रावीपार

‘रावीपार’ ही कथा आणि त्यातली ‘दर्शनसिंग’ ही व्यक्तिरेखा काळजात रुतून बसते. उण्यापुर्‍या साडेचार पृष्ठांची ही कथा. मूळ उर्दू भाषेत लिहिलेली, पण इंग्रजीच्या वाटेने मराठीत येऊन स्थिरावलेली. विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी मराठीत अनुवादित केलेली. भारत-पाकिस्तान फाळणीचा काळ. विलक्षण वेगाने घडणार्‍या घटना. माणुसकीला कबरीत दफन करून हातात धर्मांधतेच्या नंग्या तलवारी घेऊन नाचणार्‍या माणसांचा हैदोस चाललेला. या हैदोसाच्या कल्लोळात दर्शनसिंगाचा बाप घरी मरण पावला तर आई भग्न, उद्ध्वस्त झालेल्या गुरूद्वार्‍यात हरवली. पुढे भारतात येणार्‍या ट्रेनच्या टपावरून येताना त्याच्या नवजात दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो.

‘partition literature’ अर्थात ‘फाळणीचे साहित्य’ हा भारतीय साहित्यातील एक दुर्लक्षित प्रवाह आहे. हे खरे आहे की, एखाद दुसरा अपवाद वगळता मराठी साहित्यात फाळणीच्या त्रासदीच्या खुणा उमटलेल्या नाहीत. पण भारतीय भाषांपैकी उर्दू, हिंदी आणि पंजाबी भाषेतील साहित्यात मात्र काळीज विदीर्ण करून टाकणार्‍या फाळणीच्या भळभळत्या जखमांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून येते. सआदत हसन मंटो, भीष्म साहनी, अमृता प्रीतम यांच्या साहित्यातून तर जणू या वेदनेचे रक्त सारखे ठिबकत राहते.
गीतकार, संवेदनशील कवी आणि मनस्वी दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेल्या गुलजार यांच्या साहित्यातूनही फाळणीतून उद्भवलेल्या ‘एलिएनेशन’च्या खुणा जागोजागी विखुरलेल्या आढळतात.
दहा वर्षे झाली असतील पहिल्यांदा वाचून पण ‘रावीपार’ ही कथा आणि त्यातली ‘दर्शनसिंग’ ही व्यक्तिरेखा अजूनही काळजात तशीच ठसठसती आहे.
उण्यापुर्‍या साडेचार पृष्ठांची ही कथा. मूळ उर्दू भाषेत लिहिलेली, पण इंग्रजीच्या वाटेने मराठीत येऊन स्थिरावलेली. विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी मराठीत अनुवादित केलेली.
भारत-पाकिस्तान फाळणीचा काळ. विलक्षण वेगाने घडणार्‍या घटना. माणुसकीला कबरीत दफन करून हातात धर्मांधतेच्या नंग्या तलवारी घेऊन नाचणार्‍या माणसांचा हैदोस चाललेला. या हैदोसाच्या कल्लोळात दर्शनसिंगाचा बाप घरी मरण पावला तर आई भग्न, उद्ध्वस्त झालेल्या गुरूद्वार्‍यात हरवली.
हयात असताना फाळणीच्या घटनेने बाप अस्वस्थ झाला होता, पण भीती त्याच्या मनाला स्पर्श करू शकली नव्हती. त्याचे म्हणणे होते: ‘धर्म वेगळा असला म्हणून काय झालं, शेकडो वर्षांपासून आपण एकजीव होऊन जगलोय; त्यात दरार कशी पडेल?’ बापाचे हे भाबडेपण दर्शनसिंगाला रुचणारे नव्हते. धर्माचा उद्घोष करत रात्रंदिवस घोंगावणार्‍या रक्तपीपासू झुंडीच्या वार्ता शिशाच्या तप्त रसाप्रमाणे त्याच्या कानात शिरत होत्या. बापाचा भाबडा काळ आता मागे पडला, याची तीव्र जाणीव त्याला होत होती. म्हणून तर जिथे त्याचा जन्म झाला, बालपण गेले, तारुण्याच्या हळव्या काळात जिथे मोहरला, तिथला सगळा माहौल विषारी झाल्याची खात्री त्याला लवकर पटली आणि वडिलांच्या अपघाती जाण्याने तर जणू त्याचा त्या पर्यावरणातला जीवनरसच संपला.
काही दिवस गुरूद्वार्‍याच्या आश्रयाला उरलेला कुटुंबकबिला घेऊन तो राहिला खरा, पण इथून आपण ‘एलियनेट’ झालोय, ही भावना सारखे त्याचे काळीज कुरतडत राहायची. अखेर एके दिवशी हा सगळा दाब त्याला असह्य झाला आणि तो आपल्या कुटुंबाला घेऊन गुरूद्वार्‍यातून बाहेर पडला. त्याने या मातीत खोलवर व्यापून राहिलेली आपली सगळी मुळे जणू उपटून घेतली. कुठे जाणार? कुठे राहणार? काय करणार? या विवंचनेतच तो स्टेशनवर येवून पोचला.
‘निर्वासितांना भारताकडे घेऊन जाणार्‍या ट्रेन सुरू झाल्या आहेत’ हे त्याने ऐकले होते. म्हणून तो स्टेशनवर आला खरा, मात्र इथे तर स्टेशनला मोठ्या छावणीचे स्वरूप आले होते. भूक, दुखणी, आजारपण यांनी विव्हळणारी माणसे स्टेशनच्या आडोशाला आलेली होती. लोक सांगत होते, पाच दिवसांपूर्वी निर्वासितांना घेऊन एक ट्रेन गेली. पण तिच्यात तिळाएवढीही जागा शिल्लक नव्हती.
आता मात्र दर्शनसिंगाच्या डोळ्यांपुढे अंधारी दाटून आली. बाप गेला.आई गुरुद्वार्‍यात बिछडली. सारे काही असताना आपण उघड्यावर आलो. नेमक्या त्याच वेळी त्याच्या बायकोने-शाहनीने-जुळ्या मुलांना जन्म दिला. जणू नशिबाने त्याच्यासोबत ‘इस हाथ ले, इस हाथ दे’ चा सौदा केला होता.
अजूनही सारे काही संपलेले नाही. ‘वाहे गुरु’ आपल्यावर मेहरबान आहे, म्हणून तो मनोमन सुखावला. अखेर ट्रेन आली. त्याने झाकण लावलेल्या एका वेताच्या टोपलीत जुळ्या मुलांना ठेवून ती आपल्या डोक्यावर घेतली.
स्टेशनवर ट्रेन आली खरी. परंतु त्यात मुंगीलाही पाऊल ठेवता येऊ नये एवढी गर्दी होती. मात्र तरीही ओली बाळांतीन आणि नवजात अर्भके यामुळे दया येऊन लोकांनी त्यांना रेल्वेच्या टपावर जागा करून दिली.
शाहनी-दर्शनसिंगाची बायको, यातले तिला काय आवडत होते-नव्हते, माहीत नाही तरी सावली होऊन ती नवर्‍याची सोबत करत होती.
खोल गेलेले डोळे, व्याकुळ झालेली नजर आणि खपाटीला गेलेले पोट घेऊन आळीपाळीने ती दोन्ही लेकरांना पाजत होती.परंतु शरीरात दुधाचा थेंबही शिल्लक नसल्याने पोरांना छातीशी कवटाळण्यापलीकडे दुसरे काही घडत नव्हते.
बर्‍याच वेळेनंतर, रात्र झाल्यावर दर्शनसिंगच्या लक्षात आलं की एका मुलाची हालचाल चालू आहे, रडण्याचा आवाज येतोय, पण दुसरा तर अगदी थंड पडलाय.
त्याने टोपलीत चाचपून पाहिलं. त्या मुलाचं शरीर थंडगार पडलं होतं.
बापाचा मृत्यू,आईचं बिछडणं, जन्मभूमीपासून दुरावल्याचं दुःख यामुळे अगोदरच मोडून पडलेला दर्शनसिंग नवजात मुलाच्या मृत्यूने जणू उन्मळून पडला. असहायतेने रडू लागला. लोकांनी समजावलं. शाहनीजवळून ती टोपली घेण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण या सार्‍या वैफल्याने तिचा तर दगड झाला होता. ती टोपलीला कवटाळून बसली होती.
मध्ये बराच वेळ गेला.
अखेर लाहोर आलं. लाहोर आलं म्हणजे हिंदुस्थानात पोचलोच. लोकांनी ‘हर हर महादेव!’ ‘जो बोले सो निहाल!’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
गाडी एका पुलावर आली. पूल आला म्हणजे ‘रावी नदी’ आली, हे लोकांच्या लक्षात आले. लोक आनंदले. तेवढ्यात कुणीतरी येऊन दर्शनसिंगाच्या कानात पुटपुटले, ‘सरदारजी, मुलाचं प्रेत इथं रावीतच टाकून द्या. कल्याण होईल त्याचं.’
दर्शनसिंग भानावरच नव्हता. या पुटपुटण्याने तो भानावर आला. पोराची टोपली त्याने हळूच बायकोपासून ओढून बाजूला घेतली. मग अचानक त्या टोपलीत हात घालून दुपट्यात गुंडाळलेलं ते पोर एका झटक्यात उचललं अन् ‘वाहे गुरू’ म्हणून रावीच्या प्रवाहात फेकून दिलं.
अंधारात पोराच्या रडण्याचा अस्फुटसा आवाज ऐकू आला.
भांबावलेल्या दर्शनसिंगाने घाबरून बायकोकडे पाहिले.
‘मेलेलं मूल’ तिने छातीशी घट्टपणे कवटाळून ठेवलेलं होतं.
नेमकं काय घडलंय हे समजण्या इतपतही तिला भान नव्हतं आणि काय घडलंय हे लक्षात आल्याने दर्शनसिंग मात्र पुरता बेभान झाला होता.
ट्रेनमध्ये मात्र कोलाहल उसळला होता,
‘वाघा! वाघा!’
‘हिंदुस्थान जिंदाबाद!’
पृष्ठावर छापलेली कथा इथे संपते.
परंतु दर्शनसिंग आणि शाहनीच्या आयुष्याचा फाळणीच्या घटनेने जो पालापाचोळा केला, त्याने आपण पुरते अस्वस्थ होऊन जातो. रावीत फेकलेल्या नवजात अर्भकाचे आक्रंदन आपल्या काळजाला चिरे पाडत जातं….
तसे आपण मराठी मुलखात राहणारे लोक….फाळणीच्या ज्वाळा आपल्यापैकी कुणाच्याही घरापर्यंतच काय पण उंबरठ्यापर्यंतही आलेल्या नाहीत. परिणामी ‘परदुःख शीतल’ या न्यायानेच आपण ही घटना अन् तिच्या परिणामांकडे पाहतो. पण मग मध्येच दर्शनसिंग आणि शाहनी रावी ओलांडून आपल्या भावविश्वात उतरतात आणि निर्वासनाची, विस्थापनाची वेदना आपल्याही उरात ठणकू लागते.
‘परदुःख शीतल’ या उथळ भावापासून ते ‘परकाया प्रवेश करून दुःखजाणीवे’त उतरण्याच्या नितळ भावनेपर्यंतचा हा प्रवास घडतो तो कलेच्या, कलावंतांच्या बळावर.
आपल्या जाणिवेच्या मध्यमवर्गीय वर्तुळाला दर्शनसिंगाच्या दुःखापर्यंत घेऊन जाणार्‍या गुलजारांनी आपल्या एका कवितेत विणकराला उद्देशून जे म्हटलंय ते आपणा समस्त कलावंतांना लागू होणारे आहे :

‘मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है की ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और कोई सिरा जोड के उसमें
आगे बुनने लगते हो…
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे…’