घरफिचर्ससारांशगाणं एका रात्रीच्या गोष्टीचं!

गाणं एका रात्रीच्या गोष्टीचं!

Subscribe

‘रात्र काळी असते. तिच्या चेहर्‍यावर कुणीही कितीही प्रकाशाचे थर लावा, तिचा काळपटपणा उघडा पडतोच. तिचं आगमन झालं की अंधार पसरतो. अंधाराचं साम‘ाज्य सुरू होतं. त्या साम‘ाज्यात कृष्णकृत्यांचंही राज्य सुरू होतं. मनात काळं असणार्‍यांसाठी रात्र ही पर्वणी असते. अवघं जग तेव्हा सुखाने झोपी गेलेलं असतं. अशा निद्रिस्त जगात अशीही माणसं असतात की ती टक्कं जागी असतात. लोक कधी झोपी जाताहेत ह्याची जणू ती वाट पहात असतात. त्यांचे सगळे व्यवहार उघड्या डोळ्यांनी होत असतात, पण तेव्हा आलम विश्वाचे डोळे मिटलेले असतात. त्यांना आपली लबाडीची कामं करताना उजेड नको असतो. त्यांना उजेडाची अ‍ॅलर्जी असते असं समज. ...‘

एक निर्माता आपल्या सिनेमाची गाणी लिहिणार्‍या गीतकार मित्राला आपल्या सिनेमाची गोष्ट ऐकवत होता. गीतकार कान देऊन ती कथा ऐकत होता.

‘…तर ह्या गोष्टीतली ही रात्र मनात काहीतरी काळंबेरं घेऊन उगवलेली आहे. ही रात्र क्षणाक्षणाने पुढे सरकू लागते तेव्हा लोक निद्रादेवीच्या अधीन होऊन घोरूही लागलेले आहेत. एका महानगरातले दगडी रस्ते चांगलेच सुनसान झालेले आहेत. दगडी इमारतीही रात्रीच्या त्या सुनसान अंधारात अंग चोरून उभ्या आहेत. आता रात्रीचा बरोबर पाऊण वाजला आहे. रात्रीने आपला काळा रंग गडद करायचं काम हाती घेतलं आहे. रस्त्यावर काही शिपाई पहारा देताहेत, गस्त घालताहेत, ’जागते रहो, जागते रहो’ असा त्यांच्या गळ्यातून खोल उमटणारा ध्वनी रात्रीचा अंधार अधेमधे चिरतो आहे. त्यातल्या एका शिपायाने ’जागते रहो’ असा आवाज दिल्यावर दुसरा शिपाई त्याला प्रतिसाद म्हणून आपल्या गळ्यातून पुन्हा ’जागते रहो’ असा विलंबित सूर लावतो आहे. त्यांचं जागं राहण्याचं काम आहे म्हणून ते ’जागते रहो, जागते रहो’चा जप चालू ठेवून आहेत. त्यातही कुणीतरी पेंगतोय आणि पेंगता पेंगताच ’जागते रहो’ अशी हाळी देतोय. जागण्याचं जे काम ज्यांच्यावर विश्वासाने सोपवलेलं आहे तेच झोपलेले आहेत, अशी ह्या गोष्टीची सुरूवात आहे…‘

- Advertisement -

निर्माता गीतकाराला ही गोष्ट सांगत होता, पण त्या गोष्टीतली फक्त रात्रच पुढे सरकते आहे असं ती गोष्ट ऐकत असलेल्या गीतकाराला वाटत होतं. त्या गोष्टीतली ती रात्र पुढे सरकताना पुढे काय घडणार आहे ह्याची गीतकाराला उत्सुकता होती.

‘…हं…तर अशा पध्दतीने एक काळी कभिन्न रात्र मध्यावर येऊन पोहोचते हे कळलं मला…पुढे?‘ गीतकाराने निर्मात्याला शांतपणे विचारलं आणि आपल्या हाताची दोन बोटं गालावर ठेवली.

- Advertisement -

गोष्ट सांगता सांगता गोष्टीतली रात्र आपण जरा जास्त लांबवली आहे हे निर्मात्यालाही कळलं. मग त्याने गोष्टीला थेट हात घातला. त्याने गोष्टीतली उत्तररात्र सांगायला सुरूवात केली.

‘…तर अशी ही रात्र आता उलटण्याच्या दिशेने प्रवास सुरू करत असतानाच एक गरीब खेडवळ माणूस एका नळाजवळ पोहोचतो. गस्त घालणार्‍या शिपायाच्या नजरेला तो पडतो. ह्या गरीब खेडवळ माणसाच्या अंगावर अगदीच कळकट-मळकट कपडे आहेत. त्याचं फाटकं धोतर कसंबसं त्याच्या गुडघ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अंगावरच्या कोटालासुध्दा भोकं पडलेली आहेत. महानगरात येऊन तो गोंधळलेला, भांबावलेला आहे हे त्याच्या वागण्यावावरण्यातून सरळ सरळ दिसतं आहे. त्याच्या दाढीचे खुंट वाढलेले आहेत. त्यांना तो सारखा गोंधळून हात लावतो आहे. कान खाजवतो आहे. पण त्याच्या निरागस डोळ्यांत भीती दाटलेली आहे. त्याचं कारण आहे – तो रात्रभर जिथे जिथे फिरला तिथे त्याला लोक चोर समजले आहेत. त्याच्या मागे लागलेले आहेत. त्या सगळ्यांपासून आपला जीव वाचवत वाचवत तो इथे ह्या नळापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तो तहानलेला आहे आणि त्याला फक्त पाणी हवं आहे. फक्त घोटभर पाणी इतकीच त्या रात्रीतली त्याची गरज आहे. खेड्यातून कामाधंद्याच्या शोधात आलेला तो खेडूत आहे.

आपल्याला लोक चोर समजले आहेत ह्या दु:खाचाही त्याला आता विसर पडला आहे. आपली भूक नव्हे तर छोटीशी तहान भागवण्याच्या शोधात तो आहे. शिपाई त्याला हटकतो तेव्हा तो हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. पण शिपाई त्याचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तो त्याला हाकलून देतो. शेवटी सगळ्यांच्या तावडीतून सुटून हा खेडूत एका लहान मुलीच्या खोलीत आसरा घेतो. पार घाबरलेला हा खेडूत खोलीत शिरताच दार बंद करतो तेव्हा त्या खोलीतली मुलगी म्हणते, ‘सकाळ झालीय. सकाळच्या वेळी दार उघडायला हवं, नाहीतर प्रकाश आत कसा येणार?‘ ती मुलगी त्याची एकूण अवस्था पाहून पुढे विचारते, ‘तू घाबरला आहेस का? तू का घाबरला आहेस? तू तर तसं काहीच केलेलं नाहीस!‘ ह्यातल्या कोणत्याच प‘श्नाचं उत्तर त्या खेडुताकडे नसतं. त्याच वेळी त्या खोलीच्या खिडकीतून गाण्याचे सूर त्याला ऐकू येतात. त्या खोलीतली ती मुलगी त्याला हात धरून वर उठवते. दरवाजा उघडते आणि बाहेरची वाट दाखवते. बाहेर स्वप्नमय दिसावी अशा बागेत त्याला दिसतं की एक तरूणी झाडांना पाणी घालते आहे, कबुतरांना पाणी पाजते आहे. तो तहानलेला खेडूत हाताची ओंजळ करून आपल्याला तहान लागल्याचं खुणेने तिला सांगतो. हा खूप तहानलेला आहे हे तिला कळतं. ती त्याच्या ओंजळीत पाण्याची धार धरते.‘

निर्माता त्याची गोष्ट संपवतो. आपल्या गीतकार मित्राला सांगतो, ‘गोष्टीतला हा शेवटचा प्रसंग हा त्या संपूर्ण गोष्टीचा आत्मा आहे. मला ह्या प्रसंगाला अगदी अनुरूप गाणं तुझ्याकडून हवं आहे.‘

गीतकार ती गोष्ट आणि गोष्टीतला तो प्रसंग आपल्या मनाच्या कप्प्यात नोंदवतो…आणि एके दिवशी त्या गोष्टीच्या खोल गाभार्‍यात शिरल्यावर त्याला सुचलेले शब्द लिहितो –

जग उजियारा छाये,
मन का अंधेरा जाये,
किरनों की रानी गाये,
जागो हे, मेरे मन मोहन प्यारे,

जागी रे, जागी रे जग कलियां जागी,
जागी रे जागी रे जागी रे…जाग रे.

जागो मोहन प्यारे जागो,
नव युग चुमे नैन तिहारे,
जागो मोहन प्यारे, जागो.

…ह्यात ही गोष्ट खुलवून सांगणारा निर्माता होता राज कपूर…आणि गोष्ट ऐकून त्याला साजेसं गाणं लिहून देणारा शब्दांचा निर्माता होता…गीतकार शैलेन्द्र!…आपल्याला हवं तसं गाणं लिहिलं गेलं आहे हे राज कपूरना लगेच कळून आलं आणि त्यांनी सलील चौधरींकडे ते शब्द सोपवले. गाणं ऐकताना आजही अंगावर काटा येतो ह्यातच त्या गाण्याचं मर्म आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -