घरफिचर्ससारांशगोष्ट एका बाटलीची...

गोष्ट एका बाटलीची…

Subscribe

रम म्हटल्यावर सगळे दोन पावलं मागेच सरकले. देशकराच्या चाळीत रमची बाटली? ‘पण काय हो, दादांना ती रमच आहे, हे समजलं कसं?’ नानू परांजपे बाजूला उभ्या असलेल्या पांडोबा परिटाच्या कानात कुजबुजला. पांडोबालाही हसू आवरलं नाही आणि दोघांनी एकमेकांना टाळ्या देत गपचूप हसून घेतलं. दादरच्या देशकराच्या चाळीत अचानक एके दिवशी रमची बाटली सापडली आणि खळबळ उडाली. व्यसनमुक्ती असताना चाळीत ही बाटली आलीच कशी, यावरून मोठं रणकंदन झालं, त्याची ही काल्पनिक गोष्ट...

गोष्ट तशी फार जुनी नाही. पण फार नवीनही नाही. म्हणजे शोले चित्रपट थिएटरमध्ये लागून दोन आठवडेच झाले होते. तेव्हाची गोष्ट! दादरच्या बोरकरवाडी, टायकलवाडी अशा अनेक वाड्यांपैकीच एका वाडीच्या टोकाला रस्त्याकडे तोंड करून दिमाखात उभ्या असलेल्या देशकराच्या चाळीतली गोष्ट! देशकराची चाळ म्हणजे इतर चाळींसाठी आदर्श! चाळीतील जुन्याजाणत्या संस्कृतीपरायण लोकांनी एकत्र येत चाळीची घटना तयार केल्याची घटना सर्वात आधी याच चाळीत घडली. स्वच्छता सप्ताहापासून दारूबंदीपर्यंत आणि गणेशोत्सवापासून अगदी दहीहंडीपर्यंत सगळे सण अगदी नियमाने साजरी करणारी ही चाळ इतरांसाठी मोठा आदर्श होती.

अशा या चाळीत अचानक एके रात्री मोठा गहजब उडाला. गच्चीकडून कोलाहल ऐकू यायला लागला. त्या कोलाहलात नेमकं घडलंय काय, हे कोणालाच कळत नव्हतं. पण सगळेच जण, ‘सापडला, सापडला’ असं ओरडत वरच्या मजल्याकडे धावत होते. गच्चीवर चाळीतील संस्कृतीचे राखणदार असा बहुमान मिळवलेले दादा पारसेकर हातात चाळीतल्याच सर्वात सधन घरातल्या बंड्या सांवताचं बकोट पकडून उभे होते. दादांच्या मागे त्यांचे मित्र अण्णा तोरसेकर, भाई पाटोळे, नाना साने आदी इतर मुलांच्या कानशिलात भडकावत होते.

- Advertisement -

‘दादा, झालंय काय? आधी त्या सावंतांच्या बंड्याचं बकोट सोडा बघू!’ गर्दीतून कोणसंसं ओरडलं. ‘काय झालंय? ज्याची भीती होती तेच झालंय. चाळीचं पावित्र्यं भंगलं,’ मोकळा असलेला दुसरा हात हवेतल्या हवेत नाचवत दादा उत्तरले. खरं तर ते खूप विनोदी दिसत होते, पण प्रसंगाचं गांभीर्य ओळखून नानू परांजपेने कुजकट शेरा मारणं टाळलं.

‘बंड्या, तू सांग बघू. काय झालंय?’ आठ नंबरच्या खोलीत राहणारे बन्या नाबरचे बाबा पृच्छते झाले. ‘तो काय बोलेल! दात उपटणार नाय त्याचे मी?’ दादा पुन्हा कडाडले. आता हे जरा अतीच झालं होतं. नेमकं काय घडलंय, तेच कोणाला कळत नव्हतं आणि छापा मारणारे कोणाला पत्ताही लागू देत नव्हते. तेवढ्यात सावंत पुढे आले. ‘दादा, पोराला सोडा. त्याने केलंय काय? आणि असं बकोट धरायला आमची पोरं काय रस्त्यावर नाय पडली.’

- Advertisement -

दादांनी सावंतांकडे ज्या नजरेने बघितलं तशा नजरेने पुराणकाळात ऋषी दुसर्‍याकडे बघत आणि समोरच्याचं भस्म करत. ‘काय केलंय? हा बंड्या, बापटांचा जन्या, बेंद्य्राची सुमी आणि कटकोळांचा रम्या गच्चीच्या कोपर्‍यात बसले होते आणि त्यांच्याकडे ही रमची बाटली सापडली. आता बोला!’

रम म्हटल्यावर सगळे दोन पावलं मागेच सरकले. देशकराच्या चाळीत रमची बाटली? ‘पण काय हो, दादांना ती रमच आहे, हे समजलं कसं?’ नानू परांजपे बाजूला उभ्या असलेल्या पांडोबा परिटाच्या कानात कुजबुजला. पांडोबालाही हसू आवरलं नाही आणि दोघांनी एकमेकांना टाळ्या देत गपचूप हसून घेतलं.

आता सावंतांची पंचाईत झाली. खरं तर सावंत, बापट, बेंद्रे आणि कटकोळ एकाच हापिसात कामाला होते. त्यामुळे ते नेहमी एकत्र असायचे. सावंत हुद्द्याने जरा वर असले, तरी बापट, बेंद्रे आणि कटकोळ यांची कमाईदेखील चाळीतील इतर कुटुंबांपेक्षा जरा चांगलीच होती. त्यामुळे ही चार कुटुंबं इतर चाळकर्‍यांशी जरा तोर्‍यातच वागायची. त्यांच्या घरात मोकळेढाकळेपणा होता. खरं तर चाळीतील संस्कृतीरक्षकांच्या डोळ्यात तो कधीच आला होता, पण चारही कुटुंबं एकमेकांना घट्टं धरून होती आणि सधन होती. चाळीतील गणपतीसाठी सर्वात जास्त वर्गणी याच घरांमधून यायची. त्यामुळे त्यांच्यासाठी ही चार कुटुंबं अवघड जागेचं दुखणं झाली होती.

‘रमची बाटली सापडली, तर त्यात एवढा आरडाओरडा करण्यासारखं काय आहे? अहो, आंग्र्यांच्या चाळीतला नाग्या तर हातभट्टी लावतो. परळकराच्या चाळीतली पोरं सिगारेटही पितात,’ सावंत कडाडले.

सावंतांची ही भूमिका अर्थातच बहुसंख्य चाळकर्‍यांना मान्य नव्हतीच. या चार कुटुंबियांची सधनता त्यांना खटकायचीच. आता तर चांगलंच निमित्त मिळालं होतं. सर्वात पहिले तोंड सोडलं ते पहिल्या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या खोलीत राहणार्‍या मन्या पाटलाने! सावंत आणि मन्यामध्ये जातीचा पोटभेद होता आणि त्यावरून त्यांचं भांडण आधीपासूनच होतं. त्यामुळे मन्या ही संधी सोडणार्‍यातला नव्हता.

‘ओ सावंत, तुमचा हा युक्तिवाद चाळीबाहेरच ठेवा. काहीही झालं, तरी देशकराच्या चाळीला एक परंपरा आहे. आपल्या परंपरेत या गोष्टी बसत नाहीत,’ मन्या गुरगुरला. दादा पारसेकरांनी मन्याकडे कौतुकाने बघितलं. मन्याचा हा आवेश बघून इतर चाळकरीही ‘हे खपवून घेतलं जाणार नाही, हे आपल्या चाळीत चालणार नाही,’ असा गलका करायला लागले. एव्हाना बंड्याच्या मानेला चांगलीच रग लागली होती. पण दादा आपली पकड ढिली करायला तयार नव्हते. त्यांच्या मागे तोरसेकर, पाटोळे, सानेदेखील इतर मुलांचे हात पकडून होते. सावंत युक्तिवादात एकटे पडत आहेत, असं बघून बेंद्रे पुढे सरसावले.

‘हे पाहा, आमच्या मुलांना चांगल्या वाईटाची जाण आहे. त्यांच्याकडे रमची बाटली सापडली, म्हणजे त्यांनी ती रम प्यायली, असा अर्थ होत नाही. बाटली सापडण्यात काही गैर नाही ना.’ ‘ओ राव, दारूबंदी कायदा आहे म्हणावं. बाटली सापडणंही गंभीरच आहे.’ 13 नंबरच्या खोलीतील परब म्हणाले. परबांचा आवाज ऐकून कटकोळांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. दारूबंदी लागायच्या आधी नाक्यावरच्या गुत्त्यावरून अनेकदा कटकोळांनीच परबांना सुखरूप घरी आणून सोडलं होतं. दारूबंदी लागल्यानंतरही एक-दोन वेळा परबांच्या घरून बरळण्याचे आवाज ऐकू आले होते. पण ते बोलायची वेळ नव्हती. कारण ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं. ‘मग दादा, काय करायचं म्हणता या पोरांचं? ढकलून द्यायचं का गच्चीतून?’ जन्या बापटचे बाबा म्हणाले.

‘केश्या, यांना ढकलून द्यायला मी काय यांच्या जीवावर उठलो की काय? पण आधी छडा लावला पाहिजे की ही बाटली आली कुठून? आणखी कोणाकोणाच्या घरात या बाटल्या आहेत?’ दादा म्हणाले. दादांनी हा मुद्दा काढल्यावर मात्र परबांनी मागच्या मागे काढता पाय घेतला. कारण परबांच्या सांगण्यावरून बंड्या सावंतने त्यांनाही एक बाटली नुकतीच मिळवून दिली होती. फक्त परबांचेच नाही, तर इतरही अनेकांचे चेहरे गोरेमोरे झाले. खुद्द दादा पारसेकरांच्या अन्याचीही बोबडी वळली.

वास्तविक या बाटल्या चाळीतल्या मागच्या भिंतीजवळच्या गेटमधून आत येतात, हे गुपित दादांनाही माहीत होतं. आत्ता तपास केला, तर कोणाकोणाच्या घरी बाटल्या मिळू शकतील, हेदेखील त्यांना निश्चित सांगता आलं असतं. समोरच्या लोकांचे गोरेमोरे झालेले चेहरे त्यांच्याही नजरेतून सुटले नव्हते. पण साने, पाटोळे, तोरसेकर आणि त्यांनी ठरवूनच सावंत, बेंद्रे, बापट आणि कटकोळांच्या मुलांना पकडलं होतं. त्यामुळे त्यांना ही गोष्ट फार ताणावी की नाही, हे कळत नव्हतं.

‘मी काय म्हणतो, चाळीतल्या प्रत्येकाला सुपारीच्या खांडापासून गांजाच्या चिलिमीपर्यंत काय ना काय व्यसन आहेच ना? दादांना तरी बिडीचं व्यसन कुठे सोडवता येतंय,’ नानू परांजपे पहिल्यांदाच मोठ्याने बोलला आणि सगळे चिडीचूप झाले. सगळे आपापल्या सोयीने पुटपुटत आपापल्या मार्गाने चालते झाले. जाता जाता सावंतांनी बंड्याच्या कानशिलात लगावलेली सगळ्या चाळीने पाहिली. आपला नैतिक विजय झाला, या समाधानाने दादांनी घरी गेल्यावर संडासात जाऊन एक बिडी शिलगावली आणि सगळ्या चाळीत रात्रीची शांतता पसरली.

हे प्रकरण झाल्यानंतर काही दिवस चाळीच्या मागच्या गेटाजवळची वर्दळ कमी झाली. पहिल्या मजल्यावरच्या संडासाजवळून येणार्‍या बिड्यांचा वास बंद झाला, मागच्या चौकात पडणारी सिगारेटची थोटकं मिळेनाशी झाली आणि बंड्या सावंताची गँगही संध्याकाळच्या वेळी चाळीत दिसेनाशी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -