही तू, जीने की सारी खुशबू
तू ही तू, तू ही तू, आरजू, आरजू
तेरी जिस्म की आंच को छूते ही, मेरी सांस सुलगने लगते है
मुझे इश्क दिलासे देता है, मेरे दर्द बिलखने लगते है
तू ही तू, तू ही तू, जीने की सारी खुशबू
तू ही तू, तू ही तू, जीने की सारी खुशबू
तू ही तू, तू ही तू, आरजू, आरजू
छूती है मुझे शरगोशीसे, आंखो में घुली खामोशी से
मै फर्श पे सजदे करता हू, कुछ होश मै, कुछ बेहोशी से
दिल का साया हमसाया…

तेरी राहों मे उलझा- उलझा हू, तेरी राहों मे उलझा -उलझा हू
तेरी बाहों मे उलझा- उलझा, सुलझाने दे होश मुझे, तेरी चाहों मे उलझा हू
मेरा जीना जूनून, मेरा मरना जूनून, अब इस के सिवा नही कोई सुकून
मेरा जीना जूनून, मेरा मरना जूनून

तू ही तू, तू ही तू, सतरंगी रे हे ए , मनरंगी रे…
इश्क पर जोर नही, है ये वो आतिश गालिब
जो लगाये न लगे और बुझाए न बुझे…

मुझे मौत के गोद में सोने दे, तेरी रूह में जिस्म डूबोने दे
सतरंगी रे हे ए .. मनरंगी रे हे ए …

अनेक अंगांनी हे गाणं खूप वैशिष्ठ्यपूर्ण नि विलक्षण आहे. यातले शब्द अतिशय उत्कट आणि हृदयाला थेट भिडणारे आहेत. प्रेमातली असोशी, ओढ, विरह, बेचैनी, अनुराग, समर्पण, निष्ठा आणि भक्ती ह्या भावनांची जोरकस आणि काहीशी आक्रमक अभिव्यक्ती गुलजारने केलेली आहे. गाण्याच्या आशयाला अनुरूप संगीतसाज आणि सोनू निगम-कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातला गोडवा मंत्रमुग्ध करणारा आहे. पडद्यावर शाहरुख आणि मनीषा कोईराला यांनी आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. गाण्याचं चित्रीकरण देखील नजरेत भरणारे आहे. गाण्यातल्या ‘मुंहजोर हवा, ठहरेगी कहा’ या शब्दांच्यावेळी वाहत्या हवेचा प्रवाह दाखवण्यात आलाय. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले शाहरुख व मनीषा प्रेमाचा लाल रंग आणखीनच गडद नि गहिरा करण्याचा प्रयत्न करताहेत, असं वाटून जातं. गुलजारने ‘इश्क पर जोर नही’ हा गालिबचा शेर वापरून गाण्याला त्रिमितीची खोली प्राप्त करून दिली आहे.

नयनाच्या शराने प्रीती हृदयात घर करते, ही एक सर्वसामान्य अभिव्यक्ती. मात्र इथं गुलजारने ‘उन्स’ या शब्दाचा प्रयोग करून या अभिव्यक्तीला मोहक सौदर्य मिळवून दिलंय ! प्रेम म्हणजेच भक्ती (इबादत) या भावनेने गुलजारने सहचराला वंदन केलेलं आहे. हे वंदन काहीसं भानावर राहून तर थोडंसं बेभान होऊन म्हणजे वेडे होऊन केलेली प्रेमाची भक्ती म्हटली पाहिजे. या गाण्यातून गुलजार एका तत्वचिंतकाच्या भूमिकेत श्रोत्यांना भेटतात. आपल्या शरीराला आत्म्यात विलीन करणं म्हणजेच प्रेम, असा संदेश त्यांनी दिला आहे. भारताचा मोझार्ट समजला जाणार्‍या संगीतकार ए. आर. रहेमानने गुलजारच्या शब्दांना पुरेपूर न्याय देणारं संगीत दिलं आहे.

–प्रवीण घोडेस्वार