रहस्यमयी ‘रंगीत पाऊस’!

पाऊस ना-ना रंग दाखवितो कधी रूसून बसतो तर कधी ढगफुटी बनत अतिवृष्टी करतो. मात्र ना-ना रंग दाखविणारी ही बरसात खरोखर रंगीत पाऊस घेऊनदेखील येते. लाल, पिवळा, हिरवा, पांढरा आणि चक्क काळा रंगाचा पाऊस अशा रंगीत पावसाच्या नोंदी भारताप्रमाणेच श्रीलंका, रशिया, इराण, इराक आदी देशातही आढळतात. रंगीत पाऊस पडण्यामागे वातावरणातील प्रदूषण, आकाशात एखाद्या अशनीचा स्फोट, धुळीची वादळे, शैवाळ, कधी कधी पक्ष्यांचा मोठा थवा आकाशात संचारत असताना त्यांच्या विष्ठा वातावरणात पसरणे अशी अनेक कारणे दिली जातात. मात्र असे असले तरी विविध रंगी पावसाबद्दल जाणून घेणे मोठे रंजक आहे.

२०२२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस हा पांढरा पाऊस ठरला. पावसाच्या पाण्याचे थेंब वाळताच वाहनांवर पांढरे डाग पडल्याचे दिसून आलेत. २०२१ मध्ये मुंबईतदेखील असाच पाऊस झाला होता. या पांढर्‍या पावसाबरोबरच चीन आदी देशांचे काळ्या इराद्यांची चर्चादेखील रंगली. पांढरे डाग हे बुरशीमुळे होते की जैवयुद्धाचा भाग हे पावसानंतरच्या पांढर्‍या पावडरीच्या रासायनिक विश्लेषणानंतर स्पष्ट होते, मात्र असे रिपोर्ट नेहमीच जनहितासाठी एक्स फाईलचा शिक्का मारून गोपनीय ठेवले जातात हा जगभरचा इतिहास आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण शहर परिसरात २०१७ साली ‘काळा’ पाऊस झाला होता. मुंबईजवळ बुचर आयलंड येथे वीज कोसळून हायस्पीड डिझेलच्या दोन टाक्यांना आग लागल्याची घटना घडली होती. आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोण पसरले होते. ही आग आटोक्यात आली, पण बुचर आयलंडपासून जवळ असलेल्या उरण आणि आसपासच्या परिसरात काळा पाऊस पडला होता. पावसामुळे सुखावलेले उरणचे नागरिक आणि शेतकरी काळा पाऊस झाल्यामुळे घाबरले होते. सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत काळा पाऊस झाल्यामुळे स्थानिकामध्ये भितीचं वातावरण होते. जवळपास दोन दिवस परिसरात काळ्या रंगाचा पाऊस बरसत झाली होती. काळ्या पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच जैव वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले, पण पुढे काय रिपोर्ट आले हे सर्वसामान्य जनतेला आजही माहीत नाही.

पाऊस ना-ना रंग दाखवितो कधी रूसून बसतो तर कधी ढगफुटी बनत अतिवृष्टी करतो. मात्र ना-ना रंग दाखविणारी ही बरसात खरोखर रंगीत पाऊस घेऊनदेखील येते. लाल, पिवळा, हिरवा, पांढरा आणि चक्क काळा रंगाचा पाऊस अशा रंगीत पावसाच्या नोंदी भारताप्रमाणेच श्रीलंका, रशिया, इराण, इराक आदी देशातही आढळतात. रंगीत पाऊस पडण्यामागे वातावरणातील प्रदूषण, आकाशात एखाद्या अशनीचा स्फोट, धुळीची वादळे, शैवाळ, कधी कधी पक्ष्यांचा मोठा थवा आकाशात संचारत असताना त्यांच्या विष्ठा वातावरणात पसरणे अशी अनेक कारणे दिली जातात. मात्र असे असले तरी विविध रंगी पावसाबद्दल जाणून घेणे मोठे रंजक आहे. आश्चर्यचकीत करणारी अशी ‘ही’ बरसात हे अनेकदा जनसामान्यांना एक गुढ रहस्य भासते.

परग्रहावरील सजीव आणि लाल पाऊस

केरळमधील कन्नूर जिल्हात ५ जुलै २००१ रोजी तर कोट्टायम आणि इडुकी जिल्ह्यांमध्ये २५ जुलै २००१ रोजी लाल रंगांचा पाऊस पडला होता. इसवी सन १८९६ आणि अगदी अलीकडे २०१२ मध्येही केरळमध्ये रंगीत पाऊस पडला होता. उत्तर-पूर्व श्रीलंकेच्या सेवांगला प्रदेशासह अनेक भागांत १५ नोव्हेंबर २०१२ ते २७ डिसेंबर २०१२ या काळात लाल रंगाचा पाऊस पडला होता.

संशोधनात असे स्पष्ट होते की, अरबस्तानातून धुळीचे लोट वार्‍याने आल्यामुळे पाणी लाल रंगाचे झाले असा एक मत प्रवाह आहे. मात्र कोट्टायम येथील महात्मा गांधी युनिव्हसिर्टीमधील भौतिकशास्त्रज्ञ लुईस गॉडफ्रे यांच्या म्हणण्यानुसार लाल पाऊस हा परग्रहावरील सजीवांमुळे पडला होता. या लाल पावसात जीवाणूसदृश पेशीसारखे घटक होते. पृथ्वीजवळून जाणार्‍या एका धूमकेतूमार्फत ते येथे आले आणि हा पाऊस भारतात २००१ सालात पडला. डीएनए विरहीत असल्यामुळे हे घटक सजीव नाहीत असे मत ‘न्यू सायन्टिस्ट’, ‘र्वल्ड सायन्स’ यासारख्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले, मात्र ते गॉडफ्रे यांच्या मताशी सहमत नाहीत. पुणे व अलास्कामध्येही नारंगी रंगाच्या पावसाची नोंद आढळते.

पांढर्‍या मिठाचा रंग बदलविणारा काळा पाऊस

२९ ऑक्टोबर २००९ रोजी जयपूर येथील सितापुरा औद्योगिक वसाहतीतल्या इंडियन ऑइल डेपोला संध्याकाळी आग लागली. सुमारे ८० लाख लिटर ऑइल साठवण्याची या डेपोची क्षमता होती. जयपूरच्या इंडियन ऑयल डेपोला लागलेली आग पाच दिवसांनंतर विझली. आगीमुळे हजारो लिटर ऑइल जळून नष्ट झाले. या आगीमुळे निर्माण झालेला विषारी धूर संपूर्ण परिसरात पसरला होता.

जयपूर शहरापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या कुचामन शहराजवळ मीठाची शेती केली जाते. येथील सांभर साल्ट बेल्ट हा देशातील सर्वांत मोठ्या साल्ट बेल्टपैकी एक आहे. या ठिकाणी सुमारे तीन किलोमीटर परिसरातील मिठाच्या शेतांमध्ये विषारी धुराचे लोट पहायला मिळाले. या भागात जळालेल्या पेट्रोल आणि डिझेलचा पाऊस झाला. धुराचे लोट, हवा आणि बाष्प यांच्या संयोगातून बनलेला ह्या काळ्या पावसामुळे या परिसरातील मीठ पूर्णतः खराब झाले. घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर तो काळा पाऊस बनून पडला होता.

१९९० च्या इराण-इराक खाडीयुद्धाच्या दरम्यान, आखाती देशात तेल विहीरींना लागलेल्या आगींनंतर अनेक देशात काळा पाऊस पडला होता.

डोंबिवलीचा हिरवा पाऊस

डोंबिवली एमआयडीसी परिसरात २१ जानेवारी २०१४ रोजी हिरवा पाऊस पडला. डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक कारखाने आहेत. वातावरणात कॉपर, मोरचूद यांसारख्या रासायनिक घटकांचे प्रदूषण होते. रंगाच्या डाय बनविणार्‍या अनेक कंपन्या या भागात आहेत. एमआयडीसी परिसरातील डाय बनविणार्‍या कंपन्यांमधून बाहेर पडलेल्या फ्लोरोसीनचा हवेतील पाण्याशी संपर्क झाल्यामुळेच जमिनीवर पडलेले पाणी हिरव्या रंगाचे झाले, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला. जानेवारीप्रमाणेच १४ जून रोजीदेखील अचानक डोंबिवली पूर्वेतील मानपाडा निवासी भागात हा हिरवा पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातील नागरिक हवालदिल झाले.

गारांचा नव्हे तर चक्क हिर्‍यांचा पाऊस

शनी, गुरू या ग्रहांवर गारांचा नाही तर चक्क हिर्‍यांचा पाऊस असणार आहे. शनी ग्रहावर तर एका वर्षात किमान एक हजार टन हिरे पडत असतील. या ग्रहांवरील विशिष्ट वातावरणामुळे स्फटिक स्वरूपात असलेल्या कार्बनचे मोठे प्रमाण आढळून आले आहे, त्यामुळे तेथे सुमारे एक सेंटिमीटर आकाराच्या हिर्‍यांचा पाऊस पडू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जोरदार वादळासह पडणार्‍या विजांमुळे गुरू आणि शनी या वायूपासून बनलेल्या ग्रहांवरील वातावरणातील मिथेनचे कार्बनमध्ये रूपांतर होईल. खाली कोसळताना दाब वाढल्याने कार्बन कठीण होत जाऊन त्याचे आधी ग्रॅफाईट आणि नंतर हिर्‍यात रूपांतर होईल, असे विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. केविन बायन्स यांचे म्हणणे आहे. मात्र, पावसाच्या माध्यमातून पडणारे सर्व हिरे या ग्रहांच्या गर्भात असणार्‍या उकळत्या लाव्हांमध्ये वितळून जातील, असेही मत वॉशिंग्टन येथून आलेल्या एका वृत्तानुसार त्यांनी नोंदविले आहे.

आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी पाऊस

पावसाचे शुद्ध पाणी रासायनिकदृष्ठ्या उदासीन असते. शुद्ध पाण्याचा पीएच म्हणजे सामू सात एवढा असतो; परंतु पाण्यामध्ये आम्ल मिसळली गेली तर पीएच सातपेक्षाही कमी होतो, तर सातपेक्षा जास्त पीएच असल्यास पाण्याला अल्कधर्मी गुणधर्म प्राप्त होतात. पाऊस पडताना जेव्हा हवेतील वायू अथवा धुलीकण झेलून ते पावसाच्या थेंबांमध्ये विरघळले की त्याची पीएच व्हॅल्यू बदलते आणि आम्ल किंवा अल्कधर्मी पाऊस पडतो. कधी कधी प्रदूषणामुळे सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईडसुद्धा हवेमध्ये मिसळले जातात. ती वरून खाली पडणार्‍या पावसाच्या पाण्यात मिसळली जातात. तसेच कधी कधी विजा चमकल्यामुळे पाण्याची आणि ऑक्साईडची अभिक्रिया होऊन त्यापासून सल्फ्युरिक आम्ल किंवा नायट्रिक आम्लामुळे पाण्याचा पीएच जर ५.६ पर्यंत कमी झाला की त्याला ‘आम्ली पाऊस’ म्हणजे ‘अ‍ॅसिड रेन’ असे म्हणतात.

पिवळा पाऊस की रासायनिक अस्त्र

४ डिसेंबर २०१० रोजी कोरेगाव तालुक्यातील रिकिबदारवाडीत देखील दुपारी अडीचच्या सुमारास आम्लयुक्त पिवळा पाऊस पडला होता. यामुळे जिल्हाभर पिवळ्या पावसाच्या चर्चेला ऊत आला होता. बॉटनी विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे करण्यात आलेल्या तपासणी अहवालानुसार पिवळ्या डागांचे पीएच हे न्यूट्रल आढळले होते. ५ डिसेंबर २०१० रोजी दुसर्‍या दिवशी पुन्हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रिकीबदारवाडीत पिवळा पाऊस झाला. परंतु १०० मीटर परिसरातच पिवळा पाऊसाचा वर्षाव झाला. पाऊस पडून गेल्यानंतर झाडाच्या पानांवर पिवळे थेंब पडत असल्याचे आढळून आले. शेतातही पिवळ्या रंगाचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकर्‍यांनी कामे अर्धवट टाकत भीतीपोटी गावाकडे धाव घेतली. पिवळ्या पावसाच्या धास्तीमुळे गावात बराच काळ शुकशुकाट होता.

५ डिसेंबर २०१० रोजी कराड बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या व नेहमी गजबजलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात पिवळा पाऊस पडल्याने चर्चेला उधाण आले. दुपारी दोनच्या सुमारास आम्लयुक्त पिवळ्या रंगाच्या पावसाने शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसरात वर्षाव केला. स्मृतिसदनात अनेक लोक विश्रांतीसाठी बसले होते. अचानक पडलेल्या पिवळ्या पावसामुळे स्मृतिसदन परिसरात असलेल्या नागरिकांच्या अंगावरील कपड्यांवर तसेच विविध प्रकारच्या झाडांच्या पानांवर पिवळे डाग पडले. यामुळे शहरभर पिवळ्या पावसाची चर्चा होती. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण होते.

साथीचे रोग शत्रूच्या तोफा-बंदुकांपेक्षाही जास्त संहारक असतात. हिटलरच्या नाझी फौजांबरोबर लढताना एका रशियन सैन्य शिबिरात अकस्मात हगवणीची साथ पसरली आणि दोन दिवसात काही हजार सैनिक चक्क मेले होते. हगवणीची कारणे नेहमीच दूषित अन्न किंवा पाणी ही असतात. त्या शिबिरातल्या अन्न-पाण्याचे नमुने तपासले तेव्हा आढळले की, बुरशी आलेल्या गव्हाचे पाव खाल्ल्याने ही साथ पसरलेली आढळली होती. यानंतर १९७० च्या दशकाच्या अखेरीस कंबोडियातले कम्युनिस्ट बंडखोर आणि अफगाणिस्तानात घुसलेल्या सोवियत फौजा यांनी विशिष्ट रासायनिक-जैविक अस्त्रांचा वापर विरोधकांवर केला अशी एक अमेरिकन खबर होती. त्यामुळे पिवळा पाऊस पडला. त्यातून सर्वत्र बुरशीचा फैलाव झाला. मात्र, सुदैवाने यातून हगवणीची साथ उद्भवली नाही; हा पिवळा पाऊस पाडणारे रासायनिक अस्त्र रशियाला इस्रायलकडून मिळाल्याची चर्चा होती. परिणामी पिवळा पाऊस म्हटले की जास्त भीती पसरते.

अशी बरसात झाल्यास काय करावे?

१) नागरिकांनीही घाबरून जाऊ नये.

२) अफवा पसरवू नये.

३) पावसाचे प्रदूषित पाणी जसे मानवी आरोग्याला धोकादायक आहे तसेच ते पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्याही जीविताला धोकादायक आहे.

४) रंगीत पावसाच्या संपर्कात आलेले पदार्थ खाऊ नये.

५) रंगीत पावसाचे पाणी पिऊ नये.

६) पावसाच्या पाण्याच्या विश्लेषणातूनच महत्वपूर्ण माहिती मिळू शकते.

७) स्वच्छ काचेच्या बाटलीत अशा पाण्याचे सॅम्पल घेऊन ठेवावे.

८) रंगीत पावसाच्या पाण्याचे नमुने, डाग पडलेले कपडे, विविध झाडांची डाग पडलेली पाने कोरड्या जागी ठेवावीत.

९) पावसाच्या पाण्यातील जैविक व रासायनिक घटकांचे योग्य पृथ्थकरण होण्याकरता असे नमुने कडक उन्हात ठेऊ नये.

१०) परिसरातील वातावरणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभाग, हवामान संशोधन केंद्र, जिल्हा अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधावा.