Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश धर्मधुरीण हेच समाजाचे शत्रू

धर्मधुरीण हेच समाजाचे शत्रू

Subscribe

संत हे मुळातच मानवी सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असतात, परंतु आपले लहान बंधू ज्ञानदेव यांच्या म्हणण्याला महत्व देऊन निवृत्तीनाथांनी पुन्हा पैठणला त्याच धर्मपीठाकडे जाण्यास संमती दर्शवली. ज्या कर्मठ धर्माने किंवा त्याचे संचालन करणार्‍या धर्मधुरीण यांनी विठ्ठलपंतांना देशोधडीला लावले. तो धर्म किती सहिष्णू आहे, त्याच्याजवळ मानवी दयाभाव आहे हे या भावंडांनी समाजाला दाखवून दिले. धर्माच्या आणि त्यातल्या तत्त्वज्ञानाच्या अवजड पखाली वाहणारे धर्मधुरीण हेच समाजाचे शत्रू आहेत, हा मुख्य विचार तत्कालीन धर्मसभेमध्ये निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानेश्वरांनी बोलून दाखविला.

– प्रा.अमर ठोंबरे

मागच्या लेखात आपण निवृत्तीनाथांची गुरुपरंपरा तसेच त्यांची वैचारिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याचा मागोवा घेतला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि पुढे एकनाथ, नामदेव, तुकाराम यातील निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदाय आणि भागवत धर्म याचा सुयोग्य समन्वय घालून एक नवा वारकरी पंथ ज्ञानेश्वरांकरवी महाराष्ट्राला देणारे संत होते. असं नेहमी म्हटलं जातं की निवृत्तीनाथांनी महाराष्ट्राला काय दिले? तर त्याचे प्रामुख्याने एकच उत्तर आहे की निवृत्तीनाथांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा भागवत धर्म दिला आणि नंतर ज्ञानेश्वर दिले. या दोन्हीही मोठ्या गोष्टी निवृत्तीनाथांनी महाराष्ट्राला दिल्या आहेत. आपण जेव्हा या चार भावंडांचं चरित्र बघतो अर्थात निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ती.

- Advertisement -

तेव्हा विठ्ठलपंतांच्या देहत्यागानंतर संन्याशाची म्हणून हिणवली जाणारी ही मुलं त्याच धर्मरक्षकांकडे पुन्हा गेली होती, ज्या धर्माच्या ठेकेदारांनी विठ्ठलपंतांना देहदंडाची शिक्षा दिली. मग आपण पुन्हा याच धर्माच्या ठेकेदारांकडे का जावं? ज्यांनी आपल्या पित्याला मृत्युदंड ठोठावला आहे. शुद्धिपत्रके आपल्याला मिळालीत किंवा मिळाली नाही याविषयी मात्र वडील बंधू या नात्याने निवृत्तीनाथ तटस्थ होते. किंबहुना, पुन्हा आपल्याला धर्मात सहभागी करून घ्यावे याही मताच्या ते विरुद्ध होते. आपण मूळचे शुद्ध आहोत ही त्यांची अध्यात्मातली भूमिका होती. संत नामदेवांनी निवृत्तीनाथांची ही भूमिका त्यांच्या अभंगगाथेत मांडली आहे.

नाही जाती कुळ वर्ण अधिकार क्षेत्री, वैश्य शूद्र द्विज न व्हो, पुढे ते म्हणतात, नव्हे मी निर्गुण नव्हे मी सगुण
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट निजबोधे स्वरूप माझे

- Advertisement -

संत हे मुळातच मानवी सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असतात, परंतु आपले लहान बंधू ज्ञानदेव यांच्या म्हणण्याला महत्व देऊन निवृत्तीनाथांनी पुन्हा पैठणला त्याच धर्मपीठाकडे जाण्यास संमती दर्शवली. ज्या कर्मठ धर्माने किंवा त्याचे संचालन करणार्‍या धर्मधुरीण यांनी विठ्ठलपंतांना देशोधडीला लावले. तो धर्म किती सहिष्णू आहे त्याच्याजवळ मानवी दयाभाव आहे हे या भावंडांनी समाजाला दाखवून दिले. धर्माच्या आणि त्यातल्या तत्त्वज्ञानाच्या अवजड पखाली वाहणारे धर्मधुरीण हेच समाजाचे शत्रू आहेत, हा मुख्य विचार तत्कालीन धर्मसभेमध्ये निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानेश्वरांनी बोलून दाखविला. आणि त्यातूनच पुढे लोककेंद्री अशा भागवत धर्माचे नवे रूप उदयाला आले. तुकोबारायांच्या भाषेत ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ याप्रमाणे चांगल्या धर्माचे सहिष्णुरूप निवृत्तीनाथ आणि भावंडांनी महाराष्ट्राला दिले. अर्थात विठ्ठलपंतांना झालेला देहदंड हेही या पाठीमागचे एक कारण असावे. कारण खरा धर्म हा माणसाच्या प्रगतीआड येणारा नसून तो तर मानवी उत्थानाचा मूळ स्रोत आहे, हे या भावंडांनी जगाला दाखवून दिले.

या नव्या भागवतधर्मात संतांनी बनवलेले कायदेकानून होते. ज्ञानदेवांसारखा थोर तत्वनिष्ठ साधू या धर्माच्या अधिष्ठानात सहभागी होता तर दुसरीकडे चोखामेळ्यासारखा संत याच धर्माने अंगाखांद्यावर खेळवला. समाजातल्या खालच्या थरातला एकूण एक माणूस या चालत्या बोलत्या धर्मपीठाचे वाहक होते. त्यांच्यामध्ये समता नांदत होती लोकशाही नांदत होती. परमेश्वरप्राप्तीचे साधन जटिल कर्मकांडात नसून ते रोजच्या जगण्यात आहे. धर्म हा माणसाच्या रोजच्या जगण्याच्या केंद्रस्थानी याच संतमांदियाळीने आणला. निवृत्ती ज्ञानदेव यांनी पहिल्यांदा खर्‍या अर्थाने ही मानवमुक्तीची पालखी उचलली. पुढे तुकोबा निळोबांपर्यंत असंख्य हात या पालखीला लागले. पैठणच्या धर्मपीठाचा ओढा पंढरपूरकडे वळला आणि तमाम श्रमजीवी, वारकरी आणि फाटक्या लोकांचे माहेर खर्‍या अर्थाने पंढरपूर बनले. कारण पंढरपूरचा विठोबा हाच मुळात श्रमजीवींचा प्रतिनिधी आहे. या पांडुरंगाने ज्यांना ज्यांना मदत केली त्या लोकांकडे जर आपण बघितलं तर ते कुणीही धनदांडगे किंवा वरच्या स्तरातले नसून सारे काही गमावलेले लोक होते.

नामदेवांची दासी जनी आणि कान्होपात्रा हे यातीलच आहे. कारण उत्पादनाची साधने ज्या वर्गाच्या हातात होती तो वर्ग खर्‍या धर्मापासून लोकांना वंचित ठेवत होता. मग याला पर्याय काय? तर याला पर्याय म्हणजे पर्यायी धर्मव्यवस्थेची उभारणी करणे. आणि ती संतांनी केली. स्वतःचे कायदेकानून संतांनी निर्माण केल्यामुळे पुरोहितांनी दाबलेला देवधर्म सहजपणे तळागाळातल्या लोकांच्या अंगण-ओट्यावर खेळू लागला. आणि तिथूनच पुढे संस्कृत श्लोकांऐवजी संतांचे लडिवाळ अभंग सामान्यांच्या ओठावर नाचू लागले. ज्या अभंगांमध्ये शेतीमाती होती, नवरा बायकोचे खट्याळ भांडण होते, संसारातली उणीदुणी होती. आणि यातून आपलं कोणीतरी गार्‍हाणं ऐकणारा आहे, ही जाणीव त्यांना झाली. संतांची ही लोकभाषा केवळ त्याच लोकांना समजत होती जे या प्रस्थापित व्यवस्थेकडून नाडले गेले होते. असा हा संतांचा भागवत धर्म सामान्यांचा जगण्याचा आधार बनत होता. आपण अजूनही काही संतांचे विचार अनुभवणार आहोत ते पुढील भागात.

- Advertisment -