घरफिचर्ससारांशरंगभूमी पुन्हा गजबजू लागली

रंगभूमी पुन्हा गजबजू लागली

Subscribe

मराठी व्यावसायिक रंगभूमीवर प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन सादर करत असलेल्या गौरी थिएटर निर्मित ‘तू म्हणशील तसं !’ या नाटकाच्या प्रयोगाने रंगभूमीवरील टाळेबंदी संपणार आहे. तिकडे अमराठी रंगभूमीवर नसीरूद्दीन शहांच्या ‘मॉटली’ या संस्थेने त्यांच्या ‘आईनस्टाईन’ या नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटरवर सादर केले. येत्या जानेवारी महिन्यात ओम कटारेंच्या ‘यात्री’ या संस्थेच्या बेचाळीसाव्या वर्धापनदिनानिमित्ताने एक नाट्यमहोत्सव होऊ घातलाय. एकूणच काय तर रंगभूमी आता हळूहळू का होईना, पण पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. ही गजबज उत्तरोत्तर वाढो हीच रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना...

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नाट्यगृहे औपचारिकदृष्ठ्या पुन्हा एकदा सुरू करण्याच्यादृष्टीने निर्बंध शिथिल केले. तरीसुद्धा नाट्यगृहांची व्यवस्थापने सगळ्या बाजूंनी सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. ती पूर्णपणे उघडण्याची घाई अजिबात दिसत नाहीय. दुसरीकडे रसिक प्रेक्षकही आपली पाऊले जरा जपूनच टाकण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत. अशी दोन्ही बाजूंनी सावधगिरी बाळगण्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच की काय, पण मुंबईतील व्यावसायिक तसंच प्रायोगिक रंगभूमी आणि उर्वरित देशपातळीवर रंगकर्म अजून पूर्वपदावर आल्याचे दिसत नाहीय. असं असलं तरी काही संस्थांनी सर्वतोपरी खबरदारी दाखवत आपले उपक्रम यशस्वीपणे पार पाडले. पुण्याच्या ‘आयपार’ या संस्थेने नाटकांच्या अभिवाचनाची स्पर्धा अतिशय नेटकेपणाने राबवत रंगभूमीवर असलेली दीर्घ शांतता भंग केली.

मुंबई-पुण्याव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील मातब्बर संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसादच रंगकर्मींची रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रयोग करण्याची आतुरता ठळक करून गेला. या स्पर्धेच्या प्रयोगानंतर आता या महिन्यातच (डिसेंबर 2020) नाट्यमहोत्सवाचे आयोजन ‘आयपार’तर्फे केले जाणार आहे. त्याशिवाय, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन सादर करत असलेल्या गौरी थिएटर निर्मित ‘तू म्हणशील तसं !’ या नाटकाच्या प्रयोगाने रंगभूमीवरील टाळेबंदी संपणार आहे. तिकडे अमराठी रंगभूमीवर नसीरूद्दीन शहांच्या ‘मॉटली’ या संस्थेने त्यांच्या ‘आईनस्टाईन’ या नाटकाचे प्रयोग पृथ्वी थिएटरवर सादर केले. येत्या जानेवारी महिन्यात ओम कटारेंच्या ‘यात्री’ या संस्थेच्या बेचाळीसाव्या वर्धापनदिनानिमित्ताने एक नाट्यमहोत्सव होऊ घातलाय. एकूणच काय तर रंगभूमी आता हळूहळू का होईना, पण पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. ही गजबज उत्तरोत्तर वाढो हीच रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना….

- Advertisement -

सरत्या वर्षाने काय दिले याचा आढावा घेण्यासाठी जेव्हा मी माझ्या सहकारी रंगकर्मींसोबत बोललो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे या शहरातले जे नाट्यविषयक उपक्रम आपले पूर्वाश्रमीचे तेज राखून होते, त्यांची काळाच्या ओघात अंधाराने माखलेली वाट या कोरोनाकाळात अधिक ठळक गहिरी झालेली दिसू लागली. उदाहरणच द्यायचे झाले तर मुंबईच्या महाविद्यालयीन वर्तुळात सुप्रसिद्ध असलेली आयएनटी या संस्थेतर्फे आयोजित केली जाणारी आंतर-महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होय. मुंबईतल्या कुठल्याही रंगकर्मीला विचारले तरी या स्पर्धेचा गौरवशाली इतिहास तो आपल्याला सांगू शकेल. किंबहुना, आज व्यावसायिक रंगभूमीवर स्थिर झालेल्या अनेक गुणी कलाकारांच्या कारकीर्दीची सुरूवातच या स्पर्धेच्या निमित्ताने झाली, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

गेल्या पंचवीस तीस वर्षांतील महत्वाच्या लेखकांनी लिहिलेल्या एकांकिकांचे प्रयोग या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी करत असत. अगदी प्रथितयश कलाकारांनाही या स्पर्धेचा मोह आवरत नसे. आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवत ते या स्पर्धेची शोभा वाढवत, इतकं या स्पर्धेचं वलय होतं. पण गेल्या काही वर्षात या स्पर्धेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरूवात झाली. त्याची प्रमुख कारणे शोधू पाहिल्यास एक कारण म्हणजे अलीकडील पंधराएक वर्षांत, शिकण्याच्या वयातच टेलिव्हिजन आणि सिनेमासारख्या माध्यमांचे एक्स्पोजर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळू लागले. या एक्स्पोजरच्या बरेवाईटपणाबद्दल इथे काही टिप्पणी करायची नसली तरी, उमेदीच्या वयात गांभीर्याने रंगकर्म करण्याच्या प्रक्रियेला नाही म्हटलं तरी काही अंशाने खिळ बसली. त्यातच एकांकिका स्पर्धांकडे टेलीव्हिजन आणि सिनेमात करण्याआधीची पायरी म्हणून पाहण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये बळावू लागली. याचा परिणाम म्हणून हळूहळू या स्पर्धांचं महाविद्यालयांच्या दृष्टीने असलेलं ‘हेल्दी ग्लॅमर’ उणावू लागलं.

- Advertisement -

प्रथितयश कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन एकप्रकारे या स्पर्धांचं नुकसानच केलं, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण कळत नकळत का होईना, त्यांचा आदर्श घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थी आपले ध्येय निश्चित करू लागले. एक सुजाण नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत बालरंगभूमी जी भूमिका बजावत असते, तशीच भूमिका एक प्रगल्भ रंगकर्मी घडविण्यात या एकांकिका स्पर्धांची आहे. आजही त्यांची गरज आणि उपयुक्तता कुणी नाकारू शकणार नाही. पण काळाच्या ओघात या स्पर्धांना लागलेले ग्रहण त्यांच्या तेजापेक्षा मोठे ठरत गेले आहे. जी गत आयएनटीची तीच उन्मेष, मृगजळसारख्या इतर स्पर्धांचीही झाली. या स्पर्धा गेल्या काही वर्षांत बंद झाल्या. आयएनटीची स्पर्धा आजही तग धरून आहे. पण आता तिचे पूर्वीचे वैभव मात्र राहिले नाही. कोरोनाच्या उजाड कालखंडात यावर्षी जरी तिचे आयोजन झाले नसले, तरी या निमित्ताने तिचे सिंहावलोकन केल्यास हाती निराशाजनक चित्र येते. येत्या वर्षात या स्पर्धांचं सकस आशयाच्या एकांकिकाच्या सादरीकरणानं पुनरूज्जीवन झालं तर ते कुणाला नकोय ?

‘एकांकिका’ हा एक लघु पण तितकाच सघन नाट्याविष्कार आहे. तेव्हा त्यांचं सादरीकरण फक्त महाविद्यालयीन स्पर्धांपुरतं मर्यादित असणं, हे सुद्धा काही अंशी मारक आहे. नाही म्हणायला मुंबईच्या अमर हिंद मंडळासारख्या काही संस्था जरूर आहेत, ज्यांनी खुल्या गटातील रंगकर्मींना एकांकिकेचा फॉर्म हाताळून पाहण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिला. तळकोकणातील कणकवलीमध्ये वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे खुल्या गटातील एकांकिका महोत्सवाचे आयोजन यशस्वीरित्या करते आहे. दरवर्षी एक लेखक निवडून त्याच्या निवडक एकांकिकांचे प्रयोग सादर करण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर संस्थांना तिथे पाचारण केले जाते. पण अशा हाताच्या बोटांवर मोजता येणार्‍या मोजक्या उपक्रमांनी मोठे ध्येय साध्य करता येणार नाही. अशा उपक्रमांची संख्या वाढण्याकरता एक उपाय दिसतो तो असा की, आज व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरस्थावर झालेल्या नामवंत कलाकारांनी पुन्हा एकदा मागे वळून एकांकिका करून पाहायला हव्यात. एकांकिका हा केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी किंवा हौशी रंगकर्मींनी करायचा फॉर्म नसून कुठल्याही कसलेल्या कलाकाराला त्यातल्या शक्यता अजमावून पाहण्यासाठी आव्हान देणारा तो एक नाट्यप्रकार आहे, असा इष्ट संदेश उभरत्या रंगकर्मींपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे. शिवाय, कुठल्याही कलावंताला पुन्हा पुन्हा स्वत:ला तपासत राहण्याकरता एकांकिकेसारखं दुसरं माध्यम असू शकत नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

कोरोनाच्या काळात जी सक्तीची विश्रांती घ्यावी लागली, त्यातून गतकाळात हातून काय निसटलं, पुन्हा काय व्हावंसं वाटतं याचा धांडोळा घेत असताना वरील दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. येत्या वर्षात या गोष्टी पुन्हा एकदा जोमाने सुरू होवोत.
या सदिच्छेसह तूर्तास थांबतो.

-समीर दळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -