घरफिचर्ससारांश फटाके उडवताहेत भविष्याच्या चिंधड्या!

 फटाके उडवताहेत भविष्याच्या चिंधड्या!

Subscribe

दरवर्षी आपण दिवाळी साजरी करत असतो. दिवाळी आली की बालचमूला अधिक आनंद मिळतो तो फटाके फोडल्याने. त्यामुळे छोट्याशा फटाक्यापासून कानठळ्या बसविणारे फटाके उडवले जातात. त्याचबरोबर ज्यातून धूर बाहेर पडतो अशा अनेक गोष्टी मुलांच्या हाती असतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना वातावरणातील बदलांचा परिणाम लक्षात आणून दिला तर नक्कीच उपयोग होईल. शिक्षण आयुक्तांनीदेखील फटाकेमुक्त दिवाळीसंदर्भात आवाहन केले आहे. मुळात पर्यावरणरक्षण आणि प्रदूषण मुक्तता हा सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे.

-संदीप वाकचौरे
     दीपावली म्हटले की प्रत्येक घरातील प्रत्येकासाठी आणि विशेषतः बालकांच्या आयुष्यातील अधिक आनंदाचे क्षण असतात. प्रकाशाच्या सणाच्या उत्सवाने  घराघरात आनंद फुलवला जातो. यानिमित्ताने खाद्य संस्कृतीच्या सोबत फटाक्यांची आतषबाजी आनंद मिळवून देत असते. सध्या दिल्ली आणि मुंबईबरोबर अनेक महानगरांतील प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. जगभरात सर्वत्र तापमानवाढीचा विक्रम झाला आहे. गत १५० वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. आपली हवेची अशुद्ध पातळी धोक्याचा इशारा देत आहे. मानवी आयुष्य आता धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. आजच आपण विचार केला नाही तर उद्याचे सर्वांचेच भविष्य काळोखमय असणार आहे. आजच्या आनंदाच्या क्षणासाठी उद्याचे आनंदाचे क्षण आपण कायमचेच मिटवत आहोत याचेही भान ठेवण्याची वेळ आली आहे.
 साधारणपणे स्वच्छ हवेत ७८ टक्के नायट्रोजन, सुमारे २१ टक्के प्राणवायू आणि १ टक्का कार्बनडाय ऑक्साईड, हेलियम, नियॉन, हायड्रोजन, अरगॉन इत्यादी वायू असतात. आज हे सारे प्रमाण विषम होत आहे. त्यातून लाखो मुले आणि वृद्ध मृत्यूच्या खाईत लोटले जात आहेत. अशा वेळी किमान मोठ्यांबरोबर लहानांची मने प्रदूषणाच्या विरोधात लढाई लढण्यासाठी प्रज्वलित करण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर ग्रेटा थनबर्ग या छोट्याशा विद्यार्थिनीने जागतिक प्रदूषणाविरोधात लढाई सुरू केली. वातावरणातील बदलाचे परिणाम भविष्यात होणार आहेत ही जाणीव तिला झाली. उद्या आपल्याला भविष्य नाही म्हणून तिने शाळा सोडली आणि वातावरण विरोधातील लढाईसाठी तिने पहिले पाऊल टाकले.
ती म्हणते  मी अशी निदर्शने शाळा बुडवून करत आहे. कारण तुम्ही माझ्या भविष्याचे वाटोळे केले आहे. हे जे छोट्याशा मुलीला कळते ते आपल्याला आज कळत नाही. उद्याचे भविष्य आणखी अंधारमय असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीपावलीच्या निमित्ताने फोडल्या जाणार्‍या फटाक्यांवर निर्बंध आणण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनीच चळवळ उभी करण्याची गरज आहे. हे बालसैनिक प्रदूषण कमी करून लाखो सजीवांना जीवदान देऊ शकतात. मोठ्यांनी त्यासाठी बालकांच्या हाती फटाके देण्याऐवजी पुस्तके द्यायला हवीत.
दरवर्षी आपण दिवाळी साजरी करत असतो. दिवाळी आली की बालचमूला अधिक आनंद मिळतो तो फटाके फोडल्याने. त्यामुळे छोट्याशा फटाक्यापासून कानठळ्या बसविणारे फटाके उडवले जातात. त्याचबरोबर ज्यातून धूर बाहेर पडतो अशा अनेक गोष्टी मुलांच्या हाती असतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना वातावरणातील बदलांचा परिणाम लक्षात आणून दिला तर नक्कीच उपयोग होईल. शिक्षण आयुक्तांनीदेखील फटाकेमुक्त दिवाळीसंदर्भात आवाहन केले आहे. मुळात पर्यावरणरक्षण आणि प्रदूषण मुक्तता हा सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. प्रत्येक गोष्ट न्यायालयाच्या आदेशानंतर आपण करणार असू आणि सरकारनेच ते करावे असे वाटत असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आता ही वेळ प्रतीक्षा करण्याची नाही तर स्वत:हून भूमिका घेण्याची आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक जागृती दाखवत प्रदूषणाचे परिणाम समोर आणण्यासाठी ग्रेटाच्या पावलावर पाऊल टाकण्याची गरज आहे.
आज हे पाऊल पडले नाही तर उद्या आपले अस्तित्व तरी राहील का, अशा प्रश्न निर्माण होत आहे. आज फटाके आनंद देत आहेत. हे फटाके अनेकांच्या आयुष्यात अंधार निर्माण करत आहेत. यानिमित्ताने वातावरणात धूर निर्माण होतो. विषारी वायू हवेत मिसळतात. अनेकदा आवाज इतका मोठा असतो की त्याचा परिणाम म्हणून बहिरेपणा येण्याची शक्यता निर्माण होते. हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण असतात. त्यांनाही त्याचे परिणाम सोसावे लागतात. हे गंभीर परिणाम लक्षात घेऊनच सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रदूषण व पर्यावरण संरक्षण हे फक्त न्यायालयाचे काम नाही, तर वायू व ध्वनी प्रदूषण कमी करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत लोकांना जागृत करणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांपेक्षाही प्रौढ व्यक्ती फटाके अधिक फोडतात. त्यामुळे लोकांनीच आता याविरोधात समोर यायला हवे. हे निरीक्षण समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी वाढवणारे आहे.
 जागतिक आरोग्य परिषदेनुसार ध्वनी प्रदूषण म्हणजे कुठल्याही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो. दैनंदिन जीवनात अडथळा आणतो. विविध संस्थांच्या संशोधनातून आजवर हे समोर आले आहे की अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनी प्रदूषणाची बळी ठरत आहे. मोठ्या आवाजातील फटाके फोडले जात आहेत. ८० डेसिबल एवढा आवाज आपण सतत आठ तासांसाठी ऐकला तर आपल्याला बहिरेपणा येण्याची शक्यता अधिक असते. कर्णकर्कश हॉर्नचे डेसिबलमध्ये मोजमाप केल्यास ही पातळी १००-१२० डेसिबल या प्रमाणात येते. त्याचबरोबर फटाक्यांमध्ये विषारी वायू आणि रासायनिक घटक असतात. फटाक्यांमुळे वातावरणातील उष्णतेसह कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढते.
ध्वनी प्रदूषणात मोठ्या आवाजाचा थेट प्रभाव मानवी आयुष्यावर पडतो. आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. फटाक्यांमध्ये सल्फर, झिंक, कॉपर आणि सोडियम हे रासायनिक घटक असतात. या घटकांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. फटाक्यांमध्ये बेरियम वापले जाते. ते अतिशय विषारी आहे. ते घटक मानवी शरीरात गेल्यास त्याचा परिणाम मानवाच्या मज्जासंस्थेवर होतो. त्यातून कंप सुटणे, अर्थांगवात, श्वसन व्यवस्थेवर परिणाम, अशक्तपणा, भयगंड, पोट, आतडे, स्नायू कमकुवत होणे, रक्तदाब वाढणे आदी समस्या निर्माण होतात. तसेच हृदयक्रिया, पचनसंस्था, त्वचा यावरही दुष्परिणाम होत असतो. इतके गंभीर परिणाम होत असलेले फटाके आपण वाजवत असू तर आपणच आपले जीवन संपवत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.
   मुलांना एखाद्या विषयाचे गांभीर्य कळले तर निश्चित त्यासाठी ती पावले टाकू शकतात. मुळात पर्यावरण रक्षण हा विषय आजच्या बालकांच्या भविष्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. आज मोठ्यांनी आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी शिक्षण, आरोग्य जितके महत्त्वाचे वाटत आले आहे. ते का तर केवळ त्यांच्या भविष्यासाठी मोठी माणसं कार्यरत आहेत म्हणून. मुलांचे भविष्य आपल्याला खरोखर उज्ज्वल हवे असेल तर प्रदूषणाविषयी चळवळीची गरज आहे. मोठी माणसं अधिक संवेदनशील हवी असताना प्रदूषण ही अधिक महत्त्वाची चळवळ उभी राहण्याची गरज जगातील एका मुलीला वाटावी याचे आश्चर्य वाटते. अनेकदा मुलांना कुठे काय कळते असा मोठ्यांचा समज आहे.
अशा वेळी स्वीडन देशातील ग्रेटा थनबर्ग या १६ वर्षांच्या मुलीने याबाबत अभ्यास केल्यावर वातावरणातील बदलाचे गांभीर्य लक्षात आले. त्याचे परिणाम काय असू शकतात याचा अंदाज आला. आपले भविष्य शिक्षणाने नाही तर प्रदूषणाने अडचणीत येणार आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक काही करण्याची गरज तिला वाटू लागली. तिने स्वीडनच्या संसदेच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. हातात एक फलक घेऊन ती एकटीच लढत होती. त्या फलकावर लिहिले होते, वातावरण आणीबाणीसाठी शाळा बंद. तिने शाळा बंद करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांशी, संसद प्रतिनिधींना भेटून मुलांच्या भविष्यासाठी पर्यावरणाचे  वास्तव लक्षात आणून देेत आहे. आरंभी नेहमीप्रमाणे छोट्या मुलीच्या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली नाही. मुलांना कोठे काय कळते असा सार्वत्रिक समज आहे.
ती आपली भूमिका मांडत राहिली. काही काळानंतर तिचा आवाज आणि पर्यावरणाच्या काळजीबद्दल ती जे काही सांगत आहे ते किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. आज तिने उभारलेल्या आंदोलनात जगभरातील युवा सहभागी झाले आहेत. आज पर्यावरणासंदर्भाने देशातील परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या प्रदूषणाबाबत अधिक दखल घेत शासनाला त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. मुंबईतदेखील तीच स्थिती आहे. आज हे महानगरात दिसत आहे. छोट्या छोट्या शहरात उद्या हेच चित्र असणार आहे. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
फटाके वाजवल्याने आनंद मिळतो असे म्हटले जाते, पण ते खरे असले तरी आनंदाचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे. इतके गंभीर परिणाम समोर आणण्यासाठी आणि रंजनासाठी मुलांच्या हाती पुस्तके देण्याची गरज आहे. खरंतर महाराष्ट्रात वर्तमानात फारशी वाचन संस्कृती नाही. घराघरात फटाके फोडले जातात, पण त्या प्रत्येक घरात पुस्तक असेल याची खात्री नाही. माणसं शिकलेली असली तरी ती वाचतील याची खात्री नाही. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीत मोठ्या प्रमाणावर विविध विषयांवर आणि विविध वयोगटाला अनुरूप असे अनेक दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. त्यात विविध वाङ्मय प्रकारांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत मोठ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि मनोरंजनही होण्यास मदत होईल. आज जगातील प्रत्येक सजीवासाठी शहाणपणाने वाट चालण्याची गरज आहे. ती वाट आज चाललो नाही तर उद्याच्या सार्‍याच वाटा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील तरुणाईसोबत बालकांनीदेखील ग्रेटाचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करण्याची गरज आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -