घरताज्या घडामोडीपोटाच्या भुकेशी भाषेचा संबंध!

पोटाच्या भुकेशी भाषेचा संबंध!

Subscribe

मातृभाषेतून शिक्षण होण्याची गरज असते. शिक्षण हे मातृभाषेत व्हावे असे जगभरातील भाषातज्ज्ञ सांगत आले असले तरी पोटाची भूक भागविण्याची क्षमता भाषेच्या माध्यमातून निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले तरच ती वाट चालण्यासाठी प्रयत्न होतील. मुळात त्या मार्गाने चालण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे. उच्च शिक्षण जर मातृभाषेत होऊ शकले तर त्यात राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सामावलेला आहे. त्यातून संशोधनाची वृत्ती विकसित होण्यास मदत होईल. त्याचा परिणाम मराठी भाषेतील साहित्याचा दर्जा उंचावण्यासाठी आणि उच्च दर्जा विकसित होण्यास मदत होईल.

जगाच्या पाठीवर काळाच्या ओघात अनेक भाषा मृत्यू पावल्या आहेत. इंग्रजांच्या वसाहती जेथे स्थापन झाल्या तेथील स्थानिक भाषा इंग्रजी भाषेने गिंळकृत केल्या आहेत. या भाषा का मरण पावल्या? मुळात भाषा जिवंत राहण्यासाठी ती लोकव्यवहाराची भाषा बनायला हवी असते. मराठी भाषा ही जोवर लोकसमूहाची भाषा आहे तोवर ती मरण्याची शक्यता नाही. मुळात भाषा ही लोकसंवाद व साहित्याने अधिक काळ टिकत असते. कोणतीही भाषा ही लोकभाषा आणि शिक्षणाची भाषा झाली तर तिचा मृत्यू होण्याच्या भीतीची शक्यता बाळगण्याची गरज नाही. आज मराठी ही महाराष्ट्राची जनमनाची भाषा आहे. तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

अशाच चिंतेच्या सोबत मराठी ही अभिजात भाषा असल्याचे अनेक पुरावे समितीने केंद्र सरकारला सादर केले आहेत. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. संत साहित्याने ती अधिक समृध्द केली आहे. अलिकडे मराठी भाषेत साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत असले तरी साहित्याच्या दर्जाबद्दल चिंता करावी, अशी स्थिती मात्र निश्चित आहे. त्यामुळे इतिहासाने अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणार्‍या मराठी भाषेकरिता वर्तमानात तिच्या समृध्द प्रवासाकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. मुळात भाषा जिवंत राहण्यासाठी आंदोलने, मोर्चे, शासन निर्णयापेक्षा धोरणकर्ते आणि समाज काय प्रयत्न करतो हे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे मराठीची समृध्द परंपरेची पताका आपण पुढे कशी घेऊ जातो हेच अधिक महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

खरेतर आपला देश बहुभाषिक आहे. सर्वेक्षणानुसार देशात 6661 भाषांची नोंद झालेली आहे. त्यापैकी 1635 भाषा या विवेकीकृत मातृभाषा व 1957 भाषांना अवर्गीकृत असे संबोधण्यात आले आहे. 1635 भाषांना विवेकपूर्ण गटात स्थान देण्यात आले आहे. भारतात बोलीसह सुमारे दहा हजार भाषा बोलल्या जात असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. अशा विविध भाषा असताना देशात अवघ्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्राची मराठी ही देखील केंद्र सरकारच्या निकषाची पूर्ती करत असल्याचे विविध पुरावे मिळत आहेत. खरेतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून विशेष अनुदान मिळेल. मात्र त्या अनुदानावर भाषेचा विकास होईल का? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. भाषा विकासाची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. तिच्या विकासासाठी समाज व धोरणकर्ते किती प्रमाणात प्रयत्न करतात हे महत्वाचे. भाषा जिवंत राहण्यासाठी भाषा व्यावसायिक विकासाला अधिक पूरक ठरण्याची गरज असते. आज आपल्याकडे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणात मराठी भाषेचा उपयोग केला जात आहे. अर्थात त्यातही गेल्या काही वर्षात आपल्या राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. विद्यार्थ्यांचा पटही ढासळतो आहे.

उच्च आर्थिक स्तरातील पालकांच्या पाल्यांबरोबर मध्यमवर्गीय पालकांचा ओढा हादेखील इंग्रजी भाषेच्या शिक्षणाकडे दिवसेंदिवस वाढतो आहे. ही वाढत जाणारी संख्या म्हणजे पालकांचा दोष आहे असे नाही, तर मराठी बचावासाठी भूमिका घेणार्‍या सर्वांनी याबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे. मुळात जागतिकीकरण झाल्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या संधी सीमा राष्ट्रापार गेल्या आहेत. त्यामुळे जगाशी संवाद साधण्यासाठी लागणारी इंग्रजी हीच नोकरीची भाषा बनली आहे. त्यामुळे भाषेचा संदर्भ पोटाच्या भुकेशी आहे ही बाब लक्षात घेता मराठी भाषेच्या विकासाचा विचार करण्याची गरज आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मराठी भाषेत केले तरी उच्च शिक्षणात आणि विशेषतः व्यावसायिक शिक्षणाच्या काही अभ्यासक्रमाचा अपवाद वगळता मातृभाषेत अभ्यासक्रमाची उपलब्धता फारशी नाही. त्यातही ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला विशेष प्रतिष्ठा आहे, असे वैद्यकीय, विधी, संगणकीय, अभियांत्रिकीसारख्या अनेक अभ्यासक्रमांची भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे भविष्यासाठी मुलाचे शिकणे आणि नोकरीची वाट सुलभ व्हावी म्हणून प्राथमिक स्तरापासून इंग्रजी माध्यमाच्या भाषेत शिकविण्याचा ओढा वाढताना दिसतो आहे.

- Advertisement -

भविष्याची गरज ओळखून मराठी भाषा ही उच्च शिक्षणाची भाषा बनण्याची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार उच्च शिक्षण हे मातृभाषेत उपलब्ध करून देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. धोरणे किती चांगली असली तरी दुर्दैवाने त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणार्‍या इच्छाशक्तीचा मोठा अभाव आपल्याकडे सातत्याने दिसून येतो. शिक्षण हक्क कायद्याच्या अस्तित्वानंतर किमान प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असेल असे म्हटले होते, मात्र त्याचे देशभरात काय झाले आहे हे बारा वर्षात आपण पाहिले. अलीकडे राजभाषेच्या पलिकडे जात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचे प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरू केले आहेत. ज्यांच्यावरती मराठी शाळा आणि शिक्षण वाचविण्याची व प्रसार करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच अशी पावले टाकली तर ती लोकांची गरज आहे असे म्हटले जाते. पण तसे करण्याची गरज का निर्माण झाली याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मातृभाषेतून शिक्षण होण्याची गरज असते. शिक्षण हे मातृभाषेत व्हावे असे जगभरातील भाषातज्ज्ञ सांगत आले असले तरी पोटाची भूक भागविण्याची क्षमता भाषेच्या माध्यमातून निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले तरच ती वाट चालण्यासाठी प्रयत्न होतील. मुळात त्या मार्गाने चालण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे. उच्च शिक्षण जर मातृभाषेत होऊ शकले तर त्यात राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सामावलेला आहे. त्यातून संशोधनाची वृत्ती विकसित होण्यास मदत होईल. त्याचा परिणाम मराठी भाषेतील साहित्याचा दर्जा उंचावण्यासाठी आणि उच्च दर्जा विकसित होण्यास मदत होईल.

मुळात दिवसेंदिवस मराठी साहित्यात किती उत्तम दर्जाचे साहित्य प्रकाशित होते आहे? मराठी भाषेतील साहित्य कितीप्रमाणात जगातील भाषेत अनुवादित होते? याचाही विचार महत्वाचा आहे. आपल्या साहित्याने जगाच्या प्रश्नांचा वेध घेणे, आपल्या साहित्याची उंची जगाला कौतुकास्पद वाटेल असे काही भाषेत घडण्याची गरज असते. आपल्याकडे साहित्य म्हणून कथा, कांदबरी, कविता, ललित असे साहित्य जरी प्रकाशित होत असले तरी उत्तम वैचारिक साहित्य प्रकाशित होण्याचे प्रमाण किती? याचाही विचार करण्याची गरज आहे. जे निर्माण होते त्याला किती प्रमाणात वाचक मिळतो आहे, मराठी भाषेत वर्तमानात अनेक अनुवादित पुस्तके येता आहेत, ते कोणत्या प्रकारचे साहित्य आहे? याचाही विचार व्हायला हवा. आपल्या मराठी तरूणाईला जी भूक आहे ती भूक भागविणारे साहित्य मराठी भाषेत का येत नाही?

मराठी भाषेचा विचार केवळ अभिजात भाषा, मराठी फलक एवढ्यापुरता करून चालणार नाही. त्या पलीकडे मराठी साहित्यातून मस्तके घडविणे. जागतिक नागरिकत्वाची भाषा होत असताना मराठी मने भाषेतून विकसित करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून शिक्षणाची व्यवस्था भक्कम हवी. लोकांमध्ये शहाणपणाची पेरणी करण्यासाठी ग्रंथालयाची व्यवस्था भक्कम हवी. या प्रयत्नाकडे मराठी वाचविण्यासाठी प्रयत्न करू पाहणारे आणि शासन व्यवस्थेने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ग्रंथालयातून होणारी देवाणघेवाण ही केवळ पुस्तकांची नाही तर ती भाषेची असते. त्यातून मस्तके समृध्द होतात आणि त्यामुळे भाषा समृध्दतेचा प्रवास सुरू होत असतो. आपल्याला भाषा टिकवायची असेल, तिला पुढे घेऊन जायचे असेल तर ग्रंथालयाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठी शासनाने भूमिका घेण्याची गरज आहे. आजही गावोगावी ग्रंथालये नाहीत, शाळांना ग्रंथपाल नाहीत. मग भाषा कशी समृध्द होणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्याचबरोबर मराठीचा उत्सव म्हणून आपण दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करतो. कोणत्याही भाषेसाठी असे उत्सव गरजेचे असतात.

मात्र त्यापलीकडे असे उत्सव गावोगावी होण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. उत्तम साहित्याच्या विकासासाठी नवोदितांची मस्तके आणि लेखणीत शक्ती भरण्यासाठी प्रयत्नाचा अभाव आहे. त्या प्रयत्नासाठी साहित्य संस्थांनी भूमिका घेऊन प्रयत्न करायला हवेत. इंग्रजी भाषा ही जगावर अधिराज्य करणारी भाषा मानली जाते. त्या भाषेत दरवर्षी नव्या नव्या शब्दांची भर पडते. नवे नवे शब्दकोश सातत्याने प्रकाशित होतात. शब्दकोश हे त्या त्या भाषेचे वैभव असते. आज असे शब्दकोश मराठीत किती प्रमाणात प्रकाशित होतात? याचाही विचार व्हायला हवा. गेल्या काही दशकात मराठीत असे प्रकाशनाचे प्रमाण सातत्याने कमी होताना दिसते आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर अऩेक संकल्पना, विषय नव्याने आले. त्यासाठी नवनव्या शब्दांचा समावेश केला गेला आहे. त्या स्वरूपात मराठीत नवीन शब्दांची भर सातत्याने पडण्याची गरज आहे. असे प्रयत्न जितके होतील तितकी भाषा समृध्द होत जाणार आहे. मराठीच्या उत्सवा इतकेच मराठी भाषा विकासासाठी गंभीरपणे पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय मराठी राजभाषा दिनाला तरी काय अर्थ उरणार आहे ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -