Homeफिचर्ससारांशयमुनेतील नव्या कालियाचे मर्दन व्हावे!

यमुनेतील नव्या कालियाचे मर्दन व्हावे!

Subscribe

ताजेवालापासून इटावापर्यंतच्या यमुनेच्या क्षेत्रात दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा ही मोठमोठी शहरे पडतात आणि हीच शहरे यमुनेला अभिशाप ठरली आहेत. दिल्ली शहराने तर यमुनेचे जगणे असह्य करून सोडले आहे. देशाच्या सांडपाणी प्रक्रियेवरील होणार्‍या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च केवळ दिल्लीवर केला जातो, तरीसुद्धा यमुनेची स्थिती दिवसागणिक जर्जर होत चालली आहे. प्रचंड निधी खर्च होऊनही त्याचा परिणाम मात्र शून्य आहे. त्यामुळे ही प्रक्रिया योग्य दिशेने होत आहे की नाही हे तपासून पाहायची निकड निर्माण झाली आहे. आजपर्यंत ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्या सर्व आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असाच काहीसा प्रकार असल्यामुळे यमुनेची स्थिती गंभीर आणि अतिगंभीर झाली आहे.

-संजीव आहिरे

मागील लेखात गंगा नदीच्या सांस्कृतिक, आध्यत्मिक आणि प्रदूषणाच्या स्थितीचा उहापोह आपण केला. गंगा आणि यमुना या भारतीय संस्कृतीला जन्म देणार्‍या नद्या आहेत. श्रीरामांनी गंगेच्या हरित मैदानावर निवास करून भारतीय संस्कृतीची पायाभरणी केली, तर भगवान श्रीकृष्णांनी यमुनेच्या पवित्र पावन तीरांना आपले कार्यक्षेत्र बनवले. मथुरा-वृंदावनाच्या सौंदर्यघन जंगलात आपल्या बाललीला करीत प्रेमरसाने ओथंबलेल्या ब्रज संस्कृतीला जन्म दिला. पुढे त्यांच्या आचरणाचे परासरण होऊन संपूर्ण भारतीय प्रदेशात ही संस्कृती पसरली. भारतीय संस्कृतीला म्हणून गंगा-जमुना संस्कृती म्हटले जाते.

त्यामुळे गंगा जेवढी पावन तेवढीच यमुना पवित्र पावन आणि श्रीकृष्णाच्या प्रेमभरित संस्कृती, प्रकृती, अध्यात्म आणि मानवीय मूल्यांनी ओथंबलेली आहे. त्यामुळेच भारतीयांच्या जीवनात या दोन्ही नद्या अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. काळ कितीही बदलला असला तरी आजही त्यांचे महत्त्व आबाधित आहे किंबहुना वाढले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विषादाची बाब एवढीच की या पतितपावन नद्यांची पावनता अंतर्धान होऊन त्यांची अवस्था पतित झाली आहे. स्वतःला प्रगतिशील म्हणवणार्‍या माणसाने प्रगती तर केली, परंतु ही तथाकथित प्रगती जेवढी झाली तेवढी आपल्या जीवनदायिनी नद्यांची त्याने अधोगती करून सोडली आहे. यापेक्षा विषादाचा दुसरा विषय तो कोणता असणार?

उद्गम – यमुना नदी उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हिमालयाच्या हिमाच्छादित ६२०० मीटर उंचावर असलेल्या बंदरपूंछ नावाच्या शिखरावर यमुनोत्री नावाच्या ग्लेशियरमधून उगम पावून पुढे आठ किमी अंतरावरील कालिंदी पर्वतावरून वाहते. पुढे कित्येक मैल बर्फाच्छादित हिमनग आणि दर्‍याखोर्‍यातून अदृश्यरूपाने वाहत यमुनोत्तरी पर्वतावरून तिचा जलद प्रवाह आदळू लागतो तेव्हा त्या विलोभनीय प्रपाताचे दर्शन घेण्यासाठी हजारो श्रद्धाळू भारताच्या कानाकोपर्‍यातून येतात.

पुढे उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेशातून वाहत १४३६ किमीचा प्रवास करून प्रयागराज येथे गंगेला येऊन मिळते. हा प्रवास करताना डावीकडून शारदा, गिरी, ऋषिगंगा, हनुमान गंगा, टोस, हिंडन आणि उजवीकडून चंबळ, बेतवा, केन, सिंध या उपनद्या यमुनेला येऊन मिळतात. या उपनद्यांना सामावून घेत दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा काल्पी या महानगरातून प्रयागराज येथे गंगा आणि सरस्वतीला मिळून त्रिवेणी संगम घडवते. अशी ही भगवान श्रीकृष्णांची यमुनामैया.

पौराणिक मान्यता – यमुना ही ब्रह्मांडाचे तेजोनिधी सूर्याची कन्या असून मृत्युदेवता यमाची भगिनी आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यांना ब्रज संस्कृतीचे जनक म्हटले जाते ते यमुनेचे पती आहेत. त्याअर्थी यमुना ही ब्रजवासीयांची माता आहे. म्हणून व्रजवासी मोठ्या आदराने यमुनेला जमुनामैया म्हणतात. ब्रम्हपुराणानुसार यमुना सृष्टीचा आधार आणि सच्चीदानंदस्वरूप आहे. उपनिषदात उल्लेख केल्यानुसार यमुना ब्रह्मरूपिणी आणि परमतत्वस्वरूप आहे.

यमुनेची सांस्कृतिक परंपरा – गंगेसारखीच यमुना भारतवर्षाची सर्वात प्राचीन आणि पवित्र नदी आहे. आर्याची पुरातन आणि गौरवशाली संस्कृती याच नद्यांच्या काठी जन्माला आली. यमुना ब्रज संस्कृतीची मूळ धरोहर आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांची साक्षी असलेल्या यमुनेच्या पवित्रपावन तटावर प्रेम, ओज, मार्दव आणि स्निग्धगंधा ब्रजभाषा जन्मास आली. श्रीकृष्णाच्या बाललीलांमुळे यमुना कोट्यवधी लोकांचे श्रद्धाकेंद्र आहे.

ब्रजभाषेतील असा एकही कवी आढळणार नाही ज्याने यमुनेचे रसभरीत वर्णन केले नाही. भक्तकवी आणि भक्तीसाहित्याची फार मोठी परंपरा यातून जन्माला आली आहे. यमुनेच्या तटावर आग्र्यासारखे प्रसिद्ध ऐतिहासिक, व्यापारिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ आहे. पुढे श्रीकृष्णाचे आजोबा शूर यांची राजधानी असलेले बटेश्वर आहे. बटेश्वर येथे कार्तिक पौर्णिमेला यमुना स्नानासाठी प्रचंड मोठी यात्रा भरते. त्यापुढे श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा आणि वृंदावनमधून कृष्णोपासनेचे भक्तीअमृत जगाला प्राप्त झाले आहे.

यमुनेत प्रदूषणाचा कालिया – गेल्या दोन दशकांत भारतीय नद्यांचे प्रदूषण ही सर्वव्यापी आणि विक्राळ स्वरूपाच्या चिंतेची बाब झाली आहे आणि दिवसेंदिवस त्याचे स्वरूप अधिकच भयावह होत आहे. ताजेवालापासून इटावापर्यंतच्या यमुनेच्या क्षेत्रात दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा ही मोठमोठी शहरे पडतात आणि हीच शहरे यमुनेला अभिशाप ठरली आहेत. दिल्ली शहराने तर यमुनेचे जगणे असह्य करून सोडले आहे. देशाच्या सांडपाणी प्रक्रियेवरील होणार्‍या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च केवळ दिल्लीवर केला जातो, तरीसुद्धा यमुनेची स्थिती दिवसागणिक जर्जर होत चालली आहे.

प्रचंड निधी खर्च होऊनही त्याचा परिणाम मात्र शून्य आहे. त्यामुळे ही प्रक्रिया योग्य दिशेने होत आहे की नाही हे तपासून पाहायची निकड निर्माण झाली आहे. आजपर्यंत ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्या सर्व आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असाच काहीसा प्रकार असल्यामुळे यमुनेची स्थिती गंभीर आणि अतिगंभीर झाली आहे. उदाहरणस्वरूप द्यायचेच झाले तर जेव्हा जेव्हा यमुनेच्या प्रदूषणाची चर्चा होते, यमुनेकाठी असणार्‍या गरीब लोकांच्या झोपड्या हटवण्यावर जोर दिला जातो, प्रदूषणाचे जे मुख्य स्त्रोत आहेत त्यावर विचार न होता या झोपड्यांवर सर्वांचा निशाणा आहे. खरंतर ह्या लोकांना बरोबर घेऊन यमुनेच्या सफाईचे आणि प्रदूषणाचे व्यापक जनआंदोलन चालवले जाऊ शकते.

याशिवाय प्रदूषण नियंत्रणाचे प्रयास हिमालयापासूनच व्हायला हवेत. हिमालयातील वृक्षवल्ली, डोंगरांची माती आणि पाण्याच्या संरक्षणार्थ आवश्यक उपाययोजना व्हायला हवी. याउलट यमुना व तिच्या सहाय्यक नद्यांवर धरणे आणि वीज परियोजनांच्या निर्माणावर भर दिला जातोय, ज्यामुळे प्रदूषणात भरच पडली आहे. धरणे आणि वीज परियोजनांमुळे मूळ जलप्रवाह खुंटत जाऊन प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. ताजेवालाच्या आसपास निर्माण करण्यात आलेल्या धरणातून यमुनेचे जवळजवळ सर्वच पाणी पूर्व आणि पश्चिमेच्या पाटांमध्ये वळवण्यात येऊन मूळ प्रवाह रोडावून जातो आणि समस्या अधिकच गंभीर होत जाते.

प्रमाणित मानकानुसार नदीच्या पाण्याचा बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) ६ एमजी प्रति लिटरपेक्षा अधिक असेल तर त्या पाण्याला अतिप्रदूषित पाणी मानले जाते. ११व्या पंचवार्षिक योजनेच्या सरकारी आकड्यानुसार दिल्ली निजामुद्दीन येथील यमुनेच्या पाण्याचा बीओडी ३१, आग्राकडील पाटाच्या पाण्याचा २८ तर मथुरा, आग्रा, इटावा येथील १५ आढळून आला आहे. यमुनेच्या पाण्याची यावरून आपल्याला स्पष्ट कल्पना येऊ शकते.

यमुनेच्या पाण्याचे हे भयाण वास्तव पाहून श्रीकृष्णांनी त्रेतायुगात यमुनेच्या डोहात केलेल्या चित्तथरारक कालिया मर्दनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विष यमुनेच्या पाण्यात ओकणार्‍या कालियाला नामोहरम करण्यासाठी श्रीकृष्णाने कालियामर्दन करून यमुनेला निर्मल आणि विषमुक्त केले होते. वर्तमान परिस्थितीत प्रदूषणाचा अक्राळविक्राळ कालिया अवघ्या यमुनेच्या देहात शिरला आहे. त्यामुळे वर्तमान युगानुसार अर्वाचीन आणि नव्या कालिया मर्दनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. असे कालियामर्दन करण्यासाठी सरकारला श्रीकृष्ण तर यमुनेच्या तटावरची अवघ्या जनतेला गोप-गोपिका व्हावे लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही.

प्रदूषणाची कारणे ः

१) यमुना नदीच्या प्रदूषणाला सर्वात जास्त जबाबदार दिल्ली शहर आहे. दिल्ली महानगराच्या अनेक गटारींचे पाणी प्रक्रिया न करताच थेट प्रवाहात सोडले जाते. त्यातून कित्येक टन कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि शहराचे मलमूत्र यमुनेच्या पाण्यात मिसळून प्रचंड प्रमाणावर नदी प्रदूषित होते.

२) हरियाणामधील यमुनेच्या तीरावर वसलेल्या सोनिपत औद्योगिक शहरात हजारो रासायनिक उद्योग आहेत. या उद्योगांचे अवशिष्ट, उर्वरकांच्या निर्माण प्रक्रियेतून निघणारा अमोनिया, प्लास्टिकच्या कारखान्यांची रसायने थेट यमुनेला येऊन मिळतात. त्यामुळे यमुनेच्या पाण्याचा रंगसुद्धा बदलून पाण्यात किती मोठ्या प्रमाणावर विष मिसळले जाते याची प्रचिती येते.

उपाययोजना

जवळजवळ मरणासन्न अवस्थेत असलेल्या यमुनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आता व्यापक उपाययोजना करावी लागेल यात शंका नाही. त्यातील सर्वात महत्त्वाचे घटक ज्यावर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे ते असे…

१) सोनिपतच्या रासायनिक उद्योगांना विशिष्ट अवधीपर्यंत प्रदूषण थांबवण्याची अंतिम मुदत देऊन जे उद्योग त्यांच्या उद्योगांचे प्रदूषण रोखणार नाहीत अशा उद्योगांवर सरळ कायदेशीर कारवाई करावी. या कारवाईमध्ये कुठलाही पक्षपात होणार नाही याची दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

२) दिल्ली शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्याशिवाय कोणतेही गटार थेट यमुनेत मिसळणार नाही यासाठी दिल्ली महापालिकेने आवश्यक ती कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

३) यमुनेचे प्रदूषण रोखण्यासाठी उगम आणि आसपासचे पर्वतीय क्षेत्र, दुसरे ताजेवालापासून इटावापर्यंतचे सर्वात जास्त प्रदूषित क्षेत्र आणि तिसरे इटावापासून तीर्थराज प्रयागपर्यंतचे क्षेत्र अशा तीन भागांत विभागणी करून त्या त्या प्रकारच्या प्रदूषणानुसार उपाययोजना करण्यात यावी. म्हणजे आजारानुसार उपचार होऊ शकतो.

यमुनाजी आपके निर्मल जल मे, घुसा बडा कालिया है!
अब कौन मर्दन करेगा इसका, बचा न कोई वालिया है!
कल-कारखाने अरबो कमाते, फिर भी वे दिवालिया है!
पापमोचन करने अब केवल बहती सडान्ध नालीया है.!

ओ! यमुनाजी के रास रचईया, अब कालिया मर्दन होना चाहिये!
बहुत विकराल पसरा है कालिया, अब तो कर्दन होना चाहिये!
चिंघाडती छटपटा रही जमुना मैंया, बची है केवल कुछ ही सांसे!
जल्दी करलो अब किशन कन्हैया, मैया भरने लगी मृत्यू उमासे!