घरफिचर्ससारांश‘स्त्री’ची वास्तव संघर्षगाथा...अग्निदिव्य

‘स्त्री’ची वास्तव संघर्षगाथा…अग्निदिव्य

Subscribe

काळ कोणताही असो, स्त्रिला अग्निदिव्यातून जावंच लागतं. स्त्री-पुरुष समानतेचा कितीही जयघोष केला तरी हे वास्तव नाकारता येत नाही. अशाच एका स्त्रीची वास्तव चरित्रगाथा ‘अग्निदिव्य’ पुस्तकात लेखक आशिष निनगुरकर यांनी मांडली आहे. काळीज हलवणारं हे दुःख वाचून तरी काही जणांच्या वर्तनात बदल होईल अशी अपेक्षा ठेवता येईल. इथं या बाईनं सगळं हलाहल सहजगत्या पचवलेलं. कितीही मोठी संकटं आली तरी डगमगायचं नाही, त्याला धीरानं सामोरं जायचं हा त्यांचा बाणा. तो त्यांच्यात कसा आला? तर त्यांनी सुखाची आस कधी धरलीच नाही! सुख म्हणजे त्यांच्यासाठी जणू मृगजळच! मात्र त्यातून त्या तावून-सुलाखून निघाल्या.

– घनश्याम पाटील

माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून मी त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यांत अश्रूंचा पूर येऊ लागला. एकतर त्यांची बोलण्याची मराठवाडी शैली. त्यात त्या इतक्या समरसून बोलत होत्या की आपण एखादा चित्रपट पाहतोय असंच वाटत होतं. अत्यंत चित्रदर्शी शैलीत त्या त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत होत्या आणि आम्ही मंत्रमुग्धपणे ऐकत होतो.

- Advertisement -

कोणाच्याही सहन करण्याला काही सीमा असू शकतात. इथं या बाईनं सगळं हलाहल सहजगत्या पचवलेलं. कितीही मोठी संकटं आली तरी डगमगायचं नाही, त्याला धीरानं सामोरं जायचं हा त्यांचा बाणा. तो त्यांच्यात कसा आला? तर त्यांनी सुखाची आस कधी धरलीच नाही! सुख म्हणजे त्यांच्यासाठी जणू मृगजळच! मात्र त्यातून त्या तावून-सुलाखून निघाल्या. परमेश्वराच्या कृपेनं त्यांच्या जीवनात एक ‘अभिषेक’ आला. हा अभिषेक म्हणजे त्यांचा मुलगा. त्यालाच त्यांनी आपल्या संघर्षाचं, जगण्याचं कारण मानलं आणि त्यांचं दु:ख तुलनेनं थोडं सुसह्य झालं. रमामावशींच्या आयुष्याची थरारकथा ऐकतानाच आम्ही निर्णय घेतला की त्यांचं चरित्र प्रकाशित करायचं. आशिषजींना हेच अभिप्रेत होतं. त्यांनी लेखनाची जबाबदारी आनंदानं स्वीकारली. पूर्णपणे झोकून देऊन त्यांनी रमामावशींच्या जगण्याचं सार मांडलं. मावशीही त्यांच्याशी अनेक विषयांवर मोकळेपणानं बोलल्या. त्याचं फलित म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकात कसला कल्पनाविलास नाही. सत्य मांडल्यानं कुणाला काय वाटेल याची भीडभाड नाही. अत्यंत निर्भयपणे त्यांनी त्यांच्या जीवनाचा परामर्श घेतला आहे. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक महाकादंबरी असते. ती फक्त मांडता आली पाहिजे. रमामावशींनी हे आव्हान स्वीकारलं. आशिष निनगुरकर यांच्यासारख्या हरहुन्नरी लेखकाजवळ मुलाच्या नात्यानं मन मोकळं केलं. म्हणूनच ही जीवनगाथा आपल्यापुढे येऊ शकतेय.

काळ कोणताही असो, स्त्रिला अग्निदिव्यातून जावंच लागतं. स्त्री-पुरुष समानतेचा कितीही जयघोष केला तरी हे वास्तव नाकारता येत नाही. अन्याय-अत्याचाराच्या पद्धती वेगळ्या असतील, रांधा-वाढा-उष्टी काढा असं चित्र वरकरणी दिसणार नाही, पण आपल्या समाजव्यवस्थेत सहन करावं लागतं ते स्त्रीलाच! ती सुशिक्षित असेल किंवा अशिक्षित! तिच्या स्त्रीपणाची भलीमोठी किंमत तिला वेळोवेळी चुकवावीच लागते. समाजालाही त्याचं फारसं काही वाटत नाही. जगतेय ना तिच्या विश्वात, मग जगू द्या, असेच काहीसे भाव असतात. नातेसंबंध, जडणघडण, संसार, संघर्ष, वळणबिंदू, पोस्टनामा, चित्तरकथा आणि समाज अशा आठ भागांत संक्षिप्त स्वरूपात रमाबाई कांबळे यांचा जीवनपट या पुस्तकात मांडला आहे. आईवडिलांची नाजूक परिस्थिती, भावाचं आजारपण, जबाबदार्‍या यामुळं कमी वयात झालेलं लग्न, निसर्गानं दिलेलं शारीरिक सौंदर्याचं वरदान, दोघांच्या वयातील अंतर, मुलाकडच्या घरातील लोक सुशिक्षित असूनही त्यांची मागासलेली मानसिकता, अवहेलना आणि संशय यामुळे त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली. असंख्य लेकी-सुना यामुळे उद्ध्वस्त झाल्या. आजही अनेक जणी याच्या शिकार ठरत आहेत. आईवडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव, जबाबदार्‍या आणि समाज काय म्हणेल याची भीती यामुळे कितीतरी जणी घरातील हे रोजचं मरण अनुभवत असतात. त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. लग्नानंतर देवदर्शनाला गेल्यानंतर तिथेही तो चारित्र्यावर संशय घेत असेल तर त्या माऊलीचा संसार पुढे कसा होईल हे वेगळे सांगायलाच नको. अनेक जणींच्या या व्यथा-वेदना रमामावशींच्या रूपाने प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त झाल्या आहेत. काळीज हलवणारं हे दुःख वाचून तरी काही जणांच्या वर्तनात बदल होईल अशी अपेक्षा ठेवता येईल.

- Advertisement -

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यातील बर्‍याचशा घटना खर्‍या असतात, तर काही खोट्या. कायदे स्त्रियांच्या बाजूचे आहेत, असा युक्तिवाद कायम केला जातो. त्यालाही खर्‍या-खोट्या दोन्ही बाजू आहेत. तरीही स्त्रियांना पायदळी तुडवलं जातं. त्यांचा आत्मसन्मान दुखावला जाईल असं वर्तन अनेकदा केलं जातं. असं म्हणतात की, वाफ फार काळ कोंडून ठेवली तर त्याचा स्फोट अटळ असतो. अगदी त्याचप्रमाणं सहनशक्तीच्याही मर्यादा असतात. त्या ओलंडल्या गेल्या तर आयुष्याची होरपळ होते. त्यात उभयतांचं जीवन बेचिराख होतं.

या पुस्तकात मानवी भावभावना आणि त्यांचं वर्तन याचं सूक्ष्म निरीक्षण आलं आहे. रमामावशींचे वडील, त्यांचे भाऊ धीरोदात्त आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्याबरोबर राहिले. ‘तुझं आता लग्न करून दिलंय तर सांभाळून घे, त्या घरातून तुझा देहच बाहेर येईल’ असा खुळचटपणा त्यांनी केला नाही. आपली मुलगी-बहीण लग्नाच्या निर्णयामुळं फसली गेलीय हे लक्षात आल्यानंतर हे सारं कुटुंब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं. रमामावशींनी माहेरी असतानाही त्यांच्या आईवडिलांवर, भावावर कसला ताण येऊ दिला नाही. नोकरी करीत त्यांनी कुटुंबाला हातभार लावला. भाऊ-भावजय यांना आपल्यापासून अनावधानानेही कोणताही त्रास होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. ‘आपण भले आणि आपले काम भले’ म्हणून त्या त्यांच्याकडे राहिल्या. अत्यंत नेेटानं त्यांनी अभिषेकचं शिक्षण पूर्ण केलं.

वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर त्यांचा नवरा गंभीर आजारी पडला. दरम्यान, मधल्या अनेक वर्षांत बरंच पाणी वाहून गेलं होतं. त्या आपल्या तरुण मुलाला घेऊन नवर्‍याच्या भेटीस गेल्या. मुलाला सांगितलं, हा तुझा बाप. तशा आजारी अवस्थेतही नवर्‍यानं आणि त्यांच्या घरच्यानं त्यांना तुसडेपणाची वागणूक दिली. तरुण मुलगा आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या वडिलांना भेटत होता. ती काही मिनिटांची भेट शेवटचीच ठरली आणि तिथून निघून आल्यानंतर काही महिन्यांनी त्यांना कळलं की त्याच दिवसात त्यांच्या नवर्‍याचा मृत्यू झाला. अभिषेकनं त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागू नये म्हणून ही इतकी मोठी बातमीही त्यांच्यापासून लपवण्यात आली. रमामावशी आणि त्यांच्या मुलाला त्यांचं अंतिम दर्शनही घेता आलं नाही.

या पुस्तकातील अशा अनेक घटना आपल्याला हेलावून सोडतात. माणसाचं आयुष्य किती बेभरोशाचं आणि विलक्षण आहे याची जाणीव करून देतात. पुढे रमामावशींना नियतीनं आणि पोस्टातील एका अत्यंत प्रामाणिक अधिकारी महिलेनं दिलेली साथ त्यामुळं आयुष्याचा सुटलेला एक गंभीर प्रश्न हेसुद्धा चांगुलपणावरील श्रद्धा वाढवणारे आहे. जगात सगळ्या प्रकारची, सगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात हे सत्य या पुस्तकाच्या पानापानांतून दिसून येते.

आशिष निनगुरकर हे उत्तम लेखक आहेतच, पण त्यांचा चित्रपट क्षेत्राशीही जवळचा संबंध आहे. कथा, पटकथा लेखन असेल अथवा दिग्दर्शकास सहाय्य करणे असेल ते कायम तत्पर असतात. आपली नोकरी सांभाळून हा युवा लेखक साहित्य प्रांतात यशस्वी मुशाफिरी करतो आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील सातत्यपूर्ण लेखन आणि सामान्य माणसाच्या विवंचनेची जाणीव यामुळे त्यांची लेखणी सत्याचा कैवार घेते. हे पुस्तक लिहितानाही त्यांनी काही हातचे राखून ठेवले नाही. रमामावशींनी त्यांना जे सांगितले ते उत्तम आणि प्रभावी शैलीत शब्दांकित करणे हे काम सोपे निश्चितच नव्हते. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे या पुस्तकाला एक लय प्राप्त झाली आहे. भविष्यात या पुस्तकावर आधारित एखादा लघुपट आल्यास आश्चर्य वाटायला नको. स्त्रियांवर किती आणि कसे अन्याय-अत्याचार होतात हे समजून घेण्यासाठी म्हणून नाही तर आपल्यातील चांगुलपणाचा आपल्याला विसर पडू नये म्हणून हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. सीतामातेच्या अग्निदिव्याचे सातत्याने उदाहरण दिले जात असतानाच आजच्या काळातील अशा असंख्य माता-भगिनींच्या डोळ्यांतील हे अश्रू बघितले की पुरुषप्रधान व्यवस्थेची लाज वाटू लागते. ही लाज बाळगणारा आणि यातून काहीतरी बोध घेऊन वागणारा समाज उद्याचे आशास्थान ठरणार आहे. रमामावशीने अनुभवलेला संघर्ष अन्य कुणाही महिलेच्या-मुलीच्या वाट्याला येऊ नये एवढीच यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी उत्तमरीत्या साकारले असून आमच्या ’चपराक प्रकाशन’ने या पुस्तकाची निर्मिती केली आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. दैनंदिन कर्तव्ये पार पाडत असतानाच रमामावशींची संघर्षगाथा वाचकांसमोर मांडल्याबद्दल मित्रवर्य लेखक आशिष निनगुरकर यांचंही मनःपूर्वक अभिनंदन करतो. साध्या-सोप्या शब्दांत मांडलेले हे चरित्र काळजाचा ठाव घेते व मनाला विचार करायला भाग पाडते, हेच या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ठ्य आहे.

लेखक- आशिष निनगुरकर
प्रकाशन- चपराक प्रकाशन
मूल्य – 200 रुपये
पृष्ठे – 120

(लेखक साहित्याचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -